महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाचा प्रारंभ बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’ (इ.स. १८३२) या साप्ताहिकाच्या आरंभापासून झाला असे म्हणता येईल. परंतु सामाजिक सुधारणेला पोषक व प्रेरक असे साहित्य ‘प्रभाकर’ पत्रातून १८४६ सालापासून ‘शतपत्रां’च्या रूपाने महाराष्ट्राला दिले ते लोकहितवादी यांनीच. त्याच वर्षी पुण्यात पहिली मुलींची शाळाकाढून म. जोतिबा फुले यांनी प्रत्यक्षात सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला. पेशवाईच्या अस्तानंतर केवळ तीस वर्षांच्या कालावधीत हे सारे घडून आले. इंग्रजी राज्य हे शाप की वरदान याचा निर्णय होण्यापूर्वीच हे घडून गेले. या परिवर्तनाची कल्पना व योजना ज्या त्रिमूर्तीनी केली ते तिघेही तरुण होते. विशीत-पंचविशीत होते. त्यांनी इंग्रजी भाषा व पाश्चात्त्य विद्या यांची दीक्षा घेतली होती. अध्यात्मविद्येपेक्षा भौतिकविद्या अधिक जीवनोपयोगी, व्यक्तीच्या विकासाला आणि समाजाच्या प्रगतीला प्रेरक व पोषक आहे असा दृढ विश्वास त्यांच्या हृदयात रुजला होता. स्वदेश व स्वजन यांच्याविषयी त्यांना आस्था आणि आत्मीयता वाटत होती. स्वजनांना जागृत करून कल्याणाचा मार्ग दाखवावा या हेतूने हे त्रिकूट लेखनप्रवृत्त झाले. १८४४ साली बाळशास्त्री जांभेकरांचे अकाली निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर लोकहितवादींची ‘शतपत्रे’ प्रकाशित झाली.
शतपत्रे लिहिली त्यावेळी लोकहितवादी ऐन पंचविशीत होते. भोवतालची परीस्थिती, ब्राह्मणवर्गाचा अधःपात, भौतिक विद्येचा अभाव हे सर्व पाहून ते संतप्त झाले. त्यांच्या लेखणीने सामाजिक व धार्मिक दुरवस्थेवर घणाघाती प्रहार केले. त्यातून सजातीयही सुटले नाहीत. पुराणिकांची विद्या आता निरुपयोगी असल्याने त्यात द्रव्याचा अपव्यय नको, असे सांगून त्यांनी पेशवाईतील दक्षिणा वाटण्याच्या प्रथेला विरोध दर्शविला. तेव्हा पुण्याच्या तुळशीबागेत पाच हजार भट-भिक्षुकांनी लोकहितवादींचा जाहीर निषेध केला. याच भट-भिक्षुकांची कड घेऊन विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी लोकहितवादींवर टीका केली. पण तिचे समर्थन चिपळूणकर-भक्तांनाही करता आले नाही. ग. त्र्यं. माडखोलकरांनी लिहिले, “या भिक्षुकीच्या प्रकाराचे समर्थन पश्चिमेच्या उदाहरणावरून होण्यासारखे नाही. तिकडे दोष असतील तर तेही आपण पत्करावेत काय, असा प्रश्न उपस्थित होतो.”
येथे दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो. तो असा की, खरोखरीच लोकहितवादी ब्राह्मणद्वेष्टे होते का? विष्णुशास्त्रींनी म्हटल्याप्रमाणे त्यांना ब्राह्मणांविषयी मत्सर वाटत होता का? निश्चित नाही. भटांनी लावून दिलेले वेड, ‘सांप्रतचे पंडितांचे ज्ञान, ‘नाना फडणिसाचे शहाणपण’ किंवा ‘संस्कृतविद्या हे जे लेख लोकहिवादीनी लिहिले ते मत्सरग्रस्त वृत्तीतून नसून सद्भावनेतून व जुन्या विद्या, रूढी, परंपरा, अज्ञानमूलक धार्मिक कल्पना, अंधश्रद्धा जोपासण्याच्या कालबाह्य प्रकारांना आळा घालण्याच्या सद्धेतूने लिहिलेले आहेत. पण जेथे शास्त्रीबुवांसारख्या नवविद्याविभूषित पंडिताला हे उमगले नाही तेथे सामान्यांना कसे उमगणार? बहुधा त्यामुळेच लोकहितवादींच्या पुण्यस्मृतीचे शंभरावे वर्ष संपायला आले तरी महाराष्ट्रातील साहित्यसंस्था, ब्राह्मणसंघ यापैकी कोणीच या घटनेची दखल घेतलेली दिसत नाही. नाशिकचे ‘लोकहितवादी मंडळ’ हे केवळ याला अपवाद.
