सावरकरांचे एक निष्ठावंत व व्यासंगी अभ्यासक म्हणून प्रा. शेषराव मोरे यांचे नाव आता प्रतिष्ठित झाले आहे. व्यावसायिकदृष्ट्या अभियांत्रिकीत पारंगत असलेले प्रा. मोरे इतिहास, समाजशास्त्र, तर्कशास्त्र व भाषा वगैरे विषयांचेही जाणकार आहेत. स्वातंत्र्यवीर हा तर त्यांच्या अध्ययन-मनन-चिंतनाचा नव्हे तर निजिध्यासाचाच विषय गेल्या अनेक वर्षांपासून ठरला आहे. यातूनच निष्पन्न झालेल्या त्यांच्या ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ या ग्रंथराजाने चार वर्षांपूर्वी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या ग्रंथाच्या दुसर्या आवृत्तीसोबतच ‘सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास’ नामक त्यांचा दुसरा बृहद्ग्रंथ प्रकाशित झाला आहे. दीडेक हजार पाने एवढा मजकूर लिहून बॅ. सावरकरांची पुनःप्रस्थापना करण्यासाठी जी मेहनत व चिकाटी प्रा.मोरे यांनी दाखवली ती खचितच अभिनंदनीय आहे. रा. वसंत पळशीकरांनी म्हटल्याप्रमाणे सावरकरांच्या टीकाकारांना त्यांचे काम अधिक नेटकेपणाने चोखपणे करावे लागेल एवढी भक्कम विधायक मांडणी प्रा. मोरे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक निष्ठेने खचितच केली आहे. (आजचा सुधारक वर्ष तिसरे, २२२) गंभीर विषयांवरील मराठी भाषेतील ग्रंथांमध्ये अपवादानेच आढळणार्या संदर्भटीपा, संदर्भग्रंथसूची, निवडक व्यक्तिनामसूची इत्यादींबाबतची संशोधकीय शिस्त प्रा. मोरे यांनी आपल्या ग्रंथात कटाक्षाने सांभाळली याचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल.
सावरकरांचे समाजकारण या ग्रंथाची मांडणी लेखकाने तीन भागांत केली असून त्यांपैकी पहिल्या भागात सावरकरांच्या ध्येयसृष्टीतील समाजाचे चित्रण विविध विषयांच्या अनुषंगाने केले आहे. हिंदी राष्ट्र, विज्ञाननिष्ठा, धर्मांतर, मुस्लिम समाज, जातिव्यवस्था व चातुर्वर्ण्य, स्त्रियांचे प्रश्न, समाजसुधारणा इत्यादि विषयांचा त्यात समावेश आहे. दुसर्या भागात सावरकरांचे सामाजिक धोरण या शीर्षकांतर्गत सुधारणेची प्रक्रिया, सुधारकांची भूमिका, परंपरेचा आदरपूर्वक निषेध, जातीयसंस्थेचे कार्य, सामाजिक दुरवस्थेचे उत्तरदायित्व कोणाचे? सुधारणाकार्यातील धर्म व आपद्धर्म इत्यादींची सविस्तर चर्चा केली आहे. सावरकरांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या प्रत्यक्ष कार्याचे सविस्तर तपशील तिसर्या भागात लेखकाने दिले आहेत.
