मानवी मूल्यांत कामप्रेरणेचे स्थान
कामप्रेरणेविषयी लिहिणार्या लेखकांवर, या विषयाची वाच्यता करू नये असे मानणार्या लोकांकडून, त्याला ह्या विषयाचा ध्यास लागलेला आहे असा आरोप होण्याची भीती नेहमीच असते. या विषयात त्याला वाटणारा रस त्याच्या महत्त्वाच्या तुलनेत प्रमाणाबाहेर असल्यावाचून फाजील सोवळया लोकांकडून होणारी टीका तो आपल्यावर ओढवून घेणार नाही असे मानले जाते. परंतु ही भूमिका रूढ नीतीत बदल केले जावेत असे म्हणणाऱ्या लोकांच्या बाबतीतच घेतली जाते. जे वेश्यांच्या छळाला उत्तेजन देतात, आणि जे नावाला गोऱ्या गुलामांच्या व्यापाराविरुद्ध असलेले, पण वस्तुतः ऐच्छिक आणि स्वच्छ विवाहबाह्य संबंधांविरुद्ध असलेले, कायदे घडवून आणतात; जे आखूड झगे घालणार्या आणि लिपस्टिक लावणार्या स्त्रियांचा निषेध करतात, आणि जे अपुर्या वस्त्रांत पोहणार्या स्त्रियांचा शोध घेत समुद्रकिनारे धुंडाळत असतात, त्यांना मात्र लैंगिक ध्यास आहे असे कोणी म्हणत नाही. परंतु वस्तुतः हे लोक लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्या लोकांपेक्षा त्या ध्यासाने जास्त पछाडलेले असतात. हिंस्र, असहिष्णु नीतिमत्ता बहुधा कामुक भावनांची प्रतिक्रिया असते, आणि जो मनुष्य तिचा पुरस्कार करतो त्याचे मन बहुधा अश्लील विचारांनी ग्रस्त असते. त्याचे विचार अश्लील असतात म्हणजे ते कामविषयक असतात म्हणून नव्हे, तर नीतिव्यवस्थेने त्याला कामप्रेरणेविषयी निर्मळपणे आणि आरोग्यावह रीतीने विचार करणे अशक्य करून टाकलेले असते म्हणून. कामुक विषयाचा ध्यास असणे वाईट ह्या धर्मसंस्थेच्या मताशी मी सहमत आहे. परंतु ही अनिष्ट गोष्ट टाळण्याची उत्तम रीत कोणती याविषयी मात्र माझा मतभेद आहे. सेंट अँटनीला कामविचाराने इतके ग्रासले होते की अत्यंत विषयासक्त माणसापेक्षाही तो त्याने अधिक ग्रस्त होता हे प्रसिद्ध आहे. अलीकडची उदाहरणे मी देत नाही, कारण तसे केल्यास लोकांच्या रोषास कारणीभूत होण्याची भीती आहे. कामप्रेरणा ही एक नैसर्गिक गरज आहे, भूक आणि तहान यांसारखी. खादाड मनुष्य आणि दारुडे यांना आपण नावे ठेवतो, कारण ज्या गोष्टीला जीवनात तिचे उचित स्थान आहे तिने त्यांच्या जीवनाच्या फार मोठ्या भागाचा ताबा बळकावला असतो. परंतु आपण रास्त आणि निरोगी प्रमाणात अन्नात रुची असणार्या माणसाला नावे ठेवीत नाही. तापसी लोक त्याला दोष देतात, आणि जगण्याकरिता अवश्य एवढेच अन्न आपण खावे असा आग्रह धरतात. पण हे मत सार्वत्रिक नाही, आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. कामपूर्तीचे सुख न घेण्याचा निर्धार केल्यामुळे प्यूरिटन लोकांना रसनेच्या सुखांची पूर्वीपेक्षा अधिकजाणीव झाली. सतराव्या शतकातील प्यूरिटन पंथाचा एक टीकाकार म्हणतो : ‘तुम्हाला आनंदमय रात्री आणि सुखद भोजने हवी आहेत काय? मग तुम्हाला संतांसह भोजन करावे लागेल, आणि पापी लोकांबरोबर शय्या करावी लागेल.’ प्यूरिटनांना मानवी स्वभावाचा शरीर भाग पूर्णपणे आपल्या ताब्यात आणता आला नाही असे दिसते; कारण त्यांनी जे रतिसुख गमावले त्याची भरपाई त्यांनी खाण्याच्या सुखाने केली. कॅथलिक पंथात खादाडपणाला सात घोर पापांपैकी एक मानले आहे, आणि जे खादाड असतात त्यांची रवानगी डांटेने नरकाच्या अति खोल भागात केली आहे. परंतु खादाडपणा हे एक संदिग्ध पाप आहे, कारण अन्नात रुची असणे कुठे संपते आणि खादाडपणाच्या पापाचा आरंभ कुठे होतो हे सांगणे कठीण आहे. जी गोष्ट पोषक नाही ती खाणे पाप आहे असे समजायचे काय? असे असेल तर प्रत्येक खारावलेल्या बदामागणिक आपण नरकवासाला आमंत्रण देत असतो असे म्हणावे लागेल. परंतु अशी मते आता कालबाह्य झाली आहेत. खादाड मनुष्य आपण केव्हाही ओळखतो, आणि जरी त्याचा काहीसा तिरस्कार केला जात असला तरी त्याची कोणी कठोर निंदा करीत नाही. असे असले तरी खाण्याचा ध्यास असलेली माणसे सुखवस्तू लोकांमध्ये विरळच. बहुतेक लोक भोजन करतात आणि नंतर पुढच्या भोजनाची वेळ येईपर्यंत अन्य कुठल्यातरी कामात गुंतलेले असतात. परंतु ज्यांनी तापसी जीवनाचा स्वीकार केला आहे त्यांनी अल्पतम अन्नापलीकडे अन्नाकडे पाठ फिरविलेली असते; त्यांना मेजवान्यांची स्वप्ने पडत असतात. अंटार्क्टिकात अडकलेले आणि व्हेल माशाच्या तेलावर दिवस कंठणारे भूसंशोधक आपण घरी गेल्यावर कार्लटन हॉटेलमध्ये जे जेवण घेणार आहोत त्याचा तपशील ठरवीत दिवस व्यतीत करीत असतात.
या आणि इतर अशाच उदाहरणांवरून असा निष्कर्ष सुचतो की जर कामेच्छेचा ध्यास लागायला नको असेल, तर आपण अन्नाकडे जसे पाहतो तसे नीतिमार्तडांनी कामप्रेरणेकडे पाहिले पाहिजे. भूक आणि तहान यांच्या सारखीच कामवासना हीही एक नैसर्गिक गरज आहे. तिच्या पूर्तीवाचून मनुष्य जगू शकतो हे खरे आहे, परंतु मानसशास्त्रीय दृष्टीने कामेच्छा ही सर्वथा भूक आणि तहान या इच्छांसारखीच आहे. उपासमारीने तिची तीव्रता प्रचंड वाढते, आणि तिचे समाधान केल्याने ती काही काळ शांत होते. जेव्हा ती तीव्र असते तेव्हा तिच्यामुळे मनुष्याला सर्व जगाचा विसर पडतो. इतर सर्व इच्छा त्या क्षणापुरत्या नाहीशा होतात, आणि त्या भरात मनुष्याचा हातून अशी कृत्ये घडतात की जी नंतर त्यालाच शुद्ध वेडेपणाची कृत्ये वाटतात. शिवाय तहान आणि भूक यांच्याप्रमाणेच कामेच्छाही तिच्यावर बंदी घातल्याने बेसुमार वाढते. ख्रिस्ती शिकवण आणि ख्रिस्ती धर्माधिकारी यांच्यामुळे कामप्रेरणेविषयी फाजील कुतूहल निर्माण होते. म्हणून रूढ शिकवणीपासून मुक्त झालेली पहिली पिढी फाजील प्रमाणात कामव्यवहार करील – म्हणजे ज्यांची कामप्रेरणेविषयीची मते अतिश्रद्ध (superstitious) शिकवणीपासून मुक्त असतील अशा लोकांपेक्षा अधिक प्रमाणात, कामप्रेरणेच्या फाजील ध्यासावर स्वातंत्र्याखेरीज