प्रा. काशीकर ज्या स्टीफन हॉकिंगचे संदर्भ देतात त्या (आजचा सुधारक, मे-जून ९२) प्रोफेसर हॉकिंग यांचेबद्दल थोडी अधिक माहिती वाचकांना नसल्यास करून द्यावीशी वाटते. डॉ. स्टीफन हॉकिंग (वय वर्षे ५०) हे केंब्रिज विद्यापीठात थिऑरेटिकल फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड व नंतर केंब्रिज विद्यापीठात झाले व वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी १९६६ मध्ये “Universe could have sprung from a singularity, and there is a singularity in our past” हा विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीआपला Ph.D. चा प्रबंध मांडला व तो सर्वमान्यही झाला.
वयाच्या २१ व्या वर्षापासून हॉकिंग यांना ‘अ-मायोट्रॉफिक स्क्लरोसिस’ या भयानक रोगाची प्रारंभिक लक्षणे दिसू लागली. तरीपण त्यांनी आपले काम जोमाने चालूच ठेवले. याचवेळी त्यांनी विवाहही केला. जेन या पत्नीपासून त्यांना रोगाच्या प्राथमिक अवस्थेत ३ अपत्येही झाली. परंतु रोग पूर्णपणे वाढल्यावर गेली २० वर्षे डॉ. हॉकिंग यांचे डाव्या हाताची बोटे वगळता संपूर्ण शरीर लुळे पडले आहे. त्यांना शरीराच्या कोणत्याही भागाची हालचाल करता येत नाही, बोलता येत नाही, खातापिता येत नाही. सदैव पलंगावर अथवा व्हीलचेअरवर आयुष्य काढावे लागते. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी त्यांना नर्सचे सहाय्य लागते. ते वाचू शकतात व आपले विचार केवळ डाव्या हाताच्या दोन बोटांनी कॉम्प्युटरद्वारे व्यक्त करू शकतात. शरीर असे गलितगात्र झालेले असले तरी हॉकिंग यांचा मेंदू मात्र अतिशय तल्लख आहे. आइन्स्टाइन नंतर या शतकातील सर्वोत्तम फिजिसिस्ट म्हणून त्यांना अवघे जग मानते. १९८८ साली विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी “A Brief History of Time” हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याच्या १७ लाख प्रती विकल्या गेल्या.
हॉकिंग यांच्या कर्तृत्वास त्यांच्या पत्नीचा जेनचा मोठा हातभार लागला. वैवाहिक जीवन आजारामुळे संपुष्टात आल्यावरही जेनने त्यांची मनापासून सेवाशुश्रूषा केली. परंतु पुढे स्टीफन हॉकिंग यांच्या अत्याग्रही नास्तिकतेमुळे आस्तिक जेनचा कोंडमारा होऊ लागला व १९७० साली उभयतांनी घटस्फोट घेतला. हल्ली हॉकिंग यांची सोबत त्यांची एक नर्स करते.
डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे उत्कृष्ट चरित्र नुकतेच मायकेल व्हाईट व जॉन ग्रिबिन यांनी लिहिले असून ते डटन (Dutton) कंपनीने प्रसिद्ध केले आहे. किंमत आहे २३ डॉलर्स, अर्थात् ७०० रुपये.
र. वि. पंडित
प्रिय प्रा. दि. य. देशपांडे,
डॉ. विठ्ठल प्रभू यांच्याकडून मला आलेल्या ता. ५-५-९२ च्या पत्राची एक आणि मी त्यांना आज ता. १६-५-९२ रोजी लिहिलेल्या पत्राची एक अशा दोन छायाप्रती सोबत पाठवीत आहे. कळावे.
आपला,
वि. रा. लिमये.
प्रिय श्री. वि. रा. लिमये यांस,
स. न. वि. वि. आपण पाठविलेली झेरॉक्स प्रत (आजचा सुधारक एप्रिल १९९२/२७ व २९) मिळाली. त्याबद्दल आभारी आहे. आजचा सुधारक मार्च व एप्रिल १९९२ या अंकांतून माझी पत्रे प्रसिद्ध करविण्याबद्दलही आभारी आहे. लेखातून मला जे सांगता आले असते ते सर्व माझ्या या दोन पत्रांद्वारे वाचकांना आता कळलेले असल्यामुळे लेख लिहिण्याचे प्रयोजन राहिलेले नाही.