ज्या दोन मान्यवरांना प्रा. मोरे यांनी आपला हा ग्रंथ अर्पण केला आहे त्यात एक लेखकाच्या मते एकमेव ‘सच्चे सावरकरवादी’ असलेले कै. अनंत हरि गद्रे हे आहेत. (अन्यत्र त्यांनी हेच विशेषण डॉ. सुधाकर देशपांडे यांनाही पृ. ४८ वर लावले आहे हा भाग निराळा!) सावरकरांचे अनुयायी म्हणवणार्या इतर कोणीही प्रत्यक्षात सावरकरांचे यथार्थ दर्शन समाजासमोर ठेवले नाही हे सप्रमाण सिद्ध करणे हा या ग्रंथाच्या लेखनामागील एक हेतू असल्याचे लेखकाने नमूद केले आहे. केवळ सावरकरांचा सामाजिक विचार, धोरण व प्रत्यक्ष कार्य एवढ्यांची माहिती देण्याइतपतच ग्रंथलेखन हेतू सीमित न ठेवता लेखकाला येथे ‘सावरकरांच्या समाजविचारावर टीकाकारांनी केलेली टीका, आरोप व त्यांनी केलेला विपर्यास यांचीही चिकित्सा करायची होती. या आरोपांचा एकदाचा सोक्षमोक्ष करावा असा त्यांचा इरादा होता. (लेखकाचे दोन शब्द) ‘वाटेल ती निराधार मते मांडत राहणार्या महाराष्ट्रातील अशा तथाकथित पुरोगामी विचारवंतांच्या भ्रमाचा भोपळा एकदा केव्हातरी फोडलाच पाहिजे (४०२) अशा भूमिकेतून या ग्रंथांची जवळपास तीन चतुर्थाश पाने त्यांनी लिहिली आहेत. निदान यानंतर तरी असे आरोप बंद होतील (४०५) अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. सावरकरांचे हे हिंदुसंघटनाचे, राष्ट्रोद्धाराचे आपद्धर्म म्हणून मांडलेले धोरण कनिष्ठ प्रतीचे व टाकाऊ आहे म्हणून ठामपणे व ठासून सांगण्याच्या प्रचाराचा जो साथीचा रोग आज सुरू झाला आहे, त्याचा एकदा निकाल लावला पाहिजे या हेतूने (४३१) एका विशिष्ट मुद्द्याची चर्चा केल्याचे ते अन्यत्र नमूद करतात.
वाचकांनी सावरकरांच्या विरोधकांच्या टीका मुळातून अभ्यासाव्यात, अनुयायांचा ‘हिंदुत्वाच्या चौकटीत समाजसुधारणा करणारा सावरकर अभ्यासावा व मगच आमच्या याग्रंथातील ‘सत्य व ‘विपर्यासा’बद्दलचा अंतिम निर्णय द्यावा (६७५) अशीही विनंती लेखकाने ग्रंथ अखेरीस केली आहे. एकूण प्रेषितांच्या सुरात, ‘अखेरचा शब्द सांगण्यावर लेखकाचा फारच भर आहे. त्यांनी ग्रंथात तो कदाचित् सांगितलाही असेल, पण वाचक या नात्याने त्यांची सूचना आम्ही अमलात आणलेली नाही, सबब आम्ही अंतिम निर्णयही देऊ शकत नाही. आम्ही फक्त त्यांच्या ग्रंथाबद्दलचा आमचा अभिप्राय नोंदवू शकतो. ज्ञानाच्या क्षेत्रात ‘अंतिम शब्द’ सांगितला जाऊ शकतो यावर तसा आमचा विश्वासही नाही. सावरकरांवर टीका करणारे एकजात सारे अभ्यासक सावरकरांची बदनामी करण्यासाठीच संशोधनप्रवृत्त झालेले आहेत या प्रा. मोरे यांच्या एकूण प्रतिपादनाशी सहमत होणे आम्हाला शक्य नाही. टीका करणारे सगळे अज्ञानी, अनभ्यस्त व छाकटे आहेत, तर प्रत्यक्षपणे त्यांचे समर्थन करणारे थोर व साक्षेपी अभ्यासक आहेत, असे त्यांनी जागोजाग केलेले मतप्रदर्शन त्यामुळेच आम्ही ग्राह्य मानू शकत नाही. प्रा. मोरे यांचा व्यासंग असा खंडनमंडनाच्या अभिनिवेशाने डागाळला नसता तर त्यांच्या ग्रंथांचे मूल्य निश्चितच वधारले असते असे मात्र आम्हास प्रामाणिकपणे वाटते.
