आजच्या संपादकीयाचे स्वरूप वेगळे आहे. श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी आमच्या सल्लागार मंडळाच्या एक सभासद डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या धर्मान्तराच्या निमित्तानेआम्हाला पाठविलेल्या पत्रामुळे काही खुलासा करण्यासाठी हे आम्ही लिहीत आहोत.
आजचा सुधारक हे विवेकवादाला वाहिलेले मासिक सुरू झाल्याला लवकरच तीन वर्षे पूर्ण होतील. ह्या अवधीत आम्हाला महाराष्ट्रातील विचारी वाचकांकडून पुष्कळच प्रोत्साहन मिळाले आहे. ह्या मासिकात कोणते विषय कसे मांडले जातात त्याकडे आमच्या वाचकांचे बारीक लक्ष असते.
ह्या मासिकाच्या संचालनासाठी दोन मंडळे नेमली आहेत. एक संपादक मंडळ व दुसरे सल्लागार मंडळ. संपादक मंडळाचे सभासद संपादकांना दैनंदिन कामात मदत करतात. त्यांपैकी बहुतेक मंडळीअगदी रोज नाही तरी आठवड्यातून सरासरी चार दिवस संपादकांना भेटतात.
सल्लागार मंडळांच्या सभा मुद्दाम बोलवाव्या लागतात. अशा सभा वर्षातून तीनचार होतात. त्या सभांना सल्लागार मंडळातील सर्व सभासद उपस्थित असतातच असे नाही. सल्लागार मंडळाचा सल्ला धोरण ठरविण्यासाठी घेतला जात असला तरी धोरणाविषयी अंतिम निर्णय संपादकांचा असतो. सल्लागार मंडळाच्या सभांना उपस्थित न राहिलेल्यांचीही नावे मंडळावर राखली जातात, ती त्यांची काही धोरणे मासिकाच्या धोरणांशी मिळतीजुळती असल्यामुळे. असे करण्याचे कारण ते सभासद पुढे मागे सभांना येतील, त्यांचे लेखनात साहाय्य होईल अशी आशा वाटत असते. अशा सभासदांनी आपले नाव काढावे अशी विनंती केली तरच ते काढले जाते. एरवी ते प्रकाशित होत राहते. डॉ. रूपा कुळकर्णी ह्यांचे नाव अशांपैकी एक आहे.
डॉ. रूपा कुळकर्णी ह्यांनी गेल्या महिन्यात बौद्ध धर्म जाहीरपणे स्वीकारला. आपल्या समाजाला श्रद्धाळू बनविण्याच्या धर्माची पकड दूर व्हावी असा विचार मांडणाच्या मासिकाच्या संपादकीय सल्लागार मंडळावर त्यांचे नाव आता ठेवावे की नाही असा विचार आमच्या मनात डोकावून गेला. कारण कोणत्याही धर्माचे अनुयायी कोण्या एका धर्मप्रवर्तकाने अथवा अनेक ज्ञात-अज्ञात ऋषिमुनींनी दाखविलेल्या वाटेने जात असतात. स्वतःच्या विवेकाच्या साह्याने शोधलेल्या वाटेऐवजी पूर्वसूरींनी दाखविलेली वाट ते चोखाळत असतात. म्हणूनच ते त्या त्या धर्माचे अनुयायी म्हणवितात. त्यातही जन्माने प्राप्त झालेल्या धर्माचा त्याग करून जे स्वेच्छेने आणि विचारपूर्वक दुसर्या धर्माचा जाहीर रीतीने स्वीकार करतात त्यांची धर्म ह्या संस्थेवरील निष्ठा विवादातीत ठरते. हे आमच्या मासिकाच्या धोरणाशी विसंगत आहे. असे असले तरी त्या सल्लागार मंडळाच्या सभासद असल्यामुळे व सल्लागार मंडळाच्या सभासदांची मासिकाच्या धोरणाशी शंभर टक्के बांधिलकी अपेक्षित नसल्यामुळे आणि ते मंडळ शिथिल बांधणीचे असल्यामुळे आमच्याकडून तातडीने कोणतीहीकृती घडली नाही.
