पूर्वेतिहास आणि पूर्वाचार हे पुनःपुन्हा पुढे आणून त्यांचे फिरून अवलंबन करा, असे सांगत न बसतां, अलीकडील न्यायाच्या भात्यांतून तीव्र बाण काढून त्यांचा त्यांवर संपात केला पाहिजे. कोणतेहि आचार घालण्यास पूर्वीच्या ऋषींस जितका अधिकार होता तितकाच आम्हांसहि आहे. पूर्वकालीन आचार्यांवर ईश्वराची जितकी कृपा होती, तितकीच आम्हांवरहि आहे, व त्यांच्याशी त्यांचा जितका संबंध होता तितकाच आम्हांसहि आहे. बर्या-वाईटाची निवड करण्याची जितकी बुद्धि त्यांना होती तितकी, तीहून अधिक आम्हांसहि आहे. सृष्टिविषयक ज्ञान जितकें त्यांना होते, तितकें, किंबहुना त्याहून अधिक ज्ञान आम्हांस आहे. सबब त्यांनी घालून दिलेल्या नियमांपैकी जेवढे हितकारक असतील तेवढ्यांचंच आम्ही पालन करणार आणि जे अपायकारक असतील ते टाकून देऊन त्यांचे जागी आम्हांस निर्दोष वाटतील असे नवीन घालणार. अशा धर्तीवर हा वाद नेला पाहिजे.