गोष्ट पासष्टीची, ले. शांता किर्लोस्कर, वितरक – मौज प्रकाशन गृह, गिरगांव, मुंबई -४, किंमत रु. १५०/
किर्लोस्कर खबर १९२० च्या जानेवारीत निघाले तेव्हा ते अक्षरशः चारपानी चोपडे होते. त्याच्या ३०० प्रती काढल्या आणि ‘आप्तमित्र, ग्राहकबंधूंना वाटल्या. जगप्रसिद्ध फोर्ड या मोटार कारखान्याचे फोर्ड टाइम्स हे मासिकपत्र पाहून शंकररावांना स्फूर्ती झाली आणि ही खबर निघाली. पुढे हे मासिक वाढतच गेले. दहा वर्षांनी स्त्री आणि आणखी चार वर्षांनी चौतीस साली मनोहर असा परिवार वाढला. मासिकांच्या विकासाची ही कहाणी मोठी आहे. चांगली पासष्ट वर्षांची. १९८४ साली सामाजिक परिवर्तनाचे एवढे काम केलेली ही संस्था एखाद्या मालमत्तेसारखी विकली गेली. ‘हस्तांतरित झाली’ हे शब्द बोचत नाहीत, पण अर्थ तोच. ‘उद्योग, उत्साह आणि उन्नती’ या सूत्रांची गरज सरली की ऐहिक उत्कर्ष हवा, पण इहवादी नीती नको असे झाले? किर्लोस्कर मासिकांच्या पासष्टीची गोष्ट सांगितली आहे खुद्द शांताबाई किर्लोस्करांनी. ही आपली आत्मकथा नाही याचे त्यांना पूर्ण भान आहे. पण ही एका सामाजिक कार्याची आत्मकथा आहेच. एका संस्थेशी एकरूप झालेल्या कुटुंबाची, कुटंबीयांच्या कर्तृत्वाची हकीकत आहेच.
१९४३ साली शांताबाईचे मुकुंदरावांशी लग्न झाले. ते पर्यायाने ‘किर्लोस्करा’शीच, १९८३ साली साठी गाठल्यावर त्या मासिकांच्या सेवेतून निवृत्त झाल्या खर्या, पण पुन्हा सहा वर्षे खपून अडीच हजारांहून अधिक अंक वाचून, टिपणे काढून त्यांनी हे लेखन सिद्ध केले आहे.
शांताबाईंनी ही गोष्ट लिहिताना म्हटले ते अगदी खरे आहे. आज साठीतला मराठी माणूस घडवण्यात या मासिकांचा मोठाच वाटा आहे. प्रस्तुत परिचय लेखकाचा किर्लोस्कर हा बालपणीचा जुना ज्येष्ठ सोबती आहे. अगदी ‘पत्र नव्हे, मित्र’ या शैलीतला. फ्रेंड, फिलॉसफर अँड गाईड. पुढे तेवढा सहवास राहिला नाही. तरी किर्लोस्करचे हस्तांतर झालेया घटनेवर त्याचा विश्वास बसेना. आणि बसला तेव्हा ही गोष्ट त्याला लागून गेली.
