कर्व्यांचे प्रेरणास्थान आगरकर होते. ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’ हा आगरकरी बाणा. तो कर्व्यांच्या अंगी इतका भिनला होता की त्यांचे जीवन ही एकझपाटलेल्या सुधारकाची जीवनकहाणी वाटावी. आगरकर १८९५ साली वारले. कर्वे १८९७ साली संपूर्ण मुंबई इलाख्यात मॅट्रिकला पहिले आले, कॉलेजात सतत गणितात पहिले येत गेले. फ्रान्समध्ये जाऊन त्यांनी गणिताचा आणखी विशेष अभ्यास केला. एल्फिन्स्टन, डेक्कन अशा सरकारी आणि विल्सन कॉलेजसारख्या नामांकित मिशनरी कॉलेजांत मिळत गेलेल्या नोकऱ्या त्यांनी सोडल्या. आणि स्वतःला प्राणप्रिय, पण समाजाला अत्यंत अभद्रआणि ओंगळ वाटणार्यान कार्यासाठी त्यांनी कायम अर्धबेकार आणि ओढघस्तीचे जिणे पत्करले. कर्व्यांची सारी जीवनकहाणी जितकी करुण तितकीच हृदयदाहक!
आयुष्याच्या अखेरीस मागे वळून पाहताना त्यांनी एका लेखात म्हटले आहे की ‘आमचा उद्देश प्रथमपासूनच असा होता की, आगरकरांनी ज्या बुद्धिवादाचा पुरस्कार केला त्या बुद्धिवादाचा प्रकाश शक्य तितक्या विषयांवर पाडून त्याचा प्रसार करावा. अर्थात् बुद्धिवाद आगरकरांनी आपल्या डोक्यातून काढलेला नाही. त्याचा त्यांनी पुरस्कार केला इतकेच. परंतु कित्येक बुद्धिवादी लोक असे समजतात की, आगरकर म्हणजे बुद्धिवादाची कमाल मर्यादा झाली. त्यांच्यापुढे जाणे शक्य नाही. आमच्या मते ते शक्य आहे. आणि आम्ही तसा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही मते आगरकरांना देखील पसंत पडली नसती या आक्षेपालाआम्ही बिलकूल किंमत देत नाही.
आगरकरांच्यापुढे नेलेली बुद्धिवादाची मर्यादा कोणती आणि त्यांनादेखील पसंत न पडण्यासारखी आक्षेपकांना वाटणारी ही मते कोणती? अर्थात कामशास्त्रावरची. कामशास्त्र हा विषयच असा आहे की आजही प्रतिष्ठित बैठकीत कोणी त्यावर बोलू धजत नाही. मग सत्तर वर्षांपूर्वीची गोष्टच विचारायला नको. कामवासना जीवनातली केवढी प्रभावी प्रेरणा! पण तिचा शास्त्रीय विचार देखील विद्वानांना वर्म्य. एक वात्स्यायन तेवढा याला ऐतिहासिक अपवाद. त्याच्यानंतर इतिहासालाच माहीत किती हजार वर्षे लागली हा दुसरा वात्स्यायन निघायला!
रघुनाथ धोंडो कर्वे हे आधुनिक काळातले वात्स्यायन. बहुधा सवाई वात्स्यायन.
आधुनिक कामशास्त्र या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘तर्कशुद्ध शास्त्रीय विचार करण्याची पद्धत एकंदरीत फारच थोड्या लोकांस साधते व त्यातही ही पद्धत कामवासनेस लावण्याची फारच थोड्यांची तयारी असते. कोणी हा विषयच घाणेरडा अश्लील समजून त्यासंबंधी विचारच करीत नाही …. कोणी दुसर्या बाजूला घसरून त्यात धर्म व पावित्र्य घुसडतात, याबद्दल त्यांस दोष देण्यापेक्षा या विषयासंबंधी शास्त्रीय विचार लोकांपुढे मांडणे जरूर आहे.’