अन्य उपाय नाही. परंतु स्वातंत्र्याला कामविषयक प्रबुद्धशिक्षणाची जोड मिळाल्याशिवाय ते निरुपयोगी ठरेल. मी या ठिकाणी शक्य तो सर्व जोर देऊन म्हणू इच्छितो की कामव्यवहारात फाजील प्रमाणात गुंतून राहणे मी अनिष्ट समजतो. हे अनिष्ट अमेरिकेत मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. तेथे कडक नीतिमार्तडांमध्ये मला ते मोठ्या प्रमाणात आढळते. ज्यांना ते आपले शत्रू समजतात अशा लोकांविषयींच्या लोकापवादांवर ते ज्या सहजपणे विश्वास ठेवतात त्यातून हे व्यक्त होते. खादाड मनुष्य, कामासक्त मनुष्य आणि तापसी – हे सर्वच आत्मकेंद्री लोक असून त्यांचे क्षितिज त्यांच्या स्वतःच्या इच्छांनी मर्यादित झालेले असते. त्या इच्छांना दडपणे किंवा त्यांना मोकळे सोडणे यांतच ते सतत गढलेले असतात. ज्याचे मन आणि शरीर निरोगी आहे असा मनुष्य अशाप्रकारे स्वतःमध्ये गढलेला नसतो. त्याचे लक्ष बाह्य जगाकडे असते, आणि ज्यात त्याला रस वाटेल अशा गोष्टींचा शोध तो घेत असतो. स्वतःमध्ये गढून असणे हे काही लोक समजतात त्याप्रमाणे सामान्य मनुष्याची स्वाभाविक अवस्था नव्हे. तो एक विकार आहे, आणि तो कोठल्यातरी नैसर्गिक ऊर्मीचा विरोध झाल्याने होतो. जो अन्न साठवून ठेवतो तो सामान्यपणे दुष्काळातून गेलेला किंवा दारिद्र्य अनुभवलेला मनुष्य असतो; त्याचप्रमाणे लैंगिक समाधानाच्या विचारात गढलेला मनुष्य सामान्यपणे कोठल्यातरी उपासमारीचा ऊर्मी असतो. निरोगी, बहिर्मुख स्त्रिया आणि पुरुष नैसर्गिक ऊर्मी दडपल्याने निर्माण होत नसतात. ते जर निर्माण व्हायचे असतील तर संतुष्ट जीवनाला आवश्यक असलेल्या सर्व ऊर्मीच्या समान आणि संतुलित विकासानेच ते होऊ शकले.
जसे खाण्याविषयी कसलाच संयम असू नये असे मी म्हणत नाही, तसेच तो कामपूर्तीविषयी असू नये असेही मी म्हणत नाही. खाण्यावर तीन प्रकारची बंधने असतात, कायद्याची, शिष्टाचाराची आणि आरोग्याची. अन्न चोरणे गुन्हा आहे असे आपण मानतो आणि तसेच सामायिक अन्नापैकी आपल्या वाजवी वाट्यापेक्षा जास्त अन्न घेणे, आणि ज्याने आपण आजारी पडू असे अन्न घेणेही आपण चूक समजतो. कामप्रेरणेच्या बाबतीतही बंधनांची आवश्यकता आहे, परंतु येथे ती अधिक गुंतागुंतीची असतात आणि त्यात आत्मसंयमाची अधिक गरज असते. शिवाय एक मनुष्य दुसर्या मनुष्याची मत्ता असू नये असे असल्यामुळे चोरीची तुल्य गोष्ट या बाबतीत व्यभिचार नव्हे, तर बलात्कारही असते, आणि त्याला कायद्याने मनाई असली पाहिजे. आरोग्यासंबंधी या प्रांतात जे प्रश्न उद्भवतात त्यांत प्रामुख्याने गुप्त रोगांचा अंतर्भाव होतो. आपण या रोगांचा विचार वेश्याव्यवसायासंबंधात केला आहे. धंदेवाईक वेश्यावृत्ती कमी होणे हा, औषधोपचार वगळता, या अनिष्ट गोष्टींवर उत्तम उपाय आहे, आणि ती कमी होण्याचा उपाय म्हणजे तरुणतरुणींना अधिक स्वातंत्र्य देणे.