वर्हाडातल्या एका खेड्यात, दूर आडरानात जिथे बसचा रस्ता जात नव्हता अशा गावातल्या या आठवणी. जिथे इंग्रजी शाळा नव्हती, जिथले व्हिलेज पोस्ट ऑफिस म्हणजे शाळेच्या हेडमास्तरांचे घर. संध्याकाळी सडकेच्या गावावरून सहा मैलांवरून रनर पोस्टाची थैली आणी. गावात चार बुके शिकलेली चार पोरे जमत. तालुक्याला इंग्रजी शिकायला गेलेला, सुटीत गावी असलेला ह्या लेखकासारखा एखादाही त्यांत असे. संध्याकाळी फुटणारी थैली एक करमणुकीची गोष्ट असे. पंचक्रोशीतली डाक साँर्टिंग होताना मधेच एखादे जाडजूड, लंबेचवडे, गुळगुळीत, चकचकीत कव्हर असणारे पुस्तक निघे. त्याला नुसता हात लावायलाही मजा वाटायची. पोस्टमास्तर-कम-गुरुजी रॅपर फाडत. ते मासिक पुस्तक कधी किर्लोस्कर, कधी स्त्री असायचे. याचे कुतूहल गुरुजींच्या ध्यानात येई. गुरुजी तरुणपणापासून वाचनाचे शौकीन असावेत. त्यांच्या घरी एका मोठ्या खोक्यात किलोस्करचे जुने अंक असत. प्रस्तुत परिचयकर्त्यांची किर्लोस्करची ओळख अशी झाली. नंतर याच्या उन्हाळ्यामागून उन्हाळ्याच्या सुट्या, दिवाळीच्या सुट्या हा सुकामेवा फस्त करण्यात गेल्या. वाढाळू वयातले याचे भरणपोषण किर्लोस्करने केले. शांताबाईंनी म्हटले ते खरे आहे. आणि ते किलोस्कर आता किर्लोस्करांचे राहिले नाही हे कळल्यावर मन उदास झाले. उगीचच मोठे नुकसान झाले असे वाटले.
गुरुजींच्या घरच्या त्या खोक्यातला खजिना अमोल होता. अगदी अल्लादीनच्या चिरागासारखा. कारण तिथेच लेखकाने आयुष्यातली पहिली सफर मारली. नाथ एस्. गोडबोले आणि त्यांचे मित्र श्री चित्रे यांच्याबरोबर ‘चाकावरून जगाची चक्कर’ केली. इजिप्तचे पिरॅमिड्स याने पाहिले ते तेव्हाच. साहसकथा तरी किती प्रकारच्या! भानू शिरधनकरांनी सांगितलेल्या चित्तथरारक शिकारीच्या गोष्टी. कधी सर्कशीच्या गोष्टी. नेहमी काहीतरी नवे, भव्य-दिव्य करणार्या व्यक्तींच्या उत्साहवर्धक हकीकती. उद्योग, उत्साह आणि उन्नती या ब्रीदवाक्याला साजेशा. तिथेच त्याने त्रिखंड प्रवास आणखी एकाबरोबर केला. हे होते महर्षि धोंडो केशव कर्वे. युरोप, अमेरिका आणि जपानमधील स्त्रियांच्या शिक्षणसंस्था पाहायला अण्णा निघाले होते. भारतात बालविधवांसाठी काढलेल्या महिलाश्रमाची माहिती तिथे ते देत. अमेरिकेत देणग्या मिळत. व्याख्यानाशेवटी देणग्यांसाठी हॅट फिरविली जाई. आपल्याकडे कीर्तनाअखेर आरतीचे तबक फिरवतात तसे. गुरुजींच्या त्या खोक्यात सावरकरांचे सामाजिक विचार धुळीखाली दडलेले आढळले. एकापेक्षा एक गाजलेले निबंध, एक मजेदार शीर्षक आठवते : ‘पाहिजे, आमचा रंग बदलविणारा पाहिजे!‘आमच्यात लाख गुण असोत पण एका काळ्या रंगाने आमचा घात केला आहे. आता विज्ञान भूवर अवतरले आहे. निघो कोणी वैज्ञानिक, जो आमचा कृष्णवर्ण बदलवील. या कोणीतरी पुढे, घ्या हे आव्हान. काढा आमचा वर्ण बदलविण्याची किमया शोधून. असे काहीतरी सावरकरांनी सांगितले होते त्यात. तो वीर म्हणेः देवाला प्रश्न विचारा, संकटांचे निवारण केले म्हणून सत्यनारायण जर करायचा तर आधी त्याने तुम्हाला संकटात ढकललेच का? गाय फक्त एक उपयुक्त पशू. तिचे शेणमूत पवित्र म्हणून पिणे ही हतबुद्धतेची कमाल आहे.