आणि तेवढ्यात वर उल्लेखिलेले श्रीमती भागवतांचे पत्र आमच्या हाती पडले. ते पत्र पुढीलप्रमाणे
श्री दि. य. देशपांडे यांस स. न. वि. वि.
आपल्या आजचा सुधारकचा ऑक्टोबरचा अंक मिळाला. मी त्याची खुशीने वर्गणीदार झाले. कारण आगरकरांच्या देवधर्मविरहित समाजकल्याणकारक प्रवृत्तीवर माझी निष्ठा आहे.
परंतु या अंकात संपादक मंडळावर प्रा. रूपा कुळकर्णी यांचे नाव पाहून मी त्यापुढे या नियतकालिकाची वर्गणीदार राहू इच्छित नाही. मात्र माझी आधीची वर्गणी राहिलेलीअसावी. ती मला कृपा करून कळवावी. मी ती खुशीने पाठवीन.
देवधर्म न मानणाच्या आगरकरी बाण्यात धर्मनिष्ठा बसू शकत नाही. मला आता ‘धर्म’ या गोष्टीबद्दलच शंका उत्पन्न झाली आहे. उघड ‘धर्मांतर’ म्हणजेच कुठला का होईना पण धर्म पूज्य मानणे. याला इहवाद किंवा विवेकवाद म्हणत नाहीत.
आपल्याविषयीचा आदर सतत कायम राहील. कृपा करून हे पत्र ‘सुधारका’त छापावे व माझ्याकडे अंक पाठवावा.
आपली
दुर्गा भागवत
हे पत्र आल्यानंतर ते आम्ही डॉ. रूपा कुळकर्णी ह्यांच्याकडे पाठविले. त्यांनी उत्तरादाखल पाठविलेले पत्र खाली देत आहोत. त्यामधील पत्रकर्तीबद्दल केलेला काही व्यक्तिगत उल्लेखाचा भाग वगळला आहे. कारण ह्या वादाला परस्परांविषयीच्या पूर्वग्रहांची बाधा होऊन मुख्य मुद्दा बाजूला राहण्याची शक्यता आम्हाला जाणवली. ते पत्र पुढे दिलेआहे.
आदरणीय डॉ. दि. य. उपाख्य नानासाहेब देशपांडे यांसी सा, नमस्कार,
काल सायंकाळी फोनवर झालेल्या बोलण्यानुसार, श्रीमती दुर्गा भागवत यांच्या आपणास आलेल्या पत्राची प्रत मला आज सकाळी मिळाली. उद्याच्या बैठकीच्या आधी उत्तर आल्यास बरे असे आपण म्हटल्याने माझी आजी अत्यवस्थ असतानाही त्वरित उत्तर पाठवीत आहे.
मी बौद्ध धम्म स्वीकारला म्हणून माझे नाव जोवर संपादकमंडळावर आहे तोवर दुर्गाबाई आजचा सुधारक च्या वर्गणीदारसुद्धा राहू इच्छित नाहीत असे त्यांनी आपणास कळविले आहे. “संपादक मंडळावर प्रा. रूपा कुळकर्णी यांचे नाव पाहून मी यापुढे या नियतकालिकाची वर्गणीदार राहू इच्छित नाही” असे त्या स्पष्टपणे लिहितात.
याबाबत फोनवर आपण माझ्याशी बोलताना मी संपादक मंडळाचा राजीनामा द्यावा असे अप्रत्यक्षपणे सुचविले. याबद्दल मी आपले आभार मानते. परंतु त्याच वेळी हेही निदर्शनास आणून देऊ इच्छिते की, लोकहितवादी न्या. रानडे, आगरकर, महात्मा फुलेआणि बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांना आपण सुधारक मानीत नाही.
म. फुले यांनी नव्या सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली तर डॉ. बाबासाहेबांनी रूढ अर्थाने धर्म नको म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला व हिंदू समाजातील दलित, पीडित अशा लाखो लोकांची धार्मिक, सामाजिक व आर्थिक गुलामीतून मुक्तता केली.