‘वि. दां. चा तो अर्थ । आम्हासीची ठावा।ऐसा येथे दावा। पानोपानी।।’ असे प्रस्तुत ग्रंथावावत म्हणता येईल. आपण सांगतो तेच फक्त ‘सत्य’ असा पवित्रा बौद्धिक चर्चा करणार्या लेखनात साजत नाही.
सावरकरांवर टीका करणार्या पुरोगामी, माक्र्सवादी प्रवाहातील टीकाकारांवर प्रा. मोर्यांचा विशेषच रोष आहे. त्यांच्या मते ते सगळे खोडसाळ, असत्य व निराधार लिहितात, आंधळ्यासारखे वागतात, वनवाबनवी व चलाखी करतात, वारंवार ठासून सांगून खोट्याचे खरे करतात. सावरकरांचे हेतुतः विकृतीकरण करून वाचकांची दिशाभूल करतात. ते विद्वान, विचारवंत, संशोधक ‘असण्यापेक्षा ‘मानले जातात; याउलट सावरकरांसंबंधी गौरवपर लेखन करणारे मात्र खरोखरच थोर, साक्षेपी, तत्त्वज्ञ, विचारवंत, समाजचिंतक असतात! अशी पक्षपाती शेलकी विशेपणे लेखकाचे पूर्वग्रह व्यक्त करतात. संशोधनाचा समतोल संयतपणा त्यातून निकालात निघतो. त्यातही रा. वसंत पळशीकर आणि डॉ. य. दि. फडके यांच्या प्रतिपादनांचा प्रतिवाद करताना प्रा. मोरे यांच्या लेखणीने अगदीच ताळ सोडला आहे. पुरोगामी टीकाकारांना लावलेली इतर विशेपणे तर त्यांनी पळशीकरांना लावली आहेतच, त्याखेरीज वैचारिक गुन्हेगारीत जमा होतील अशीही अनेक दृपणे त्या दोघांना दिली आहेत. मतभेद समजू शकतात. अपसमज दूर करणेही स्वागतार्हच ठरते. पण संतापाची वाधा लेखणीला होऊन शिष्टाचार व सुसंस्कृतपणा यांचा बळी जाणे मात्र इष्ट म्हणताच येणार नाही. पळशीकरांनी जे काही सावरकरांसंबंधी लिहिले आहे ते “जाणीवपूर्वक’ अर्थाचा अनर्थ करण्यासाठी, किंवा सावरकरांची बदनामी करण्यासाठी, त्यांच्यावर खोटीनाटी टीका करण्यासाठी, त्यांच्या विचारांचा विपर्यास करून वाचकांची दिशाभूल करण्यासाठीच लिहिले आहे अशाआशयाची अनेक विधाने प्रस्तुत ग्रंथात आली आहेत. (पृ. १८१, १८३, १९०, १९८-९, २०२, २१९, २३८,इत्यादी). जात्युच्छेदनाबद्दलची सावरकरांचे अनुयायी जी भूमिका सावरकरांची म्हणून किंवा स्वतःची म्हणून मांडतात ती पाहिल्यावर ‘पळशीकरांच्या टीकेत थोडेबहुत तथ्य असावे अशीच शंका आपल्याला येऊ लागते (२२७) असे एखादे अपवादभूत वाक्य वगळता प्रा. मोर्यांच्या लेखणीने पळशीकरांच्या संदर्भात जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती गंभीर विचारविमर्शात मुळीच शोभत नाहीत. पळशीकरांचे लेखन म्हणजे बुद्धिवादी चक्रव्यूह आहे, भूलभुलैया आहे, ते त्यांनी घेतलेले केवळ सोंग आहे, एक कारस्थान आहे, सावरकरांना जातीयवादी व अनुवंशवादी ठरवणे एवढा एकमात्र हेतू त्यांच्या या ‘उपद्व्यापामागे आहे असे गृहीत धरूनच मोर्यांनी पळशीकरांच्या मतांचा प्रतिवाद केला आहे. प्रामाणिक सत्यशोधनाचीही भूमिका टीकाकारांची असू शकते हे प्रा. मोरे लक्षातच घेत नाहीत.
