वाक्यांविषयीची वाक्ये
गेल्या अंकात प्रसिद्ध झालेला या लेखमालेचा पहिला पाठ ज्यांनी वाचला असेल अशा वाचकांपैकी अनेक वाचकांचे त्याने समाधान होणार नाही. ते म्हणतील : ‘तत्त्वज्ञान म्हणून तुम्ही दुसरेच काहीतरी आमच्या गळी उतरवीत आहात. आम्हाला तत्त्वज्ञानाची फारशी माहिती नसेल, पण आम्हाला इतके नक्की माहीत आहे की तुम्ही सांगता ते तत्त्वज्ञान नव्हे. तत्त्वज्ञान म्हणजे दृश्य जगाच्या मागे किंवा पलीकडे असणारे अदृश्य किंवा अतींद्रिय सत् त्याचे ज्ञान असे आम्ही ऐकले आहे. तसेच आम्ही हेही ऐकले आहे की तत्त्वज्ञान म्हणजे ज्याला अध्यात्म म्हणतात तेः म्हणजे आपल्या आत्म्याच्या खच्या स्वरूपाविषयीचे ज्ञान. पण तुम्ही जे सांगत आहात त्यात या दोन्ही गोष्टींचा पत्ता नाही. तेव्हा खरी गोष्ट काय आहे याचा आधी खुलासा करा, आणि मग पुढे जा.
ही तक्रार बहुतेक वाचक करतील याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि ते स्वाभाविकही आहे. कारण तत्त्वज्ञान या विषयासंबंधीचे पूर्वापार चालत आलेले आणि समाजात प्रचलित झालेले मत असेच आहे की आपल्या दैनंदिन अनुभवाला येणारे जग पूर्णपणे खरे जग नसून खर्यात जगाची ओळख करून देणे, आणि तसेच आपल्या आत्मस्वरूपाविषयीचे खरे सत्य सांगणे हे तत्त्वज्ञानाचे काम आहे. हे खरे आहे. परंतु अलीकडचे तत्त्वज्ञ तत्त्वज्ञान म्हणजे वरील प्रकारचे ज्ञान असे मानीनासे झाले आहेत. याचे कारण वर उल्लेखिलेले पारंपरिक शोध निष्फळ आहेत असे आढळून आले आहे. त्या प्रकारचे ज्ञान प्राप्त करून घेणे मानवी शक्तींच्या आटोक्यात नाही. ते प्रश्न सोडविण्याचे सामर्थ्य मानवी बुद्धीत कसे नाही ते आपण पुढे केव्हा तरी पाहू. तूर्त आपण गृहीत धरून चालूया की तत्त्वज्ञानाचे ते प्रश्न सोडविणे अशक्य असल्यामुळे त्यांच्या वाटेला न जाता, जे प्रश्न आपल्या आटोक्यातआहेत असे वाटते त्यांचाच फक्त विचार अलीकडे केला जातो.या दुसऱ्या पाठात आपण प्रथम काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द समजावून घेऊ.
वाक्य आणि विधान
वाक्य आणि विधान यांतील भेद आपण गेल्या पाठात अंशतः पाहिला आहे. तो म्हणजे वाक्ये फक्त विधाने व्यक्त करीत नाहीत. विधानांखेरीज वाक्यांनी प्रश्न, आज्ञा, विनंती इत्यादि गोष्टीही व्यक्त होतात. म्हणजे काही वाक्ये विधानार्थी (म्हणजे विधाने व्यक्त करणारी) असतात, काही प्रश्नार्थी असतात, काही आज्ञार्थी असतात, इत्यादि. वाक्ये आणि त्यांनी व्यक्त होणार्याक विधान, आज्ञा, प्रश्न, इत्यादि गोष्टी यांतील एक महत्त्वाचा भेद हा आहे की वाक्य ही शब्दांची बनलेली, म्हणजे शब्दमय किंवा भाषिक वस्तू आहे, परंतु विधान, प्रश्न, आज्ञा इत्यादि गोष्टी शब्दमय किंवा भाषामय नाहीत. हे म्हणणे सकृद्दर्शनी चमत्कारिक वाटेल, पण थोड्या विचारानंतर ते तसे नाही हे लक्षात येईल. आपण वाक्य आणि विधान या जोडीचा तूर्त विचार करू. वाक्य हे शब्दांचे बनलेले असते ही गोष्ट स्पष्ट आहे. पण त्यामुळे वाक्य हे कोणत्यातरी एका भाषेचा भाग असते हे मान्य करावे लागते. कोणतेही वाक्य हे मराठी असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, किंवा इतर अगणित भाषांपैकी कोणत्याही एका भाषेतील वाक्य असेल; परंतु त्या वाक्याने जे विधान व्यक्त होते ते मराठी किंवा इंग्लिश असते असे म्हणणे चमत्कारिक दिसते. कारण एका भाषेत व्यक्त झालेले विधान अन्य कोणत्याही भाषेत व्यक्त होऊ शकते. पृथ्वी गोल आहे या मराठी वाक्याने व्यक्त होणारे विधान ‘The earth is round’ या इंग्लिश आणि ‘Die Erdcistrundया जर्मन भाषेतील वाक्यांनीही व्यक्त होते. म्हणजे तेथे वाक्ये तीन आहेत, पण विधान मात्र एकच आहे. विधानाला स्वतःची भाषा नसल्यामुळे ते कोणत्याही भाषेत व्यक्त होऊ शकते, आणि एका भाषेतील वाक्याचे भाषांतर अन्य भाषांत होऊ शकते.
