धर्मसुधारणा कशास म्हणावयाचे याची स्पष्टता करावी लागेल. तसेच हिंदुधर्माभिमानी’ या शब्दाची. एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्रात सनातनी ब्राम्हणांचा एक पक्ष अस्तित्वात होता. यांच्यासाठीच हा शब्द वापरावयाचा का? तसेच हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादी हिंदुत्ववादी संघटना, पक्ष, चळवळी यातील व्यक्तींसाठी हाशब्द राखून ठेवायचा का? अशी व्याख्या केली तर न्यायमूर्ति रानडे, संत गाडगे महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, इत्यादि कोणीच हिंदुधर्माभिमानी ठरत नाही.
मी माझ्या लेखनात या शब्दांचा प्रयोग केलेला नव्हता. ‘हिंदू असल्याबद्दल रास्त अभिमान बाळगणार्या व धर्माविषयी, परंपरा व इतिहास यांविषयी आस्था बाळगणाच्या अशा अर्थाचे वाक्य मुळात आहे’.
ब्रिटिश भारतात आले त्यावेळी आढळणारे धर्माधिष्ठित कौटुंबिक व सामाजिक जीवन आणि आजचे कौटुंबिक व सामाजिक जीवन यात अंतर आहे. हे अंतर मोठे आहे आणि ते सुधारणेच्या दिशेने आहे ही गोष्ट डॉ. पाटील यांना मान्य असली तरच पुढचा विचार होऊ शकतो. रोटीबेटीव्यवहार, सोवळे-ओवळे, जातपात, नित्य व नैमित्तिक कर्मकांड, स्पृश्यास्पृश्यता, स्त्रियांचे स्थान व त्यांना मिळणारी वागणूक, धर्मचिंतन असे काही विभाग पाडून आढावा घेतला तर कमीअधिक वाटचाल झालेली आढळते.
एकोणिसाव्या शतकात ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले चढविले. ज्याला तुम्ही धर्म व धर्माचरण म्हणता तो सारा प्रकार किती अडाणी, खुळचट, अनीतिमान, हास्यास्पद वगैरे आहे याची मांडणी ते करीत. परंपरेने चालत आलेल्या रीती, प्रथा, समजुती, विधी, कर्मकांडे यांच्याबद्दल, आणि हिंदू धर्माचा तात्त्विक गाभा काय आहे याबद्दल चिकित्सक विचाराला चालना मिळाली. हिंदू म्हणवून घेण्याचीही लाज वाटते अशी प्रतिक्रिया होऊन, वा ख्रिस्ती धर्म हाच एकमेव खरा व तारणारा धर्म आहे अशी खात्री वाटून धर्मातर करणारी अनेक ब्राह्मण कुटुंबेही निघाली. पण यांचा अपवाद सोडल्यास, चिकित्सक तपासणीनंतर हिंदू असल्याबद्दल आपण रास्त अभिमान बाळगू शकतो अशा निष्कर्षालाच बहुतेक जण आले. आगरकरांचे उदाहरण घेतले तरी, हिंदू असण्याबद्दल त्यांना रास्त अभिमान वाटत होता, त्याचवेळी शरमेने मान खाली घालावी अशा अनेक गोष्टी आचरणाचा भाग बनल्या आहेत आणि त्या सुधारून घेण्यासाठी त्यांची धडपड होती अशी माझी समज आहे. नास्तिक व अज्ञेयवादी व्यक्तींनाही हिंदू असण्याचा अभिमान वाटावा अशी गुणवत्ता हिंदू धर्मविचार व तत्त्वचिंतन यांत आढळत होती.
हिंदू असला की त्याला जातपात काटेकोरपणे पाळलीच पाहिजे, अस्पृश्यतेचे पालन केलेच पाहिजे, स्त्रियांना विशिष्ट प्रकारेच वागणूक दिली पाहिजे, अमुकतमुक विधी वे कर्मकांड आचरलेच पाहिजे अशी स्थिती बर्यांच प्रमाणात एकोणिसाव्या शतकात होती. ख्रिस्त्यांसमवेत चहा पिण्यावरून पुण्यात उपस्थित झालेले प्रकरण गाजलेले आहे. या सर्व बाबतीत सुधारको व्यवहार करणे हेच हिंदू धर्माच्या मूळ शिकवणीशी अधिक संवादी आहे. लोकमान्य टिळकांनी राजकीय-सामाजिक नेतृत्वाच्या चुरशीमध्ये सनातनी ब्राह्मणांच्या पक्षाची कड प्रसंगी घेतली, पण त्यांचा एकंदर प्रभाव सुधारणेला अनुकूल राहिला.
