माझ्या ‘गीतेतील नीतिशास्त्र या लेखावर डॉ. नी. र. वर्हाडपांडे यांनी अनेक आक्षेप घेतले आहेत. (आजचा सुधारक, मे-जून ९२, पृ. ८५) त्यांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
१. त्यांचा पहिला मुद्दा असा आहे.‘गीतेचे विवेचन महाभारताच्या पाश्र्वभूमीचा विचार केल्याशिवाय योग्य रीतीने होऊ शकत नाही. गीतेत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर नाही असे प्रा. देशपांडे म्हणतात. या आरोपाची चिकित्सा करण्यासाठी अर्जुनाचा प्रश्न काय होता हे समजून घेतले पाहिजे. ‘कर्तव्य कोणते हे कसे ठरवावे?’ आणि ‘ युद्ध न्याय्य की अन्याय्य याचा निकष कोणता?’ या मूलभूत प्रश्नांची चर्चा महाभारतात इतरत्र आलेली आहे व गीतेच्या नीतिशास्त्रविषयक विचारात ती गृहीत धरलेली आहे.’
मग डॉ. वर्हाडपांड्यांच्या मतानुसार अर्जुनाचा प्रश्न काय होता?ते म्हणतात की अर्जुनाच्या प्रश्न असा होता : ‘स्वजनाशी युद्ध करणे माझे क्षत्रियोचित कर्तव्य असले तरी ज्यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो त्या भीष्मासारख्या वडीलधार्यांवर शस्त्र चालविताना माझा थरकाप होतो. हे कृत्य केल्याने मला पाप लागेल अशी भीती वाटते. युद्ध कर्तव्य असले तरी आप्तस्वकीयांवर प्रेम करणेही कर्तव्य आहे, व येथे कर्तव्यांत संघर्ष उत्पन्न झाला आहे.’तो कसा टाळावा ही अर्जुनाची समस्या आहे. (पृ. ८६) (तिरपा टाइप माझा)
या विधानाच्या सिद्ध्यर्थ गीतेने काय उत्तर दिले आहे असे डॉ. वर्हाडपांडे म्हणतात.? ते म्हणतात : अर्जुनाच्या समस्येचे गीतेतील उत्तर असे आहे.आत्म्याच्या अमरत्वाची आठवण ठेवावी, म्हणजे स्वकीयांना मारण्यातवाटणाच्या कातरतेवर काबू ठेवता येईल. आत्म्याचे अमरत्व मान्य नसेल तर मृत्यू अटळ आहे या निर्विवाद सत्याची जाणीव ठेवावी, म्हणजे स्वजनांना मारण्याचे दुःख कमी होईल. पण सर्वात प्रभावशाली मार्ग म्हणजे स्थितप्रज्ञाच्या वृत्तीने कर्मे करावीत. सुखदुःखे, संकटे इत्यादिकांनी स्थितप्रज्ञाचा तोल सुटत नाही. या स्थितप्रज्ञ वृत्तीतच स्वजनांच्या हत्येचे पाप लागू न देण्याचे सामर्थ्य आहे.’
