आपण ज्या जगात जन्मलो, त्याची स्थिती सर्वांना शक्य तितकी सुखदायक व्हावी, अशीच खटपट सर्वांनी केली पाहिजे, व त्यांत ऐहिक सुखाचा विचार झाला पाहिजे, ही बुद्धिवाद्यांची भूमिका आहे. आज हिंदुस्थानाला आध्यात्मिक आढ्यतेने ग्रासले आहे. आम्ही सर्व जगाला धडे देऊ ही भूमिका केवळ घमेंडीची आहे, तींत बिलकुल तथ्य नाही. जेथे आम्हांलाच काही येत नाही, तेथे आम्ही लोकांना काय शिकवणार?शास्त्रीय ज्ञानांत आघाडी मारली तरच लोकांना काही शिकवता येईल, एरवी नाही. अध्यात्म हा कल्पनेचा खेळ आहे, त्याचा व्यावहारिक उपयोग बिलकुल नाही. प्रजोत्पत्तीच्या बाबतीत सर्व जगाने संयुक्त धोरण आंखणे जरूर आहे, त्यात आपल्यापुरताच विचार कोणीही करता नये.
पण ‘वसुधैव कुटुंबकम्’ या स्थितीला आपण अजून पोचलो नाही. तेव्हा राष्ट्राच्या दृष्टीने विचार करणे सध्या तरी भाग आहे.