फेब्रुवारी महिन्यापासून ‘आरोग्य-मित्र’ या माझ्या नव्या पुस्तकाची प्रफे येऊ लागली. (आपले आधीचे पत्र मिळाले तेव्हा ती आलेली नव्हती.) हे काम हातावेगळे होईपर्यंत म्हणजे आणखी एक-दोन महिने लेख लिहिणे शक्य नव्हते. मागे एकदा इच्छामरण या विषयावरील आमची रेडियोवरील चर्चा आपल्याला लिहून पाठविण्याचे कबूल केल्यावर सुमारे सहा महिन्यानंतर देखील मी आवर्जून हस्तलिखित पाठविल्याचे आठवते का? टेपवरील रेकडिंग कागदावर उतरविण्यासाठी सहा तास लागले होते. वेळ मिळाला तेव्हा हे शक्य झाले. मी अजून निवृत्त झालेलो नाही.
सांगलीचा निवांतपणा मुंबईत नसतो हे आपणास माहीत आहेच. रोज नव्या समस्या उभ्या राहातात. यावरून आपले समाधान होईल अशी आशा बाळगतो. मात्र आपण आधी ही कारणे पत्राद्वारे मला विचारली असती व नंतर ‘आजचा सुधारक’कडे तुमचे पत्र पाठवले असते तर ते योग्य ठरले असते.
माझ्या दृष्टीने हे प्रकरण आता संपले आहे असे आपण पत्रात लिहिता. कोणते प्रकरण? आपली खाजगी पत्रे प्रसिद्ध करून आपणच प्रकरण निर्माण करता.
आपल्याला आलेली खाजगी पत्रे पत्रलेखकाची परवानगी न घेता प्रकाशित करणे कितपत आचारसंहितेला धरून आहे यासंबंधी चौकशी करून मला कळवावे.
‘जगायचे की मरायचे’ या आपल्या पुस्तकातही आपल्याला आलेली पत्रे छापलेली आहेत.
तुमच्या दृष्टीने हे प्रकरण संपलेले असले तरी माझ्या दृष्टीने ते संपलेले नाही. या पत्राची झेरॉक्स प्रत आजच्या सुधारककडे पाठवावी. यापुढे एखाद्या नॉन् इश्यूचे प्रकरण बनवू नये ही विनंती.
आपण याविषयी (स्त्री पुरुषांची लैंगिक उपासमार) आपली मते मांडणार होता. ती मते लेखनरूपाने व्यक्त करावीत असे मी आपल्याला लिहिले होते. त्याचे काय झाले? जरूर लिहावे. कारण आपण अविवाहित आहात. आपल्या लैंगिक उपासमारीसाठी आपण काय केले तो स्वानुभव वाचकांना कळू द्यावा. कळावे लोभ असावा ही विनंती.
आपला
विठ्ठल प्रभू
प्रिय डॉ. विठ्ठल प्रभू,
प्रथमच हे सांगणे आवश्यक आहे की माझी जी आकलनक्षमता आहे तिच्या मर्यादेतच मला तुमच्या पत्राचे आकलन होणार. तुम्हाला हे मान्य होण्यास हरकत नसावी.
(१) ‘प्रकरण’ या शब्दाचा वापर. (२) तुम्ही मला लिहिलेली खाजगी पत्रे प्रसिद्ध करविण्याची व्यवस्था करून मी केलेला आचारसंहितेचा भंग. (३) नॉन-इश्यूचे प्रकरण बनविणे. तुमची नाराजी मुख्यतः या तीन कारणांनी असावी.
(१) श्री. वर्हाडपांडे यांच्या लेखाचा विषय हा तुमच्याही अभ्यासाचा विषय असल्यामुळे तुम्हीही या विषयावर एक लेख लिहून तो आजच्या सुधारकडे पाठवावाअशी विनंती करणारे पत्र मी तुम्हाला लिहिले. तुम्हाला लेख लिहिण्यास उद्युक्त करावे एवढाच माझा उद्देश असता तर वर्हाडपांडे यांच्या लेखाची छायाप्रत मीच तुम्हाला पाठवली असती; पण तुम्ही मासिकाचे वर्गणीदार व्हावे असेही मला वाटत असल्यामुळे फेब्रुवारी, १९९२ ची अंक तुम्हाला पाठविण्याबद्दल मी संपादकांना विनंतीवजा पत्र लिहिले. त्यावर ता. १२-२-१९९२ च्या पत्रात तुम्ही लिहिले की ‘…. जरूर मी त्याचा वर्गणीदार होईन. फेब्रुवारीचा अंक पाठविण्याबद्दल शिफारस केली त्याबद्दल आभार. अंक मिळाल्यावर लेख लिहीन…’ त्यानंतर ता. २६.२.१९९२ च्या पत्राने तुम्ही कळविले की अमुकअमुक कारणांनी व वेळेअभावी आजचा सुधारकसाठी मी लेख लिहू शकणार नाही. ही सर्व कारणे पूर्वीपासूनच होती. आता ता. ५-५-१९९२ च्या पत्रावरून असे दिसते की फेब्रुवारी महिन्यापासून ‘आरोग्य-मित्र’ या तुमच्या नव्या पुस्तकाची प्रुफे येऊ लागली. हे नवे कारण तुम्ही मला कळवावयास हवे होते. कारण त्यावेळी चेंडू कार्टाच्या तुमच्या भागात होता. तसे तुम्ही न कळविल्यामुळे मी जे लिहिले आहे ते लिहिले. यात माझी काय चूक?