तर्कशुद्ध शास्त्रीय विचार उर्फ बुद्धिवाद हा सुखाचा मूलमंत्र आहे हे कर्व्यांना पटले होते. सर्वांनी त्याची कास धरावी असे त्यांचे म्हणणे होते. ह्या बुद्धिवादाची फोड ते वेळोवेळी करत होते. समाज स्वास्थ्याच्या मागे उल्लेखिलेल्या (एप्रिल ५१) अंकातच ते लिहितात, बुद्धिवाद हा सर्व शास्त्रीय ज्ञानाचा पाया आहे. नैसर्गिक परिस्थितीचे अवलोकन किंवाप्रयोग करून मिळविलेली माहिती आणि यावर आधारलेली तर्कशुद्ध अनुमाने एवढेच काय ते शास्त्रीय सत्य मानायचे याचे नाव बुद्धिवाद
[१. समाजस्वास्थ्य, एप्रिल १९५१ समाज स्वास्थ्यांतील सर्व संदर्भ य. दि. फडके यांच्या र. धों. कर्वे या ग्रंथातून घेतले आहेत.]
पाश्चात्य तत्त्वज्ञानात बुद्धिवाद (रॅशनलिझम) नावाचा एक संप्रदाय आहे. रेने देकार्त (१५९६-१६५०) ह्या फ्रेंच तत्त्वज्ञाला त्याचा प्रवर्तक मानतात. देकार्त अव्वल दर्जाचा गणिती होता. कर्वे गणिताच्या उच्च अभ्यासक्रमासाठी सुमारे दीड वर्ष पॅरिसमध्ये होते ही गोष्ट अन्वर्थक आहे. देकार्तप्रणीत ज्ञानमीमांसा कर्व्यांनी अगदी सही सही, त्याच्याच शब्दांत उचलली आहे. ते म्हणतात, ‘बुद्धीची मुख्य खूण आणि ज्ञानार्जनाचे साधन म्हणजे चिकित्सक वृत्ति, शंका घेण्याची प्रवृत्ति.
वास्तविक कर्वेच काय, सर्वच लोक सुखाचे साधक आहेत. मुळात काम हा पुरुषार्थ आहे, तृतीय पुरुषार्थ. पण षड्रिपूंमधला आद्य रिपू म्हणून धर्माचार्यांनी हिणविलेला. सुख मनुष्याचे साध्य आहे, इतकेच नाही, तो प्रत्येकाचा हक्क आहे. अगदी जन्मसिद्ध. ही गोष्ट सांगायचा कर्व्यांना कधी कंटाळा आला नाही. ‘समाजस्वास्थ्याची समाजसेवा’ या मनोहर मासिकाच्या जानेवारी १९४६ मधील लेखात ते म्हणतात, कोणी काहीही म्हटले तरी या मासिकाचे एकच ध्येय आहे. ते ध्येय सर्व समंजस माणसांना मान्य झालेच पाहिजे. मग त्यांचे मार्ग माझ्यापेक्षा वेगळे असले तर असोत.
सर्वेऽपि सुखिनः सन्तु , सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु, न कश्चिद् दुःखभाग् भवेत् ।।।
कर्व्यांच्या बुद्धिवादात फक्त ऐहिक सुख बसते. तसेच सुखाचा हा शोध ते आपल्या देशाच्या सीमेत घेतात.“वसुधैव कुटुंबकम्’’या स्थितीला आपण अजून पोचलो नाही तेव्हाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करणे सध्या तरी भाग आहे.
बुद्धिवाद्याच्या भूमिकेतून इहलोक हाच सर्व सुखाचे आगर आहे. म्हणून ऐहिक सुख हे सर्वांचे साध्य आहे. हाच प्रस्थानबिंदू. त्यासाठी निरामय कामजीवन, संततिनियमन, समाजधारणा आणि व्यक्तिस्वातंत्र्य, धर्म, अध्यात्म आणि नीती या सर्वांचा ऊहापोह ते करतात. आणि बुद्धिवादी–सुखवादी जीवनदृष्टीचा समग्र आलेख ते मांडतात तो ऐहिकाचाच. वर त्यांना जे सवाई वात्स्यायन म्हटले ते या अर्थाने. आता पुढील अवतरणे पाहा.