डॉ. य. दि. फडके यांच्या लेखनाच्या संदर्भातील प्रा. मोरे यांची विधानेही अशीच हेत्वारोपी, आकसपूर्ण व अकारण आक्रमक आहेत. शोधाच्या नावाखाली फडके खोटा प्रचार करतात, भत्तांच्या कचाट्यातून सावरकरांना सोडवण्याचा बहाणा करून सावरकरांचे अधिकच विकृतीकरण करतात, ‘सावरकरांची प्रत्येक भूमिका विपर्यस्त स्वरूपात मांडण्यांचा विडाच डॉ. फडके यांनी उचललेला असल्यामुळे…(ते) सारे माहीत असतानाही जाणीवपूर्वक विपर्यस्त अभिप्राय नांदवतात’ असे अनेक आरोप मोर्यांनी केले आहेत. एवरेच नव्हे तर हेच तर त्यांचे (फडक्यांचे) वैशिष्ट्य आहे असे सरसकट विधानही त्यांनी केले आहे. सावरकरांच्या लेखांचे संकलन तत्त्वज्ञ सावरकर या पुस्तकात करून डॉ. फडके यांनी त्यास लिहिलेल्या प्रस्तावनेवर काही हेत्वारोप प्रा. मोर्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे सदर संकलनात ‘धर्मांतरावरील लेखांमुळे दलितांची मने रावरकरांवद्दल कलुपित व्हावीत या स्पष्ट हेतूने त्यांनी (डॉ. फडके यांनी) एकाच विषयावरचे तीन लेख निवडले’ (३८६) असल्याचा आरोपही त्यांनी बिनदिक्कतपणे केला आहे. एवढच नव्हे तर प्रा. यशवंत सुमंत यांच्या एका प्रतिपादनाचा प्रतिवाद करताना, सुमंतांचा सावरकरविषयक अभ्यास ‘वरचा व तुटकतुटक असा सोईपुरताच असल्यावद्दल आपल्याला आश्चर्य वाटत नाही, कारण पुरोगामी व माक्र्सवादी मंडळी सावरकरांसारख्या प्रतिगाम्याचा मुळातून अभ्यास करणे पाप मानतात (३९४) अरोही मोर्यांनी म्हटले आहे. आणि तेवढ्यावरच न थांबता, पुढे नामोल्लेख न करता डॉ. फडके यांना ते नथीतून तीर मारतात. ते लिहितात, ‘एका जणाने हे पाप जाणीवपूर्वक केलेले असले तरी, त्या अभ्यासाचा हेतू व उपयोग सावरकरांना नकली बुद्धिवादी, धूर्त प्रतिगामी व ब्राह्मण जातीयवादी ठरवण्यासाठी करून त्यांनी ते पाप धुऊन टाकून पुण्यसंपादन केलेले आहे.(कित्ता) लेखकाने पृ. ५१६, ५६२ व ६०० वरही डॉ. फडक्यांचे जे उल्लेख केले आहेत ते अनुदारपणाचे असून आडवळणाने फडक्यांना असमंजस व अप्रामाणिक ठरवणारे आहेत.