सेक्युलर शब्दाची आपली व्याख्या सर्वधर्म-अभाव आहे अशी दिसते. याला आपण धर्मनिरपेक्षता मानता. या अर्थाने आगरकरसुद्धा सुधारक नव्हते आणि आपल्या संपादकमंडळात असलेल्या सर्व मंडळींनी या दृष्टीने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. कारण हिंदू रूढींप्रमाणे लग्नसमारंभ आणि अन्य रीतिरिवाज पाळून, जातिबांधवांच्या मंडळातही राहता येते व तरीही ते जीवन देवधर्मविहीन आहे हे मानणे म्हणजे थोतांड आहे की नाही याचा विचार आपण सर्वांनी आणि विशेषतः दुर्गाबाईंनी करावयास हवा. याचा सरळ अर्थ असा की हिंदुधर्म चालेल पण बुद्धाचा धम्म नको एवढाच आहे. यात हिंदुधर्माबद्दल अंधश्रद्धा आणि बुद्धधर्माबद्दलचा आकस आहे, असे मला वाटते.
मी बौद्ध धम्म स्वीकारला. धम्म आणि धर्म यातील भेद आपण म्हणालात त्याप्रमाणे केवळ संस्कृत आणि प्राकृतापुरता नाही तर तो मूलभूत आहे. मला वाटते, मनू नातू आज असत्या तर ही वागणूक मला मिळाली नसती. त्यांच्यावरील प्रेमादरामुळेच मी संपादकमंडळात येण्यास मान्यता दिली होती. आता आजचा सुधारकची भूमिका आणि विवेकवाद यातच फरक झालेला दिसतो. त्यामुळे मी आपल्या संपादकमंडळात मावू शकेन असे मला वाटत नाही. एरवीही धर्माने हिंदू नसलेली एकही व्यक्ती आपल्या संपादकमंडळात नाहीच. इतर धर्मातील लोकांना इहवाद किंवा विवेकवाद कळत नाही असे यावरून अनुमान काढले तर ते चूक होईल असे मला वाटत नाही. म्हणून माझे संपादकमंडळात न राहणेच इष्ट ठरेल.
धम्म आणि धर्म यांतील भेद समजून घेण्याची नव्या सुधारकाची इच्छा असल्यास ते मी स्पष्ट करू शकेन. परंतु ती भूमिका आपल्याला पटेल किंवा रुचेल असे मला वाटत नाही. म्हणून मी तो मोह टाळते. मला तुमची अडचण कळते. इहवाद व विवेकवाद यांच्यासोबत व्यवहारवादही आपल्याला सांभाळावयाचा आहे. कुठलेही नियतकालिक चालविण्याची ही मर्यादा दिसते. म्हणून मी या अशा मर्यादेत गुंतून राहू इच्छित नाही. म्हणूनच खेदपूर्वक हा राजीनामा पाठवीत आहे, आणि आपल्या उत्तराची वाट न बघता यातून आताच मुक्त झाले असे मानीत आहे. हा निर्णय मी विचारांती घेतला आहे.
विवेकवादाला वाहून घेतलेल्या मंडळींना अगर नियतकालिकाला भारतीय राज्यघटनेने दिलेले धर्म व उपासनेचे स्वातंत्र्य मान्य नाही असे दिसते. मी तर भारतीय नागरिक आहे. मी भारत हा माझा देश आहे असे मानते, आणि त्यामुळे ती राज्यघटनाही मला मान्य आहे हे ओघानेच आले. मी बौद्ध धम्म स्वीकारला तो माझा मूलभूत अधिकार मानते आणि माझी ही भूमिका आपण समजून घ्याल अशी मला खात्री आहे. अर्थात् बौद्ध धम्म हा रूढार्थाने आपण मानता तसा धर्म नाही हे मी स्पष्ट करू इच्छिते. हा फरक लक्षात न घेतल्यास इहवाद व विवेकवादही एक संप्रदाय किंवा पंथ ठरू शकेल.
आपण आजवर मला दिलेल्या सहकार्याबद्दल मी आपली आभारी आहे. मी संपादकमंडळातून मुक्त झाले तरी आपल्या सर्वांबद्दलचा माझा आदर कायमच राहील. कारण तो स्नेहादर आहे आणि स्नेहाला कुठल्याच उपाधीची गरज नसते. माझीही आपल्याबद्दल हीच अपेक्षा आहे. दुर्गाबाईंच्या पत्रासोबत माझ्याही पत्राला आपण प्रसिद्धी द्याल अशी विनंती करते आणि येथेच थांबते. कळावे.
