डॉ. के. रा. जोशी यांचे विवेकवादीनीति विचारावरील आक्षेप

डॉ. जोशांचा पहिला आक्षेप असा आहे की कांट काय किंवा उपयोगितावादी काय, त्यांचे विवेचन प्रमाणविरुद्ध आहे. कारण विवेकवाद्याला उपलब्ध असलेल्या दोन प्रमाणांनी त्यांचे समर्थन अशक्य आहे. उदा. साधु ईहेचे स्वरूप काय आहे?ती ‘साधु’ कशी ठरते?‘साधुत्व म्हणजे काय?या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे दुर्लभ आहेत असे ते म्हणतात. ते असे का म्हणतात कळत नाही, कारण या प्रश्नांची समर्पक उत्तरे कांटने दिली आहेत, आणि त्यांचा उल्लेख माझ्या लेखात मी केला होता. असे असले तरी ती उत्तरे मी पुन्हा देतो.
ईहा म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी असणारी अशी मानस शक्ती की जिच्यामुळे तो स्वतंत्रपणे कर्मे करतो. कांट म्हणतो की निसर्गात सर्वच गोष्टी नियमाप्रमाणे घडतात; परंतु मनुष्याच्या ठिकाणी नियमाच्या कल्पनेनुसार कर्मे करण्याची शक्ती आहे. उदा. एखादा दगड उंचावरून फेकला तर तो खाली पडतो, आणि त्याचे हे पडणे एका नियमानुसार असते. तसेच पशूचे वर्तनही नियमबद्ध असते. परंतु दगड काय किंवा पशू काय, नियम पाळण्याकरिता कर्म करतात असे आपण म्हणत नाही. परंतु मनुष्य नियम आपल्यासमोर ठेवून, म्हणजे नियमाची कल्पना करून, त्यानुसार बुद्ध्या वागू शकतो. या त्याच्या शक्तीला कांट will’ हे. नाव देतो. त्याला मी ईहा हा शब्द वापरतो. मनुष्याच्या जीवनातील बहुतेक घटना निर्जीव पदार्थाच्या घटनांप्रमाणे नियमाने घडतात; पण त्याचा एक लहानसा भाग असा आहे की ज्यात मनुष्य स्वतः नियम बनवून त्यानुसार वागू शकतो हे निर्विवाद आहे.
आता यापुढचे प्रश्न ‘साधुत्व म्हणजे काय? आणि ईहेचे साधुत्व कशाने ठरते?हे आहेत. या प्रश्नांचे उत्तर देण्याकरिता आपल्याला स्वतोमूल्य (किंवा साध्यमूल्य) आणि परतोमूल्य (किंवा साधनमूल्य) या दोन मूल्यांत भेद करावा लागतो, आणि तसेच स्वतोमूल्यांचे नैतिक आणि ननैतिक मूल्य असा भेद ओळखावा लागतो. आपण जी नैतिक भाषा वापरतो तिच्यात हा भेद अभिप्रेत असतो. नैतिक भाषेत अभिप्रेत आलेला हा भेद स्पष्टपणे ग्रथित करणे हे नीतिमीमांसकाचे काम असते. आपण ज्या गोष्टी इष्ट, चागंल्या किंवा मूल्यवान मानतो त्यांपैकी काही त्या अन्य इच्छित वस्तूंची साधने असतात म्हणून मानतो. परंतु इतर काही गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला स्वार्थ, म्हणजे केवळ त्यांच्याकरिताच (for themselves) हव्या असतात. या दुसर्याा प्रकारच्या वस्तू म्हणजे स्वतोमूल्यवान