नीतीचा आणखी थोडा विचार
या लेखमालेत नीतीचा विचार अनेक लेखांकांत आला आहे. विवेकवाद – ९, ‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा (जाने. ९१), विवेकवाद -१२ व १३, ‘उपयोगितावाद, १ व २’ (मे, जून १९९१), विवेकवाद – १८, नैतिक मूल्यांविषयी
आणखी थोडेसे (डिसेंबर ९१)- हे ते लेखांक.
या लेखांकांत जे विवेचन आले आहे त्याच्याविषयी अनेक वाचकांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे नीतीच्या काही कल्पनांचे थोडे विस्ताराने विवेचन झाल्यास बरे होईल असे वाटते.
विवेकवादाचे विवेचन करताना विवेकाचे कार्य ज्ञान आणि कर्म या दोन क्षेत्रांत काय आहे याचा विचार आपल्याला करावा लागला. प्रथम आपण ज्ञानक्षेत्रातील विवेक म्हणजे काय (म्हणजे आपण कोणती विधाने सत्य मानावी? किंवा आपण कोणत्या विधानांवर विश्वास ठेवावा?) याचा विचार केला, आणि नंतर कर्मक्षेत्रातील विवेकाकडे वळलो. त्यात आपण कोणती कर्मे करावी? इष्ट कर्म कोणते आणि अनिष्ट कोणते याची कसोटी काय आहे? विधी आणि निषेध कसे ठरवितात? युक्त (right) कर्म कोणते? इत्यादि प्रश्नांचा विचार केला. इष्टानिष्टाचा विचार म्हणजे मूल्यांचा विचार. तो करताना प्रथम आपण स्वतोमूल्य आणि परतोमूल्य हा भेद विशद केला,आणि नंतर स्वतोमूल्यांतील नैतिक मूल्य आणि ननैतिक मूल्य या भेदाचे विवरण केले. त्यानंतर आपण कर्तव्यकर्म ठरविण्याचा निकष काय आहे या प्रश्नाकडे वळलो, आणि कर्तव्यकर्मे कर्तव्यबुद्धीने, म्हणजे ती कर्तव्ये आहेत म्हणून ती आपण केली पाहिजेत यावृत्तीने, केली तरच त्यांत नैतिक मूल्य निर्माण होते हे आपण पाहिले. कर्तव्यकर्माचा विचार करीत असताना आपण एका बाजूला कांट या थोर जर्मन तत्त्वज्ञाच्या मताचे विवरण केले, तर दुसर्या बाजूला उपयोगितावादी (Utilitarian) नीतिमीमांसेचाही आपण परामर्श घेतला.
आज या लेखांकात कांटवादी नीतिमीमांसा आणि उपयोगितावादी नीतिमीमांसा यांचा थोडा अधिक खोलात जाऊन विचार करणार आहोत. नीतीच्या समाधानकारक उपपत्तीत या दोन्ही मीमांसांचा समावेश करावा लागतो हे आपल्याला आज पाहावयाचे आहे. ते करीत असताना वरील काही संकल्पनांचे स्वरूप आधीच्या विवेचनात पुरेसे स्पष्ट झाले नसेल, किंवा काही संकल्पनांचा विचार मुळी झालाच नसेल तर त्यांचे अधिक विवेचन करून त्यांची संदिग्धता कमी करण्याचा प्रयत्न आपण करू.