३० ऑक्टोबर १९९२
आ.स्नेहाकांक्षी रूपा कुळकणीं
वरील उत्तरात डॉ. रूपा कुळकर्णी यांनी स्वसमर्थनार्थ अनेक युक्तिवाद केले आहेत; आणि अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढेच नव्हे, तर आजचा सुधारकच्या संपादकांवर काही हेत्वारोपही केले आहेत. त्यापैकी प्रमुख युक्तिवादांना आम्ही उत्तरे देतो.
सेक्युलर’ या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष, किंवा स्पष्टच सांगायचे तर इहवादी. आणि धर्म इहवादी (म्हणजे केवळ इहवादी किंवा इहैकवादी) असू शकत नाही, हे आम्हाला वाटते, मान्य व्हावे. डॉ. कुळकर्णी म्हणतात की या अर्थाने आगरकरसुद्धा सुधारक नव्हते. हे आम्हाला पटत नाही. हे खरे आहे हे डॉ. कुळकर्णी यांनी दाखवून द्यावे अशी त्यांना विनंती आहे. परंतु ते त्यांनी सिद्ध केले तरी त्यामुळे आम्ही निधर्मीपणा सोडणार नाही. आगरकर या बाबतीत कमी पडले असे आम्ही म्हणू. आजचा सुधारक आगरकरांचे अनुयायित्व मानीत असला तरी तो त्यांचा अंध अनुयायी नाही.
आता विवेकवादी माणसाने विवाहादींच्या बाबतीत कसे वागावे ह्याविषयी काही तुरळक अपवाद सोडले तर आपल्या समाजातील सर्व व्यक्ती कोणता. तरी धर्म मानणाच्या मातापितरांच्या पोटी जन्मल्या आहेत, आणि म्हणून जन्मल्यापासून त्या धर्माची शिकवण त्यांना मिळाली असून ती त्यांच्या अंगवळणी पडली आहे. मोठे झाल्यावर ह्यापैकी काही लोकांना धर्माचे व श्रद्धेचे अविवेकित्व पटते, आणि मनातून ते धर्म मानीनासे होतात, परंतु ते जाहीर रीतीने आपल्या जन्मप्राप्त धर्माचा त्याग करीत नाहीत, कारण त्यांना त्याची गरज वाटत नाही. सर्व धर्म कमीअधिक प्रमाणात अविवेकी आहेत हे ओळखल्यामुळे धर्मांतर करण्याचा पर्याय त्यांच्यापुढे नसतो. व्यवहारात ते सहज शक्य असेल तेथे धार्मिक विधी टाळतात. उदाहरणार्थ आपल्या मुलाचे लग्न ते नोंदणीपद्धतीने करतात आणि मुलांची मुंज करीत नाहीत. परंतु मुलीच्या लग्नात वरपक्षाकडील मंडळींनी आग्रह धरला तर वैदिक विधीने लग्न करतात. एखाद्या सभेत जर शोकप्रस्ताव मांडला जात असेल तर इतरांबरोबर ते दोन मिनिटे स्तब्ध उभे राहतात. तसे केल्याने ईश्वर मृताच्या आत्म्यास सद्गती देईल असे त्यांना वाटत नाही, आणि तो विधी ख्रिस्त्यांचा असला तरी त्यामुळे आपण ख्रिस्ती झालो असेही ते मानीत नाहीत. दिवाळीत ते दिव्यांची रोषणाई करतात, पण ती धार्मिक कारणासाठी करीत नाहीत, तर केवळ आनंदाकरिता करतात. दसर्याच्या दिवशी त्यांच्याकडे सोने द्यायला कोणीआला तर ते त्यांचे स्वागत करतात, आणि कदाचित् त्याला सोनेही देतात. पण हा एक रूढ सामाजिक व्यवहार असतो, त्याला धार्मिक अंग नसते. हे सर्व आचार ते टाळू शकतील, पण त्यापैकी जे निरुपद्रवी व आनंददायी असतात त्यांचा त्याग करण्याचे त्यांना कारण नसते. मात्र ते आचार ते श्रद्धापूर्वक करीत नाहीत. त्यामुळे हिंदुधर्मातील काही चालीरीती पाळणारा मनुष्य त्या धार्मिक हेतूने पाळतो असे म्हणता येत नाही. आमच्या संपादकमंडळातील सदस्य या अर्थाने अश्रद्ध आणि इहवादी आहेत अशी आमची समजूत आहे.