वस्तू. आता या स्वतोमूल्यवान वस्तूंपैकी एक वस्तू कांटच्या मते अशी आहे की जिचे मूल्य नैतिक आहे. ही वस्तू म्हणजे सदीहा (सत् + ईहा, good will). ती केवळ कर्तव्याकरिता कर्तव्य करण्यास प्रेरणा देते. ह्या ईहे चे साधुत्व किंवा चांगलेपणा अन्य सर्व चांगल्या किंवा स्वतोमूल्यवान गोष्टींहून वेगळे आणि श्रेष्ठ आहे. याचे कारण असे आहे की बाकीच्या सर्व गोष्टी भ्रष्ट होऊ शकतात, म्हणजे त्यांचा चांगलेपणा प्रसंगी नष्ट होऊ शकतो, परंतु सदीहेचे मूल्य मात्र सर्वदा अबाधितच राहते. अन्य गोष्टींच्या चांगुलपणाची एक अपरिहार्य अट म्हणजे त्यांना सदीहेची जोड असणे; पण ती नसली तर त्यांचा चांगुलपणा नष्ट होऊ शकतो. उदा. सुख हे स्वतोमूल्यवान खरे; पण दुष्ट माणसाला होणारे सुख चांगले नसून वाईट असते असे आपण म्हणतो. सदीहेचे मूल्य म्हणजे नैतिक मूल्य हे सदीहेने केलेल्या (म्हणजे कर्तव्य म्हणून केलेल्या) कर्मात उतरते, तसेच ते सदीहेने प्रेरित माणसात आणि त्याच्या शीलातही उतरते. आपल्या जीवनात स्वतोमूल्य असल्याने ते नैतिक होत नाही. उदा. सुखी मनुष्य नीतिमान असेलच असे नाही. आपले कर्म नीतिमान, नैतिकमूल्यवान होते ते त्यात सदीहा व्यक्त झाल्याने.
डॉ. जोशांचा पुढचा प्रश्न आहेः साधु ईहेचा सार्विकीकरणाच्या नियमाशी संबंध कसा जोडावयाचा? कांटचे उत्तर असे आहे की नीती ही नियमबद्ध गोष्ट आहे. एखादे कर्म चांगले किंवा युक्त असेल तर ते एका विशिष्ट प्रकारच्या नियमानुसार घडलेले असलेपाहिजे. हा नियमांचा विशिष्ट प्रकार म्हणजे ज्या नियमांचे साविकीकरण करता येते असे नियम. मी ज्या नियमाप्रमाणे वागतो आहे त्या नियमानुसार सर्वांना वागता येईल काय?म्हणजे सर्व लोक जर त्या नियमानुसार वागले तर चालेल काय?ह्या प्रश्नाचे उत्तर जर होकारार्थी आले तर तो नियम नैतिक नियम मानायला हरकत नाही असे कांटचे म्हणणे आहे. हा सार्विकीकरणाचा निकष कर्तव्य ठरविण्याच्या कामात अपुरा पडतो हे मी माझ्या यापूर्वीच्या लेखात सांगितले आहे. परंतु हा निकष पर्याप्त नसला तरी अवश्य (किंवा अपरिहार्य) आहेच हे लक्षात ठेवायला हवे. सार्विकीकरणाच्या निकषाचा मुद्दा असा आहे. कठीण कर्तव्य करताना आपल्याला पुष्कळदा स्वतःचा अपवाद करण्याचा मोह होतो. त्यावेळी ह्या मोहाला बळी पडण्यापूर्वी समान परिस्थितीतील प्रत्येक मनुष्याने मोहाला बळी पडणे हे नीतिसंमत आहे असे मानावे लागेल. स्वतःच्या बाबतीत पक्षपात घडू नये हा हेतू वरील निकषाच्या योजनेत आहे.
ही उत्तरे तर्कसंगत नाहीत असे डॉ. जोशी म्हणणार आहेत काय?