एकेक लेख म्हणजे बुद्धिवादाचे बाळकडूचं. अद्यावत व्हा. विज्ञानाची उपासना. परंपरेला दृढ चालवावे असे आंधळे गाणे गाऊ नका. ‘कृण्वन्तो विश्वं आर्यम्’ अशा पोकळ घोषणांना अर्थ नाही. जुनी मूल्ये ‘पुज्य की पूज्य’ याची चिकित्सा करा. असा विवेकवादाचा तिसर्या-चवथ्या दशकापासून लावलेला सूर तेथे लागला. गुरुजींच्या त्या खोक्यातच याने सर्वप्रथम उपासनी महाराजांना पाहिले. साकोरीच्या मठातील त्यांचे चाळे, स्त्रियांकडून लिंगपूजा करवून घेण्याची उपासना, पुरुषभक्तांना हा बुवा लुगडी नेसायला लावी. बांगड्या भरायला लावी. गोदावरी नावाच्या आपल्या पट्टशिष्येला हाताशी धरून, त्याने अनेक कुमारिकांशी लग्ने लावली. हातात बाळकृष्ण घेऊन. स्त्रियांसाठी पिंजरे केले. त्या पिंजर्यातल्या बायकांची चित्रे लेखात असत. हे सगळे किळसवाणे प्रकार आपण केल्याची चक्क कबुली त्याने कोर्टात दिलेली. महादेवशास्त्री दिवेकर यांनी लेखामागून लेख लिहून केलेले हे दंभस्फोट!
एका दिवाळीच्या सुटीत त्याला दाजी भेटला तो तिथेच. नरकचतुर्दशीला सुगंधी तेलाऐवजी फिनेल आणि एरंडेल आणून आंतर्बाह्य स्वच्छतेचा धडा देणारा दाजी. विक्षिप्त, भाबडा! तो व्याख्यानमालेला शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी शीघ्रकाव्य करतोः
असेच चाले ज्ञानसत्र हे सालेच्या साले।
अध्यक्षासह श्रोतेवक्ते मरूनि जरी गेले।।
या विनोद विडंबनाची आणखी एक गोष्ट, द्वितीय महायुद्धाच्या काळात मुंबईकरांना सगळ्या गोष्टींचे रेशनिंग. सर्वत्र मोठमोठ्या रांगा लागलेल्या असत. घरगड्यांचा असाच तुटवडा पडला अशी कल्पना करून एक प्रहसन आले होतेः मोठा क्यू, लेखक त्यात उभाराहातो. क्यू कशासाठी हे पुढच्याला विचारतो. ते त्यालाही माहीत नसते. पण काहीतरी दुर्मिळ गोष्ट असणार अशा विचाराने तो पुढे पुढे सरकत जातो. शेवटी एका खोलीत इंटरव्ह्यू चाललेला असतो. एक तगडा रामागडी भांडी घासण्याच्या कामासाठी कोणाला वेळा द्यायच्या नि कोणाला नाही यासाठी मुलाखती घेतो. लेखकाने पहिल्या सलामीतच रामागड्याला जिंकले. त्याच्या पिळदार दंडांचे कौतुक केल्यामुळे खूष होऊन तो याला वेळ देतो. वेळ गैरसोयीची पण लेखक घेतो. ‘शेकरेटरी भांडी वेळेवर तयार ठेवत जा’ म्हणून वारनिंग देतो. नंतर चारदोन दिवस सेक्रेटरी मोटर सायकलवर पुढे नि रामागडी मागे असे येणे चालते. एक दिवस वेळेवर भांडी तयार नाहीत हे पाहून ते भांडी घासणारे साहेब ‘अपाइनमेंट क्यांसल’ करायला सांगून तणतणत फटफटीवरून निघून जातात.
दादा कोंडकेंनी सादर केलेली प्रहसने पुढे पुष्कळ पाहिली. पण असा निर्मळ विनोद क्वचित.
गुरुजींच्या त्या खोक्यात कोण कोण भेटले म्हणून सांगावे? पिरोज आनंदकर आणि लीला मस्तकार रेळे. वाटे काय चमत्कारिक नावे ही. ‘युद्धस्य कथा रम्या’ म्हणून युद्धकथा असत. कोयना धरण, भाषावार प्रांतरचना यासारखे लेख असत. ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत एवढा ठसा मनावर उमटे. गोष्ट पासष्टीची वाचताना अधून मधून असा आठवणींचा समांतर प्रवास चालत राहातो.
