व्यक्तिजीवन आणि समाजजीवन सुख-शांतीचे व्हावयाचे असेल तर त्यासाठी विवेकाच्या संगोपन-संवर्धनाची नितान्त आवश्यकता आहे. बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा आणि विवेक या संकल्पना परस्परांच्या फार जवळ आहेत. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण आणि बुद्धिप्रामाण्य यांना सोडून विवेक असू शकणार नाही आणि विवेक नसेल तर खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्य असू शकणार नाहीत. विवेक ही अधिक व्यापक अशी जीवनसंवर्धक संकल्पना आहे. विवेकाची सविस्तर चर्चा केल्यास बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, reason, श्रद्धा, अंधश्रद्धा इत्यादी सर्व विषयांचा ऊहापोह होऊन जाईल.
सृष्टीतील अचेतन आणि सचेतन अशा सर्व वस्तूंना निश्चित गुणधर्म असतात. अचेतन वस्तूंमध्ये स्वतःच्या अंगचे चैतन्य नसते तर सचेतन वस्तूंमध्ये (वनस्पती आणि प्राणी) अंगभूत चैतन्य असते. वनस्पतीपेक्षा प्राणी चैतन्याच्या दृष्टीने वरच्या पातळीवर असतात. सृष्टीमध्ये मानवेतर जीव आणि मानव यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. मानवेतर जीवांमध्ये काही प्रमाणात बुद्धीचा भाग असतो, पण त्या बुद्धीचे स्वरूप उपजत प्रेरणांचे (instinct) असते. त्यांच्यातील बुद्धीचा भाग नेहमीच पूर्वनियोजित आणि मर्यादित असतो. मानवाच्या ठिकाणीही instincts, उपजत प्रेरणा असतात. पण स्वतंत्र आणि अमर्याद बुद्धी हे मानवाचे वैशिष्ट्य आहे. मानवाची इतरही काही वैशिष्ट्ये आहेत. त्याला भाव-भावना असतात; वासना, विकार आणि अहंकार यांना त्याच्या जीवनात मोठे स्थान असते. सत्य-शिव-सुंदराचे भान असलेला, ज्ञानसंग्रह आणि संचय यांची क्षमता असलेला, आत्माविष्काराचे आणि माणसा-माणसांतील एकात्मतेचे भान असलेला असा हा अपूर्व आणि सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. मानवेतर जीवांप्रमाणे जगण्यासाठी उपजत प्रेरणा त्याला उपयोगी पडत नाहीत, पुरेशा होत नाहीत. त्यासाठी त्याला त्याच्या ठिकाणी असलेल्या वरील विविध क्षमतांचा जाणीवपूर्वक वापर करावा लागतो. आपल्या जीवनाच्या गरजा मिळविण्यासाठी त्याला अपरिहार्यपणे इतर मानवांचे सहकार्य आणि साहाय्य घ्यावे लागते. म्हणजेच त्याच्या ठिकाणी अपरिहार्य सामाजिकता आहे. मानवाच्या या गुणधर्मामुळे, वैशिष्ट्यांमुळे त्याच्यावर काही जबाबदाऱ्याही अटळपणे येऊन पडतात. आत्माविष्काराचे, म्हणजे आपले जीवन कसे फुलवावे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य आणि क्षमता मानवाच्या ठिकाणी आहे. म्हणूनच आत्माविष्काराचे स्वरूप, त्याची दिशा आणि मार्ग ठरविण्याची आणि त्यानुसार जाण्याची जबाबदारीही त्याच्यावर आहे. आपल्या स्वतंत्र बुद्धीचा वापर करण्याची, ज्ञानसंचय करण्याची आणि जीवनासाठी त्याचा वापर करण्याची, पूर्णत्वाकडे, उन्नत आणि श्रेष्ठ जीवनाकडे वाटचाल करण्याची, सत्य शिव सुंदराची आराधना करण्याची, सृष्टीतील संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडू न देण्याची, मानवामानवातील एकात्मभाव सांभाळण्याची-अशा अनेकविध जबाबदाऱ्या मानवावर येऊन पडलेल्या आहे. उत्क्रांतिक्रमातील सर्वश्रेष्ठ प्राणी या नात्याने त्याच्यावर येऊन पडलेल्या या जबाबदाऱ्या त्याला टाळता येणार नाहीत. त्या जबाबदाऱ्या निभावण्यासाठी त्याला विवेकाची आवश्यकता आहे.
विवेकाभाव हेच दुरावस्थेचे मूळ कारण
(आजच्या) मानवी जीवनामध्ये – व्यक्तिजीवन आणि समाजजीवन – जी दुःखे, अरिष्टे, अनिष्टे निर्माण झालेली आहेत, त्यांच्या मुळाशी विवेकाभाव हेच कारण आहे. जीवनामध्ये विवेकाचा पुरेसा वापर न करण्याचे हे दुष्परिणाम आहेत. जीवनातल्या विविध समस्यांबाबत योग्य निर्णय करण्याची मानवोचित पद्धती म्हणजे विवेक असे म्हणता येईल. मानवाच्या वर उल्लेखिलेल्या अनेकविध वैशिष्ट्यांतून वर नमूद केलेल्या जबाबदाऱ्या उत्क्रांत होतात आणि त्या जबाबदाऱ्यांतून विवेक उत्क्रांत होतो असे मला वाटते. यशस्वीआणि सुखी मानवी जीवनासाठी विवेकाचे महत्त्व आणि आवश्यकता मान्य केल्यानंतर विवेकाचे नेमके स्वरूप लक्षात घेणे इष्ट होईल. विवेक म्हणजे प्रश्नाच्या सर्व साधकबाधक बाजू लक्षात घेऊन समबुद्धीने त्याचा निर्णय करण्याची पद्धती; त्यानुसार वागण्याची तयारी. प्रश्नांना तांत्रिक, व्यवहारिक, सैद्धांतिक, नैतिक अशा विविध बाजू असतात. प्रयास आणि फळ अशाही बाजू असतात. चांगले फळ मिळण्यासाठी प्रयास/कष्टही बहुधा अधिक करावे लागतात. या विविध बाजूंचा निकोप बुद्धीने विचार करून निर्णय केल्यास हिताचे होते. सामाजिक प्रश्नांचा विचार करताना त्यांच्या नैतिक बाजूचा विचार महत्त्वाचा असतो. या नैतिक विचाराला विवेकामध्ये महत्त्वाचे स्थान असते. कोणती गोष्ट करणे न्यायाचे, सर्वांच्या, निदान जास्तीत जास्त लोकांच्या हिताचे वा कल्याणाचे हे लक्षात घेऊन सारासार विचाराने अशा गोष्टीचीच निवड करावी लागते. स्वहित आणि सर्वहित यांच्यामध्ये विरोध असेल तेव्हा किंवा स्वहित आणि दुसऱ्याचे न्याय्य हित यांच्यात संघर्ष येईल तेव्हा स्वहित बाजूला ठेवावे लागते.
न्याय, कल्याण, हित, समबुद्धी, निकोप मन इत्यादि संज्ञांचा नेमका अर्थ किंवा त्यांचे नेमके स्वरूप स्पष्ट झाल्याखेरीज विवेकाचा विचार योग्य प्रकारे व पुरेशा प्रमाणात होऊ शकणार नाही. म्हणून आता त्यांचा विचार करू.
न्याय, कल्याण, निकोप मन
पृथ्वीवरील सर्व मानव सुखप्राप्तीचे समान अधिकारी आहेत असे मानून त्यांना सुखाची म्हणजेच स्वहितसाधनाची आणि आत्माविष्काराची योग्य पुरेशी संधी उपलब्ध करून देणे म्हणजे न्याय, कल्याण म्हणजे श्रेयस, अंतिम हित, खरे हित. प्रेयस (म्हणजे फसवे तात्कालिक हित) नव्हे. निकोप मनाला, समबुद्धीला मानवणारे, पटणारे हित. वासना, विकार आणि अहंकार यांच्या अनिष्ट प्रभावापासून पूर्णपणे मुक्त आणि त्यांच्या एकूणच प्रभावापासून जास्तीत जास्त मुक्त असे मन म्हणजे निकोप मन, अशी बुद्धी म्हणजे समबुद्धी. खेरीज निकोप मन, समबुद्धी ही विकृती अथवा जाड्य या दोषांपासून मुक्त असावीत अशी अपेक्षा. वासना, विकार, अहंकार यांचे अनिष्ट किंवा अवाजवी रूप कसे आणि कोणी ठरवायचे? ज्या अवस्थेमध्ये स्वतःच्या इच्छा-आकांक्षा-वासना, स्वतःचे राग-लोभादी विकार, स्वतःचा अहंभाव यांना इतरांच्या तशाच प्रकारच्या वासना, विकार आणि अहंकार यांच्यापेक्षा अधिक प्राधान्य लाभते (किंवा इतरांच्या वासना, विकार, अहंकारास गौणत्व येते), जेव्हा तटस्थपणे किंवा निःपक्षपातीपणे आपल्याला दोन्ही बाजूंचा विचार करता येत नाही अशी अवस्था ही वासना, विकार, अहंकार यांच्या बाबतीत अनिष्ट/ अवाजवी प्रभावाची बुद्धी/मन असे मानायला हवे. ज्यांना सामान्यतः सर्वच लोक (मतलबी किंवा दुष्ट सोडून) संत वृत्तीचे, सच्चरित्र किंवा समबुद्धीचे मानतात अशांचे मत या बाबतीत ग्राह्य मानायला हवे. आपल्या अंतःप्रेरणेशी प्रतारणा करावयाची नाही, असे प्रामाणिकपणे ठरविणार्या बहुतेक व्यक्तींमध्ये वासना, विकार आणि अहंकार यांच्या बाबतीत कोणत्या अवस्थेला अनिष्ट किंवा अवाजवी म्हणावे याबाबत व्यापक सहमती होणे कठिण नाही. आणि हेतूबद्दल संशय नसेल तेथे सहमतीसाठी थोडी वाट पाहायलाही हरकत नसावी.
बुद्धिप्रामाण्य आणि विज्ञाननिष्ठा
विवेकामध्ये श्रद्धेला स्थान असेल, पण अंधश्रद्धेला नाही. विवेक हा नेहमीच बुद्धिप्रामाण्य आणि विज्ञाननिष्ठा यांना अनुसरणारा असतो. बुद्धिप्रामाण्य आणि विज्ञाननिष्ठा या विचार करण्याच्या निकोप पद्धती आहेत. पूर्वग्रह, पक्षपातीपणा इत्यादींना तेथे स्थान नाही. अनाग्रही तटस्थ वृत्तीनेच तेथे काम करावयाचे असते. बुद्धिप्रामाण्यामध्ये तर्ककठोर आणि तीक्ष्ण बुद्धीने, संचित ज्ञानाचा योग्य वापर करून, सत्यशोधनाच्या निष्ठेने निर्णय करावयाचे असतात. विज्ञाननिष्ठेमध्ये प्रयोगशीलतेला आणि निष्कर्षांच्या सार्वत्रिकतेला/सार्वकालिकतेला अनन्यसाधारण महत्त्व असते. अशा प्रकारे विज्ञाननिष्ठाआणि बुद्धिप्रामाण्य या कल्पना विवेकाला पूरक-पोषक आहेत हे स्पष्ट होईल.
विवेकाची इतर अंगे
समबुद्धी किंवा निकोप मन, विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्य या विवेकाच्या अंगांची चर्चा येथवर केली. विवेकाची आणखीही काही अंगे आहेत. ती आता पाहू. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव किवा प्रेम हीदेखील विवेकातून उदित होणारी आणि विवेकात समाविष्ट असलेली महत्त्वाची अंगे आहेत. पैकी न्याय या तत्त्वाचे थोडेसे विवेचन वर आलेले आहे. या चारी तत्त्वांना जगामध्ये व्यापक मान्यता आहे. उघड विरोध तर कुठेच दिसत नाही. असे असूनही भारतीय संविधानाने आधारभूत मानलेल्या या तत्त्वांची आपल्या प्रत्यक्ष जीवनव्यवहारात वेळोवेळी आणि जागोजागी उपेक्षाच होताना दिसते. जीवनामध्ये विवेकाला पुरेसे स्थान न देण्याचे गंभीर दुष्परिणाम आपण भोगत आहोत. निसर्गाचे नियम आणि क्रम, निसर्गसृष्टीतील संतुलन, निसर्गातील प्रमाणबद्धता व शिस्त यांची उपेक्षा करून आणि/किंवा मानवाच्या खास गुणधर्मांकडे वा वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करून मानवी समाजाच्या समस्या यशस्वीपणे सोडविणे शक्य होणार नाही याची विवेकाने दखल घेतली पाहिजे. संतुलित आणि प्रमाणबद्ध विकास हे निसर्गाचे एक महत्त्वाचे सूत्र दिसते. सचेतन वस्तुमानातील गर्भित क्षमतांचे किंवा प्रकट संभवांचे उलगडणे हे जीवनाचे प्रयोजन असे निसर्ग व्यवहारातील दुसरे सूत्र दिसते. सत्य, शिव, सुंदर या सृष्टीतील गुणत्रयींपैकी मुख्यतः ‘सत्या’चा वेध घेणारी मानवी बुद्धी; ‘शिवा’चा म्हणजे पावित्र्य, नैतिकता, आणि न्याय यांचा वेध घेणारा माणसातील एकात्मभाव आणि बंधुभाव (करुणा); आणि ‘सुंदरा’चा ठाव घेणारी माणसातील सौंदर्यदृष्टी, त्याच्या भावभावना आणि कलात्मक सृजनशक्ती – या तीन प्रकारच्या मानवी क्षमतांचा समतोल आणि प्रमाणशीर विकास झाल्याचे आपल्याला दिसते काय? माणसातील एकात्मभाव आणि बंधुभाव यांचा विकास तुलनेने फारच कमी असल्याचे जाणवत नाही काय? अहंभाव आणि एकात्मभाव; वासना आणि विरक्ती; वासनाविकारांचा आवेग आणि संयम, मित्रता आणि शत्रुत्व या माणसाच्या ठिकाणी आढळणार्या उपजत प्रवृत्तींचा समतोल विकास झाला असता तर सामाजिक जीवनातील तणाव, द्वेष, संघर्ष, हिंसा इत्यादींनी उग्र स्वरूप धारण केले नसते.
जीवसृष्टीच्या उत्क्रांतिक्रमातील मानवानंतरचा टप्पा कोणता असेल? उन्नत मानव त्या टप्प्याकडे वाटचाल करण्याच्या कामी आजच्या मानवावर काही जबाबदारी अपरिहार्यपणे पडते असे मानता येईल काय? निसर्गाकडून माणसाला आणि समाजाकडून व्यक्तीला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोगापेक्षा दुरुपयोगच अधिक झाल्याचे दिसत नाही काय? हे सर्व विवेकाभावाचे स्पष्ट पुरावे आहेत असे मला वाटते.
विषम ऐहिक लाभांची पद्धती
मानवी समाजात हजारो वर्षांपूर्वी जेव्हा कधी पहिली नागरी सभ्यता (Civilization) उदयाला आली तेव्हापासून आजवर पृथ्वीवरील मानवी समाजाने केवळ विवेकाभाव असलेली नव्हे, तर सरळ सरळ अविवेकी अशी एक समाज पद्धती/व्यवस्था रूढ केली आहे. ही व्यवस्था समाजामध्ये इतकी मजबूतपणे रुजलेली आहे की तिच्यातील अन्याय अत्यंत तीव्रआणि गंभीर असूनही गेली हजारो वर्षे तो खपवून घेतला गेलेला आहे. या शोषणाच्या पद्धतीविरुद्ध आजवर कुणीही आवाज उठविल्याचे, चळवळ केल्याचे दिसत नाही. या इतक्या भयानक व्यवस्थेचे रूप कसे आहे? आजच्या भौगालिकदृष्ट्या आणि लोकसंख्येच्याही दृष्टीने फार विशाल आणि मानवी जीवनाच्या गरजांच्या दृष्टीने प्रमाणाबाहेर वाढलेल्या, अजूनही वाढत असलेल्या आणि कमालीच्या गुंतागुंतीच्या समाजामध्ये जीवनाची विविध, स्वतंत्र आणि वेगवेगळी अंगे आणि त्या प्रत्येक अंगामध्ये अधिकारपदांची एक प्रचंड उतरंड या बाबी अटळ, अपरिहार्य होऊन बसलेल्या आहेत. त्या तशा होण्याने काही बिघडलेले नाही. परंतु वेगवेगळ्या उतरंडींपैकी प्रत्येक उतरंडीच्या विविध पातळ्यांवर असणार्या व्यक्ती किंवा/आणि समूह यांना त्यांच्या उतरंडीतील पातळीच्या आधारे अत्यंत विषम, सतत वाढत जाणारे ऐहिक लाभ हक्क म्हणून मिळत जावेत अशीही अन्याय्य व्यवस्था आहे. पैसा, सोयी-सवलती, सेवा आदि भौतिक लाभांबरोबरच मानमरतब, अधिकार, प्रतिष्ठा इत्यादि ऐहिक लाभ प्रमाणाबाहेर आणि पात्रतेशी मुळीच संबंध नसणारे मिळत राहावेत अशी ही शोषण आणि विषमता यांना कायदेशीर मान्यता देणारी व्यवस्था आहे. राजकारण, अर्थकारण, शिक्षण, शासन, व्यापार उदीम, विविध व्यवसाय, धर्म, संस्कृती, साहित्य, कला, क्रीडा, आधुनिक प्रचारमाध्यमे, वैद्यकीय सेवा आदि जीवनाची सर्व क्षेत्रे या अन्याय्य व्यवस्थेने व्यापलेली आहेत. या व्यवस्थेने शोषण, विषमता यांची बहुसंख्य समाजातील पकड अत्यंत मजबूत करून ठेवली आहे. ही व्यवस्था जोपर्यंत अबाधित राहील तोवर शोषणमुक्त समाजाचे स्वप्न साकार होणे अशक्य आहे. विवेकाच्या मोठ्या प्रमाणावरील संगोपन-संवर्धनामुळेच या जाचक व्यवस्थेला आव्हान देणे शक्य होईल. म्हणून विवेकाच्या संगोपन-संवर्धनाचीच केवळ नव्हे, तर विवेकाची आवश्यकता पटवून देण्यासाठीदेखील प्रबोधनाची मोठी चळवळ ही आजच्या काळाची उत्कट गरज आहे.