सगळ्यांत उद्बोधक उदाहरण छत्रपती शाहूमहाराजांचे आहे. सनातनी ब्राह्मण पक्षाचा पाडाव करण्यासाठी त्यांनी राजकारण व समाजकारण केले. डॉ. आंबेडकरांना राजकारणात पुढे आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सुधारणेच्या दिशेने त्यांचा प्रभाव मोठा राहिला. ही भूमिका हिंदू धर्मातच राहूनच नव्हे तर अभिमान बाळगून त्यांनी वठविली.
‘हिंदुधर्माभिमानी’ हा शब्द घात करणारा आहे. पंचहौद मिशनमधील चहापानाचे प्रकरण उपस्थित करणारे सनातनी ब्राह्मण, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शाहू महाराज हे सर्वच हिंदुधर्माभिमानी होते असे म्हणता येईल. यांच्यातील भेद महत्त्वाचा. डॉ. पाटील यांनी या भेदाचे भान बाळगणे आवश्यक आहे. सावरकर हिंदुत्ववादी होते व त्या भूमिकेचा एक भाग म्हणून धर्माभिमानी होते. पण ते सुधारक होते. अधिक मुळापर्यंत जाऊन भिडणारे. शाहू महाराज हिंदुत्ववादी नव्हते. धर्मभिमानी होते आणि सुधारकही होते. डॉ. आंबेडकरांच्या हिंदुधर्मसुधारक होण्याच्या आकांक्षेविषयी वर उल्लेख आलाच आहे.
७. माझे मुळातले विधान मर्यादितच होते. ते असे – (धर्मचिकित्सा, तिच्याद्वारा जागरण व प्रबोधन, धर्मसुधारणा) ही प्रक्रिया घडून यावी असे वाटणार्याच व्यक्ती मुस्लिम समाजातही असणार व आहेत असे मला वाटते. धर्मचिकित्सेचे कार्य अबुल कलाम आझाद यांच्या ताकदीने करणाच्या व्यक्ती मला परिचित नाहीत. तेवढा माझा त्या क्षेत्रातील कार्याशी व प्रकाशित लेखनाशी परिचय नाही. मी सुशिक्षित, आधुनिक व्यवसायात पडलेल्या, मध्यम व उच्चमध्यमवर्गीय तरुण मुसलमानांना डोळ्यांसमोर ठेवून विधान केले आहे. या मुद्द्यावर प्रा. फक्रुद्दिन बेन्नूर यांच्यासारख्या मित्रांशी झालेल्या बोलण्याचा आधार माझ्या विधानाला आहे. ही प्रक्रिया पुढे नेण्यात अ. भि. शहा, हमीद दलवाई यांच्या भूमिका,कार्यपद्धती, निवाडे यांची अडचण होते.
८ व ९ डॉ. पाटील यांनी मी काय म्हणत आहे ते नीट वाचलेले वा समजून घेतलेले नाही. भारतातील मुस्लिम समाजापैकी बहुसंख्य हे धर्मांतर करून मुसलमान झालेले एतद्देशीयच आहेत. या अर्थाने ते स्वकीयच आहेत. भाऊबंद आहेत. भाऊबंदच भाऊबंदकी करू शकतात! डॉ. पाटील मागतात तशी गॅरंटी देता येईल म्हणून त्यांना स्वकीय भाऊबंद माना असे माझे म्हणणे नाही. कोणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नसलेले ते तथ्य आहे.