(१) ‘दुसऱ्यास त्रास दिल्यावाचून शक्य तितके सुख मिळविण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे, व कामवासनेपासून सर्वांत अधिक सुख कशा रीतीने प्राप्त करून घेता येईल हे शिकविण्याचा कामशास्त्राचा उद्देश आहे.
(२) शारीरिक वासनांपैकी कामवासना ही एक अत्यंत प्रबळ वासना असून तिच्या पूर्तीपासून मनुष्यांस निरतिशय आनंदाचा लाभ होतो. पुष्कळ वेळा दुःखाने गांजलेल्या लोकांस एवढी एकच समाधानाला जागा असते.”
२ समाजस्वास्थ्य, वर्ष २२, अंक ९, पृ. २०८
३. उपेक्षित द्रष्टा – दिवाकर बापट, पृ. ५३ वरील अवतरण
४. तत्रैव, पृ. ५७
५. आधुनिक कामशास्त्र, प्रस्तावना
(३) ‘ऐहिक सुखाचा संततिनियमनाशी अतूट असा संबंध आहे:‘ऐहिक सुखाची पहिली बाब म्हणजे पुरेसे आणि सकस अन्न. तेच जर मिळाले नाही तर सुखाचे नावच कशाला?सर्व जगाचा विचार जोपर्यंत करता येत नाही, तोपर्यंत प्रत्येकाने स्वतःपुरता विचार करून अन्नाच्या दृष्टीने सुस्थिति असेल तरच मूल होऊ द्यावे. एरवी संततिनियमन हाच समंजस मार्ग आहे.’
(४)’समाजधारणेशी व्यक्तिस्वातंत्र्याचा समन्वय घालावाच लागतो.’म्हणून समाजात राहणार्याे कोणत्याही व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही. परंतु जोपर्यंत दुसर्याू कोणाचे नुकसान होत नाही तोपर्यंत प्रत्येकास पाहिजे तसे वागण्याची मुभा असलीपाहिजे.’
(५) ‘स्वातंत्र्य’ याचा अर्थ चुका करण्याचे स्वातंत्र्य किंवा रूढीविरुद्ध वागण्याचे स्वातंत्र्य असाच केला पाहिजे. रूढीप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य काय असावयाचे? कोणाचे नुकसान किंवा कोणाला जुलूम करण्याचा हक्क कोणालाही नाही. परंतु इतर कोणताही निर्बध असता कामा नये.
चारलोकांत बसलेल्या मला हवे तसे हातवारे करण्याचे स्वातंत्र्य आहे खरे; पण जिथून दुसर्यालचे नाक सुरू होते तिथे माझे स्वातंत्र्य संपते. याचेच नाव सामाजिक मर्यादाआणि व्यक्तिस्वातंत्र्य.
कर्वे समागम-स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात. या बाबतीतही समाजाच्या दोन मर्यादा ते मानतात. अनिष्ट संतती आणि सांसर्गिक रोग हे होता कामा नयेत. यावर संततिनियमन ही पहिली आणि सांसर्गिक रोगप्रतिबंधक उपाययोजना ही दुसरी खबरदारी घेतली की झाले असा त्यांचा तोडगा.”