उपयोगितावादाचे विवेचनही प्रमाणविरुद्ध आहे असे जोशी म्हणतात. सुख म्हणजे अनुकूलतया वेदनीय असा अनुभव असेल तर भूयिष्ठांचे अधिकतम सुख तपासण्याची रीत कोणती?सुख स्वयंवेद्य असल्यामुळे एखाद्या मनुष्याला सुख होते आहे की नाही हे तपासण्याचे साधन अन्य कोणालाच उपलब्ध होऊ शकत नाही. डॉ. जोशांचा हा आक्षेप बिनतोड दिसतो, पण वस्तुतः तो अगदीच पोकळ आहे. डॉ. जोशांना असे म्हणायचे आहे काय की दुसर्याा मनुष्याला सुख होते की नाही हे समजण्याचे आपल्याजवळ कसलेच साधन नाही? जर नसेल तर मनुष्यांचे सबंध कौटुंबिक आणि सामाजिक जीवन सर्वथा अशक्य होऊन जाईल. पशू आणि तान्ही मुलेही केव्हा दुःखात असतात आणि केव्हा सुखात हे आपण सहज ओळखतो. मानवाचे वर्तन (behavior) त्याच्या मनोव्यापाराचा बोलका आरसा असतो. एखादा मनुष्य आनंदात आहे की नाराज आहेत, तो क्रुद्ध आहे की भयभीत आहे, लाजलेला आहे की गोंधळलेला आहे हे त्याच्या वर्तनात प्रतिबिंबित होते. आणि जेथे भाषेचा उपयोग होतो तेथे तर तिच्या साह्याने मनोदशेचे बारीक वर्णनही करता येते.
भूयिष्ठांचे अधिकतम सुख कसे तपासणार हा प्रश्न त्या मानाने बराच सयुक्तिक आहे, कारण त्याकरिता सुखदुःखांचे मोजमाप आणि बेरीज-वजाबाकी करावी लागेल. पण ही गोष्ट बन्याच बिनचूक प्रमाणात साध्य करता येते असे म्हणता येते. एखाद्या मनुष्यसमूहात सुखाची वाटणी समान व्हावी अशी इच्छा मुलखावेगळी म्हणता येणार नाही. खरे म्हणजे प्रत्येक कुटुंबात त्याचे प्रमुख, म्हणजे आई आणि बाप, यांची धडपड या दृष्टीने चालू असते हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. कुटुंबातील सदस्य अतिशय भिन्न असतातः आई आणि बाप हे दोन प्रौढ, आणि तान्ह्या बालकापासून ते कुमार आणि प्रौढ वयाच्या मुलांपर्यत. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या गरजा, आवश्यकता, आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती या सर्वांचा नीट विचार करून कुटुंबाची स्वामिनी सर्वांना समान सुख व्हावे अशी खाद्ये, पेये, इत्यादि पदार्थाची वाटणी करते. कोणाला काय दिले असता त्याला किती सुख किंवा दुःखहोते यांची तिला चांगली कल्पना असते. हीच गोष्ट आपण कुटुंबाबाहेरही अनेक ठिकाणी पाळतो. उदा. मित्रमंडळीत ज्याने सुख होईल असेच आपण करत असतो. इतरांना कशाने सुख होते आणि कशाने असुख होते, आणि ते किती होते हे आपण त्यांच्या वर्तनाचे अवलोकन करून आणि त्यांच्या स्वतःसंबंधीच्या वक्तव्यावरून ओळखण्यास आपण शिकतो. आणि हे आपले अंदाज स्थूलमानाने बरोबर असतात हे आपल्याविषयी इतर जे बोलतात आणि वागतात त्यावरून आपल्या लक्षात येते. तेव्हा सुख स्वयंवेद्य असून ते ज्याचे त्यालाच कळू शकते हे केवळ मर्यादित अर्थाने सत्य आहे. आपला सबंध सामाजिक व्यवहार याला साक्षीआहे.
आता हे खरे आहे की सुखदुःखांचे काटेकोर मोजमाप आपण करू शकत नाही. उदा. एका माणसाचे सुख किंवा दुःख दुसर्यार माणसाच्या सुखदुःखाएवढे नेमके आहे, किंवा ते त्याच्या पाउणपट किंवा दीडपट आहे हे आपण सांगू शकत नाही. पण दोन माणसांचे सुख स्थूलमानाने सारखे आहे, किंवा त्यांपैकी एकाचे सुख दुसर्यााच्या सुखापेक्षा बरेच जास्त आहे. हे आपण ओळखू शकतो, आणि त्यानुसार त्याच्याशी व्यवहार करतो. जेव्हा सुखवादी किंवा उपयोगितावादी म्हणतो की ज्या कर्माने जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख होईल ते कर्म करणे आपले कर्तव्य असते, तेव्हा हे म्हणणे त्याला वरील स्थूल अर्थानेच अभिप्रेत असते. आपल्या आणि इतरांच्या सुखदुःखांची व त्यांच्या मात्रेची आपण बर्यावपैकी बिनचूक कल्पना करू शकतो यावरच मानवसमाजाचे व्यवहार आधारलेले आहेत.
डॉ. जोशी म्हणतात की कर्तव्ये मानवी हिताशी संबंध असतात. आता हितकारक म्हणजे परिणामी सुखकारक असे ते म्हणतात. परंतु एखाद्या कर्माची हितकारकता तपासण्याकरिता किती कालखंड जावा लागेल हे सांगणे शक्य नाही. म्हणून आपले कर्तव्य काय आहे याचा निर्णय करणे अशक्य आहे असे ते म्हणतात. ‘हितकर’ या शब्दाचा त्यांनी दिलेला ‘परिणामी’ सुखकारक हा अर्थ स्वीकारायला माझी हरकत नाही. आता कोणती कर्मे हितकारक आहेत आणि कोणती नाहीत याचे मनुष्यजातीला हजारो वर्षांच्या अनुभवाने पुष्कळ ज्ञान प्राप्त झालेले आहे, एवढेच नव्हे तर प्रत्येक मनुष्याला त्याचे आईबाप, गुरुजन इत्यादिकांकडून ते सतत प्राप्त होत असते. उदा. दारू, अफू, इत्यादि मादक द्रव्यांचे सेवन परिणामी दुःखकारक असते किंवा लहानपणी आणि तारुण्यात विद्या प्राप्त केल्यास उत्तरायुष्यात पुष्कळ सुख प्राप्त होते, इत्यादि सामान्य नियमांचे ज्ञान प्रत्येक मनुष्याला तो लहानाचा मोठा होत असताना घर, शाळा, आणि बाहेरचा समाज यांच्याकडून भरपूर होते. तेव्हा कोणते कर्म हितकारक आहे हे आपल्याला कसे कळणार हा प्रश्न डॉ. जोशी यांना का पडावा कळत नाही.
६.
डॉ. जोशांचा एक आक्षेप असा आहे की उपयोगितावादी नीतिमीमांसेत मानलेला कार्यकारणभाव चुकीचा आहे. भूयिष्ठांचे अधिकतम सुख हा त्यांचा कर्तव्यकर्माचा निकष स्वीकारला तर नैतिक कर्तव्यामुळे काही थोड्या का होईना लोकांना दुःखकारक अनुभव येऊशकतो असे मानायची आपत्ती येते. त्यामुळे नैतिक कर्तव्ये सुखाचे कारण असतात हे म्हणणे चुकीचे ठरते. या आक्षेपाला उपयोगितावादी नीतिमीमांसेजवळ समर्पक उत्तर आहे. त्या मीमांसेत असे गृहीत धरले आहे की कोणत्याही कर्माने केवळ सुखनिष्पत्ती होईल हे असंभव आहे. प्रत्येक कर्मातून सुखाबरोबरच थोडेबहुत दुःखही निर्माण होते हे निश्चित. उदा. अपराध्याला शिक्षा करणे कर्तव्य ठरते कारण जरी त्यातून अपराध्याला दुःख झाले, तरी व्यापक विचार करता त्यातून कितीतरी जास्त सुखाची निष्पत्ती होणार हे निश्चित असते. जेव्हा उपयोगितावादी अधिकतम सुखाविषयी बोलतो तेव्हा वस्तुतः त्याला अधिकतम सुखाधिक्य (greatest balance of pleasure over pain) अभिप्रेत असते. एखाद्या कर्मातून उद्भवलेल्या सुखातून त्यातून उद्भवलेले दुःख वजा करून जे सुख शिल्लक उरेल ते सुखाधिक्य. हे सुखाधिक्य जास्तीत जास्त असावे अशी उपयोगितावाद्याची धडपड असते. आणि समजा क्वचित् एखादे कर्म असे निघाले की त्यातून केवळ सुखच निर्माण होते, दुःखाचा लवलेशही निर्माण होत नाही, तर अशा अपवादात्मक कर्माची सोय ‘भूयिष्ठांचे अधिकतम सुख’ या सूत्रात केलेलीच आहे. ‘भूयिष्ठांचे सुख यात सर्वांचे सुख अभिप्रेत आहेच. भूयिष्ठाची कमाल मात्रा म्हणजे सर्व, तेव्हा जर एखाद्या कर्माने सबंध मानवजातीला केवळ सुखच होणार असेल, तर ते कर्म उपयोगितावाद्याला वर्ण्य नाही. याप्रमाणे चुकीच्या कार्यकारणभावाचे म्हणून डॉ. जोशांनी दिलेले उदाहरण बरोबर नाही असे म्हणावे लागते.