सावरकरांच्या या टीकाकारांचे म्हणणे बरोवर की प्रा.मोर्यांचे याबद्दल आम्हाला येथे काही म्हणावयाचे नाही. पण ज्या पद्धतीने व ज्या भाषाशैलीचा वापर करून मोरे त्या टीकाकारांचा समाचार घेतात ती आम्हाला आक्षेपार्ह वाटते. ‘टीकाकारांनी फक्त स्वतःचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी आणि सावरकरांना हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रवादी ठरवण्यासाठी लेखन केले आहे असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे तर आहेच, पण वस्तुस्थितीचा विपर्यास करणारेही आहे. अशा टीकेला कारणीभूत ठरणार्या काही गोष्टी खुद्द सावरकरांच्याआणि बहुतेक सगळ्या सावरकरवाद्यांच्या लेखनात – वर्तनात विद्यमान असल्याची कबुली स्वतः मोरे यांनी चाचरत कचरत का होईना दिली आहेच. सावरकरांनी अमूक एक शब्दप्रयोग केला नसता तर बरे झाले असते, त्यांचे शब्द एकूण त्यांच्या लेखनशैलीत समजून घ्यायला हवेत, सनातनी श्रोत्यांना उद्देशून सावरकर बोलत-लिहीत वागत होते, किंवा त्यांनी सुधारणेची मांडणी विशिष्ट चौकटीत केली होती, हे ध्यानात घेऊनच त्यांच्या विचारकार्याचे मूल्यमापन व्हावे, धर्मातरावरची टीका करण्यात सावरकरांनी चूक केली आहे किंवा आंबेडकरांसंबंधी त्यांनी वापरलेले काही शव्द आक्षेपार्ह आहेत, धर्मातरावर टीका करणारे लेख लिहून सावरकरांनी दलितांची अकारण अप्रियता व रोप ओढवून घेतला आहे, त्यांनी आंबेडकरांवर काही बिनपुराव्याचे आरोपही अकारणच केले आहेत अशी विधाने लेखक करतात, तेव्हाच खरे तर सावरकरांच्या साधकबाधक मूल्यांकनाची शक्यता त्यांनी स्वीकारलेली असते. या सर्व वस्तुस्थितीचे निर्वचन अभ्यासक आपापल्या परिप्रेक्ष्यात करणार हे उघडच आहे. मोर्यांनी ते स्वतःच्या परीने केलेच आहे. सावरकरांना निश्चितच टोप दिला पाहिजे (८०) असे ते एकीकडे म्हणत असले तरी त्याचवेळी सावरकरांची विशिष्ट मते तत्कालीन परिस्थिती व विचारांची समग्र पार्श्वभूमी यांच्या संदर्भात समजून घ्यावी असेही त्यांना वाटते हे टीकच आहे. पण आपल्याला जे वाटते तसेच इतरांनाही वाटले पाहिजे असे कोणीच म्हणू नये. प्रत्येकाला आपल्या परीने इतिहासाचा अर्थ लावण्याची मुभा असलीच पाहिजे, हे इतरांचे स्वातंत्र्य प्रा. मोरे यांनी मान्य केले असते तर त्यांचा तोल असा सुटला नसता.
पण त्यापेक्षाही महत्त्वाची त्रुटी आम्हाला या ग्रंथात अशी दिसते की सावरकरांच्या टीकाकारांनी व अनुयायांनी केलेला विपर्यास दूर करण्याचा हव्यास लेखकाच्या मानगुटीवर असा स्वार झाला आहे की सावरकरांबाबतचे ‘सत्य प्रस्थापित करायला त्यांना पुरेसा अवकाशच शिल्लक उरलेला नाही. वस्तुतः सावरकरांसंबंधीची त्यांची प्रमेये नीट व सप्रमाण सोडवून वाचकांसमोर ठेवण्यावरच त्यांनी भर दिला असता आणि त्यांच्या प्रतिपादनाच्या प्रकाशातच आक्षेपांचे म्हणणे पडताळून पाहण्याचे जर वाचकांवर सोपवले असते तर त्यांचे ग्रंथहेतू अधिक सफल झाले असते.