(६) ते म्हणतात, ‘मी समागम-स्वातंत्र्याच्या कट्टा पुरस्कर्ता आहे, मात्र यास दोन माणसांची संमती लागते हे विसरता कामा नये’. समागम ही एकेकाळी सामाजिक बाब होती. परंतु संततिनियमनाची आणि गुप्तरोगप्रतिबंधाची माहिती आहे अशा सुशिक्षितांच्या बाबतीत तरी ती हल्ली सामाजिक बाब नाही. समाजाने नसत्या उठाठेवी करू नयेत इतकेच माझे म्हणणे आहे. सर्वास असे स्वातंत्र्य केव्हा मिळेल तेव्हा मिळो, ज्यांना ते घेता येईल त्यांनी ते आज, आता घ्यावे. क्रांतीची वाट पाहिणे मूर्खपणा आहे.
व्यक्तिस्वातंत्र्याबाबत कर्व्यांचे म्हणणे हे की, स्वातंत्र्याचे जर काही वाईट परिणाम होत असतील तर त्याला स्वातंत्र्य हाच उपाय आहे. अंधारात राहिलेल्याला जर उजेड सहन होत नसेल तर त्याला उजेडाची सवय होऊ देणे हेच योग्य. पुन्हा अंधारात ढकलणे नव्हे.
(७) नीती सामाजिक आहे. तिचा पूर्वग्रहरहित विचार व्हावा अशी कर्त्यांची मागणी आहे. ते म्हणतात, ‘विवाहाचा व नीतीचा बिलकूल संबंध नाही. विवाहबाह्य समागमातबळजबरी कायदेशीर नसल्यामुळे (व पत्नीवर बळजबरी करण्याचा कायदेशीर हक्क पतीस असल्यामुळे) विवाह हीच कायदेशीर अनीतीस सवड आहे. मात्र, जेथे दोन किंवा अधिक व्यक्तींचा परस्परसंबंध तेथेच नीतीचे प्रश्न उपस्थित होतात व कामवासना नैसर्गिक रीतीने तृप्त करण्यास प्रत्येकास अन्यलिंगी व्यक्तीची जरूर असते. यामुळे या बाबतीत नीतीचे प्रश्न नेहमीच येतात. समाजाला अनिष्ट अशी संतती उत्पन्न न करणे आणि गुप्तरोगांचा फैलाव अगदी न कळतदेखीलन करणे एवढे व्यक्ती समाजाचे देणे लागते. संततिनियमन आणि गुप्तरोगप्रतिबंधक खबरदारी उपाययोजना हे पथ्य सांभाळले की समाजाच्या आरोग्याला धाका नाही. मग हरतर्हेिची सुखसाधना करायला मनुष्य मोकळा आहे.
अध्यापकी सोडून कर्व्यांनी लेखणी हाती घेतली. याची हकीकत सांगण्यासारखी आहे. कर्वे तेव्हा विल्सन कॉलेजात प्राध्यापक होते. किर्लोस्कर मासिकाला पहिल्यापासून महाराष्ट्राचे पुरोगामी मासिक समजत. प्रथम त्याचे नाव ‘किर्लोस्कर खबर’ होते. त्यात कर्व्यांचा संततिनियमनावरचा लेख प्रसिद्ध झाला. साल होते १९२४ चा सुमार, किर्लोस्करवाडी औंध संस्थानच्या हद्दीत. संस्थानचे दिवाण जेकब बापूजी हे ज्यू गृहस्थ होते. त्यांच्या मनात कर्व्यांबद्दल अढी होती. संस्थानी राजकारणातील त्यांच्या शत्रुपक्षाशी कर्व्यांची मैत्री होती. त्यांनी विल्सन कॉलेजच्या मिशनरी चालकांकडे तक्रार केली. कर्व्यांचा लेख, त्यांनी आधी लिहिलेल्या दोन्ही इंग्रजी पुस्तिका आणि ते विकत असलेल्या संततिनियामक साधनांचा कॅटलॉग हे सारे त्यांच्याकडे पाठवले. कॉलेजचालकांना कर्वे हवे होते. त्यांनी त्यांना नोकरी सोडू नये, प्रचार सोडा म्हणून, म्हणून पाहिले. कर्व्यांनी उत्तर दिले, ‘तुम्हाला गणित शिकवणारे हवे तेवढे मिळतील, पण ह्या कार्याला कोण मिळणार?त्यांनी राजिनामा दिला.