(२) लोकांनी आपल्याला आलेली खाजगी पत्रे त्यांना विचारल्याशिवाय प्रसिद्ध करू नयेत इतपत आचारसंहितेचे ज्ञान मला आहे. स्त्री-पुरुषांची कामवासना, विवाहाचे योग्य वय, लैंगिक उपासमार इत्यादींबद्दलची तुमची मते तुम्ही पत्रात लिहिली आहेत. यात काही खाजगी आहे असे मला वाटत नाही. ता. २६-२-९२ च्या पत्रात तुम्हीसुद्धा लिहिले आहे की, ‘.. या संबंधी मी “निरामय कामजीवन” या पुस्तकात लिहिले आहे. अनेक लेखांतही माझे विचार मांडले आहेत.’
(३) नॉन-इश्यूचे प्रकरण मी बनवत नसून तुम्हीच बनवत आहात. तुम्हाला लेख लिहिण्याची प्रथम मी विनंती केली. ती तुम्ही मान्य केली. नंतर काही कारणांनी (जे मला माहीत नव्हते) आपण लेख लिहू शकत नसल्याचे तुम्ही कळविले. त्यावर मी निर्णय घेतला की या गोष्टीचा पाठपुरावा आपण आता करावयाचा नाही. या अर्थाने मी लिहिले की, ‘माझ्या दृष्टीने तरी प्रकरण आता संपले आहे.’
आपली दोघांची पत्रे प्रसिद्ध करण्या-न करण्याबद्दल मी संपादकांना कधीच लिहिले नव्हते.
आता तुमचे मत काहीही असले तरी ता. २-५-१९९२ च्या पत्रात (यावेळपर्यंत तुम्हाला फक्त मार्चच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या पत्रांच्या छायाप्रती मिळालेल्या होत्या.) तुम्ही माझ्याबद्दल लिहिले आहे की, … पत्रलेखनाबाबतीत तत्परता व लेखनाबाबतीत सडेतोडपणा या दोन गोष्टी आपणाकडून सर्वांनी शिकण्यासारख्या आहेत.’
हे जे काही घडले आहे त्यामुळे फक्त मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेल्या, वयाच्या अठ्ठावीस ते चौपनपर्यंतचा उमेदीचा सर्व काळ केवळ जगण्यासाठी धडपड करण्यात गेलेल्या आणि यामुळे या काळात ४०-५० पुस्तकेसुद्धा न वाचू शकलेल्या, स्टॉक एक्चेंज आणि कमॉडिटीज बाजार यांमध्ये होणारी तेजीमंदी, यूथनेसिया (euthanasia), पत्त्यातला रमीचा खेळ यांशिवाय इतर कोणत्याही विषयाचा खास अभ्यास न केलेल्या आणि एकूणच प्रचलित विचारसरणीशी सुसंगत अशी विचारसरणी नसणार्या माझ्यासारख्याच्या मनात आता असा विचार प्रबळ होऊ लागला आहे की बर्याच शैक्षणिक पदव्या धारण करणारे, बुद्धिवंत, पुरोगामी, वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञ वगैरे व्यक्तींच्यापासून आपण चार हात दूर राहिलेलेच बरे; कारण न जाणो केव्हा आपल्या हातून अनुचित शब्दाचा वापर होईल. आचारसंहितेचा भंग होईल. एखाद्या नॉन-इश्यूचा इश्यू करण्याचा अपराध आपल्या हातून घडेल आणि त्यांच्या रोषास पात्र होण्याची पाळी आपल्यावर येईल!
कळावे.
आपला, विनायक राजाराम लिमये