लोकहितवादी यांनी सामाजिक परिवर्तनाचा विचार बुद्धिवादी भूमिकेतून मांडला. शब्दप्रामाण्यापेक्षा बुद्धिप्रामाण्यावर भर दिला. ज्या स्मृतिकारांच्या वचनांना पायाभूत मानून पंडित व पुरोहित वर्गानी समाजरचना संवर्धित केली त्या स्मृतिकारांबद्दल लोकहितवादींनी रोखठोक शब्दांत लिहिलेः ” मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो; ‘बुद्धिरेव बलीयसी’ असे आहे. शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धि चालवा. विचार करून पाहा. घातक वचनांवर हरताळ लावा.” आणखी एके ठिकाणी ते लिहितात.“मनू हा जर ईश्वर होता तर त्याने अशीहि सत्ता पृथ्वीवर कां प्रगट केली नाहीं कीं कोणे एकेहि ब्राह्मण स्त्रीचा नवरा मरणार नाही. प्रथम स्त्री मरावी, नंतर नवरा मरावा, असा क्रम जर पृथ्वीवर घातला असता तर मी म्हटलें असतें कीं, मनू ईश्वर होता.
”(शतपत्रे, पत्र क्र.१५) मनुस्मृतीचे दहन करणार्या डॉ. आंबेडकरांना शोभेल अशा भाषेत मनूवर टीका करणार्या लोकहितवादींवर ब्राह्मणवर्गाचा रोष व्हावा हे योग्यच नव्हे का?हाच भाव “समाजातील अग्रगण्य अशा ब्राह्मणांवर त्यांनी भरपूर टीका केली असल्याने त्यांचेवर ब्राह्मणसमाजाचा रोष झाला असावा (आजकालचा महाराष्ट्र – पाध्ये-टिकेकर, पृ. ९५) या अवतरणातून व्यक्त झाला आहे.
एकीकडे लोकहितवादी ब्राह्मणद्वेष्टे म्हणून त्यांची ब्राह्मणसमाजाने उपेक्षा केली तर दुसरीकडे ते स्वतः ब्राह्मण म्हणून त्यांची दृष्टी ब्राह्मणवर्गाच्या हितापलीकडे पोचलीच नाही अशी टीका ब्राह्मणेतरांनी केली. “बाळशास्त्री जांभेकर,लोकहितवादी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, रानडे, आगरकर, ही सर्व मंडळी ब्राह्मण होती. त्यामुळे त्यांनी कितीही व्यापक विचार करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या प्रत्यक्ष कार्याचे क्षेत्र ब्राह्मणवर्गापुरतेच मर्यादित राहिले. ज्या समाजामध्ये ते जन्मले आणि वाढले तेथील परिस्थितीची बंधने त्यांच्या अंगीकृत कार्यावर पडणे काही अंशी स्वाभाविकच हेते.’ हा अशाच प्रकारचा एक अभिप्राय, (राजर्षी शाहू-डॉ. एस्.एस्. भोसले, पृ. २७) लोकहितवादींच्या आचार-विचारांत विसंगती होती अशीही एक टीका ब्राह्मणेतर लेखक करतात. तिच्यात तथ्य नाही, असे म्हणवत नाही. डॉ. भोसले लिहितातः “लोकहितवादींची वाणी आणि लेखणी जितकी तिखट आणि जहाल होती तितकीच वृत्ती आणि कृती पोचट आणि मवाळ होती. आचार-विचारांत संगती असली की सांगण्याला कवचकुंडले प्राप्त होतात. विसंगती आली की कवचकुडंले हरवून बसलेल्या कर्णासारखी दीन अवस्था होते. लोकहितवादींच्या समाजविषयक लेखनाचे तसेच झाले आहे.” (राजर्षी शाहू, पृ. २३-२४) परिणाम असा झाला की, लोकहितवादींना ब्राह्मणवर्गाची सहानुभूती तर मिळाली नाहीच पण ब्राह्मणेतरांनाही ते कधी आपले वाटले नाहीत. ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही.