समाजस्वास्थ्य हे मासिक कर्व्यांनी १९२७ च्या जुलैमध्ये काढले. त्याला एक लहानसे निमित्त झाले. किलोस्करने त्यांचा एक लेख नाकारला होता. लेखाचा मथळा होता ‘विनय’ विषय होता नग्नता. कर्व्यांनी त्यात प्रतिपादले होते की, वस्तुतः स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या नग्न शरीरात तटस्थ वृत्तीने पाहणारास लाज वाटण्यासारखे काहीच नाही. किर्लोस्करने लेख नाकारला. कर्व्यांना राग आला, तो पुढे शेवटपर्यंत राहिला. त्यांच्यासमाजस्वास्थ्य वर पहिली दोन वर्षे वगळता शेवटपर्यंत नग्न स्त्रीचे मुखपृष्ठ असे. किर्लोस्करांनी लेख नाकारण्याचे निमित्त झाले. आपल्या इष्ट विचारांच्या प्रसारार्थ एखादेमासिक काढावे असे त्यांच्या मनात कधीपासूनच घोळत होते.
मुक्त स्त्रीपुरुष-संबंधात दोन अडथळे होते. समाजाला नको असलेली संतती आणि गुप्तरोगांचा घातक प्रसार. त्यावर संततिनियमन आणि रोगप्रतिबंधक उपाय हे त्यांचे तोडगे होते. त्यांच्याबद्दल सुमारे १५ वर्षांपासून त्यांचे वाचन सुरू होते. मनन, चिंतन चालू होते. या विषयांकडे सुशिक्षितांचे लक्ष वेधावे म्हणून त्यांनी दोन इंग्रजी पुस्तिका लिहिल्या होत्या. हेतू हा की त्या हिंदुस्थानभर वाचल्या जाव्यात. प्रकाशक मिळाला नाही म्हणून पदरमोडकेली. टाइम्स ऑफ इन्डिया कडे जाहिरात दिली. टाइम्स सारख्या मातबर पत्रानेही कच खाल्ली. जाहिरातदेखील छापायचे नाकारले. ही कोंडी फोडावी म्हणून कर्व्यांनी ती पुस्तके मराठीत आणली. केसरीत जाहिरात पाठवली. तिथेही नकार. संपादक तात्यासाहेब केळकरांशी कव्र्याची ओळख होती. कर्वे केळकरांना भेटले. आपली पुस्तके त्या महत्त्वाच्या विषयांची शास्त्रीय माहिती देणारी आहेत म्हणून युक्तिवाद केला. मोठ्या मुष्किलीने तात्यासाहेब जाहिरात छापायला तयार झाले. पण फक्त एकदाच. तात्यासाहेब म्हणाले, असल्या विषयांची चर्चा करणे समाजाच्या दृष्टीने खासच हिताचे नाही. या सगळ्या अनुभवातून कर्त्यांचा निर्णय झाला, आपले स्वतःचे मासिक काढायचे.
