श्री. संपादक,
आजचा सुधारक स.न.वि. वि.
श्री केशवराव जोशी यांना पळशीकरांनी दिलेले उत्तर वाचले (आजचा सुधारक, ऑगस्ट ९२). सावरकरांची ‘धार्मिक-सामाजिक सुधारणेमागची प्रेरणा …. माणसांना कडवी, आंधळी, निरुंद, निर्दय, वैरवृत्तीची बनविणारी, विध्वंसक व विनाशक होती, असे पळशीकर म्हणतात. हिंदुसमाज बलवान करण्यासाठी सावरकरांना समाजसुधारणा हवी होती, त्यामागे न्याय, माणुसकी ही प्रेरणा नव्हती, असा आरोप समोर ठेवून पळशीकरांनी हे विधान केलेले आहे.
मी थोडाबहुत सावरकर वाचलेला आहे. अस्पृश्यता पाळणे म्हणजे ‘मनुष्यत्वाविरुद्ध अत्यंत गर्छ असा अपराध करणे होय असे सावरकर म्हणतात (खंड ३, पृ.४८३). न्यायाच्या दृष्टीने, धर्माच्या दृष्टीने, माणुसकीच्या दृष्टीने ते कर्तव्य आहे, म्हणूनच अस्पृश्यतेचे बंड आपण हिंदूंनी साफ मोडून टाकले पाहिजे. त्यापासून आजच्या परिस्थितीत लाभालाभ काय आहेत हा प्रश्न दुय्यम आहे. हा लाभालाभाचा प्रश्नच आपधर्म होय आणि अस्पृश्यतानिवारण हाच मुख्य आणि निरपेक्ष धर्म होय.” (तिरपा टाइप माझा) हे। सावरकरांचे विचार मी वाचलेले आहेत. एवढेच नव्हे तर तेव्हाच अर्धवट वाचणार्याा टीकाकारांना उद्देशून सावरकर म्हणतात, ‘श्रद्धानंदांचे लेख नेहमी समग्र न वाचणाच्या कोणा कोणा प्रामाणिक मनुष्याचा मधूनच काही छेदक (पॅरिग्राफ) किंवा वाक्ये वाचून भ्रांत समज होण्याचा संभव असल्यामुळे हे स्पष्टपणे आणि वारंवार सांगणे भाग आहे की, प्रस्तुतचीअस्पृश्यतेची रूढी ही अत्यंत अन्याय्य आणि आत्मघातकी असल्यामुळे मुख्यतः केवळ माणुसकीसाठी म्हणूनच तिचे आम्ही हिंदूंनी निर्दालन केले पाहिजे. इतर सर्व कारणे ही दुय्यम होत, हेच आमचे अबाधित मत आहे (खंड-३, पृ. ४८५) (तिरपा टाइप माझा). हे काहीही न वाचता सावरकरांच्या समाज-सुधारणेचा मुळीच अभ्यास न करता पळशीकरांनी आपले अज्ञान प्रकट केलेले आहे. पण हे अज्ञान नाही असे माझे मत आहे. पळशीकरांकडून सालरकरांना हेतुपूर्वक बदनाम करण्यात आले आहे असे दाखविणारा पुरावा हवा असेल तरह्या प्रा. शेषराव मोरे यांच्या नुकत्याच (मे १९९२) प्रसिद्ध झालेल्या सावरकरांचे समाजकारण सत्य आणि विपर्यास या ग्रंथातील पळशीकरांच्या संबंधीचा भाग वाचकांनी वाचून घ्यावा.
निर्मल प्रकाशन, कैलासनगर, निर्मलकुमार सूर्यवंशी
नांदेड ४३१६०२
संपादक
आजचा सुधारक यास,
आजच्या सुधारक (डिसेंबर १९९२) मधील मोहनींचा लेख वाचला व त्यातील संपादकीयही वाचले.
आपण शिक्षणक्षेत्रातील सत्य परिस्थिती मांडली आहे. त्यात काही अतिशयोक्ती नाही. मी आपल्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे.
मला असे वाटते की, शिक्षणक्षेत्रातील ही दुरवस्था फक्त जागृत व संघटित पालकच दूर करू शकेल. म्हणून ग्राहक पंचायत च्या धर्तीवर पालक पंचायत स्थापन करून त्यांचे मार्फत काही प्रश्न सुटू शकतील. पण त्याला शासकीय अनुष्ठान असेल व काही अधिकार हवेत. शहरातील पालक वर्ग देखील आपल्या पाल्याविषयी होत असणार्याे अन्यायाबाबत तक्रार करण्यास धजत नाहीत, आपल्या पाल्यावर वचपा काढला जाईल ह्या भीतीमुळे. त्या मानाने खेड्यातील पालक अधिक जागृत आहे असे वाटू लागते. कार्यक्षम अशी पालक संघटनाच शाळेवर दबाव आणू शकेल..
प्रत्येक शाळेसाठी एक स्वतंत्र पालकसंघटना व पूर्ण शहरासाठी एक पालक संघटना असावी. या प्रयत्नामुळे सर्व प्रश्न चुटकीसारखे सुटतील असे मुळीच नाही. पण या दृष्टीने प्रयत्न करून पाहण्यास काही हरकत नसावी. पालक पंचायतीचे निर्णय संस्थांवर बंधनकारक असले पाहिजेत. त्यासाठी कोर्टकचेरी करावी लागली तरी हरकत नसावी.
१२९ शारदानगर,अमरावती ४४४६०५ न. दे. झामरे