कामप्रेरणेचे व्यापक नीतिशास्त्र म्हणजे कामप्रेरणा ही एक नैसर्गिक प्रेरणा असून अनेक संकटांचे उगमस्थान आहे एवढेच मानून चालणार नाही. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परंतु मानवी जीवनातील अत्युत्कृष्ट मूल्यवान गोष्टींपैकी काहींशी ती निगडित आहे ही गोष्ट त्याहून महत्त्वाची आहे. त्या मूल्यवान गोष्टींपैकी पुढील तीन सर्वश्रेष्ठ आहेत : काव्यात्म प्रेम, वैवाहिक सौख्य, आणि कला. काव्यात्म प्रेम आणि वैवाहिक सौख्य याविषयी यापूर्वीच बोलून झाले आहे. कला आणि कामप्रेरणा यांचा संबंध नाही असे काही लोक म्हणतात. परंतु या मताचे समर्थक अलीकडे फार कमी आहेत. कोणत्याही आभिरौचिक (aesthetic) निर्मितीची प्रेरणा मानसशास्त्रदृष्ट्या प्रियाराधनाशी संबद्ध असते. म्हणजे एखाद्या प्रत्यक्ष किंवा उघड पद्धतीने नव्हे, तर गाढ रीतीने. कामप्रेरणेतून कलात्मक आविष्कार होण्याकरिता अनेक अटी पुऱ्या व्हाव्या लागतात. मनुष्यांच्या ठिकाणी कलाशक्ती असावी लागते. परंतु एकच मानववंश घेतला तरी त्यात कलाशक्ती एका काळी विपुल प्रमाणात दिसते, तर दुसर्या काळी ती अल्प दिसते. यावरून असा निष्कर्ष काढणे गैर असू नये की कलात्मक प्रेरणा वाढीस लागण्याकरिता परिस्थितीही कारणीभूत असली पाहिजे. तिच्यात एक प्रकारचे स्वातंत्र्य असावे लागते. म्हणजे अशी परिस्थिती की जिच्यामुळे माणूस कला, संस्कृती यांचा शत्रू होणार नाही. जेव्हा पोप दुसरा ज्यूलियस याने मायकेल अँजेलोला बंदिवान केले तेव्हा कलावंताला अवश्य असणार्या स्वातंत्र्यात त्याने हस्तक्षेप केला नाही. त्याने त्याला कैद केले, कारण तो त्याला महत्त्वाचा माणूस समजला, आणि कोणाही मनुष्याकडून त्याचा अपमान होणार नाही अशी त्याने व्यवस्था केली. जेव्हा कलावंताला श्रीमंत आश्रयदात्यांपुढे हांजी हांजी करावी लागते, आणि त्यांच्या कलेविषयीच्या निकषांप्रमाणे कलानिर्मिती करावी लागते, तेव्हा त्यांचे कलात्मक स्वातंत्र्य नष्ट होते. आणि जेव्हा सामाजिक आणि आर्थिक बहिष्काराला भिऊन असह्य झालेल्या विवाहबंधनात त्याला अडकून राहावे लागते, तेव्हा कलानिर्मितीकरिता अवश्य असणारी त्याची शक्ती नाहीशी होते. जे समाज रूढ अर्थाने सदाचारी होते, त्यांत थोर कला निर्माण झाली नाही. ज्या समाजात थोर कलावंत निर्माण होतात तेथील कलावंतांना अमेरिकेच्या इडाहो संस्थानात खच्ची करण्यात येईल. सध्या अमेरिकेतील बहुतेक कलावंत युरोपातून आयात केले जातात, कारण युरोपात अजून स्वातंत्र्य अस्तित्वात आहे. परंतु युरोपचे अमेरिकीकरण सुरू झाले असून तेथे आता निग्रोंकडे वळावे लगते. आफ्रिकेतील काँगोचे खोरे किंवा तिबेटचे पठार ही कलेची शेवटची भूमी होणार असे दिसते. परंतु तिचा मृत्यू फार काळ लांबविता येणार नाही, कारण अमेरिका ज्या प्रकारच्या पारितोषिकांचा परदेशी कलावंतांवर वर्षाव करते त्यांच्यामुळे त्यांचा कलात्मक मृत्यू अटळ दिसतो. भूतकाळात कलेला सामाजिक जीवनात आधार होता, आणि कला जीवनाच्या आनंदावर अवलंबून असे. आणि जीवनाचा आनंद कामप्रेरणेच्या बाबतीत असणार्या उत्स्फूर्ततेवर अवलंबून असतो. जिथे कामप्रेरणेवर निरोध असतो तिथे फक्त कष्ट उरतात, आणि कष्टाकरिता कष्ट करण्याच्या शिकवणीतून कधीही महत्त्वाचा उद्योग निर्माण होत नाही. कोणी म्हणतील की अमेरिकेत प्रतिदिनी घडणार्या कामकृतींचे आकडे गोळा केले गेले आहेत, आणि ते अन्य कोठल्याही देशातील आकड्यांपेक्षा कमी नाहीत असे आढळून आले आहे. हे खरे आहे की नाही, मला माहीत नाही, आणि ते नाकारण्यात मला रस नाही. रुढिग्रस्त नीतिमांर्तडांची एक भयानक चूक म्हणजे ते कामप्रेरणा म्हणजे केवळ लैंगिक कर्म समजतात. कोणत्याही नागरित मनुष्याच्या, किंवा मला माहीत असलेल्या अनागरित मनुष्याच्याही, कामप्रेरणेचे पूर्ण समाधान केवळ मैथुनक्रियेने होत नाही. तिचे पूर्ण समाधान व्हायचे असेल तर त्यात प्रियाराधन हवे, प्रेम हवे, सख्य हवे. ही नसतील तर शारीर भूक किंचित्काल नाहीशी झाली तरी मानसिक भूक कायम राहते, आणि त्यामुळे कोणतेही समाधान प्राप्त होऊ शकत नाही. कलावंताला जे स्वातंत्र्य हवे असते ते प्रेम करण्याचे स्वातंत्र्य, कुठल्यातरी अनोळखी स्त्रीजवळ केवळ शारीरिक भूक शमविण्याचे स्वातंत्र्य नव्हे; आणि प्रेम करण्याचे स्वातंत्र्य रूढिग्रस्त नीतिमार्तंड कदापि मान्य करणार नाहीत. जगाचे अमेरिकनीकरण झाल्यावर जर कलेचे पुनरुज्जीवन व्हायचे असेल तर अमेरिकेला बदलावे लागेल, तेथील नीतिमार्तंड कमी नीतिमान व्हावे लागतील, आणि अनैतिकतावादी लोक कमी अनैतिक व्हावे लागतील. म्हणजे कामप्रेरणेत अनुस्यूत असलेली उच्च मूल्ये ओळखावी लागतील. आनंदाचे मूल्य बँकखात्यापेक्षा कदाचित् जास्त असू शकते ही शक्यताही ओळखावी लागेल. अमेरिकेत आढळणार्या आनंदाच्या अभावाने प्रवासी जितका व्यथित होतो तितका अन्य कशाने होत नाही. तेथे सुख संक्षुब्ध, उन्मत्त आणि क्षणिक विस्मृती घडवणारे असते, आल्हादकारक आत्माविष्काराचे नसते. ज्यांचे आजे बॉल्कनमधील किंवा पोलंडमधील खेड्यांत बासरीच्या सुराबरोबर नाचत असत ती माणसे आज दिवसभर आपल्या टेबलाला खिळलेली असतात. त्यांच्या भोवती टाईपरायटर्स आणि टेलिफोन यांची गर्दी असते. संध्याकाळी ते पिण्याकरिता दुसर्या प्रकारच्या गोंगाटात जातात, आणि आपल्याला सुख मिळते आहे अशी कल्पना करतात. परंतु त्यांना खरोखर मिळते पैशाला जन्म देणार्या पैशाचे उन्मत्त आणि अपुरे विस्मरण, आणि त्याकरिता ते वापरतात ज्यांचे आत्मे गुलाम झालेले आहेत अशी मानवी शरीरे.