महाराष्ट्रात इंग्रजी राज्य आले (१८१८) ते ईश्वरी प्रेरणेने आले, ही धारणा तत्कालीन नव-इंग्रजी-शिक्षितांत पक्की रुजलेली दिसते. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, जोतिबा फुले, न्या. मू. रानडे ह्या समकालीनांच्या लेखनातून या विचाराचे पडसाद उमटलेले स्पष्ट दिसून येतात. विष्णुशास्त्री, टिळक आणि आगरकर यांनीही इंग्रजी राज्याची तरफदारी केलेली आहे. त्याला काही कारणे आहेत. मराठी राज्यात, विशेषतः पेशवाईत लोकजीवन सुरक्षित नव्हते, समाज रूढिग्रस्त होता आणि स्त्रियांची दुरवस्था होती. इंग्रजांनी ठगांचा बंदोबस्त केला, सतीबंदी केली आणि भौतिक विद्या शिकवण्याची सोय केली. लोकहितवादी म्हणतात.
“इंग्रज लोकांनी हिंदु लोकांस स्थितीवर आणण्याचा बहुत प्रयत्न चालविला आहे”.देशांत स्वस्थता केली. चोर, लुटारू नाहींसे केले. हे त्यांचे मोठे उपकार आहेत. किती काळ जरी ब्राह्मणी राज्य चालते तरी सती बंद होती ना; पेंढारे मोडते ना व बालहत्या बुडती ना.”
“हिंदुस्थानचे लोक हे फार मूर्ख व धर्मकर्म सोडून अनाचारास प्रवर्तले”. ते असे की, सती जाण्याची चाल , मुलें मारावयाची चाल, तीन वर्णाची नीच स्थिति, ब्राह्मणांचे महात्म, विद्या क्षणिक, अतिशय गर्व, संपूर्ण देशाचे लोक आम्हापुढे तुच्छ व आम्ही श्रेष्ठ, तेव्हा हा भाव हिंदु लोंकांचा (म्हणजेच ब्राह्मणवर्गाचा) मोडण्यास व त्यांस ताळ्यावर आणण्यास परदेशांतील सुधारलेले लोक यांची व त्यांची गांठ घालून देण्यापेक्षा उत्तम उपाय दुसरा काही आहे, असे वाटत नाही. यास्तव या देशात ईश्वराने इंग्रजांची प्रेरणा केली आहे.” (शतपत्रे, क्र.५४)
” इंग्रजी राज्याबद्दल विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी असे लिहून ठेवले आहेः इंग्रजी सरकारचा या देशावर सर्वात मोठा उपकार हा होय की ज्ञानाची अमोलिक देणगी त्याने या देशास दिली व अद्याप देत आहे.” (‘वक्तृत्व) निबंधमाला सुरू करताना त्यांनी लिहिले आहे की, ‘इंग्लंड वगैरे देशांत सामान्य माणसास जे ज्ञान असते ते येथील सुशिक्षितांसहिनसते.’