जगभरचा मुसलमानसमाज घेतला तर त्या त्या देशीय (उदा. अरब, तुर्क इराणी, इत्यादी) मुसलमान समाजाची म्हणून खास ऐतिहासिक सांस्कृतिक जडणघडण वेगळी आहे. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी, भारतीय मुसलमानांना इस्लामचे अनुयायी का म्हणावे, असा प्रश्न उपस्थित करण्याइतके त्यांचे वेगळेपणशुद्ध, कडव्या, मूलतत्त्ववादी धर्मगुरूंना वाटे. एके काळी पश्चिम किनार्या्वरील खेड्यापाड्यांतून राहणारे पारशी गुजराती लोकांपासून फार वेगळे राहिले नव्हते. तशीच काहीशी ही गोष्ट आहे. मुसलमानांचे मूळचे हिंदू वळणही टिकून राहिले. कडवी धर्मवेडी भूमिका आग्रहपूर्वक मुद्दामहून घेण्याचा आटापिटा एरवी औरंगजेबास का करावा लागला असता? इथल्या हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारशी इत्यादि विभिन्न धार्मिक समाजाचा वारसा कमीत कमी प्रमाणात समाईक पण आहे. या कारणाने जे खास भारतीय आशयाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण आहे ते रक्तात मुरलेले आहे. भारतीय मुसलमान म्हणवून घेणारे दिसण्यासाठी योग्य उपाय सुचविण्याचा प्रश्न नाहीच. हेही एक तथ्य आहे.
इस्लाम धर्म, संस्कृती, परंपरा व जीवन यांच्यामध्ये आपला एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळा जो प्रवाह आहे त्यात अभिमान बाळगावा अशा अनेक गोष्टी आहेत. तो अधिक डोळस, उदारव उन्नत आहे, आणि त्या आधारे जागतिक पातळीवर इस्लामला व मुस्लिम समाजाला योगदान करण्याची क्षमता आपल्याजवळ आहे, हे ठसविण्याची गरज व महत्त्व मी सांगितले.
१०. डॉ. पाटील यांनी इतका असमंजस प्रश्न विचारावा याचे मला आश्चर्य वाटते व खेद होतो. जी धर्मपीठे, जे धर्मगुरू, जे राजकारणी नेते, जे समाजधुरीण मुसलमान बांधवांना घात करणार्याा वाटेने नेत आहेत, मनात विखार निर्माण करीत आहेत, अलगतावादी भूमिका जोपासत आहेत त्यांचा राग करणे समजू शकते. ‘राग करणे’ हा उपाय नव्हेच. त्यांचा समर्थ प्रतिवाद करू शकतील अशी पर्यायी शक्ती उभी करणे हा उपाय आहे.
विशिष्ट धर्मपीठ, विशिष्ट धर्मगुरू, विशिष्ट संप्रदाय, विशिष्ट धार्मिक शिकवण, चालीरीती यांचा प्रतिवाद धर्म, धर्मपीठ व धर्मगुरू यांचाच उच्छेद करण्याचे लक्ष्य समोर ठेवून करता येईल असे मला दिसत नाही. इस्लाम धर्माविषयी रास्त अभिभान बाळगणार्याद, धर्मश्रद्धा, धर्मपीठ, वे धर्मगुरू यांच्याविषयी सरसकट अनादर न बाळगणाच्या, किंबहुना खोलवर अर्थाने धार्मिक असलेल्या व्यक्ती धर्माचिकित्सेच्या मार्गाने धर्माची अधिक उन्नत मांडणी करूनच अशी पर्यायी शक्ती आज ना उद्या उभी करू शकतील.
धर्म, राजकारण व समाजसंघटन यांची ज्या प्रकारची सांगड शीख, इस्लाम या धर्माच्या संदर्भात आढळते. (ख्रिस्ती धर्माच्या बाबतीतही ही गोष्ट आधुनिकपूर्व काळात खरी होती, व यहुदी धर्माच्या बाबतीत ती अंशतः आजही आढळते) ती ध्यानात घेता धर्मगुरू व धर्मपीठ हीच धार्मिक सामाजिक बंडखोरीचे नेतृत्व आज ना उद्या करतील आणि त्या बंडखोरीला एक राजकारणी परिमाण असेल असा माझा तर्कआहे. भिंडरावालेंचे उदाहरण उद्बोधक आहे.