आता डॉ. वर्हाडपांडे म्हणतात की दोन कर्तव्यांतील संघर्ष कसा टाळावा हा अर्जुनाचा प्रश्न आहे. परंतु या प्रश्नाला गीतेने जे उत्तर दिले आहे असे ते म्हणतात त्यात त्या प्रश्नाचे उत्तर आले आहे काय? दोन कर्तव्यांतील संघर्ष कसा टाळावा या प्रश्नाचे उत्तर वर उद्धृत केलेल्या उत्तरात मला कोठेच दिसत नाही. दोन कर्तव्यांत संघर्ष आला असता त्यांपैकी कोणते करावे? या प्रश्नाला येथे काय उत्तर मिळते? स्थितप्रज्ञवृत्तीने कार्य केल्याने त्याचे पाप लागत नाही हे ते उत्तर. पण वस्तुतः हे त्याचे उत्तर आहे काय? अर्थातच नाही, कारण स्थितप्रज्ञवृत्तीने कर्म करावे हे जरी त्यामुळे कळले तरी कोणते कर्म करावे हे अजून कळायचेच आहे, आणि ते जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत स्थितप्रज्ञ वृत्तीने कर्म करणे अशक्य आहे. तेव्हा अर्जुनाच्या प्रश्नाला गीतेने उत्तर दिलेच नाही असे जे मी म्हणतो ते खरेच नाही काय? आणि जर ते खरे नसेल, आणि डॉ. वर्हाजडपांडे म्हणताहेत ते उत्तर जर अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर असेल तर त्याचा अर्थ असा होईल की आपण कोणते कर्म करतो त्याला महत्त्व नाही. कोणतेही कर्म करा. ते स्थितप्रज्ञवृत्तीने केले की झाले. हा पर्याय डॉ. वर्हाडपांड्यांना मान्य होईल काय?
२. डॉ. वर्हाडपांडे म्हणतात की आपले कर्तव्य कोणते हे कसे ठरवायचे?आणि युद्ध न्याय्य की अन्याय्य याचा निकष कोणता या मूलभूत प्रश्नांची चर्चा अर्जुनाला उत्तर देण्यास अप्रस्तुत आहे. परंतु वर दाखविल्याप्रमाणे कोणते कर्म करणे आपले कर्तव्य आहे?या प्रश्नाचे उत्तर देणे अर्जुनाच्या समस्येचे उत्तर देण्यास अवश्य आहे. डॉ. वर्हाडपांडे म्हणतात की वरील मूलभूत प्रश्नाची चर्चा महाभारतात आली आहे आणि ती गीतेच्या नीतिशास्त्रविषयक विचारांत गृहीत धरलेली आहे. पण एकतर ही चर्चा महाभारतात आली आहे असे गीतेत कोठेही म्हटलेले नाही, आणि दुसरे ती चर्चा नेमकी काय आहे हेही गीतेवरून कळत नाही. परंतु गीतेच्या शेवटी अर्जुनाची शंका नाहीशी झाली आहे. ज्या प्रश्नांची चर्चा अर्जुनाच्या शंकेचा निरास होण्यास अवश्य होती ती काय आहे ते न कळताही त्याची शंका नाहीशी झाली हे चमत्कारिक दिसते. बरे, युद्धभूमी नीतीच्या प्रश्नांची मूलगामी चर्चा करण्याचे स्थळ नव्हे असेही म्हणता येत नाही, कारण त्याच युद्धभूमीवर भगवान कृष्णाने अठरा अध्याय खर्ची घातले आहेत, आणि त्यांपैकी पंधरा अध्यायांत गैरलागू आणि वायफळ गोष्टींची चर्चा करम्यात वेळ घालविला आहे. उदा. श्रीकृष्ण आपल्या विभूती सांगण्यात एक अध्याय खर्च करतो, सत्त्व, रजस्, आणि तमस् या गुणांचे वर्णन अनेक अध्यायांत आले आहे. अकराव्या अध्यायात विश्वरूपदर्शन घडविले आहे. या सर्व गोष्टी अर्जुनाची शंका दूर करण्याच्या दृष्टीने निरुपयोगी होत्या. ती दूर करण्याचा एकमेव उपाय म्हणजे कर्तव्याच्या निकषाची चर्चा करणे. परंतु तो सोडून अनेक अयुक्तिक मार्ग श्रीकृष्ण अवलंबतो. या ना त्या प्रकारे अर्जुनाला कोणीकडून तरी युद्धाला उभे करण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो.
