तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे?
तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे? या प्रश्नाला सामान्यपणे पुढील उत्तर दिले जाईल. ‘तत्त्वज्ञान शिकण्याची काहीच आवश्यकता नाही. तत्त्वज्ञान म्हणजे घटपटाची निरर्थक झटापट करणारा उद्योग. रिकामटेकड्या लोकांनी वेळ घालविण्याकरिता निर्माण केलेला एक खेळ. त्याचा जीवनात कसलाही उपयोग नाही. जीवनाच्या कोणत्याही समस्येशी त्याचा कोणताही संबंध नाही. ज्याला हिंदीत ‘बाल की खाल निकालना’, म्हणजे केसाची साल काढणे, म्हणतात, ते करणारा व्यवसाय. केस ही मुळात किती बारीक वस्तु, तिची साल काढल्यावर शिल्लक काय उरणार? म्हणजे जिथे कसलाही भेद नाही तिथे भेद उकरून काढणारा हा विषय आहे.’ अशी या विषयासंबंधी सामान्य माणसाची कल्पना.
परंतु सामान्य लोकांच्या कल्पना नेहमीच बरोबर असतात असे नाही. त्यांच्या अनेक कल्पना चुकीच्या असतात. त्यांपैकीच हीही कल्पना आहे. कारण थोडे बारकाईने पाहिले तर आपल्या असे लक्षात येईल की तत्त्वज्ञान हा अतिशय उपयुक्त विषय आहे. आणि तो केवळ काही लोकांच्याच उपयोगाचा नाही, तर प्रत्येक मनुष्याच्या उपयोगाचा विषय आहे. तसेच तो केवळ क्वचित् उपयोगी पडणारा विषय नव्हे. तर प्रत्यही, दरक्षणी उपयोगी पडणारा विषयआहे.
हे म्हणजे अतिशयोक्तीचे वाटेल पण ते तसे नाही हे थोड्याच वेळात कळून येईल.
अपरीक्षित जीवन मनुष्याने जगण्यालायक नाही.
सॉक्रेटिसाचे पुढील वचन प्रसिद्ध आहे. An unexamined life is not worth living for a human being. म्हणजे अपरीक्षित जीवन मनुष्याने जगण्यालायक नाही. मनुष्य विवेकक्षम प्राणी आहे, आणि विवेकाचा धर्म परीक्षा, चिकित्सा करणे हा आहे. आपण जीवनात जी तत्त्वे किंवा नियम स्वीकारतो त्यांची परीक्षा केल्यानंतरच त्यांचा स्वीकार करणे मनुष्याला शोभण्यासारखे आहे.
परंतु आपल्या प्रत्यक्ष जीवनाकडे पाहिले तर असे दिसते की, आपले जीवन सामान्यपणे अपरीक्षित नियमांच्या साह्याने चाललेले आहे. आपण जन्मतो तेव्हा आपल्या शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही शक्ती अतिशय अल्प असतात, आणि आपण वडील माणसांवर सर्वथा अवलंबून असतो. आधी आई-बाप, नंतर शिक्षक, आणि शेवटी पुस्तके यांच्याकडून आपल्याला जगाविषयी आणि जीवनपद्धतीविषयी माहिती मिळते. जिला संस्कृती म्हणतात ती आपण अशाच रीतीने वडील मंडळींकडून शिकून आत्मसात करतो. आई-बापांवर प्रेम आपण स्वाभाविकपणेच करतो, परंतु त्यांच्याविषयी भक्ती किंवा पूज्यभावना आपल्याला शिकविली जाते. तसेच आपल्याला, एवढेच नव्हे तर सर्वांना निर्मिणारा कोणी आहे असे मानणे, आणि त्याची पूजा करणे, त्याची प्रार्थना करून त्याला अनन्यभावाने शरण जाणे हेही आपल्याला शिकविले जाते. त्याचबरोबर आपण ज्या समाजात राहतो त्यात रूढ असलेल्या चालीरीती, त्याचे नियम हेही आपण स्वीकारतो. निसर्गाचे नियम, उदा. दिवसरात्र होणे, किंवा ऋतुचक्र, हे जसे अपरिवर्तनीय आहेत तसेच वर उल्लेखलेले सामाजिक नियमही नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय आहेत असेच आपण मानतो. ते तसे आहेत का हा प्रश्न आपल्या डोक्यात उद्भवच नाही.