शंकरराव किर्लोस्कर या मासिकांचे विधाते, वर्धक आणि दिग्दर्शक. वीस साली त्यांनी ‘आळस अवघाचि दवडावा । यत्न उदंड करावा।।” हे रामदासी वचन शिरोधार्य मानून मासिकांच्या माध्यमातून कामाला आरंभ केला. चारपानी मासिकाची पृष्ठसंख्या दहा महिन्यात बारा झाली. दोन वर्षात बाराची सोळा आणि वार्षिक वर्गणी सव्वा रुपया झाली. चार वर्षात म्हणजे चोवीस साली वर्गणीदारांची संख्या ७००० वर पोचली. किरकोळ अंकविक्री वेगळी. पुढे मुकुंदरावांच्या नेतृत्वाखाली मासिके किलोस्करवाडीहून पुण्याला गेल्यावर दोन वर्षांनी म्हणजे १९६१ मध्ये किलोस्कर २७,५६३, स्त्री२३,२२३ आणि मनोहर ९,२९५ असे खपाचे उच्चांक गाठले. स्त्री ने तर मराठी नियतकालिकांच्या इतिहासात खपाचा विक्रम केला. १९३० च्या ऑगस्टमध्ये निघालेल्या या मासिकाने अवघ्या तीन वर्षात दहा हजारांचा पल्ला गाठला होता. या अपूर्व यशाचे रहस्य काय?
१९२५ मध्ये एक वर्ष इंग्लंडमध्ये विक्रीकलेचे उच्चशिक्षण घेऊन शंकरराव परतले होते. पण व्यवसायनिष्ठा आणि सामाजिक दृष्टी हे गुण त्यांच्या अंगचेच होते यात शंका नाही.
हे मासिक दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बिनचूक प्रकाशित होईल, ह्या पहिल्या अंकातल्या घोषणेत त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही.
– लेखकाला, कवीला, मोबदला हा दिलाच पाहिजे हा दुसरा नियम त्यांनी काटेकोरपणे पाळला. त्याबद्दल साक्षात् श्रीपाद कृष्ण आणि स्वातंत्र्यवीरांनी त्यांची प्रशंसा केली आहे.
१९२८ च्या दिवाळी अंकात कोल्हटकरांचे महाराष्ट्रगीत नोटेशनसह प्रसिद्ध झाले. त्यावर ते म्हणतात : ‘तुम्ही माझी कविता छापलीत आणि शिवाय वर मला प्रेमोपहार (एक रुपया) पाठविला ही मोठी आनंदाची आणि नवलाची गोष्ट आहे. सावरकरांनी लिहिले. ‘लेखकांच्या मानधनाबद्दल’ संपादकांची खळखळ हा सर्वांचा अनुभव आहे. पण किर्लोस्करांची खळखळ अंकापाठोपाठ डाकवाला आणून देतो.’
शंकररावांनी ही मासिके शुद्ध ध्येयवादाने चालविली असा कुणाचाच दावा नाही. पण त्यांच्याजवळ एक विशिष्ट दृष्टी होती. ऐहिक उत्कर्ष साधायचा आणि इहवादी नीतीची कास सोडायची नाही ह्या नवमतवादाचा पुरस्कार त्यांना करायचा होता. आपला मराठी साहित्याशी परिचय बेताचाच होता हे त्यांनी आत्मचरित्रात सांगितलेच आहे. किर्लोस्करवाडीच्या माळावर बसून पत्रलेखनाच्या कौशल्याद्वारे त्यांनी साहित्य गोळा केले.लेखकांचे मेळावे भरवून जिव्हाळा निर्माण केला. अनेक नवनवे उपक्रम करून संपादनात कल्पकता आणली. गुणी, होतकरू लेखक हेरून त्यांना संपादकीय खात्यात आणले. आपली मासिके ही संस्था आणि त्यातील कर्मचारी हे एक मोठे संयुक्त कुटुंब बनविले.