डॉ. वर्हाडपांडे म्हणतात की नीतीच्या मूलभूत प्रश्नांची चर्चा महाभारतात आली आहे. ती कोठे आली आहे आणि ती नेमकी काय आहे हे त्यांनी सांगितले तर बरे होईल. तसे केल्यास अर्जुनाच्या प्रश्नाला जे उत्तर गीतेने दिले आहे त्याला आधारभूत असणारी तत्त्वे कोणती आहेतआणि त्यातून ते उत्तर कसे निष्पन्न होते ( किंवा होत नाही) हे तपासून पाहता येईल.
३. डॉ. वर्हाडपांडे यांचा दुसरा आक्षेप ‘योगः कर्मसु कौशलम्’ या वाक्याच्या मी दिलेल्या अर्थाबद्दल आहे. तो अर्थ बरोबर नाही असे ते म्हणतात. परंतु हा अर्थ सांगताना मी लो. टिळकांचे शब्दच उद्धृत केले होते. हाच अर्थ लो. टिळकांनी गीतारहस्यात सांगितला आहे. एवढेच नव्हे, तर हाच अर्थ शंकराचार्यांनाही मान्य आहे असेही लो. टिळक लिहितात. बरे, हा अर्थ बरोबर नाही, तर बरोबर अर्थ कोणता डॉ. वर्हाडपांडे सांगतात? त्यांचे म्हणणे असे आहे की योग, ज्ञान, भक्ती, इत्यादि मार्ग ‘कर्मसु कौशलम्’ साधण्याचे मार्ग आहेत, मी म्हणतो तसे ते गीतेत मोक्ष मिळविण्यासाठी सांगितलेले मार्ग नाहीत. परंतु ‘योगः कर्मसु कौशलम्’ या वाक्यातील ‘योग’ या शब्दावरून असे दिसते की त्यात योगमार्गाचे वैशिष्ट्य वर्णिले आहे. ज्ञानमार्ग आणि योगमार्ग यांची अनेकावर तुलना करून योगमार्ग श्रेयस्कर आहेअसे गीतेत सांगितले आहे, आणि त्या योगाचे स्वरूप किंवा वैशिष्ट्य कर्मे करण्याचे एक कौशल्य असे सांगितले आहे. डॉ. वर्हाडपांडे म्हणतात की ज्ञान, कर्म, भक्ती, हे मार्ग मोक्षाचे मार्ग म्हणून गीतेने सांगितले नाहीत. गीतेत व्यक्तीच्या मोक्षावर भर नसून तो लोकसंग्रहावरआहे. गीतेचा भर कशावर किती आहे हे ठरविण्याचा निकष जर एखाद्या विषयाला मिळालेल्या श्लोकांची संख्या हा घेतला तर लोकसंग्रहाचा उल्लेख फक्त दोन श्लोकांत येतो. परंतु मोक्षाचा-व्यक्तिगत मोक्षाचा-उल्लेख वेगवेगळ्या संदर्भात किमान पंचवीस वेळा येतो. ‘यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः ‘जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते’, ‘कर्मभिर्न स बध्यते, ‘न स भूयोऽभिजायते’, ‘पुनर्जन्म न विद्यते इत्यादि. शिवाय निष्काम कर्मयोगाचे रहस्य मोक्षप्राप्तीशीच बांधलेले आहे. कर्मे केली की त्यांची फळे भोगावीच लागतात, आणि त्याकरिता पुनर्जन्म घ्यावा लागतो. या अडचणीतून कर्मे करावीत की टाकून द्यावी हा प्रश्न निर्माण होतो, आणि त्याला उत्तर म्हणून संन्यासमार्ग आणि कर्मयोग हे दोन मार्ग सुचविले गेले आहेत. कर्मबंधनामुळे पुनर्जन्म येतो, म्हणून कर्मेच टाकून दिली तर चालणार नाही काय? या प्रश्नाला गीतेचे उत्तर आहे, ‘नाही, कारण एकतर कोणीही कर्म सर्वथा टाकू शकत नाही, आणि दुसरे म्हणजे लोकसंग्रहाकरिता कर्म करणे अवश्य आहे. पण मग मोक्षाचे काय? या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवान कृष्णाने योग नावाच्या कर्म करण्याच्या एका युक्तीचा उपाय सांगितला आहे. कर्मसंन्यास नव्हे, तर कर्मफलसंन्यास हा तो मार्ग आहे. आता ह्या सबंध विवेचनात मोक्षाचे स्थान किती केंद्रीय आहे ते पाहण्यासारखे आहे. कर्मसिद्धांत, पुनर्जन्म आणि त्यापासून मोक्ष मिळविण्याची इच्छा हा तर आपल्या सर्व तत्त्वज्ञानाचाआरंभबिंदू आहे.
