संपादक,आजचा सुधारक,
स.न.वि.वि.
प्रा. रूपा कुलकर्णी ह्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्याचे वाचले. त्यांचे अभिनंदनसुद्धा केले गेले. वास्तविकरीत्या आपण ज्या देशाचे नागरिक आहोत, त्या देशाच्या घटनेचे आणि इतर कायदेकानूंचे पालन केले की, ह्या पृथ्वीतलावर सुखाने जगण्यास ते पुरेसे आहे.
भारताच्या घटनेनुसार धर्म ही ज्याची त्याची खाजगी बाब आहे. व्यक्ती कोणत्या धर्माची आहे, ह्याच्याशी शासनाला कर्तव्य नाही. सर्वच धर्म पारलौकिक समाधान कशा प्रकारे मिळावे ह्यासाठी आहेत. इहलौकिक समाधानासाठी धर्माची जरुरी नाही.
ज्येष्ठ नागरिक नात्याने इंग्रजी म्हण सांगावयाची झाली तर व्यक्ती वयाच्या साठीनंतर शहाणी झाली असे समजतात. त्या दृष्टिकोनातून विचार केल्यास हिंदू धर्माव्यक्तिरिक्त इतर सर्व धर्माचे संस्थापक साठीला आलेलेसुद्धा नव्हते. त्यांचे अनुभव कमी होते. तसेच त्या त्या धर्माचे पवित्र ग्रंथ, धर्मसंस्थापकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी ग्रथित केले आहेत. अनुयायांनी धर्मसंस्थापकाचे विचार शंभर टक्के बिनचूक ग्रंथित केले असतील ह्याची खात्री देता येत नाही.
हिंदू धर्म लवचीक आहे. अनेक वर्षांपासून त्यात फरक झाले. देव न मानणारा आणि पूजाअर्चा न करणारा हिंदू असू शकतो. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावाचून तिला देवपण येत नाही. इतर धर्म असे लवचीक नाहीत. जास्त कर्मठ (rigid) आहेत. क्रियाकर्म, पोषाख, इ.ना. जास्त महत्त्व आहे. दोनचार धार्मिक ग्रंथ पाठ केलेल्या अविद्वानांपुढे नतमस्तक होणे हाच जर धर्माचा अर्थ असेल तर तो धर्म कोणताही असला तरी काय फरक पडणार?
जगाच्या इतिहासाचा अभ्यास केला तर कोणत्याही शासनकर्त्यांनी कोणत्याही धर्माचे निखालसपणे पालन केल्याचे दिसत नाही. अशा प्रकारे विचार केल्यावर एका धर्मातून दुसर्या धर्मात जाण्याने एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वांत फरक तो काय पडणार आहे? नवबौद्ध जनता आणि त्यांच्या पुढार्यांच्या जीवनमानांत फरक पडल्याचे जाणवत नाही.
त्यापेक्षा रूपा कुलकर्णीनी आगरकरांच्या बुद्धिप्रामाण्यवादाच्या कार्यास वाहून घ्यावयास हवे होते. शिवाजी, टिळकांचे स्वराज्याचे काम संपले आहे. धर्म आणि धर्मांधता वाढत असताना आगरकर आणि रघुनाथ कर्व्यांचे कार्य निष्ठेने करणारे विद्वान कमी आहेत. समाजाला निखळ बुद्धिप्रामाण्य शिकविणार्या निधड्या छातीच्या आगरकरांची जरुरी आहे.
एका धर्माच्या जोखडाखालून दुसर्या धर्माचे जोखड घेणार्यांपासून समाजाचा फायदा नाही. कळावे.
- केशवराव जोशी