डॉ. जोशी चुकीच्या कार्यकारणभावाचे आणखी एक उदाहरण देतात त्याकडे आता वळू. ते म्हणतात की नैतिक कर्तव्य आणि सुखप्राप्ती हा कार्यकारणभाव जगात अनुभवाला येत नाही, कारण एखाद्याने कर्तव्यकर्म केले आणि तो सुखी झाला असे दिसून येत नाही. परंतु नैतिक कर्म करणारा मनुष्य सुखी होतो असे उपयोगितावादी म्हणतच नाही. नैतिक कर्ता सुखी व्हावा हा नैतिक कर्माचा हेतूच मुळी नसतो. तो हेतू असतो जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त सुखी व्हावेत हा. त्या जास्तीत जास्त लोकांत स्वतः कर्ता असेलच असे सांगता येत नाही. एखाद्या वेळी कर्याच्या स्वार्थत्यागामुळे भूयिष्ठांचे अधिकतम सुख निर्माण होणार असेल. नैतिक कर्याला एक सुख मात्र निश्चितच होते, ते म्हणजे आपले कर्तव्य केल्याचे समाधान. पण हे सोडले तर त्याच्या वाट्याला अन्य कुठल्याही सुखाचा अंशही कदाचित् येणार नाही. या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. एखाद्या मनुष्याने आपल्या बुद्धीप्रमाणे एखादे कर्म कर्तव्य म्हणून निश्चित केले असले, तरी त्या कर्माने प्रत्यक्षात भूयिष्ठांचे अधिकतम सुख निर्माण होईलच अशी शाश्वती नसते. नैतिक कर्त्यांची प्रामाणिक समजूत असते की आपल्या संकल्पित कर्माने भूयिष्ठांचे अधिकतम सुख निर्माण होईल. परंतु ही समजूत चूक असू शकते. मनुष्यांच्या बौद्धिक सामथ्र्याला मर्यादा असल्यामुळे ज्या कर्माने भूयिष्ठांचे अधिकतम सुख निर्माण होईल अशी त्याने खात्री करून घेतली असते ते कर्म वस्तुतः तसे नसेल हे शक्य असते. पण याला काही इलाज नाही. कोणीही माणूस शेवटी त्याला असलेल्या बुद्धिसामर्थ्याच्या साह्याने कर्तव्य ठरविणार, आणि प्रत्यक्षात ते कर्म त्याचे कर्तव्य नसूही शकेल. असे असले तरी अस्खलनशील असे साधन मानवाजवळ नसल्याने जे साधन त्याच्याजवळ आहे त्याचाच उपयोग करून वागणे हे त्याचे कर्तव्यच आहे.