या मासिकांच्या वाढीला शांताबाईच्या मातोश्री आनंदीबाई यांचाही हातभार लागला आहे. किर्लोस्करवाडीच्या शाळेत शिक्षिका म्हणून आलेल्या आनंदीबाई विधवा होत्या. पतिनिधनानंतर अण्णासाहेब कर्वे यांच्या सांगण्यावरून वडिलांनी त्यांना सेवासदनमध्ये घातले. एका शाळेत शांताबाई आणि दुसर्या शाळेत आनंदीबाई अशा बरोबर शिकल्या. किर्लोस्करवाडीला त्यांचा शंकररावांशी दुसरा विवाह झाला. १९४२ मध्ये त्या वारल्या. चार वर्षेच त्यांना हे सहजीवन लाभले, पण तेवढ्यात स्त्री मासिकाच्या संपादनावर त्यांनी आपला ठसा उमटवला. स्त्रियांच्या चळवळी आणि त्यांच्यावरील अन्याय यावर त्यांचे लक्ष असे. मगरीच्या मगरमिठीतून सुटका या लेखातून त्यांनी पुण्यातील कुटंणखान्यात बंदिस्त स्त्रियांच्या व्यथांना वाचा फोडली होती. स्वतः त्या दुर्दैवी स्त्रियांना भेटून त्यांना बोलते केले होते. त्याबद्दल खुद्द ज्ञानप्रकाशच्या संपादकांनी ‘तुमचा खरोखर जाहीर गौरव व्हायला हवा’ म्हणून कौतुक केले होते. अनोळखी माणसांकडून लेखनसाहित्य मिळविण्याचे कौशल्य त्यांनी अनेकदा सिद्ध केले.
मुकुंदरावांची संपादकीय शैली वेगळी होती, त्यांना आर्थिक घडामोडी आणि राजकीय चर्चा यांत आवड होती. ते महाराष्ट्रभर भ्रमन्ती करून साहित्यिक लेखक जोडत. त्यांचेशी जिव्हाळ्याचे संबंध जोडत. किर्लोस्कर स्वत:ला ‘तरुण महाराष्ट्राचे पुरोगामी मासिक’ म्हणत. पण एकदा वाचकांच्या वयाच्या पाहणीत आढळले की सरासरी ४० च्या वरील वाचकसंख्याच जास्त आहे. तेव्हा जानेवारी १९६९ नंतर विद्यार्थी आणि तरुणांसाठी युवक विभाग स्वतंत्र केला. परदेशी जाण्यासाठी तयारी, कमी खर्चात प्रवास असे विषय देऊ लागले. विविध भारतीय भाषांतील गाजलेल्या चित्रपटांच्या कथा येऊ लागल्या. मुकुंदरावांनी १९४६ मध्येच मासिके पुण्याला हालवावीत अशी योजना मांडली होती. ती १९५९ मध्ये अमलात आणली गेली. जुलै ५९ चा किर्लोस्कर एक तारखेला पुण्यातून निघाला. शांताबाईंनी स्त्रीच्या संपादनात चैतन्य तर आणलेच, पण स्वतः मार्मिक लेखनही केले.
शांताबाईंनी दरवर्षी एका प्रांतात प्रवास करून वाचकांना भारत दर्शन घडविले. १९४५ पासून ‘महिला जगत् हे सदर लोकप्रिय केले. पण १९७५ ह्या जागतिक स्त्री-वर्षात त्यांनी याहून महत्वाची लेखमाला लिहिली. तिचे पुढे ‘बायकांचा जन्म’ या नावाने पुस्तक निघाले. सिमॉन द बोव्हा या फ्रेंच लेखिकेची दोन पुस्तके जगभर गाजली होती. सेकंड सेक्स आणि नेचर ऑफ सेकंड सेक्स. हजार पानाची ही दोन पुस्तके. त्यांच्या १६ आवृत्या निघून लाख प्रति खपलेल्या. त्यांचा भावानुवाद हे त्यांचे अविस्मरणीय लेखन म्हटले पाहिजे.