डॉ. कुळकर्णीचा एक आक्षेप असा आहे की, संपादकमंडळातील एकही सदस्य हिंद्वेतर धर्माचा नाही, आणि ह्याचे कारण आम्हाला बौद्धधर्माबद्दल आकस आहे असे त्या सुचवितात. खरी गोष्ट अशी आहे की, संपादकमंडळातील व्यक्ती ह्या परस्परांचे स्नेही असून स्थूल मानाने समविचारी आहेत. त्या कोणत्या धर्माच्या आहेत हा विचारच आमच्या मनाला शिवला नाही. त्या सर्व विचाराने धर्महीन आहे अशीच आमची समजूत होती व आहे. सबंध संपादक मंडळ हिंदू सदस्यांचे बनले आहे, ह्यावरून अन्य धर्मात कोणी इहवादी व विवेकवादी नाही असे आम्हाला अभिप्रेत आहे असे म्हणणे तर खचितच हास्यास्पद आहे.
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला धर्म आणि उपासना ह्यांचे स्वातंत्र्य दिले आहे हे खरे आहे आणि हे स्वातंत्र्य आजचा सुधारकच्या संपादकमंडळातील प्रत्येक सदस्याला आहे. पण हे स्वातंत्र्य जो घेऊ लागेल त्याला आजचा सुधारकच्या संपादकमंडळावर राहता येणार नाही. पण ह्याचा अर्थ घटनेने त्यांना दिलेला हक्क आम्ही नाकारतो असा करता येणार नाही. संपादकमंडळावरील प्रत्येक व्यक्तीने स्वतःवर स्वखुषीने घालून घेण्याचे ते बंधन आहे.
शेवटी डॉ. कुळकर्णी म्हणतात की, धर्म आणि धम्म एक नाहीत. धर्म अविवेकी असेल पण धम्म मात्र विवेकाच्या कसोटीला उतरणारा आहे. हा भेद त्यांनी स्पष्ट करून दाखवावा अशी आमची त्यांना विनंती आहे. ती भूमिका आम्हाला पटणार नाही किंवा रुचणार नाही ह्या भीतीने ते काम करण्याचे त्यांनी टाळू नये. कोणत्या बाबतीत धम्म धर्मापेक्षा वेगळा आहे हे आम्हाला खरोखरीच जाणून घ्यायचे आहे. त्यांपैकी एक शब्द संस्कृत आहे आणि दुसरा प्राकृत आहे एवढाच त्या दोहोत फरक आहे अशी आमची समजूत आहे. असो.
डॉ. कुळकर्णीनी ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा. संपादक मंडळाचे सदस्य आणि सल्लागार मंडळाचे सदस्य ह्यांच्याकडून अपेक्षित बांधिलकीत असलेला व उल्लेखिलेला भेद लक्षात घेता त्यांनी सल्लागार मंडळाचा राजीनामा देण्याचे प्रयोजन उरले नाही. त्यांचे सल्लागारमंडळाचे सदस्यत्व कायम आहे असे आम्ही समजतो.
श्रीमती दुर्गाबाईंना आमचे सांगणे असे आहे की त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा बरोबर आहे. परंतु डॉ. रूपा कुळकर्णी संपादक-मंडळात नाहीत, आणि सल्लागार मंडळाकडून मासिकाच्या ध्येयधोरणाशी पूर्ण बांधिलकी अपेक्षित नाही, त्यामुळे त्यांचा आक्षेप काहीसा गैरलागू होतो. या गोष्टीचा विचार करता आजचा सुधारकशी संबंध तोडण्याचा आपला निर्णय त्यांनी मागे घ्यावा अशी त्यांना विनंती आहे.