मानवी जीवनात जे जे मूल्यवान आहे ते सर्व कामप्रेरणेशी संबद्ध आहे असे मी सुचवीत नाही, आणि मला तसे सुचवायचेही नाही. उदा. विज्ञान – शुद्ध किंवा उपयोजित- तिच्याशी संबद्ध आहे असे मी समजत नाही, आणि तसेच काही सामाजिक आणि राजकीय कृतीही तिच्याशी संबद्ध नाहीत. प्रौढ जीवनातील इच्छांचे वर्गीकरण काही थोड्या मोजक्या प्रकारात करता येते. सत्ता, काम आणि अपत्यप्रेम हे माझ्या मते मनुष्यांच्या बहुतेक कृतींचे स्रोत होत. यापैकी सत्तेचा आरंभ सर्वात आधी होतो, आणि समाप्ती सर्वात शेवटी होते. बालकाच्या शक्ती फारच अल्प असल्यामुळे त्याला ती (सत्ता) हवी असते. त्याच्या कृतींपैकी फार मोठा भाग त्या इच्छेतून उद्भवतो. त्याची दुसरी प्रभावी इच्छा म्हणजे आत्मप्रीती – सर्वांकडून स्तुतीची इच्छा, आणि निंदेची आणि अनादराची भीती. या आत्मप्रीतीमुळे बालक सामाजिक प्राणी बनते, आणि त्याला सामाजिक जीवनात आवश्यक असणारे गुण प्राप्त होतात. आत्मप्रीती हा गुण कामप्रेरणेतून तत्त्वतःभिन्न असला तरी प्रत्यक्षात तिच्यात गुंतलेला असतो. परंतु सत्ताकांक्षेचा कामप्रेरणेशी फारसा संभव नसावा असे मला वाटते, आणि निदान आत्मप्रीतीइतकी सत्ताकांक्षा ही त्याला आपले गृहपाठ करण्याची आणि स्नायू बळकट करण्याची प्रेरणा देतात. कुतूहल आणि ज्ञानोपासना या सत्ताकांक्षेच्या शाखा आहेत असे मला वाटते. ज्ञान जर शक्ती असेल, तर ज्ञानाचे प्रेम म्हणजे शक्तीची इच्छा. म्हणून जीवशास्त्र आणि शरीरशास्त्र यांच्या काही शाखा सोडून दिल्या तर विज्ञान हे कामुक भावनांच्या क्षेत्राबाहेर राहते असे म्हणता येईल. दुसरा फ्रेडरिक बादशहा सध्या हयात नाही. त्यामुळे हे मत जरतारी स्वरूपाचे म्हणावे लागते. तो जर आज जिवंत असता तर त्याने एक मोठा गणितज्ञ आणि एक प्रसिद्ध संगीतकार यांना खच्ची करून या प्रश्नाचा निकाल लावला असता. माझी अपेक्षा अशी आहे की या प्रयोगाचा परिणाम गणितज्ञावर शून्य झाला असता, तर संगीतकारावर तो मोठा झाला असता. ज्ञानोपासना ही मानवी स्वभावाच्या घटकांपैकी एक अतिशय मूल्यवान घटक असल्यामुळे वरील मत जर बरोबर असेल तर एक महत्त्वाचे कार्यक्षेत्र कामप्रेरणेच्या प्रभावातून मुक्त आहे असे म्हणता येईल.