प्रस्तुत परिचयलेखात किर्लोस्कर, स्त्री, मनोहर यांच्या कामगिर्यांचा वेगवेगळा परामर्श घेतला नाही हे खरे आहे. या लेखकाचे मनोहरचे वाचन थोडे. स्त्री-किर्लोस्कर यांचे जास्त घडले. गोष्ट सांगताना शांताबाईंनीही ती एकत्रच सांगितली आहे.
तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी पुष्कळ उपक्रम घडले. मनोहरमध्ये मो.प्र. फडके यांची ‘लेख कसे लिहावे’ ही लेखमाला त्यातलीच. स्वतः शंकररावांचा सोप्या भाषेवर फार कटाक्ष होता. अनुवाद मराठी धाटणीची नैसर्गिक भाषा वापरून केलेले असावेत असा निष्कर्ष ‘अनुवाद कसे असावेत?’ या लेखावरील चर्चेतून निष्पन्न झाला. ना.सी. फडक्यांनी सुबोध आणि आवेशयुक्त भाषेचे सौंदर्य आणि विचारांचा ठामपणा यासाठी टिळकांची भाषा अभ्यासावी असे म्हटले. ‘तुम्हाला लेखक व्हायचे आहे ना?’या लेखात श्री. म. माटे रामदासांचा हवाला देऊन हितोपदेश करतात की,
अभ्यासे प्रगट व्हावे। नाहीतरी झाकोनी असावे ।
प्रगट होवोनी नासावे । हे बरे नव्हे ।।
किर्लोस्कर मासिके काळाबरोबर राहिली हे म्हणणे अल्पोक्तीचे आहे. ती सदा काळाच्या पुढेच दोन पावले चालली आहेत. स्त्रीप्रश्नांची चर्चा हा विषय घेतला तरी हे पटण्यासारखे आहे. विसाव्या शतकाच्या तिसर्या दशकात स्त्रियांनी सकच्छ नेसावे की विकच्छ इथून सुरू झालेली चर्चा १९८० साली विवाहसंस्था कशासाठी हा प्रश्न विचारण्याइतकी पुढे गेली. हिंदुकोड बिल प्रणीत समता, मिळवतीचे प्रश्न, वेषभूषा,गृहव्यवस्था, घरकामाबद्दल मोबदला, प्रत्येक स्त्रीला माहीत हवे असे आरोग्याचे ज्ञान, कायदेशीर सल्ला, स्त्रिया आणि सैन्यभरती असे स्त्रीजीवनाला स्पर्श करणारे अनेक विषय चर्चिले आहेत. प्रख्यात स्त्री-स्वातंत्र्यादिनी कृष्णाबाई मोटे, मालतीबाई बेडेकर, शकुंतला परांजपे, गीता साने या किर्लोस्कर परिवाराच्या मासिकांच्या लेखिका आहेत. फार काय किर्लोस्करमध्ये लिहिले नाही असा मराठीतला आघाडीचा लेखक, विचारवंत, अभ्यासक आढळणार नाही. विवेकवादाचे व्यासपीठ हा लौकिक या मासिकांनी शेवटपर्यंत सांभाळला.
पासष्टीच्या गोष्टीत अनेक प्रश्नांची उत्तरे नाहीत. उदाहरणार्थ जमेपेक्षा खर्चाची बाजू वाढली हे कसे? किंवा उपासनी महाराज प्रकरणी एवढे सज्जड पुरावे छापल्यावर संपादकांनी कोर्टाबाहेर तडजोड का केली? इ.इ. पण शांताबाईंनी लिखाणाला मर्यादा घालून घेतली आहे. जंत्रीचे स्वरूप येण्याचा धोका पत्करूनही लेखक आणि विषयांचे अधिकात अधिक संदर्भ उपलब्ध करून देणे हा हेतू सफल झाला आहे. त्यामुळे जिज्ञासू अभ्यासकाची मोठीच सोय झाली आहे, आणि त्याबद्दल त्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे.