गेली काही वर्षे धर्म या विषयावर बरेच विचारमंथन चालू आहे. त्यात एक नवा विचार प्रामुख्याने पुढे येत आहे. तो विचार म्हणजे असा की ‘धर्म म्हणजे religion नव्हे. हिंदुराष्ट्रवादी विचारवंतांकडून यासंबंधात असा युक्तिवाद केला जातो की ‘धर्म म्हणजे religion मानल्याने सेक्युलरिझम (secularism) या विषयासंबंधी मोठा गोंधळ माजून राहिला आहे. ‘Secular’ विरुद्ध ‘ religious’ असल्यामुळे, आणि ‘religious’ म्हणजे धार्मिक असे मानले गेल्यामुळे, ‘सेक्युलर’ म्हणजे ‘निधर्मी, धर्मनिरपेक्ष’ असे अर्थ निष्पन्न झाले आहेत. पण हे चूक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. मा. गो. वैद्य यांनी हा विषय आपल्या अनेक पुस्तकांत मांडला आहे. त्यांपैकी त्यांच्या ‘हिंदू, हिंदुत्वआणि हिंदुराष्ट्र’,’ या पुस्तकातील भूमिकेचा विचार प्रस्तुत लेखात केला आहे.
‘धर्म’ म्हणजे Religion
अव्वल इंग्रजी अमदानीत मराठीत आणि अन्य भारतीय भाषांत जेव्हा लेखन होऊ लागले, तेव्हापासून ‘धर्म’ हा शब्द religion चा पर्याय म्हणून सर्वांनी वापरला आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, महात्मा फुले, रानडे, चिपळूणकर, टिळक, आगरकर या सर्वांनी ‘धर्म हा शब्द त्या अर्थाने वापरला, एवढेच नव्हे तर हिंदी, गुजराती, बंगाली इ. भारतीय भापांतही ‘धर्म हा ‘religion’चा पर्याय म्हणून वापरला गेला आहे. विवेकानंद, राजाराममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, अरविंद घोष, इ. विद्वानांनी हाच शब्द वापरला. आपट्यांच्या प्रसिद्ध संस्कृत-इंग्रजी कोशात ‘धर्म या शब्दाचा पहिलाच अर्थ ‘religion’ हा दिला असून त्यांच्या इंग्रजी-संस्कृत कोशात religion’ ला प्रतिशब्द ‘धर्म हाच दिला आहे फार काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री हो. वे. शेषाद्री यांनी लिहिलेल्या R.S.S.-A Vision in Action या ग्रंथाच्या शेवटी दिलेल्या शब्दार्थ-सूचीत पुढील नोंद आहे.धर्म(Religion), virtue, piety. अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेल्या मराठी विश्वकोशात धर्माचा अर्थ पुढीलप्रमाणे दिला आहे.
‘निसर्गातील अत्यंत पवित्र, संपूर्ण मानवी भवितव्याशी संबद्ध, जीवन व विश्व यांची नियंत्रक अशा शक्तीवर किंवा शक्तींवर असलेली माणसाची श्रद्धा’. त्या शक्तीचा (किंवा शक्तींचा) स्वतःशी अनुकूल, पवित्र आणि घनिष्ठ संबंध स्थापित करणारी वैयक्तिक किंवा सामाजिक मनःप्रवृत्ती व त्यातून निघणारी आचरणाची पद्धती म्हणजे धर्म (religion) होय. आणि त्या शक्तीशी (किंवा शक्तीशी) प्रतिकूल मनःप्रवृत्तीवा आचरण म्हणजे अधर्म होय.
थोडक्यात असेही म्हणता येईल की मानवाने इष्टप्राप्त्यर्थ व अरिष्टनिवारणार्थ केलेलीअलौकिक शक्तींची साधना वा आराधना म्हणजे धर्म होय.
वरील व्याख्या आणि religion’ ची व्याख्या एकच आहे हे त्या व्याख्येत ‘धर्म’ शब्दानंतर कंसात घातलेल्या ‘religion’ या शब्दावरून स्पष्ट होते.
Religion म्हणजे धर्म किंवा धर्म म्हणजे religion असे समीकरण जे अव्वल इंग्रजी अमदानीत प्रस्थापित झाले त्याचे कारण काय होते? त्या काळातील संस्कृत आणि इंग्रजी दोन्ही भाषा जाणणार्या विद्वानांना या दोन शब्दांत कोणते अर्थसाधर्म्य आढळले? हे अर्थसाधर्म्य म्हणजे ‘धर्म’, ‘धर्ममय’, ‘धर्मवित्’, ‘धर्म्य इत्यादि शब्दांचे अर्थ व्यक्त करण्याकरिता righteous’, pious’, virtuous’, just’ इत्यादि शब्द वापरावे लागतात,आणि या सर्व कल्पना religion शी संबद्ध आहेत.
याप्रमाणे दीडशे वर्षांहून अधिक काळ ‘धर्म म्हणजे ‘religion’ हे समीकरण अस्तित्वात असताना ते बरोबर नाही असा साक्षात्कार हिंदुराष्ट्रवाद्यांना आज एकाएकी कसा झाला? हा प्रश्न सुचणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर एकच दिसते. ते म्हणजे हिंदुराष्ट्रवाद्यांना आपली विचारसरणी religious नाही असे सांगणे आवश्यक वाटू लागले आहे. मध्यपूर्वेतील अनेक राष्ट्रे उघडउघड धर्मशाहीवादी आहेत. आमचे राष्ट्र हे इस्लामी राष्ट्र आहे असे ती स्पष्ट शब्दांत जाहीर करतात. परंतु आपल्याला अभिप्रेत असलेले हिंदुराष्ट्र theocratic राष्ट्र आहे हे मान्य करायची हिंदुराष्ट्रवाद्यांची तयारी नाही. अशा स्थितीत हिंदुराष्ट्र theocratic राज्य नाही हे प्रतिपादायचे तर हिंदू हा धर्म असेल तर ते अशक्य आहे. म्हणून कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून अशी कल्पना निघाली की हिंदू हा धर्म आहे, पण religion नाही. म्हणजे एकाच वेळी आपल्या संकल्पित राष्ट्राला हिंदुराष्ट्रही म्हणता येईल, आणि हिंदुराष्ट्र ही hcocracy नाही असे म्हणणेही शक्य होईल. पण हा शब्दच्छल केविलवाणा आणि व्यर्थ आहे हे लवकरच लक्षात येईल.
‘धर्म’ म्हणजे संस्कृती
जर ‘धर्म’ म्हणजे religion नसेल, तर ‘धर्म म्हणजे आहे तरी काय? यावर प्रा. वैद्यांचे उत्तर आहे, ‘धर्म म्हणजे संस्कृती, आणि religion’ म्हणजे उपासनापद्धती. परंतु ही दोन्ही समीकरणे अतिशय विवाद्य आहेत. उदा. पहिले समीकरण, ‘धर्म = संस्कृती हे घ्या. आता ‘संस्कृती हा शब्द जरी संस्कृत असला तरी त्याचा culture हा अर्थ मूळ संस्कृत अर्थ नाही. Culture या इंग्रजी शब्दाचा पर्याय म्हणून तो रूढ केला गेला आहे हे लक्षात ठेवण्याजोगे आहे. संस्कृत भाषेत, संस्कृ’ हा धातू आहे, संस्कार, संस्करण आणि संस्कृत हेही आहेत. संस्कृति’ हा शब्दही संस्कृतात आहे, पण त्याचा उपयोग विरळा आहे, आणि त्याचा अर्थ culture नाही. संस्कृति म्हणजे culture हा संस्कृति या शब्दाचा नवा, आधुनिकांनी अलीकडे रूढ केलेला अर्थ आहे. हे एक झाले. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे culture या अर्थी संस्कृतीची कल्पना बरीच संमिश्र आणि व्यापक आहे. तिच्यात एखाद्या समाजाच्या religionचा अंतर्भाव होतोच, पण त्या समाजातील विवाहादि संस्कारपद्धती, सणवार, उत्सवप्रकार, खेळ, काव्यनाट्यादि ललित वाङ्मय आणि वैचारिक वाङ्मय ह्या सर्व गोष्टी संस्कृतीत येतात. परंतु या सर्व गोष्टी धर्मविषयक किंवा धार्मिक आहेत असे म्हणणे चमत्कारिक दिसते. उदा. सोव्हिएट रशियातील संस्कृती religion विरोधी होती. तिलाही प्रा. वैद्यांना ‘धर्म’ म्हणावे लागेल. याशिवाय आणखी अनेक अडचणी त्या समीकरणात आहेत. उदा. अलीकडे ‘सांस्कृतिक (cultural) हा शब्द नाट्य, कला, उत्सव, क्रीडा यांच्याशी इतका एकरूप झाला आहे की सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आपण नाट्य, संगीत, क्रीडा यांचा कार्यक्रम असे समजतो. ‘धर्म = संस्कृती हे समीकरण जर आपण स्वीकारले तर नृत्यगीतक्रीडा यांच्या कार्यक्रमांना धार्मिक कार्यक्रम म्हणावे लागेल. तेव्हा ‘धर्म = संस्कृती हे समीकरण आज तरी अस्तित्वात नाही हे मान्य केले पाहिजे.
हिंदुधर्मात religion आहे की नाही?
प्रा. वैद्य म्हणतात की हिंदू हा धर्म आहे, religion नाही. हे त्यांचे म्हणणे क्षणभर मान्य करून त्यांना आपण असे विचारू शकतो की ज्याला इंग्रजी भाषेत religion’ ही संज्ञा आहे त्याप्रकारची गोष्ट येथे हिंदुस्थानात किंवा हिंदूंच्या आचार-विचारांत अस्तित्वात आहे की नाही? या दृष्टीने तपास केल्यास असे म्हणावे लागते की हिंदू धर्माचे जे स्वरूप प्रा. वैद्यांनी सादर केले आहे त्यात religion चा अंतर्भाव आहे. ते म्हणतात की व्यष्टी, समप्टी, सृष्टी आणि परमेप्टी या चार गोष्टींना जो एकत्र बांधून ठेवतो तो धर्म. या चार घटकांपैकी परमेप्टी म्हणजे ज्याला ईश्वर किंवा परमेश्वर म्हणतात तोच आहे हे उघड आहे, आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवणे हे religion चे एक प्रमुख लक्षण आहे. आता हे खरे आहे की परमेष्टीवर विश्वास ठेवणे हिंदुत्वाला आवश्यक नाही, निरीश्वरवादी मनुष्यही हिंदू असू शकतो, असे प्रा. वैद्य म्हणतात. परंतु अशा मनुष्याचे हिंदुत्व बरेच हिणकस असणार असे मला वाटते, कारण हिंदू धर्मातील जवळजवळ सर्वच आचार ईश्वराशी संबद्ध असतात, आणि त्याला न मानणारा मनुष्य आग्रहाने ‘मी हिंदू आहे’ असे म्हणेल असे मला वाटत नाही. निदान हिंदुराष्ट्रवाद्यांपैकी कोणीही तसा नाही असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. रामजन्मभूमीसाठी सध्या जी चळवळ चालू आहे तिच्यातील राम हा कोण आहे? तो कोणी मानव नव्हे, तो ईश्वराचा अवतार आहे. त्याची आपण पूजा करतो. मनुष्य केवढाही मोठा झाला तरी आपण त्याची पूजा करीत नाही. क्वचित् कोणी केलीच, तर त्या मनुष्याला देवस्वरूप मानले गेल्यामुळे ते शक्य होते. मग जो ईश्वर मानत नाही असा मनुष्य हिंदू आहे या म्हणण्याला काय अर्थ असू शकतो. पाप-पुण्य, परलोक, पुनर्जन्म, पूजा-अर्चा, मोक्ष या सर्व गोष्टी श्रद्धाविषय आहेत, आणि ज्याला प्रा. वैद्य हिंदूधर्म (म्हणजे संस्कृती) म्हणतात त्यातील महत्त्वाची सर्व अंगे या श्रद्धाविषयांशी संबद्ध आहेत. उदा. आपले संस्कार घ्या. ते सर्व religious विधी आहेत की नाहीत?विवाह मंत्रोच्चाराशिवाय होत नाही. मृत्यूनंतर उरलेली रक्षा गंगेला अर्पण करावी लागते. जो हे मानीत नाही, जो कोणताही संस्कार मानीत नाही, जो गाईला पूज्य मानीत नाही आणि गंगेला पवित्र समजत नाही, ज्याच्या लेखी आपले सणवार केवळ विश्रांती आणि उत्सव यांची निमित्ते आहेत, जो दिवाळीत रोषणाई करतो, पण केवळ आनंदाकरिता-असा मनुष्य आपण हिंदूआहोत असे निश्चयपूर्वक आणि आग्रहाने म्हणेल काय? आणि तो तसे म्हणाला तर त्याला काय अर्थ असू शकेल? मला वाटते ते म्हणणे सर्वथा अर्थशून्य असेल.
धर्म म्हणजे संस्कृती असे म्हणणार्या प्रा. वैद्यांना मी फक्त एक छोटासा निकष सुचवितो. त्यांनी ‘धर्म’ शब्द टाकून द्यावा आणि त्याऐवजी ‘संस्कृति’ हा शब्द घालून निर्वाह करावा. तो जर त्यांना करता आला तर त्यांचे समीकरण बरोबर आहे असे सिद्ध होईल. पण ते करता येणे अशक्य आहे, हे त्यांच्या लक्षात येईल.
प्रा. वैद्य म्हणतात की ‘धर्म’ हा शब्द अनेक वेगवेगळ्या संदर्भात वापरला जातो, आणि त्या सर्वात त्याचा religion शी संबंध असतो असा म्हणता येत नाही. उदा. ‘धर्मार्थ दवाखाना, ‘धर्मार्थ पाणपोई, बरोबर वजन दाखविणारा तराजू या अर्थाने ‘धर्मकाटा’. परंतु या सर्व शब्दांच्या अर्थाचा शेवटी religion शी संबंध आहे हे सहज दाखविता येईल. ‘पुत्रधर्म किंवा ‘राजधर्म’ म्हणजे पुत्राची किंवा राजाची कर्तव्ये. पण ही कर्तव्ये म्हणजे केवळ legal duties Jeta, moral duties for all sacred duties fäal religious duties 3TEN. त्यांचा भंग केल्यास पाप लागते आणि मरणोत्तर सद्गतीस ते बाधक होते. प्राचीन काळात (आणि खरे तर सामान्यपणे आजही) नैतिक आणि religious यांत भेद केला जात नव्हता. त्यामुळे moral duties आणि religious dutics ह्यांचा अर्थ एकच होता. प्राचीन नीतीचा संबंध पापपुण्य, मरणोत्तर अस्तित्व, परमेश्वर, इत्यादि गोष्टींशी किती गाढ होता हे, सांगण्याची गरज नाही. तीच गोष्ट धर्मार्थ दवाखाना, आणि धर्मार्थ पाणपोईची, धर्मकर्म, पुण्यकर्म म्हणून विनामूल्य चालविला जाणारा दवाखाना. पीडितांचे दुःख निवारण करणे देवकार्य आहे ही समजूत सार्वत्रिक आहे आणि तीच त्या शब्दप्रयोगांच्या मुळाशी आहे. तेव्हा ‘धर्म’ म्हणजे religion नाही हे दाखविण्याकरिता प्रा. वैद्यांनी दिलेली उदाहरणे उपयोगाची नाहीत असे म्हणणे भाग आहे.
धारणात् धर्म इत्याहुः
धर्माचे स्वरूप वर्णिणारी म्हणून सतत उद्भत केली जाणारी दोन संस्कृत वचने आहेत. त्यांचा परामर्श घेऊ. त्यांपैकी एक ‘धारणात् धर्म इत्याहु: धर्मो धारयते प्रजाः’ आणि दुसरे आहे “यतो अभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः. प्रथम ‘धारणात् धर्म इत्याहुः’ या वचनाचा विचार करू. ज्याने समाजाची धारणा होते. म्हणजे त्याचे पालन किंवा रक्षण होते तो धर्म, आता या वर्णनावरून आपल्याला धर्माच्या स्वरूपाविपयी काय बोध होतो? ज्याने समाजाचे रक्षण होते अशा अनेक गोष्टी आहेत. ज्याप्रमाणे अहिंसा, सत्य, अस्तेय इत्यादि नेतिक गुणांचा त्यात अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा इत्यादींचाही होतो. म्हणून आपण शेतीकापड विणण्याचा व्यवसाय आणि घरबांधणी व्यवसाय ही धार्मिक कर्मे आहेत असे म्हणणार काय? समाजाचा योगक्षेम नीट चालवण्याकरिता इस्पितळे, न्यायालये, पोलिस दल, ही अत्यावश्यक असतात, आणि परचक्रापासून समाजाचे रक्षण करण्याकरिता सैन्यही लागते. सारांश, संबंध राज्यसंस्थाच समाजधारणास आवश्यक असते. पण म्हणून या सर्व गोष्टींना धर्म म्हणायचे काय? शिवाय प्रत्येक समाजाच्या धारणेविपयीच्या कल्पना थोड्याबहुत भिन्न असणार आणि प्रत्येक समाज आपल्याच धर्माने धारणा होते असे म्हणणार. सोव्हिएट रशियात कम्यूनिस्ट जीवनपद्धतीने धारणा होते असे मानणार, हिटलरच्या जर्मनीत National Socialism ने ती होते असे मानले जाणार आणि हिंदुराष्ट्रवादी हिंदुधर्मानेच ती होऊ शकते असे म्हणणार, म्हणजे धारणा करायचे म्हणजे काय करायचे याविपयी जोपर्यंत निश्चित माहिती पुरविली जात नाही तोपर्यंत ‘धारणात् धर्मः’ ही उक्ति निरुपयोगी आहे.
आता ‘यतो अभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः’ या वचनाकडे वळू. समाजाचा अभ्युदय आणि निःश्रेयस ज्याने होतात तो धर्म. या व्याख्येत धर्माने दोन गोष्टी साध्य होतात असे म्हटले आहे, अभ्युदय आणि निःश्रेयस. यांपैकी अभ्युदयाचा संबंध इहलोकातील समृद्धीशी, भरभराटीशी आहे, तर निःश्रेयस म्हणजे परम कल्याण किंवा मोक्ष. निःश्रेयसाचा संबंध मरणोत्तर अस्तित्वाशी आहे हे उघड आहे, आणि म्हणून त्याचा संबंध religion शी आहे. मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका. हे मानवाचे सर्वोच्च ध्येय आहे. तेव्हा निदान निःश्रेयसकर धर्म religion शी सवंद्ध आहे हे मान्य करावयास हवे. तीच गोष्ट अभ्युदयाचीही आहे. अभ्युदय’ म्हणजे निःश्रेयस-निरपेक्ष, त्याशी असंबद्ध अशी स्वतंत्र गोष्ट नाही. ऐहिक भरभराट किंवा ऐहिक समृद्धी धर्म्य मार्गानी झाली पाहिजे, आणि हे धर्म्य मार्ग मानवाच्या अंतिम उद्दिष्टाला प्रतिकूल नसले पाहिजेत, एवढेच नव्हे तर ते त्याला अनुकूलही असले पाहिजेत अशीच आपल्या सर्व धर्मग्रंथांची शिकवण आहे. आणि म्हणून अभ्युदयकारी धर्मही केवळ ऐहिकाचा विचार करणारा असू शकत नाही.