डॉ. वर्हाडपांडे यांचा एक मुद्दा असा आहे की गीता हा ईश्वरावतार मानल्या गेलेल्या एका पुरुषाने केलेला उपदेश आहे, एखाद्या आचार्याने लिहिलेला शास्त्रीय ग्रंथ नव्हे, हे लक्षात ठेवून त्याचे मूल्यमापन झाले पाहिजे. म्हणजे गीतेतील उपदेशाची तुलना बुद्ध व महावीर यांचे उपदेश, ख्रिस्ताचा डोंगरावरील उपदेश, महंमदाचा नीत्युपदेश यांच्याशी केली पाहिजे; मूरच्या प्रिन्सिपिया एथिका सारख्या ग्रंथाशी नाही.
या आक्षेपात मला दोन गोष्टी चुकीच्या दिसतात. एखादा ग्रंथ प्राचीन असेल किंवा एखाद्या धर्मसंस्थापकाने लिहिलेला असेल, तर त्याचे परीक्षण अन्य ग्रंथासारखे करू नये; एखाद्या आधुनिक ग्रंथाची आपण जी चीरफाड करू तशी त्याची करणे योग्य नाही. पण हे म्हणजे दुराग्रहाचे दिसते. एकतर पूज्य असलेले आपले पावित्र ग्रंथ आजच्या चिकित्सक कसोट्यांना उतरत नसतील तर तसे सांगणे गैर का असावे हे कळत नाही. विशेषतः ते ग्रंथ जर आजही पूज्य, अभ्यसनीय आणि आदरणीय आहेत असा आग्रह धरला जात असेल, तर त्यांचे परखड परीक्षण करून त्यातील उणीवा, दोष, शंकास्थाने, फोलपणा दाखविणे हे आक्षेपार्ह खासच म्हणता येणार नाही. आणि दुसरे म्हणजे गीता किंवा हिंदूंचा एखादा अन्य पवित्र ग्रंथ चुकीचा, सदोष आणि टाकाऊ म्हणत असताना मी जर इतर धर्माचे ग्रंथ वाखाणत असेन तर तसे करताना गीतेची तुलना कुराण किंवा बायबलशी करणे योग्य झाले असते. परंतु मला ते अभिप्रेतच नव्हते. मी मागे एका लेखात (आजचा सुधारक, सप्टेंबर-ऑक्टोबर ९१,पृ ४-५) असे स्वच्छच म्हटले आहे की जे दोष हिंदूंच्या पवित्र ग्रंथांत आहेत असे मी म्हणतो ते किंवा तत्सम दोष कमी अधिक प्रमाणात सर्वच धार्मिक ग्रंथांत आढळतात. अशा स्थितीत मी मुसलमानी किंवा ख्रिस्ती धर्माच्या ग्रंथांचे दोष न दाखविता हिंदूंच्याच श्रद्धांचे परीक्षण करतो आणि इतरांच्या श्रद्धांचे करीत नाही याचे कारण एवढेच आहे की तसे केल्यास कसलाही इष्ट परिणाम न होता उलट त्या धर्माच्या अनुयायांचे वैर आणि अप्रीती ही मात्र होतील. पण तेही काम करायला हवे आणि ज्यांचा त्या ग्रंथांचा अभ्यास आहे, आणि आपली टीका नुसतीच विकारक्षोभक न होता निदान थोडीबहुत विचारप्रवर्तक होईल अशी ज्यांना आशा आहे त्यांनी करावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. परंतु मी ते करीत नाही एवढ्यावरून मी त्या धर्मग्रंथांना आपल्या धर्मग्रंथांहून श्रेष्ठ मानतो असा निष्कर्ष कसा निघतो ते मला कळत नाही. निदान यापुढे तरी हा आरोप माझ्यावर होऊ नये अशी आशा मी करतो.