परंतु निसर्गनियम आणि सामाजिक नियम यांत मोठा फरक आहे. तो म्हणजे असा की निसर्गाचे नियम हे कोणी मानवाने केलेले नसतात, आणि त्यांचा भंग करणे अशक्य असते. आपण त्यांचे पालन करतो असे म्हणण्यापेक्षा आपल्या हातून त्यांचे अपरिहार्यपणे पालन होते असे म्हणणे योग्य होईल. उदा. आपल्या पायाखालचा आधार काढून घेतला तर आपण खाली कोसळतो, ते आपल्याला करावे लागत नाही. निराधार वस्तू पृथ्वीवर पडतात ह्या नियमानुसार आपली हालचाल घडते. याच्या उलट सामाजिक नियम मानवाने केलेले असतात, आणि त्यांचे पालन प्रयत्नपूर्वक करावे लागते. त्यांचा भंग करणे शक्य असते. आणि शिक्षणाने आणि सवयीने ते आपल्या अंगवळणी पडल्यामुळे त्यांचा भंग करण्याचे आपल्याला सुचत नाही.
आता निसर्गनियम जसे आपण निमूटपणे स्वीकारतो, तसेच सामाजिक नियमही आपण निमूटपणे स्वीकारतो, आणि त्याचा भंग करणे शक्य आहे ही जाणीव असूनही तसे करणे आपल्याला सुचत नाही. ते नियम आपण का स्वीकारावेत हा प्रश्न आपण विचारीत नाही, आणि कोणी तो विचारलाच तर आपल्याला धक्का बसतो. पुढे केव्हा तरी तो प्रश्न गैर नाही हे आपल्या लक्षात येते. असे झाले म्हणजे आपली चिकित्साबुद्धी जागृत होते, आणि आपण आपल्या जीवनाची परीक्षा करू लागतो. एखाद्या नियमाची परीक्षा करायची म्हणजे त्या नियमाचे स्वरूप काय आहे, उदा. तो नैसर्गिक आहे की मानवकृत आहे, हे पाहायचे आणि त्याचे समर्थन करणे शक्य आहे काय ह्याचा शोध करायचा.वरील दोन प्रकारच्या नियमांतील भेद एका वाक्यात सांगायचा तर असा सांगता येईलः पहिल्या प्रकारचे नियम (म्हणजे निसर्गाचे नियम) हे विधाने आहेत, आणि दुसर्या प्रकारचे नियम (म्हणजे सामाजिक नियम) विधी आहेत. या वाक्याचे आता स्पष्टीकरण करू.
विधाने आणि विधी
विधान म्हणजे एखाद्या वस्तुस्थितीचे वर्णन. उदा. ‘पृथ्वी गोल आहे’ किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही वाक्ये विधाने व्यक्त करतात, कारण त्यांत पृथ्वीच्या आकाराचे,आणि पृथ्वी आणि सूर्य यांच्या परस्परसंबंधाचे वर्णन आहे. ‘मनुष्य मर्त्य आहे,” सिंह हिंस्र पशू आहे ही वाक्येही विधाने व्यक्त करणारी आहेत. विधाने व्यक्त करणार्या वाक्यांना आपण विधानार्थी वाक्ये असे नाव देऊ. आता विधानांतील वर्णन बरोबर असू शकते, तसेच ते चुकीचेही असू शकते. उदा. ‘पृथ्वी सपाट आहे आणि ‘सूर्य पृथ्वीभोवती फिरतो ह्या वाक्यांतील विधाने बरोबर नाहीत असे ज्योतिःशास्त्र सांगते. वस्तूचे वर्णन जेव्हा बरोबर असते, म्हणजे ती जशी आहे तसे असते, तेव्हा त्याला सत्य विधान म्हणतात, आणि जेव्हा ते ती वस्तू आहे त्याहून भिन्न असते, तेव्हा त्याला असत्य विधान म्हणतात. सत्य वर्णन म्हणजे यथार्थ (यथा = जसा, अर्थ = पदार्थ असेल तसे) वर्णन, आणि असत्य वर्णन म्हणजे अयथार्थ वर्णन. विधाने सत्य किंवा असत्य असतात. जे सत्यही नाही आणि असत्यही नाही ते विधान नव्हे असे आपण म्हणू शकतो.