वाक्य आणि विधान यांमधील एक महत्त्वाचा भेद असा आहे की वाक्याला अर्थ असतो; कारण वाक्य शब्दमय असते, आणि शब्दांना अर्थ असतो. ज्याला अर्थ नाही तो शब्द नव्हे. वाक्याचा अर्थ म्हणजे विधान. आता वर म्हटल्याप्रमाणे विधान शब्दमय नसते, आणि म्हणून विधानाला अर्थ नसतो. विधान सत्य किंवा असत्य असते. म्हणजे त्यात वस्तुस्थितीचे यथार्थ किंवा अयथार्थ वर्णन असते. वस्तुतः ‘सत्य’ आणि ‘असत्य’ ही विशेषणे वाक्याला लागू पडत नाहीत. परंतु विधानार्थी वाक्ये एका विस्तारित अर्थाने सत्य किंवा असत्य असतात असे म्हणता येईल. म्हणजे ‘सत्य’ आणि ‘असत्य’ या विशेषणांचे मूळ विशेष्य विधान, पण ते व्यक्त करणारे वाक्यही ‘सत्य’ किंवा ‘असत्य असे म्हटले जाऊ शकते.
वाक्यांविषयीची वाक्ये
वाक्ये शब्दांची बनलेली असतात, आणि प्रत्येक शब्द हा कशाचे तरी चिन्ह किंवा वाचक असतो. आपण जेव्हा भाषा वापरतो तेव्हा आपण तिच्यातील शब्दांविषयी बोलत नसून, त्यांच्या अर्थाविषयी बोलत असतो. ‘गुलाब सुवासिक आहे’ हे वाक्य आपण उच्चारतो तेव्हा आपण गुलाब या फुलाच्या वासाबद्दल बोलत असतो, ‘गुलाब’ या शब्दाविषयी नव्हे, कारण शब्दाला वास नसतो. ‘मनुष्य मर्त्य आहे’ हे वाक्य उच्चारताना आपण मनुष्य या प्राण्याबद्दल विधान करीत असतो, ‘मनुष्य’ या शब्दाबद्दल नव्हे. परंतु सामान्यपणे जरी आपण शब्दांनी वाचित वस्तूंविषयी बोलत असलो, तरी क्वचित आपल्याला एखाद्या शब्दाविषयी किंवा वाक्याविषयीही बोलायचे असते. उदाहरणार्थ, व्याकरणात आपण शब्दांविषयीबोलत असतो. ‘मनुष्य’ हे सामान्य नाम आहे, हे वाक्य एका शब्दाविषयी आहे, आणि ‘मनुष्य मर्त्य आहे’ हे वाक्य केवल वाक्य आहे हे वाक्य एका वाक्याविषयी आहे.