लोकमान्य टिळकांनी केसरीत लिहिले, “इंग्रजी राज्यात हिंदुस्थानात जे अनंत फायदे झाले आहेत ते व तसे इंग्रजांखेरीज इतरांच्या हातून कालत्रयीही झाले नसते.. आम्हास झालेले फायदे म्हणजे (१) शांतता,(२) कायद्याची सर्वत्र व्यवस्था, (३) अपराधांचा बंदोबस्त, (४) सार्वजनिक आरोग्य, (५) व्यापारसमृद्धी, (६) शेतकी-सुधारणा, (७) खनिज व उद्भिज्ज संपत्तीची अभिवृद्धी, (८) विद्या-दानाच्या अनुपम सोयी, (९) स्वराज्य कारभाच्यांची प्राप्ती, (१०) लेखनस्वातंत्र्य, (११) यंत्रादी सुखसामग्रींचा परिचय, (१२) स्वातंत्र्याची अभिरुची.” (केसरी, दि. ९ ऑगस्ट १८९२)
याचा अर्थ एवढाच की, लोकहितवादींनी इंग्रजांची व इंग्रजी राज्याची तरफदारी करण्यात कोणतीही देशद्रोही भावना व्यक्त झालेली नाही. त्यांनी व्यक्त केलेले सुधारणावादी विचार हेसुद्धा समाजविघातक होते असे म्हणता येणार नाही. किंबहुना टीकाकारांनीही तसे म्हटलेले नव्हते. फक्त त्यांनी तत्कालीन ब्राह्मणवर्ग व प्रामुख्याने भट-भिक्षुकांचा वर्ग यांच्या समाजघातकी व परंपराप्रिय विचारसरणीवर प्रखर आघात केले एवढेच!
स्वदेश, स्वधर्म आणि स्वजाती याबद्दल लोकहितवादींना प्रेम वाटत होते. इंग्रजी राज्य, त्यांच्या विद्या याबद्दलचा त्यांचा आदरभाव आणि गौरव हा कालोचित होता. बदललेल्या परिस्थितीचा अधिकाधिक फायदा आपल्या समाज-बांधवांनी घ्यावा, त्यांनी नैतिक, आर्थिक, सामाजिक प्रगती करावी अशी त्यांची उत्कट इच्छा होती. ‘विधिनिषेधरूप धर्माचे मूळ, जातीविषयी विचार, ‘नीतिप्रशंसा, ‘धर्मसुधारणा आदी पत्रांतून आपला धर्मसुधारणाविषयक विचार मांडला आहे. धर्मसुधारणेची पंधरा कलमे त्यांनी सुचवली. त्यातून त्यांनी असे विचार मांडले की आचारापेक्षा नीति प्रमुख मानावी. जात्यभिमान नसावा. स्वदेशाची प्रीति व त्याचे कल्याण मनात वागवावें. स्त्रीपुरुष अधिकार धर्मसंबंधी कामांत व संसारांत एकसारखे असावे. विद्याभिवृद्धीकरिता सर्वांनी मेहनत करावी.सत्याने सर्वांनीं चालावें.’ हे सांगण्यापूर्वी लोकहितवादींनी ‘हिंदुस्थानच्या पराधीनतेची कारणे अर्थात हिंदुनाशाष्टक’ हा लेख (पत्र क्र. ४५) लिहिला. त्यात हिंदू लोकांचे (प्रामुख्याने भटांचे) दोष दाखवले आहेत. त्यांच्या त्या समजुतींवर प्रकाश टाकला आहे. आता तरी ब्राह्मणवर्गाने शहाणे व्हावे, भौतिक विद्या प्राप्त कराव्या, जुन्या वेडगळ समजुतींना फाटा द्यावा, असा कळकळीचा सल्ला त्यांनी शतपत्रांतून दिला आहे. ‘शतपत्रां’चा इत्यर्थ हा लेख वाचला की याची प्रतीती येते.
समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेला चालना देण्याचे कार्य लोकहितवादींनी आपल्या लेखनातून केले. ‘शतपत्रे’ हा त्या लेखनाचा एक अंश होय. तरीही खर्याह अर्थाने स्वतंत्र आणि बुद्धिवादावर आधारित लेखन शतपत्रांतूनच झाले आहे. सामाजिक सुधारणा हा त्याचा केंद्रबिंदू आहे. आपल्या लोकांची धार्मिक रूढिग्रस्त परंपरेतून मुक्ती, त्यांना आत्मपरीक्षण (introspection) करण्यास प्रवृत्त करावे ही तळमळ ही त्यांच्या सुधारणाविषयक लेखनाची प्रेरणा दिसते. ब्राह्मणवर्गातील वर्णश्रेष्ठत्वाची भावना आणि समाजातील जातिभेद दूर करण्यासाठी, स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा घडून यावी म्हणून त्यांनी लेखणी उचलली. स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कपट-कारस्थान भटांनीच केले आणि त्यांच्या शिक्षणासाठी जोतिबांनी शिक्षिका म्हणून आपल्या पत्नीची योजना केली तेव्हा पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी तिचाही छळ करायला मागेपुढे पाहिले नाही. पुढे पन्नास वर्षांनी आगरकरकर्वे यांच्या प्रयत्नाने स्त्री-शिक्षणाला खरी चालना मिळाली. बालविवाह हा या मार्गातील पहिला अडथळा होता. स्वतः लोकहितवादींचा विवाह सातव्या वर्षी झाला होता. ब्राह्मणसमाजातील या अधोगतीची मीमांसा त्यांनी परखडपणे केलेली आढळते. पण दुर्दैवाने तत्कालीन पुरोहितांचे व पंडितांचे हृदयपरिवर्तन तर झाले नाहीच, उलट त्यांची उपेक्षा व अवहेलनाच लोकहितवादींच्या वाट्याला आली. वास्तविक बालविवाह सोडल्यास पुनर्विवाहबंदी, केशवपन ह्या गोष्टी फक्त ब्राह्मणवर्गातच प्रचलित होत्या. म्हणूनच ज्योतिबांनी आपले लक्ष स्त्रीशिक्षणाकडेच तेवढे केंद्रित केले. समाजसुधारणेच्या या अंगाचा बहुजनसमाजाशी काडीमात्र संबंध नव्हता, आणि उच्चभ्रू समाजसुधारकांच्या दृष्टीस अस्पृश्यतेसारखी भयानक व मानवतेचा अवमान करणारी कुप्रथा तेव्हा दिसली नाही.
तरीही लोकहितवादींचे समाजचिंतन त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष पटविणारे आहे. विशेषतः त्यांनी जे राजकीय व आर्थिक बाबींसंबंधीचे विचार मांडले आहेत ते काही अंशी आजच्या परिस्थितीत मार्गदर्शक ठरणारे आहेत. एकीकडे इंग्रज व इंग्रजी राज्य यांची तरफदारी करीत दुसरीकडे स्वदेशी व विदेशी मालावरील बहिष्कार यांचा पुरस्कार केला. भारतातील दारिद्रय कमी होण्यासाठी हा मार्ग पत्करता येईल असे त्यांचे मत दिसते. ते म्हणतात.
“याजकरितां सर्वांनी असा कट करावा की जे आपल्या देशांत पिकेल तेंच नेसू, तेच वापरू कसेंहि…. असो.. कापूस विकणारांनी असा बेत करावा कीं इंग्रेजांस इकडे तयार केलेली कापडे द्यावीं, परंतु कापूस देऊ नये. येणेकरून हे लोक सुखी होतील.. कांच, कापड, सुरी, कात्री, लाकडी सामान, घड्याळे, ही सर्व आपले लोकांनी करावयास शिकावें. इंग्रजांचेदेशचे सामान बंद करावें; किंबहुना आपलें सामान त्यांस द्यावे, परंतु त्यांचे आपण घेऊ नये. जो इकडे उत्पन्न होईल तितका माल घ्यावा. विलायती कापड घेऊ नये. यास्तव आपणांस जाडीं, मोठी कापडे नेसावयास लागली तर काय चिंता आहे?” लो. टिळकांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशी व बहिष्कार या दोन सूत्रांचा सूत्रपात त्यांच्या घोषणेपूर्वी अर्धशतकात लोकहितवादींनी केला हे विसरता येणार नाही.
हे सर्व असले तरी ज्या प्राचीन शास्त्रांचे वाभाडे काढण्यात लोकहितवादींनी उभी ह्यात घालवली त्याच शास्त्रवचनाने त्यांचा घात केला. ते शास्त्रवचन आहे, ‘सत्यं ब्रूयात्, प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम्.