विधी म्हणजे आपल्याला एखादे कर्म करायला सांगणारे वाक्य, उदा. ‘सत्यं वद, ‘धर्मं वद’. ही वाक्ये आज्ञार्थी विधेमध्ये आहेत. कर्म करण्यास प्रवृत्त करणारी वाक्ये विध्यर्थी विधेतही असतात. उदा. ‘सत्य बोलावे,’ अहिंसा पाळावी’, ‘शेजार्यावर प्रेम करावे’, ही विध्यर्थी म्हणजे विधी व्यक्त करणारी वाक्ये आहेत. आज्ञार्थी आणि विध्यर्थी ह्या दोन्ही प्रकारची वाक्ये कर्माला प्रवृत्त करणारी वाक्ये असल्यामुळे त्या दोहोंनाही आपण ‘विधी म्हणू. आज्ञा आणि विधी यांतील भेदांपैकी एक महत्त्वाचा भेद असा आहे की आज्ञा एकवचनी (म्हणजे एका व्यक्तीला किंवा एका व्यक्तिसमूहाला उद्देशून केलेली) असते, तर विधी सामान्य, म्हणजे सार्वजनिक किंवा सर्वाना उद्देशून उच्चारलेला असतो. जसे विधी म्हणजे एखाद्या कर्माला प्रवृत्त करणारे वाक्य, तसे एखाद्या कर्मापासून निवृत्त करणार्या वाक्याला निषेध म्हणतात. उदा. हिंसा करू नये. परंतु एखादे कर्म करण्यापासून अलिप्त राहणे हेही एक प्रकारचे कर्मच असल्यामुळे आपण निषेधांचा समावेश विधींमध्येच करू.
आता विधानांत जसा सत्य आणि असत्य असा भेद आहे, तसा विधींच्या बाबतीत एखादा भेद आहे काय? कारण सत्य आणि असत्य हा भेद विधींना लागू पडत नाही हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. उदा. आज्ञा घ्या. एखाद्याने आपल्याला आज्ञा केली तर त्याने सत्य किंवा असत्य असे काही उच्चारले असे म्हणता येत नाही. आज्ञा खर्या किंवा खोट्या असत नाहीत. तीच गोष्ट विधींचीही आहे. ‘अहिंसा पाळावी’ किंवा ‘परद्रव्याचे अपहरण करू नये’ या वाक्यात एखाद्या वस्तुस्थितीचे यथार्थ किंवा अयथार्थ कसलेही वर्णन नाही.
परंतु सत्य आणि असत्य हा भेद विधींना लागू पडत नसला तरी सर्व विधी सारखेच असतात असे म्हणता येणार नाही. विधि-निषेध हे पाळण्याकरिता असतात. परंतु काही विधी पाळणे बरोबर होणार नाही असे आपण म्हणतो. उदा. ‘आपण सर्वदा स्वार्थाने वागावे’ हे वाक्य विधी व्यक्त करते, परंतु त्यातील विधी स्वीकरणीय नाही असे आपण सामान्यपणे म्हणू. म्हणजे विधींच्याही बाबतीत स्वीकरणीय आणि अस्वीकरणीय असा भेद आपण करतो, तो भेद व्यक्त करण्याकरिता आपण ‘युक्त-अयुक्त’ किंवा ‘उचित-अनुचित’ हे शब्द वापरतो. ज्याप्रमाणे एखादे विधान स्वीकारण्याकरिता ते सत्य असले पाहिजे अशी अट आपण घालतो, त्याचप्रमाणे एखादा विधि स्वीकारण्याकरिता तो युक्त किंवा उचित असला पाहिजे असे आपण म्हणतो.