शब्दांचे अर्थ
शब्दांचे अर्थ संकेतजन्य असतात. शब्द मुळात ध्वनींच्या लहानमोठ्या मालिका असतात, आणि आपण देऊ तो अर्थ त्यांना रूढीने प्राप्त होतो. शब्दांचे अर्थ निसर्गसिद्ध नसतात. म्हणून जगात अनेक भाषा आहेत आणि एकाच वस्तूला भिन्न भाषेत भिन्न नावे (किंवा वाचक शब्द) असतात. जर शब्दांचे अर्थ निसर्गसिद्ध असते तर निसर्गनियम जसे सगळीकडे सारखेच असतात, तसे शब्दार्थाचेही झाले असते. विस्तव हा कोठेही उष्णच असतो, आणि त्यामुळे तो कोठेही वस्तू जाळतो किंवा भाजतो. परंतु त्या एकाच वस्तूला संस्कृतात ‘अग्नि’ म्हणतात, इंग्रजीत ‘fire’ आणि मराठीत ‘विस्तव’.
शब्द आणि अर्थ यांचा संबंध ईश्वरकृत असतो असे मानणार्या नैयायिकांनाही पुढे मान्य करावे लागले की अमुक शब्दाने अमुक अर्थ जाणावा हा संकेत मनुष्येच्छाधीन असतो.
हे शब्दार्थविषयक पुराण सांगण्याचे प्रयोजन असे आहे की संस्कृत भाषाविदांमध्ये शब्दांचे अर्थ व्युत्पत्तीने ठरतात असे मानण्याचा प्रघात आहे. उदा. जेव्हा ‘धारणात् धर्मः’ असे म्हटले जाते तेव्हा ‘धर्म शब्द ‘धृ’ या धातूपासून आलेला असल्यामुळे त्याचा अर्थ ‘धारण करणारा असा आहे असे म्हटले जाते. परंतु व्युत्पत्तीने अर्थाचा एखादा अंशच आणि तोही अनेकदा दूरान्वयाने प्राप्त झालेला अंश, दाखविला जातो. शब्दाचा अर्थ त्याचा वापर कसा होतो त्याने ठरतो. उदा ‘भर्ता’ या शब्दाचा व्युत्पत्तीने सिद्ध होणारा अर्थ ‘पोसणारा, रक्षण करणारा’ असा आहे, पंरतु त्याचा रूढ अर्थ ‘एखाद्या स्त्रीचा रीतसर लान लागून झालेला नवरा हा आहे. हा नवरा तिचे रक्षण करीलच असे नाही. तेव्हा ‘धर्म’ या शब्दाचा अर्थही त्याचा रूढ उपयोग आहे ते पाहून ठरविणेच योग्य. तसे केल्यास ‘धर्म’ हा शब्द कसाही बनलेला असला तरी त्याचा प्रत्यक्ष उपयोग religion’ या शब्दाच्या उपयोगाहून वेगळा नाही हे लक्षात येईल.
शब्दांच्या अर्थाविषयी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. अनेक शब्दांना अनेक अर्थ असतात, परस्परांशी संबद्ध नसलेलेही, आणि क्वचित तर चक्क विरुद्ध अर्थही असतात. कुठलाही कोश उघडून पाहिला की याची प्रचीती येते. संस्कृत भाषाही याला अपवाद नाही. ‘धर्म’ या शब्दाचेच उदाहरण घ्या. त्याचा एक अर्थ पुरुषार्थामधील पहिला. परंतु त्याचा दुसरा एक अर्थ स्वभाव किवा धर्म. उदा. ‘अग्नीचा जळणे हा धर्म आहे.’ तेव्हा एखाद्या शब्दाला मूळचा एक अर्थ असला तरी त्याला दुसरा पहिल्याशी संबद्ध (किंवा असंबद्ध) अर्थ देता येत नाही असे नाही. उलट ही प्रत्यही घडणारी प्रकिया आहे. म्हणून जरी कदाचित ‘धर्म’ या शब्दाच्या मूळ अर्थी तो पूर्णपणे religion’ या अर्थाचा नसला, तरी जरूर पडल्यास त्याला तो अर्थ दिला जाऊ शकतो. ‘धर्म’ या शब्दाच्या बाबतीत हे खरोखरच घडले आहे. त्यामुळे ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ मुळात काहीही असो, सध्या त्याचा एक प्रधान अर्थ religion हा आहे हे अमान्य करणे दुराग्रहाचे होईल.