अशा मनुष्याच्या लेखात कितीही प्रमाद होत असले व केवढीही कटुता असली तरी ते समंजस मनुष्याच्या स्वल्प आदरास, निदान थोड्याशा अनुकंपेस तरी पात्र झाले पाहिजे. हा वेडा पीर इतके हाल, संकटे व लोकापवाद सोसून ज्या अर्थी इतकी धडपड करीत आहे त्या अर्थी ती लोकांस अंती हितावह होईल अशी निदान याच्या मनाची तरी खात्री असावी असा विचार लोकांच्या मनात येऊन त्यांनी त्याच्या दोषाबद्दल त्यास क्षमा केली पाहिजे. लोकांनी तसे केले तर ठीकच आहे. पण नाही केले तरी त्यास (या लेखकास) विशेषसे वाईट वाटण्याचा संभव नाही; कारण सारे जग त्यावर उलटले तरी प्रसिद्ध संस्कृत कवीच्या विचाराप्रमाणे तो म्हणेल, की खरोखरीच जे या गोष्टीत आमची निर्भर्त्सना करतात त्यांना काहीच समजत नाही व त्यांच्याकरिता हा आमचा प्रयत्नही नाही. माझा समानधर्मी एखादा मनुष्य कोठेतरी असेल किंवा निपजेल. पृथ्वी विशाल आहे व काल अनंत आहे