सावरकरांची हिंदुत्वनिष्ठा ही आधुनिकता, विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्य यांच्या मुळीच आड येणारी नाही, कारण त्यांचे हिंदुत्व म्हणजे हिंदुधर्म नव्हे; सावरकर वर्णव्यवस्थेचे समर्थक नव्हते, किंवा अनुवंशवादीही नव्हते; प्रसंगी राजकारणाला त्यांच्या अग्रक्रमांत प्राधान्य प्राप्त झाले असले तरी समाजकारण हाच त्यांचा निदिध्यास होता; राष्ट्रउभारणीसाठी पूर्वपरंपरेचा आदर व अभिमान आवश्यक असल्यामुळे सावरकरांनी केलेल्या इतिहासचिकित्सेवर काही मर्यादा पडल्या असल्या तरी ते परंपरेचे अंधानुयायी कधीच नव्हते; सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात आजही मार्गदर्शक ठरावे असे सिद्धांत व कार्य सावरकरांनी करून ते हिंदुराष्ट्राचे समर्थक असले तरी मुस्लिमद्वेष्टे नव्हते, उलट एकमेव मुस्लिमप्रबोधक होते, ही व अशी काही सत्ये प्रा. मोरे यांनी सावरकरांसंबंधी प्रस्तुत ग्रंथांत मांडली असली तरीइतर फापटसायात ती काहीशी हरवून गेल्यासारखी झाली आहेत.
सावरकरांनी जे सांगितले ते इतरांनीही सांगितले आहे तरी टीकाकार फक्त सावरकरांनाच दोष देतात असा अकारणच सविस्तर युक्तिवाद मोर्यांनी अनेक संदर्भात केली आहे. काही वेळा बचावात्मक, काही वेळा विरोधकांना कात्रीत पकडण्याचा, तर काही वेळा कृतक पांडित्याचा असे विविध पवित्रे त्यांनी सोयीनुसार घेतले असले तरी एकूण त्यांचा तो खटाटोपच निरर्थक वाटतो. त्याचप्रमाणे सावरकरांनी तेव्हा जे म्हटले तेच जगातल्या समाजशास्त्र-मानवशास्त्रादी विषयांच्या जाणकारांनीही कसे म्हटले आहे, किंवा आजही अनेकजण कसे म्हणतात अशा पुराव्यांचे एकतर्फी ढिगारे रचण्यातही त्यांची बरीच शक्ती आणि वेळ वाया गेला आहे असे म्हणण्यावाचून गत्यंतर नाही. त्यापेक्षा सावरकरांवरच त्यांनी लक्ष केंद्रित केले असते तर त्यांच्या ग्रंथाचा आकार तर आटोपशीर झाला असताच, शिवाय त्यांचे प्रतिपादनही अधिक नेटके व प्रभावी ठरले असते. ग्रंथाच्या शेवटी जोडलेल्या निवडक व्यक्तिनामसूचीत सावरकर आणि आंबेडकर यांची नावे समाविष्ट केलेली नाहीत, कारण, ग्रंथातील त्या नावांची वारंवारिता वरीच मोठी आहे, अशा अर्थाची नोंद लेखकाने केली आहे. प्रस्तुत ग्रंथच सावरकरांवरचा आहे, तेव्हा त्यांचे नांव प्रतिपादनात वारंवार येणे स्वाभाविकच आहे. पण आंबेडकरांचे नाव त्यात एवढे पुनःपुन्हा येण्याचे कारण काय असावे? डॉ. मोर्यांना