५. गीतेची तुलना प्रिन्सिपिया एथिकाशी करणे अयोग्य आहे. तुम्ही ती गीतासदृश एखाद्या ग्रंथाशी का करीत नाही?’ असे जेव्हा डॉ. वर्हाडपांडे मला म्हणाले तेव्हा मी गीतेची तुलना Principia Ethica जरी नाही, तरी प्लेटोच्या Republicशी करीन असे उत्तर मी दिले होते हे खरे आहे. पण त्या उत्तराचा भावार्थ त्यांच्या लक्षात आला नाही असे दिसते. Principia Ethicaसारख्या आधुनिक ग्रंथांमध्ये ज्या पद्धतीचे व्यवस्थाबद्ध आणि मूलगामी शास्त्रीय विवेचन असते त्या पद्धतीचे विवेचन गीतेत नाही हा गीतेचा दोष नाही; कारण ज्या काळी तिची रचना झाली त्या काळी या प्रकारच्या लिखणाची पद्धत हीच होती, असे डॉ. वर्हाडपांड्यांना सुचवायचे असावे अशी माझी समजूत होती. म्हणून मी म्हणालो की इसवी सनापूर्वी लिहिल्या गेलेल्या गीतेची तुलना विसाव्या शतकातील एखाद्या ग्रंथांशी करणे अन्यायकारक होईल हे खरे आहे, आणि म्हणून इसवी सनापूर्वी चौथ्या पाचव्या शतकातील एका ग्रीक ग्रंथाचा उल्लेख मी केला. त्या ग्रंथातील निष्कर्ष किंवा सिद्धांत मला अभिप्रेत नव्हते, मला फक्त त्यातील विवेचनपद्धतीकडे लक्ष आकृष्ट करायचे होते. प्लेटोचे ग्रंथ आजही वर्तमान ग्रंथांच्या बरोबरीने वाचण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहेत. हे दुर्दैवाने आपण गीतेविषयी म्हणू शकत नाही, असे मला म्हणायचे होते, आणि आहे. प्लेटोचे राज्यशास्त्रीय आणि नीतिशास्त्रीय सिद्धांत मला मान्य नाहीत. ते मला मान्य आहेत असे गृहीत धरून डॉ. वर्हाडपांड्यांनी Republicमधील चातुर्वण्याविषयी लिहिले आहे. मात्र प्लेटोविषयीची पाश्चात्त्य जगाची अभिवृत्ती काहीशी गीतेविषयी पूज्यबुद्धी बाळगणाच्या हिंदूंच्या अभिवृत्तीसारखीच आहे हे वर्हाडपांड्यांचे मत मला मान्य आहे.