११. मशिदीत जाऊन इस्लाम धर्मातील चुकांचा पाढा वाचू नये असे मी म्हणणार नाही. मुस्लिम बांधवांना सुनावण्याची भूमिका व वृत्ती असली तर ‘सुधारणेचा प्रयत्न असे त्याचे वर्णन करता येणार नाही. इस्लामचे पितळ उघडे करण्याच्या उद्देशाने अशी कृती केली तरी तिला सुधारणेचा प्रयत्न म्हणता येणार नाही. सलमान रश्दी यांचे लेखन हा धर्माच्या सुधारणेचा प्रयत्न नव्हता. सुधारणेचा प्रयत्न करू म्हणणार्या् व्यक्तींची त्या धर्माला बांधिलकी, व धर्मीयांविषयी सहृदय आत्मीयता श्रोत्यांना/वाचकांना प्रत्ययास येण्याची गरज आहे. तुच्छभाव प्रकट होत असेल तर १९व्या शतकातील ख्रिस्ती धर्मोपदेशक व प्रसारक हिंदुधर्मसुधारणेचे प्रयत्न करीत होते असे आपण म्हणत नाही. १९३४ साली येवल्यास केलेली धर्मातरविषयक घोषणा केल्यानंतरच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी आपले प्रयत्न हिंदुधर्मसुधारणेचे नाहीत ही गोष्ट स्पष्ट केली.
१२. अन्यधर्मीयांविषयी, ‘पूर्ण वेगळ्या संस्कृतीच्या धर्मात आदर, जिव्हाळा, आपलेपणा निर्माण कसा करता येतो, त्यासाठी स्वधर्माविषयी व अन्य धर्माविषयी कोणती दृष्टी अंगीकारावी लागते, वृत्ती बाळगावी लागते याविषयी महात्मा गांधींच्या जीवनातून, विचारांमधून आपणास पुरेसे मार्गदर्शन डॉ. पाटील यांना मिळेल.
स्वतःच्या जन्मजात धर्माचा अनुयायी राहून ही गोष्ट साधणे अशक्य आहे, सर्व जण निधर्मी, धर्मविरहित बनतील तेव्हाच प्रश्न मिटेल असे डॉ. पाटील यांना सुचवावयाचेअसावे.
‘पूर्ण वेगळ्यासंस्कृतीची’ त्यांना जर अडचण वाटत असेल तर ती सर्व इहवादी बनण्यानेही सुटणार नाही.
ज्या समाजात अनेक धर्मीय लोक राहतात, वा एकाच धर्मातील विभिन्न सांप्रदायिक राहतात, त्या समाजात (वा राष्ट्रांच्या समूहात देखील) त्या समाजाचे स्वास्थ्य व शांती व भरभराट धार्मिक सहिष्णुतेच्या अभावी अशक्य आहे. विशेषतः जर आपण अल्पसंख्यक अन्यधर्मीय वा सांप्रदायिकांचाही स्वास्थ्य, शांती व भरभराठीसाठी आवश्यक शर्त म्हणून समावेश केला तर. सर्वधर्मसमभाव ही अधिक उच्चतर नैतिक वृत्ती आहे. धार्मिक सहिष्णुतेचा पाठ युरोप फार मोठी किंमत देऊन शिकला आहे.
‘मेथड’ या शब्दाने डॉ. पाटील यांना काय अभिप्रेत आहे याचा बोध मला पूर्णपणे झाला नाही. सर्व भेदांच्या पलीकडे आपणा सर्वांना अनुबंधित करणारी माणूसपण ही गोष्ट आपणास समाईक आहे. धर्म, संस्कृती यांच्या भिन्न वाटा आपण चोखाळल्या त्यामागे भूगोल, इतिहास, परिस्थिती वेगवेगळी असण्याचे कारण आहे. आपणा सर्वांना एकत्र गुण्यागोविंदाने राहावयाचे आहे व तेच शोभा देणार आहे अशी प्रगल्भ जाणीव समाजात पसरणे, हा बोध सार्वत्रिक रुजणे आवश्यक आहे. तो पसरविणे, रुजविणे हीच मेथड मला दिसते. विशेषतः बहुसंख्याक समाजात या कामी दूरदृष्टीच्या, खंबीर व कर्तृत्ववान मुत्सदी नेतृत्वाला व अशा नेतृत्वाखालील राज्यसत्तेला महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडता येते. नंतरच्या टप्प्यामध्ये. ह्या टप्प्यावर कायदेही उपयोगी व आवश्यक ठरतात.