या ठिकाणी दोन प्रश्न स्वाभाविकपणेच उपस्थित होतात. (१) विधानांची सत्यासत्यता कशी ओळखायची किंवा ठरवायची? आणि (२) विधींची युक्तायुक्तता किंवा औचित्यानौचित्य कसे ओळखायचे किंवा ठरवायचे? एखादे विधान सत्य आहे असे कोणी म्हणाले तर त्यावर कशावरून?’, किंवा त्याला प्रमाण काय?’ हे प्रश्न उद्भवतात, आणि विधा = Mood. उदा. निवेदनार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, विध्यर्थी या वाक्यांच्या वेगवेगळ्या विधा आहेत. तसेच विधींच्याही बाबतीत तो युक्त किंवा उचित आहे कशावरून?’ हा प्रश्न उद्भवतो. म्हणजे या ठिकाणी आपण विधाने आणि विधी यांच्या समर्थनाच्या क्षेत्रात प्रवेश करतो.आणि त्याचबरोबर आपण तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही प्रवेश करतो.
तत्त्वज्ञान म्हणजे चिकित्सा किंवा परीक्षा
तत्त्वज्ञानाचे मुख्य कार्य आपल्या समजुती, मते, विश्वास, श्रद्धा यांचे स्वरूप स्पष्टकरून ते समर्थनीय आहेत की नाहीत याचा शोध घेणे हे आहे.
तत्त्वज्ञानाच्या दोन मुख्य शाखा आहेत. (१) विधानांची चिकित्सा करणारी, आणि (२) विधींची चिकित्सा करणारी. त्यांना अनुक्रमे ‘ज्ञानमीमांसा (हिच्यातच तर्कशास्त्राचाही अंतर्भाव होतो), आणि ‘नीतिमीमांसा’ ही नावे आहेत. ज्याला आपण ज्ञान म्हणतो (म्हणजे अर्थात् सत्य ज्ञान, कारण असत्य ज्ञान म्हणजे केवळ भ्रांती हे उघड आहे) त्यात सामान्य मनुष्याचे दैनंदिन ज्ञान आणि तसेच ज्याला विज्ञान म्हणतात ते सुप्रष्ठित ज्ञान यांचा समावेश होतो. सामान्य माणसालाही निसर्गाविषयी पुष्कळ ज्ञान असते. उदा. शेतीचे किंवा घरगुती औषधांचे. ह्या दोन्ही प्रकारच्या ज्ञानांचा (म्हणजे सामान्य माणसाचे आणि विज्ञानाने उपलब्ध केलेले) ज्ञानमीमांसेत अभ्यास केला जातो. आपल्या ज्ञानापैकी बहुतेक ज्ञान तर्काने किंवा अनुमानाने प्राप्त झालेले असते. सबंध विज्ञान त्या प्रकारचे ज्ञान आट. त्यामुळे अनुमान किंवा तर्क या प्रक्रियेचा अभ्यास हाही ज्ञानमीमांसेत अंतर्भूत होतो. त्या अभ्यासाला तर्कशास्त्र असे नाव आहे. नीतिमीमांसेत विधींचा अभ्यास केला जातो. नीतीचे नियम हे विधीच असल्यामुळे तत्त्वज्ञानाच्या या शाखेला नीतिमीमांसा हे नाव आहे.
आता विवेकशील मनुष्याने विवेकाने वागायचे म्हणजे आपल्या जीवनात शक्यतो सत्य विधानांचा आणि युक्त विधींचा स्वीकार करायचा. पण हे करण्याकरिता विधानांची सत्यासत्यता ठरवावयाचे उपाय कोणते आहेत, तसेच विधींची युक्तायुक्तता कशी ठरविता येईल या गोष्टींचे निदान प्राथमिक ज्ञान त्याला असावे लागेल. म्हणजे अर्थात् त्याला तत्त्वज्ञानाची निदान तोंडओळख तरी करून घ्यायला हवी.
ही तोंडओळख यापुढील लेखांकांत क्रमाक्रमाने करून देण्याचा मानस आहे.