आता जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूविषयी बोलायचे असते तेव्हा आपण त्या वस्तूचे नाव वापरतो. उदा. पृथ्वी हे सूर्याभोवती फिरणाच्या एका ग्रहाचे नाव आहे, आणि म्हणून त्या ग्रहाविषयी आपल्याला बोलायचे असते तेव्हा आपण त्याचे नाव-पृथ्वी हे वापरतो. आता जर आपल्याला पृथ्वीविषयी बोलायचे नसून तिच्या नावाविषयी, म्हणजे पृथ्वी या शब्दाविषयी, बोलायचे असेल तर आपल्याला त्या नावाचे, म्हणजे त्या शब्दाचे नाव वापरावे लागेल. आता कोणत्याही शब्दाचे नाव काय आहे याचा शोध करावा लागू नये म्हणून तत्त्वज्ञांनी एक सोय करून ठेवली आहे. एखाद्या शब्दाचे नाव लिहायचे असेल तर तो शब्द अवतरण- चिन्हांमध्ये घालायचा. उदा. ‘पृथ्वी हे पृथ्वी या शब्दाचे नाव आहे. म्हणून जेव्हा आपल्याला पृथ्वी या शब्दाविषयी बोलायचे असेल तेव्हा आपण ‘पृथ्वी असे लिहायचे. उदा. ‘पृथ्वी हे सामान्य नाम आहे. तसेच ‘गाय दूध देते’ आणि ‘गाय’ दोन अक्षरी आहे या दोन वाक्यापैकी पहिले गाय या वस्तूविषयी, तर दुसरे ‘गाय’ या शब्दाविषयी आहे हे सहज लक्षात येईल.
जसे आपण व्याकरणात शब्दांविषयी आणि वाक्यांविषयी बोलतो तसेच तर्कशास्त्रातही आपल्याला करावे लागते. तर्कशास्त्राचा विषय तर्क किंवा अनुमान हा आहे. जेव्हा आपण एखादे अनुमान करतो तेव्हा आपण एका किंवा अनेक उपलब्ध ज्ञानांपासून नवे ज्ञान प्राप्त करती असतो उदा. पुढील अनुमान पहाः
त्या पर्वतावर अग्नि आहे, कारण त्यावर धूर आहे, आणि जेथे जेथे धूर असतो तेथे तेथे अग्नि असतो. येथे आपण पर्वतावरील धूर प्रत्यक्ष पाहात असतो, म्हणजे त्याचे ज्ञान आपल्याला डोळ्यांनी झालेले असते, आणि जेथे धूर तेथे अग्नि ह्या नियमाचे ज्ञान पूर्वानुभवाने आपल्याला अगोदरच मिळालेले असते. या दोन प्राप्त ज्ञानावरून पर्वतावर अग्नि आहे हे अप्राप्त ज्ञान आपण अनुमानाने मिळवितो. आता हे अनुमान वैध (valid) किंवा निर्दोष आहे हे उघड आहे; म्हणजे त्यातून मिळालेला निष्कर्ष हा बरोबर निष्कर्ष आहे. आता ‘अमुक अनुमान किंवा निष्कर्ष वैध आहे किंवा अवैध आहे’ हे वाक्य एका ज्ञानाविषयी आहे. पर्वतावर धूर आहे हे विधान पर्वत व धूर या दोन वस्तूंच्या परस्परसंबंधाविषयी आहे, परंतु “पर्वतावर अग्नि आहे” ‘हा निष्कर्ष वैध आहे हे विधान एका निष्कर्षाविषयी म्हणजे एका ज्ञानाविषयी आहे. ज्ञानाविषयी ज्ञान, किंवा वाक्याविषयी वाक्य अशा गोष्टींना द्वितीयस्तरीय गोष्टी म्हणतात. कोणत्याही वस्तूविषयीचे ज्ञान हे प्रथमस्तरीय ज्ञान, परंतु या प्रथमस्तरीय ज्ञानाविषयीचे ज्ञान म्हणजे द्वितीय स्तरीय ज्ञान. तर्कशास्त्रात अनुमानांचा म्हणजे प्राप्त ज्ञानांपासून अप्राप्त ज्ञानाच्या केलेल्या तर्काचा अभ्यास केला जातो. म्हणून तर्कशास्त्र हा द्वितीय स्तरीय अभ्यास झाला. पर्वताविषयी अभ्यास करणारे भूस्तरशास्त्र हे वस्तुविषयक शास्त्र आहे. ते प्रथमस्तरीय शास्त्र आहे. परंतु अनुमान किंवा तर्क या वस्तुविषयक ज्ञानाचा अभ्यास करणारे तर्कशास्त्र हे द्वितीयस्तरीय शास्त्र आहे.