अभिप्रेत असलेले सावरकरांचे ‘सत्य’ समाजकारण आणि डॉ. आंबेडकरांचे समाजकारण एकच होते, त्यांच्या विचारांतील कोणता कोणाचा हे ओळखू येऊ नये इतपत त्यांच्या भूमिका समरूप होत्या हे वाचकांच्या पूर्णपणे लक्षात यावे’ (२७) असा प्रयत्न लेखकाने केला आहे. सावरकरांचे कार्य हे हिंदुसंघटनेचेच आहे यावद्दल आंबेडकरांना वाटणारा विश्वास व आंबेडकरांचे कार्य हिंदुसंघटनेला पूरक असल्याची सावरकरांनी दिलेली पावती ह्या दोन्हीही वावी त्या दोघांच्या धोरणात कसा मुळीच फरक नव्हता हेच दाखवून देतात’ (४१९) असा निर्वाळा प्रा. मोरे यांनी दिला आहे. त्यांच्या मते सावरकर व आंबेडकर हे दोघेही हिंदु धर्माला आव्हानेच होती; आंबेडकरांनी केली तशी परंपरेची परखड चिकित्सा सावरकरांनी केली नसली तरी त्यांना ती अमान्य नव्हती; किंवहुना असे म्हणता येईल की शब्द, भाषा आणि अभिव्यक्तीचा फरक सोडता त्या दोहोंच्या समाजरचनाविषयक विचारांत इतर कोणताच फरक नव्हता! सावरकरांनी काही विषयांवर मांडलेले विचारच वस्तुतः आंबेडकरांनीही मांडले असल्याचे दाखवून लेखक टीकाकारांना असे साकडे घालतात की ते आंबेडकरांनांही प्रतिगामी म्हणणार काय? किंवा डॉ. आंबेडकर हे जणू पुरोगामित्वाचे मोजमाप आहे असे समजून ते असे लिहितात की जातिसंस्थेला अनुवंशाचा आधार देणार्या प्रवृत्तीविरुद्ध सावरकरांनी जेवढे तीव्र प्रहार केले आहेत तेवढे डॉ. आंबेडकरांनीही केलेले नाहीत! आम्हाला हा सगळाच अव्यापारेषु व्यापार वाटतो; किंवा मग मोर्यांच्या एका परीक्षणकारांनी म्हटल्याप्रमाणे हा आंबेडकरांचे “अपहरण करण्याचा घाट असू शकतो; किंवा दलितांनी मान्य केले तरच सावरकरांचे ‘सत्य समाजकारण समाजाच्या गळी उतरू शकेल असा भाबडा विश्वास लेखकाच्या मनात दिसतो. सावरकरांनी धर्मातरावर केलेली टीका अनाठायी होती, आणि विशेषतः धर्मातराच्या महत्त्वपूर्ण मानसिक परिणामांचीदखलच सावरकरांनी घेतली नव्हती असे एकीकडे म्हणत असतानाच (८०) सावरकरांनी केलेली टीका बौद्ध धर्मावर होती, आंबेडकरप्रणीत धम्मांवर नव्हती अशी सावरकरांची सोडवणूक; किंवा बुद्धाविषयी सावरकरांच्या नाटकातील एका पात्राच्या वक्तव्याच्या आधारे ‘बुद्धाचे श्रेष्ठत्व सावरकरांना मान्य होते’ असा केलेला सावरकरांचा बचाव करण्याची लेखकाला एरव्ही गरज भासली नसती. (शिवाय नाटकातील पात्रांची वाक्ये लेखकाची अधिकृत मते मानाचीत का हाही प्रश्नच आहे!)