युक्त (right) कर्म आणि कर्तव्य कर्म
एक महत्त्वाचा भेद आतापर्यंत विशद करायचा राहून गेला आहे – तो भेद म्हणजे युक्त (right) कर्म आणि कर्तव्य (duty) कर्म यांतील. प्रथमदर्शनी युक्त कर्म आणि कर्तव्य कर्म एकच असे आपल्याला वाटेल; आणि वस्तुतः सामान्यपणे ती तशी असतातही. परंतु त्या दोन कल्पनांत एक बारीक पण महत्त्वाचा भेद आहे. तो भेद असा आहे की एखाद्या परिस्थितीत एकाहून अधिक कर्मे युक्त असू शकतील, पण कर्तव्यकर्म मात्र एकच असू शकते. एखादे कर्म कर्तव्य आहे याचा अर्थ ते आपण केलेच पाहिजे; पण जर एखाद्या प्रसंगी अ आणि ब अशी दोन भिन्न कर्मे प्रत्येकी युक्त असतील तर आपण त्यांपैकी अमुक कर्म केलेच पाहिजे असे बंधन असू शकत नाही. ही गोष्ट उदाहरणांच्या साह्याने स्पष्ट करणे सोपे आहे. समजा आपण उपयोगितावादी विचारसरणीच्या साह्याने वागतो आहोत. तर या विचारसरणीनुसार आपण असे कर्म करावे की ज्याने अन्य कोणत्याही शक्य कर्मापेक्षा अधिक सुख (किंवा मूल्य) निर्माण होईल. अशा कर्माला कर्तव्य कर्म म्हणतात. त्याच्या तुलनेत युक्त कर्म म्हणजे असे कर्म की ज्याने अन्य कोणत्याही शक्य कर्मापेक्षा कमी मूल्य निर्माण होणार नाही. ज्या कर्माने अन्य कोणत्याही शक्य कर्मापेक्षा अधिक मूल्य निर्माण होईल ते कर्म, आणि ज्याने अन्य कोणत्याही शक्य कर्मापेक्षा कमी मूल्य निर्माण होणार नाही असे कर्म ही एकच असू शकतील; पण क्वचित असेही घडू शकेल की ती एकच नाहीत. उदा. समजा की अ आणि ब या दोन कर्मानी निर्माण होणारे मूल्य सारखेच आहे आणि ते मूल्य अन्य कोणत्याही शक्य कर्माने निर्माण होणार्या मूल्यापेक्षा कमी नाही. असे झाले तर ती दोन्ही कर्मे युक्त होतील. परंतु त्यांपैकी एकही कर्तव्य असणार नाही. कारण त्यांपैकी कोणत्याही एकाने निर्माण होणारे मूल्य अन्य सर्व शक्य कर्माच्या मूल्यापेक्षा अधिक असणार नाही. अशावेळी त्या दोन युक्त कर्मापैकी अमुक एक कर्म कर्तव्य आहे असे म्हणता येत नाही; त्यांपैकी कोणतेही एक कर्म करणे कर्तव्य आहे असे म्हणता येईल. परंतु सामान्यपणे युक्त आणि कर्तव्य कमें एकच असतात, आणि म्हणून कर्तव्याविषयीलिहितांना कर्तव्य किंवा युक्त कर्म असा उल्लेख कित्येकदा करण्यात येतो.
युक्त कर्म आणि कर्तव्यकर्म यांतील भेद स्पष्ट केल्यानंतर आता आपण कर्तव्य कर्तव्यबुद्धीने केले पाहिजे, असे केले म्हणजेच त्यात नैतिक मूल्य असते, एरव्ही नाही, या कांटच्या विचाराकडे वळू. कोणतेही कर्म कर्तव्य आहे हे ठरविण्याचा एक निकष कांटने दिला आहे हे आपल्या परिचयाचे आहे. तो निकष म्हणजे कर्माच्या नियमाची साविकीकरण शक्यता. कांट म्हणतो की ज्या कर्माच्या नियमाची कल्पना आपण साविक नियम म्हणून करू शकतो ते कर्तव्यकर्म. याचा अर्थ जे कर्म माझे कर्तव्य असेल, तेच कर्म माझ्या परिस्थितीत असलेल्या प्रत्येक मनुष्याचेही कर्तव्य असावे लागेल. याला आपण साविकीकरणाचा निकष म्हणू. काही कर्माचे नियम या निकषाला उतरत नाहीत. उदा. आपण