‘मनुष्य मर्त्य आहे’ हे विधान मनुष्याविषयी आहे. पण “मनुष्य मर्त्य आहे हे विधानसर्थ्य आहे हे दुसरे विधान पहिल्या विधानाविषयी आहे. ‘सत्य’ आणि ‘असत्य ही विशेषणे विधानांची विशेषणे आहेत. म्हणून ज्या विधानांत ‘सत्य’ आणि ‘असत्य’ ही विशेषणे येतातती सर्व द्वितीयस्तरीय विधाने होत, कारण या सर्व विधानांत कोठलीतरी प्रथमस्तरीय विधाने ‘सत्य’ किंवा ‘असत्य’ आहेत असे विधान केलेले असते. तत्त्वज्ञानाची तर्कशास्त्र ही एक शाखा. त्याची दुसरी शाखा ज्ञानमीमांसा (epistemology). या शाखेत ज्ञानाचे स्वरूप, त्याचे प्रकार, त्याची उगमस्थाने, ज्ञानाचे प्रामाण्य (म्हणजे त्याचे सत्यत्व किंवा असत्यत्व),ज्ञानाचा विस्तार आणि मर्यादा इतक्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. ज्ञानाचा हा अभ्यास अर्थातच द्वितीयस्तरीय आहे हे सांगणे नकोच. त्याच्या तुलनेत निसर्गाचा, त्यांच्या अंगोपांगांचा अभ्यास करणारी पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादि शास्त्रे (विज्ञाने) प्रथमस्तरीय अभ्यास होत.
स्थूलमानाने सांगायचे तर तत्त्वज्ञान हा द्वितीयस्तरीय अभ्यास आहे.
जगाचे ज्ञान म्हणजे विज्ञान
आपण ज्या जगात वावरतो त्याचे बरेचसे ज्ञान सामान्य म्हणजे अशिक्षित किंवा अतज्ञ मनुष्यालाही असते. पण हे ज्ञान तुटपुंजे, जुजबी, सुटे आणि अव्यवस्थित असते. त्याच जगाचे निश्चित आणि व्यवस्थित ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न विज्ञानात केला जातो. विज्ञानाची जगाचे ज्ञान मिळविण्याची रीत म्हणजे divide and rule ची, म्हणजे जगाचे अनेक विभागांत विभाजन करून एकेका विभागाचा अभ्यास विज्ञानाच्या एकेका शाखेने करावयाचा. पदार्थाचा भौतिक अंगाने अभ्यास पदार्थविज्ञानशास्त्रात होतो तर रासायनिक अंगाने रसायनशास्त्रात होतो. जिवंत वस्तूंचा अभ्यास जीवशास्त्रात, मनाचा मानसशास्त्रात, इ. याप्रमाणे सर्व विज्ञाने मिळून सबंध जगाचा, त्याच्या सर्व अंगोपांगांचा अभ्यास करतात. परंतु एकही विज्ञान संपूर्ण जगाचा, म्हणजे जगाच्या सर्व अंगांचा, अभ्यास करीत नाही.
जगाचे पूर्ण सत्यज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान?
काही लोक असे मानतात की विश्वाची काही अंगे इंद्रिये आणि तर्कया ज्ञानसाधनांनी जाणता येत नाहीत. विज्ञानाची सर्व भिस्त इंद्रियानुभव आणि त्यावर आधारलेला तर्क या दोहोंवर असल्यामुळे ही अंगे विज्ञानाच्या आटोक्यात येत नाहीत. पण ही अंगे ज्या साधनांनी जाणता येतात अशी साधने माणसाजवळ आहेत असे हे लोक सांगतात. या साधनांना साक्षात्कार व आप्तवचन किंवा शब्दप्रमाण अशी नावे असून त्यांच्या साह्याने बरेचसे तथाकथित तत्त्वज्ञान अनेक तत्त्वज्ञांनी उपलब्ध करून ठेवले आहे. या तत्त्वज्ञानाला ‘अतिभौतिकी (metaphysics) या शब्दाच्या अनेक अर्थापैकी एका अर्थाने अतिभौतिकी म्हणता येईल. असे ज्ञान मनुष्याला प्राप्त होऊ शकते काय हा एक कूट प्रश्न असून त्याचा विचार आपण पुढे केव्हा तरी करू. असे तत्त्वज्ञान शक्य असल्यास ते जगाचे कोणत्याही विज्ञानाप्रमाणे प्रथमस्तरीय ज्ञान होईल.