१९२७ सालच्या जुलै महिन्यापासून मासिक सुरू होईल अशी जाहिरात केली. ‘समाजस्वास्थ्य नाव ठरले.’ पहिल्या अंकात किर्लोस्करांनी नाकारलेल’विनय हा लेख होता. वेश्यांच्या प्रश्नाबद्दल लेख होता. त्यात कर्व्यांनी लिहिले होते, याबाबत नीतिप्रद व्याख्याने झोडणे किंवा रोग नाहीसे करण्याकरिता वेश्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ईश्वराच्या प्रार्थनेइतकेच निष्फळ आहे.’ अंक ‘मुंबई वैभव छापखान्यात छापायचे ठरवले होते. कर्व्यांनी ठरल्यावेळी मुद्रणप्रत तयार करून नेऊन दिली. ऐनवेळी छापखान्याच्या चालकांनी हातपाय गाळले. कव्र्यांनी धावपळ करून दुसरा प्रेस गाठला. ठरलेली वेळ टळू दिली नाही. हा नेम त्यांनी जन्मभर पाळला. मासिक जवळ-जवळ २७ वर्षे चालले. दर महिन्याची पंधरा तारीख कधी चुकली नाही. कर्वे ऑक्टोबर १९५३ मध्ये वारले. तारीख होती १४ ऑक्टोबर. दुसर्याक दिवशी १५ तारखेला त्यांच्या मृत्यूचे वृत्त आणि समाजस्वास्थ्य वाचकांना बरोबरच मिळाले. पहिल्या अंकाचा अनुभव त्यांना जन्माचा धडा देऊन गेला असेल का? तसे पहिले तर हा प्रेस एका पुरोगामी उदारमतवादी संस्थेचा–सहँटस् ऑफ इंडिया सोसायटीचा होती. पण कामचिकित्सा सर्वत्र वर्क्स विषय होता ना!
समाजस्वास्थ्याच्या पहिल्या अंकात आपणास कामशास्त्राचा विचार का कर्तव्य आहे याचा खुलासा आहे. कर्वे म्हणतात, “कामशास्त्र’ या शब्दाचा दुरुपयोग झालेला आहे. तरीही कामवासनेचा शास्त्रीय दृष्टीने विचार अशा अर्थाने हा शब्द वापरणे आम्हास भाग पडतआहे. याबद्दल कोणासही क्षुब्ध होण्याचे कारण नाही.’
जुलै १९२७ पासून पुढे २६ वर्षे ५ महिने अप्रतिहत समाजस्वास्थ्य चालू होते. एका हाती देकार्तपुरस्कृत संशयाची कुर्हाहड आणि दुसऱ्या हाती चिकित्सक वृत्तीने घेतलेली लेखणी समाजस्वास्थ्यामधून कर्वे चालवीत होते. कर्वे या निर्णयावर आलेले होते की, पारंपारिक नीतीच्या कल्पना त्याज्य आहेत. उदाहरणार्थ शास्त्रीयदृष्ट्या विवाहाचा व नीतीचा बिलकुल संबंध नाही. धगधगत्या शब्दांत ते लिहितात, ‘हल्लीच्या धार्मिक कायद्याने विवाहित स्त्रियांवर समागमाची सक्ती असते. हा रानटीपणा आहे. या बाबतीत वेश्यांस जेस्वातंत्र्य असते ते विवाहित स्त्रियांस नसते.”
विवाहबाह्य प्रेमसंबंध आणि अनीती याबद्दल त्यांची मते जितकी धक्कादायक तितकेच त्यांचे युक्तिवाद अंतर्मुख व्हायला लावणारे आहेत. ते म्हणतात, ‘एक तर आमचे मते समागम ही दोन माणसांमधील खाजगी गोष्ट आहे व खाजगी गोष्टीबद्दल खरी माहिती दुसऱ्यास दिलीच पाहिजे अशी सक्ती कोणावरही करता येणार नाही.त्यामुळे खोटे बोलणे सर्वथैव अनीतीचे हा समज पोरकट आहे असा निष्कर्ष ते काढतात.
प्रचलित स्त्रीपुरुष-संबंधातली नीतिकल्पना असूयेवर आधारलेली आहे. स्त्री पुरुषाच्या मालकीची वस्तू ही समजूत तिच्या बुडाशी आहे. मालकीची भावना जाणे जरूर आहे. एक प्रकारची असूया नैसर्गिक आहे. ती सोसायला शिकले पाहिजे. एखाद्या व्यक्तीवर आपले प्रेम बसले, पण तिने धुडकावून लावले तर उत्पन्न होणारी असूया नैसर्गिक आहे. तिचे दमन करायला शिकले पाहिजे. यात संस्कृती आहे. कारण प्रेम कोणाचे ताब्यात नसते. इतर नैसर्गिक दुःखासारखे हे दुःख सोसले पाहिजे. दुसरी असूया अनैसर्गिक आहे. चूक आहे. एखाद्या व्यक्तीचे प्रेम आपल्यावर असून आणखीही कोणावर असेल तर वाटणारी ही असूया अशी आहे. कारण तेच, प्रेम कोणाच्या ताब्यात नसते हे.