१३. स्वकीय असमंजस वागला तरी त्याच्या वागण्याला वेळीच प्रतिबंध घालावयाचा नाही, शासन करावयाचे नाही कारण शेवटी तो आपला स्वकीय भाऊबंद आहे ही मानसिकता योग्य तो विवेक बाळगून कृती (लढाई?) करण्याच्या आड येत आहे, असे डॉ. पाटील यांना म्हणायचे दिसते.
मते मिळविण्याच्या दृष्टीने राजकारणी अदूरदर्शीपणा, ढिलाई, अविवेक या गोष्टी राजकीय पातळीवर अनुभवाला येतात. ज्या लोकशाही राज्यव्यवस्थेची आपण निवड केली आहे तिच्यामध्ये मते प्राप्त करण्यासाठी समानहिताचा विचार बाजूला ठेवून तात्कालिक स्वार्थी हिकमती लढविणे, तडजोडी करणे, लालूच दाखविणे, ढिलाई पत्करणे या प्रकारच्या वागण्याला अंगभूत उत्तेजन आहे. यातूनच आपणास भारतातील लोकशाहीला उन्नत व प्रौढ व्यक्तित्व प्राप्त करून द्यावयाचे आहे. ठोकशाही प्रस्थापित करून नव्हे, किंवा काही समूहांना दुय्यम नागरिकत्व देऊन नव्हे. यासाठी लढाई करावीच लागेल. ती लढाई मने उन्नत व प्रगल्भ करण्याची, व्यवहार सुसंस्कृत बनविण्याची असल्याने तिचे स्वरूप व मार्ग वेगळे आहेत.
‘स्वकीय भाऊबंदां’च्या (डॉ. पाटील यांना या शब्दांनी मुसलमान अभिप्रेत असावेत) असमंजस वागण्याचे एक उदाहरण देऊन लढाई ची त्यांची रणनीती त्यांनी स्पष्ट केली असती तर अधिक सोयीचे झाले असते.समान नागरी कायदा करण्यास विरोध, हे असमंजस वागण्याचे उदाहरण म्हणून घेऊ या. आपला विरोध असमंजस आहे, पण तो आम्ही तरीही करणार, केवळ आडमुठेपणा व दांडगाई म्हणून, असे मुसलमान समाजाचे म्हणणे नाही. वेगळा व्यक्तिगत कायदा हा त्यांना आपला रास्त सामूहिक आर्थिक-सांस्कृतिक हक्क वाटतो. या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ते मुस्लिम स्त्रियांनाही रस्त्यावर (लढाईसाठी) आणू शकतात. भारत हे सेक्युलर राष्ट्र-राज्य आहे असे म्हणून व मुसलमान हे अल्पसंख्य आहेत याचा फायदा उठवून समान नागरी कायदा लोकसभेत पारित करून त्याची कठोरपणे अंमलबजावणी सत्तेचा वापर करून करणे ही कृती ‘लढाऊ कृती डॉ. पाटील यांना वाटते का? आजच्या घडीला तरी ती ठोकशाहीची कृती होईल. माझ्या स्वकीय भाऊबंदांचे मला असंमजस वाटणारे मत बदलण्यासाठी, समान नागरी कायद्यासाठी, मुस्लिम मानस व्यापक प्रमाणावर अनुकूल बनविण्यासाठी मुस्लिम समाजाशी सक्रिय संवाद साधणे प्रथमतः आवश्यक आहे. तो साकारण्यासाठी लेख, भाषणे, परिषदा, परिसंवाद यांच्या पलीकडे जाणारी कोणती कृती संभवते?लढाई, लढाऊपणा यांचीच वेगळी व्याख्या डॉ. पाटील यांना करावी लागेल असेही मी सुचवतो.
काही गोष्टी मला सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छपणे सत्य, खच्या, योग्य वाटतात; त्या ज्यांना तशा दिसत नाहीत त्यांच्या गळी जबरीने उतरविणेही गैर नाही, कारण त्या वैज्ञानिक, शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध वगैरे आहेत असे मला वाटते. दुसर्यां ना, प्रतिपक्षीयांना त्या तशा दिसत नसल्या तर, मला काहीही वाटो, त्यांच्या मताचा आदर करूनच, त्यांचे मत बदलविण्यासाठी लोकशाहींची पथ्ये सांभाळून कृती करावयास हवी. रूढार्थाने लढाईची भाषा येथे गैर ठरते असेही मी म्हणेन.