डॉ. आंबेडकरांच्या धम्माला धर्म समजून जशी टीका करू नये तद्वतच सावरकरांच्या हिंदुत्वाला हिंदु धर्म समजून टीकास्पद ठरवू नये असा अभिप्राय प्रा. मोरे यांनी दिला आहे. अन्यत्र ते असही म्हणतात की ज्या एकजिनसी रास्ट्रीयत्वाला नहरू ‘भारतीय’ असे म्हणतात त्यालाच सावरकर ‘हिंदुत्व’ असे नाव देतात. एका ठिकाणी आगरकरांचे ‘भारतीय आर्यत्वआणि सावरकरांचे ‘हिंदुत्व’ एकरूप असल्याचेही लेखक म्हणतो. त्यांच्या मते सावरकरांचे हिंदुत्व विवेकानंद-अरविंद-गोळवलकर प्रभृतींच्या हिंदुत्वापेक्षा तर मूलतः निराळेआहेच, (११, ६, १२२) परंतु; सावरकरांचे एकनिष्ट भक्त म्हणून मिरवण्याच्या मान्यवरांच्या हिंदुत्वापेक्षाही ते वेगळेच आहे. त्यांच्या मते या सावरकर-अनुयायांनीही हिंदुत्वाचा विवेकानंद-प्रणीत अर्थच प्रमाण मानला आहे. ग्रंथात अन्यत्र ज्यांचा ‘सावरकरांचे सच्चे अनुयायी (४८) असा उल्लेख आहे त्या डॉ. सुधाकर देशपांडे यांनाही प्रा. मोरे असे खणकवतात की ‘सावरकरांच्या नावावर असे उद्योग करून त्यांच्या ऐहिक हिंदुत्वाचा असा विपर्यास करू नये.’ (१२९) हा इशारा देशपांड्यांनी वादचार्वाकांना हिंदुत्वाबाहेर ठेवण्याचा कथित उद्योग केल्याच्या संदर्भात लेखकाने दिला आहे.
अडचण अशी आहे की ‘ऐहिक हिंदुत्व’ म्हणजे नेमके काय हे. मात्र हा सातशे पानी ग्रंथ वाचूनही समजत नाही. हिंदुत्व ही जर धार्मिक विचारसरणी नसेल तर मग भारतीयत्व हा नेहरूंचा पर्याय स्वीकारण्यात सावरकरांना कोणती अडचण होती? हिंदु व मुस्लिम यांचे एक राष्ट्र होण्यासाठी पृथक धार्मिक अस्तित्वे सर्वांनी सोडावीत हे सावरकरांचे मत मान्य होऊ शकते, पण ‘मुसलमानत्व, खिश्चनत्व इत्यादी ‘त्वे’ इतर सोडत असतील तर हिंदुपणाही मानुपकात विलय पावेल ही त्यांची भूमिका (१७) उफराटी आहे. सर्वांना ही पृथकत्वे सोडायला जे काही साधनीभूत ठरेल असे सावरकर सांगतात त्यात ‘एक शासन, एक कायदा, समान हितसंबंध, प्रबल राष्ट्रीय भावना’ यांच्या जोडीला हिंदूंची संघटित शक्ती ही ते समाविष्ट करतात तेव्हा आश्चर्य वाटते. हिंदुत्व व हिंदु धर्म यांतील द्वैत किती वरवरचे व केवळ तार्किक स्वरूपाचे आहे हे त्यावरून लक्षात आल्यावाचून राहत नाही. राष्ट्रबांधणीसाठी हिंदूंच्या विविध धर्मामध्ये, पंथांमध्ये वा जातीमध्ये द्वेषमत्सर राहू नये असे सावरकरांना वाटत असल्याचे मोरे सांगतात (७९), तेव्हा हिंदूचे विविध धर्म नेमके कोणते हे स्पष्ट होत नाही. धर्मांतर हिंदुसंघटनाच्या आड येते असे मानणार्या सावरकरांची राष्ट्रकल्पना धर्मनिरपेक्ष होती हे कसे स्वीकारता येईल हा प्रश्न कायमच राहतो.सावरकरांना योग्य अनुयायी मिळाले नाहीत याचे स्पष्टीकरण दैव, नशीब, किंवा शाप अशा संकल्पनांचा आधार घेऊन करण्याऐवजी (४४३,५३२) विज्ञानवादी
सावरकर अनुयायांच्या हातून ‘अध्यात्मवादी’ होण्याच्या प्रक्रियेचे अधिक वस्तुनिष्ठ विश्लेषण प्रा. मोर्यांकडून अपेक्षित होते. याही बाबतीत प्रस्तुत प्रबंधाने निराशा केली असेच म्हणावे लागते.