नीतीचे तात्पर्य, (१) स्वतःच्या हक्कांबरोबर इतरांचेही सुखाचे हक्क ओळखणे, आणि (२) दुसर्याआचे निष्कारण नुकसान न करणे. एवढेच.
स्त्री-पुरुषसंबंधाचे परीक्षण या नीतीच्या तत्त्वावर कर्वे सतत करत होते. पातिव्रत्य आणि व्यभिचार या संकेतांची त्यांची चिकित्सा सनातनी मंडळींना झोंबणारी होती. यातूनच समाजस्वास्थ्या वरील पहिला खटला उभा राहिला.
कर्वे म्हणतात, पतिव्रत्य नैसर्गिक नाही. ती पुरुषांची अरेरावी आहे. स्त्रियांना स्वातंत्र्य दिल्यास त्याही पुरुषांप्रमाणेच वैचित्र्यप्रिय असल्याचे सिद्ध होईल अशी त्यांनाखात्री होती.
स्त्रीचे चारित्र्य तिच्या जननेंद्रियात साठवलेले असते ही समजूत खोट्या आध्यात्मिक कल्पनांवर आधारलेली.
नवर्या.खेरीज अन्य पुरुषाशी केलेला समागम हा त्या दोघांच्याही संमतीने होत असेल तरी रूढार्थाने त्याला व्यभिचार म्हटले जाते. कर्वे मात्र त्याला पाप किंवा गुन्हा मानायला तयार नाहीत. समाजस्वास्थ्य निघून ४ वर्षे झाल्यावर सप्टेंबर १९३१ च्या अंकात त्यांनी व्यभिचाराचा प्रश्न हा लेख प्रसिद्ध केला. त्यात ते म्हणतात, व्यभिचार हे पाप मानण्यास कोणताही शास्त्रीय आधार नाही. प्रेम नसता पतिव्रता राहणारी स्त्री, म्हणजे केवळ कर्तव्य म्हणून समागम सोसणारी स्त्री ही आम्हास श्रेष्ठ वाटत नाही. इतकेच नाही तर ती वेश्येपेक्षाही श्रेष्ठ नव्हे, कारण वेश्या पोटाकरिता जे करते ते अशी पतिव्रता पोटाकरिता व पतिव्रत्याच्या शिक्क्याकरिता करते. परंतु दोघींचीही जात एकच.’ याच लेखात असेही म्हटले आहे की, व्यभिचार करावा असे जरी हिंदुधर्मात कोठे स्पष्ट सांगितले नाही तथापि ते पाप समजलेले दिसत नाही. निदान पाप असल्यास त्याकडे काणाडोळा करण्यास हरकत नाही अशीच हिंदुधर्माची प्रवृत्ती दिसते. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी भगवानपदाला पोचलेल्या कृष्णाची व कुंतीची उदाहरणे दिली आहेत. इतके दाहक आणि क्षोभक लिखाण केल्यावर सनातनी चिडले नसते तरच नवल! पुणेकरांनी या कामी पुढाकार घेतला; मासिक बंद पाडावेम्हणून सरकारकडे मागणी केली. आहिताग्नी राजवाड्यांकडे मोहिमेचे नेतृत्व होते. सरकारने अश्लीलतेचा आरोप ठेवून खटला भरला. १९ डिसेंबर १९३१ रोजी कर्व्यांना अटक करण्यात आली. व्यभिचाराचा प्रश्न हा लेख असलेल्या प्रती जप्त करण्यात आल्या. २५ जानेवारीला खटला सुनावणीला आला.