६. कांट हा डॉ. वर्हाडपांड्यांचा लाडका अप्रीतिविषय. तो देशपांड्यांना शिरोधार्य वाटणारा आहे असे ते म्हणतात. मी कोणालाच शिरोधार्य मानत नाही. कांटने दिलेला कर्तव्याचा निकष अपुरा आहे असे मी स्वतःच म्हटले आहे. शिवाय त्याच्या Critique of Pure Reason या प्रधान ग्रंथांतील मुख्य विचार मला मान्य नाही हे डॉ. वर्हाडपांड्यांना माहीत आहे. अशा स्थितीत तो मला शिरोधार्य वाटतो असे त्यांनी का म्हणावे हे मला समजत नाही. कांटच्या नीतिमीमांसेतील दोन गोष्टी मात्र मला महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे त्याने केलेले नैतिक मूल्याचे विवेचन, आणि दुसरे म्हणजे कर्तव्य नेहमी सार्विक असते ही गोष्ट. नीतीच्या दृष्टीने सर्व मनुष्य समान आहेत. जर एखादे कर्म एखाद्याला बंधनकारक असेल तर ते त्या परिस्थितीत असलेल्या प्रत्येकावर बंधनकारक असते, आणि जे कर्म एखाद्याला अनुज्ञेय असेल ते त्या परिस्थितील अन्य कोणालाही अनुज्ञेय असणार. या गोष्टींचा थोड्या थंड डोक्याने विचार केला तर त्या दोन्ही महत्त्वाच्या आहेत हे डॉ. वर्हाडपांड्यांनाही पटेल.
७. मनुस्मृतीत वाखाण्यासारखे काहीच नाही असा शेरा मी मारला असा डॉ. वर्हाडपांड्यांचा माझ्यावर आणखी एक आक्षेप आहे. स्वच्छच सांगायचे तर हे खरे आहे. मनुस्मृतीत आजच्या घटकेला उपयुक्त असे काही फारसे मिळेल असे मला वाटत नाही. स्त्रिया आणि शूद्र यांच्याविषयी कमालीची पक्षपाती भूमिका घेऊन समाजामधील अध्यअधिक लोकांवर मनुस्मतीने भयानक अन्याय केला आहे हे निर्विवाद आहे. डॉ. वर्हाडपांडे म्हणतात की स्त्रिया आणि शूद्र याखेरीज मनुस्मृतीत दुसरा विषयच नाही अशी माझी समजूत दिसते. नाही, अशी माझी समजूत नाही. मनुस्मृतीत आणखी अनेक विषय आहेत. त्रैवर्णिकांचे विविध संस्कार यांच्याविषयी पुष्कळ विधि आणि निषेध तिच्यात आहेत. पण ते सर्व आजच्या समाजाच्या दृष्टीने त्याज्य आहेत. डॉ. वर्हाडपांडे म्हणतात की शरियत किंवा ख्रिस्ती कायदा यांच्याशी तुलना केल्यास मनुस्मृती उजवी ठरेल. कदाचित; पण मला त्या विषयात रस नाही, आणि त्याची चर्चा निरुपयोगी आहे असे मला वाटते. मात्र शरियत आणि ख्रिस्ती कायदाच केवळ नव्हे, तर आमचे भारतीय संविधानदेखील समतेचा निकष लावला तर मनुस्मृतीपेक्षा हिणकस ठरेल असे जे डॉ. वर्हाडपांडे म्हणातात ते त्यांनी साधार दाखवून द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. मनुस्मृती शरियत आणि ख्रिस्ती कायदा यांच्या तुलनेत उजवी की डावी हा प्रश्न माझ्यापुढे नव्हता आणि नाही; आणि मनुस्मृती अन्य धर्माच्या ग्रंथांच्या तुलनेत डावी आहे असे मी कोठेही म्हटलेले नाही. असे असताना, ‘प्रा. देशपांडे यांचा विवेकवाद आमच्या सरकारच्या ‘सेक्युलरिझम’सारखा आहे. त्याला फक्त हिंदू धर्माचे प्रामाण्य मान्य नाही. हिंदू सोडून बाकी सर्व धर्माचे प्रामाण्य मान्य आहे.’ असे डॉ. वर्हाडपांडे म्हणतात तो बेजबाबदार लेखनाचा कळसच म्हणावा लागेल. वस्तुतः मला कुठल्याच धर्माचे प्रामाण्य मान्य नाही. निदान यापुढे तरी हा निरर्थक आरोप माझ्यावर होणार नाही अशी आशा मी करतो.