सुख हे स्वतोमूल्य किंवा स्वतोमूल्यवान गोष्ट आहे हे उपयोगितावाद्यांचे मत सिद्धान्तमुक्तावली कारांनाही मान्य आहे ही फार स्वागतार्ह गोष्ट आहे. ज्याची इच्छा अन्य कोणत्याही इच्छेवर अवलंबून नसते ते सुख अशी भारतीय विचारकांची सुखाची व्याख्या आहे. यालाच उपयोगितावादी स्वतोमूल्य म्हणतो. एवढ्यापुरते तरी डॉ. जोशी आणि उपयोगितावादी यांच्यात एकमत झाले हे उपयोगितावाद्यांचे भाग्यच म्हणावयास हवे. त्यामुळे डॉ. जोशांना सुख स्वतोमूल्यवान आहे हे मान्य आहे. परंतु काही उपयोगितावादी म्हणतात त्याप्रमाणे सौंदर्य किंवा कलास्वाद, स्नेह, मैत्री, इ. अन्य काही गोष्टींही स्वतोमूल्यवान आहेत हे त्यांना मान्य नाही. आता या बाबतीत उपयोगितावाद्यांमध्ये मतभेद आहेत हे मी म्हटलेच आहे. त्यामुळे मी दिलेल्या कर्तव्यनिकषात फक्त जास्तीत जास्त सुखाचाच उल्लेख केला आहे. पण जे लोक कलास्वाद, स्नेह इत्यादि गोष्टीही स्वतोमूल्यवान मानतात त्यांचे थोडेबहुत समर्थन करता येते हे येथे लक्षात ठेवले पाहिजे. काही लोक असे असतात की जे ज्ञान, कला इत्यादि गोष्टींची केवळ त्यांच्याकरिताच उपासना करतात. म्हणून त्यांच्या दृष्टीने त्या गोष्टी स्वतोमूल्ये होत. आता त्यांच्या प्राप्तीमुळे त्यांना सुख होते हे खरे आहे; परंतु हे सुख मिळावे म्हणून ते ज्ञानाची किंवा कलेची उपासना करीत नाहीत. त्यांना ज्ञान स्वतोमूल्यवान वाटते, म्हणजे त्यांना ज्ञान ज्ञानाकरिताच हवे असते; आणि म्हणून ते प्राप्त झाले की त्यांना इच्छातृप्तीचे सुख मिळते. म्हणजे येथे सुख उद्दिष्ट नसून परिणाम आहे. दुसरी गोष्ट अशी की जरी सामान्य जनांच्या दृष्टीने ज्ञान, कला, इत्यादि। गोष्टी स्वतोमूल्यवान नसल्या तरी काही अल्पसंख्य विलक्षण माणसांच्या दृष्टीने त्या स्वतोमूल्य आहेत ही गोष्ट सामान्यजनांच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे; कारण ती त्यांच्या दृष्टीने स्वतोमूल्ये नसली तरी ती साधनमूल्ये (म्हणजे सुखसाधने) खासच आहेत, आणि म्हणून त्यांचे साधनमूल्य म्हणून महत्त्व नाकारण्यासारखे नाही. कृपण मनुष्य स्वतोमूल्य नसलेली पैसा ही गोष्ट स्वतोमूल्य मानतो तशा ज्ञान, कला इत्यादि गोष्टी नाहीत. जे या गोष्टी स्वतोमूल्य मानीत नाहीत त्यांच्याही जीवनात साधनमूल्ये म्हणून त्यांचे मूल्य मोठे असते.
येथपर्यंत डॉ. जोशांच्या बहुतेक आक्षेपांना मी उत्तरे दिली आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांपैकी काही राहिले असतील तर वरील उत्तरांच्या साह्याने त्यांचीही उत्तरे देता येतील. मी दिलेली उत्तरे त्यांना पटतील अशी मी आशा करतो. मी ‘पाश्चात्य नीतिमीमांसकांना वाट पुसत जे निकष दिले आहेत ते किती अपुरे आणि बुद्धिवादाला अग्राह्य आहेत हे पाहिले म्हणजे स्वमते विवेकवादाच्या नावाने चालविलेला नीतिमीमांसेचा हा प्रयत्न निष्फळ आणि निःसार ठरतो असे ते म्हणतात. यातून आणि आपल्या लेखाला त्यांनी ‘विवेकवादातील भोंगळ नीतिविचार’ अशा हेटाळणीवजा दिलेल्या शीर्षकातून माझ्या लेखाविषयी व्यक्त होणारा अनादर आणि उपहास थोडातरी अस्थानी होता हे त्यांच्या लक्षात आले असेल असेही मला वाटते. पण तसे न झाले आणि आपले आक्षेप अजून अनुत्तरितच आहेत असे ते म्हणाले, तर या विषयाचा निर्णय जाणत्या आणि प्रांजळ वाचकांनी करावयाचा आहे. ते तो करतीलच.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.