बहुतेक राजकीय कृतींची प्रेरणा सत्ताकांक्षेतून मिळते. थोर राजकारणधुरंधराला सामाजिक हिताविषयी आस्था नसते असे मला सुचवायचे नाही. उलट मी असे समजतो की अशा पुरुषांत वात्सल्यभावना खूपच व्यापक झालेली असते. परंतु त्याचबरोबर त्याला जर बर्यापैकी सत्ताकांक्षा नसेल तर त्याच्याने राजकीय उद्योगात आवश्यक असलेले श्रम करवले जाणार नाहीत. मला अनेक उदारधी लोक माहीत आहेत. त्यांच्याठिकाणी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा एका विशिष्ट प्रमाणात नसती तर त्यांच्याजवळ जरूर ती कामे करण्याकरिता अवश्य असलेली शक्ती बहुधा राहिली नसती. एका महत्त्वाच्या प्रसंगी एब्राहम लिंकनने दोघा अविनीत सेनेटर्सना उद्देशून केलेल्या भाषणाचा आरंभ आणि शेवट पुढील शब्दांनी केला होताः ‘मी संयुक्त संस्थानांचा अध्यक्ष आहे. आणि माझ्याजवळ मोठी सत्ता आहे.’ हे वास्तव व्यक्त करण्यात त्याला एक प्रकारचे सुख होत होते हे नाकारणे कठीण आहे. सबंध राजकारणात – मग ते चांगले असो वा वाईट असो – आर्थिक हेतू आणि सत्ताकांक्षा हे दोन प्रमुख प्रेरक असतात. राजकारणाचे फ्रॉइडवादी विवरण माझ्या मते चूक आहे.
वर जे म्हटले आहे ते जर बरोबर असेल तर कलावंत वगळता बहुतेक थोर मनुष्यांना आपल्या उद्योगात जी प्रेरणा मिळाली आहे ती कामप्रेरणेशी संबद्ध नसते. जर हे उद्योग कायम राहायला हवे असतील, आणि थोड्याफार प्रमाणात सार्वत्रिक व्हायला हवे असतील तर कामप्रेरणेने मनुष्याच्या भावनिक आणि उत्कट अंगावर प्रभाव गाजवता कामा नये. जगाचे आकलन करण्याची इच्छा आणि ते सुधारण्याची इच्छा या प्रगतीच्या दोन मोठ्या शक्ती आहेत. त्यांच्या अभावी मानव समाजाची प्रगती थांबेल, एवढेच नव्हे तर कदाचित् त्याची परागतीही होईल. कदाचित् अतिपूर्ण सुखामुळे ज्ञान आणि सुधारणा याच्या प्रेरणा नाहीशा होतील. जेव्हा कॉब्डेनला जॉन ब्राइटला खुल्या व्यापाराच्या अभियानात सामील होण्याकरिता आवाहन करायचे होते, तेव्हा ब्राइट आपल्या पत्नीच्या नुकत्याच झालेल्या निधनाने दुःखात मग्न होता. त्याला हे दुःख नसते, तर कदाचित् त्याला अन्य लोकांच्या दुःखाकरिता कमी सहानुभूती वाटली असती. किती तरी माणसे विद्यमान जगाविषयी निराश झाल्यामुळे अमूर्त गोष्टींच्या उपासनेत गढून जातात. ज्याच्याजवळ पुरेशी शक्ती आणि उत्साह असेल त्याला दुःखामुळे मोठी प्रेरणा मिळू शकेल, आणि जर आपण सर्व पूर्णपणे तृप्तअसतो तर आपण आणखी तृप्तीकरिता धडपड केली नसती हे मी नाकारीत नाही. परंतु दुःखाने प्रेरणा मिळेल या आशेने एखाद्या मनुष्याला दुःख देणे कोणाचेही कर्तव्य असू शकत नाही. शंभरांपैकी नव्व्याणव दुःखे उद्ध्वस्त करणारी ठरतात. शंभराव्या प्रकरणात निसर्गावर विसंबणे शहाणपणाचे होईल. जोपर्यंत मृत्यू आहे, तोपर्यंत दुःख आहे, आणि जरी काही अति थोड्या मनुष्यांच्या जवळ दुःखाचे सोने करण्याचे सामर्थ्य असले, तरी जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत त्याची मात्रा वाढविणे हे कोणाचेही कर्तव्य असू शकत नाही.
अनुवादक : म. गं. नातू