उसने आणलेले पैसे परत करण्याची आपली इच्छा नाही. परंतु उसने घेतलेले पैसे परत न करण्याच्या कर्माच्या नियमाचे आपण साविकीकरण केले, म्हणजे सर्व मानवप्राणी जर या नियमाप्रमाणे वागू लागले, तर पैसे उसने घेण्याचे आणि देण्याचे कर्मच जगातून नाहीसे होईल, म्हणून हे कर्म साविकीकरणाच्या कसोटीला उतरत नाही, आणि त्यामुळे त्यानुसार होणारे कर्म कर्तव्य होणार नाही. जे कर्म या कसोटीला उतरते ते कर्म आपले कर्तव्यआहे असे कांट म्हणतो. परंतु हा निकष खरोखर अपुरा आहे. तो नास्तिवाचक निकष आहे, म्हणजे कोणते कर्म कर्तव्य नाही हे तो सांगतो, पण कोणते कर्म कर्तव्य आहे ते तो सांगत नाही. जे कर्म साविकीकरणाच्या कसोटीला उतरते ते कर्म कर्तव्य असेलच असे म्हणता येत नाही. कारण : अनेक ननैतिक कर्मेही या निकषाला उतरतात. उदा. अंधारात सापडल्यास शीळ घाला, किंवा रोज सकाळी छातीला तीन वेळा हात लावा, ह्या नियमांचे साविकीकरण सुसंगतपणे होऊ शकते. परंतु ती कर्मे कर्तव्ये आहेत हे म्हणणे पटण्यासारखे नाही. कारण ही कर्मे मानवी हिताहिताशी संबद्ध नाहीत. जे कर्तव्य असते ते मानवी जीवनाला उपकारक असते. म्हणून कांटने दिलेल्या नास्तिवाचक निकषाबरोबरच अस्तिवाचक निकषही देणे जरूर आहे. परंतु असा निकष कांटच्या विवेचनात फारच अल्प प्रमाणात मिळतो.
कर्तव्याची अस्तित्वाचक अट
कर्तव्याची अस्तिवाचक अट काय असेल याचा शोध करू लागल्यावर कांटच्या मीमांसेतील एका सूत्राचा उपयोग होऊ शकेल असे वाटते. ते सूत्र म्हणजे स्वतःसाध्याचे (end in itself) सूत्र.
कांटचे साधु ईहेविषयीचे (good will) मत आपल्या परिचयाचे आहे. तो म्हणतो की या उभ्या जगात (आणि त्याच्या बाहेरही) साधु ईहा सोडून अन्य एकही वस्तू अशी नाही की जी निरपवादपणे साधु असते. अनेक वस्तू चांगल्या असतात; उदा. सुख, आरोग्य, ज्ञान, बुद्धी. परंतु त्यांपैकी एकही निरपवादपणे चांगली आहे असे म्हणता येत नाही. दुर्जनालाही सुख मिळू शकते, आणि त्यामुळे त्याच्या दुष्ट उद्योगाला उत्तेजन मिळू शकते.तीच गोष्ट अन्य इष्ट गोष्टींचीही आहे. त्यांना जर साधु ईहेऐवजी दुष्ट ईहेची जोड मिळाली तर या इष्ट गोष्टींचा चांगलेपणा नाहीसा होऊन त्याचे रूपांतर वाईटपणात होते. साधु ईहा, म्हणजे कर्तव्य करण्याची बुद्धी, मात्र सदैव आपल्या स्वतःच्या तेजाने तळपत राहते. तिचे मूल्य कशानेही कमी होत नाती.
आता साधु ईहा फक्त मनुष्यप्राण्यांतच आढळते. पशूच्या पातळीवर तिचा पूर्ण अभाव असतो. ज्या विवेकामुळे (reason) मनुष्य पशूहून भिन्न म्हणावा लागतो त्या विवेकाचेच साधु ईहा हे एक रूप आहे. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी ही शक्ती आहे, आणि तिच्यामुळे प्रत्येक मनुष्य स्वतःसाध्य (end in itself) होतो. साधु ईहा ही स्वतः एकमेव साधु गोष्ट असल्यामुळे ती सर्वोच्च साध्यही ठरते. बाकीची सर्व साध्ये तिच्याहून निम्न कोटीची मानावी लागतात. आणि म्हणून अन्य कुठल्याही साध्याचे साधन म्हणून साधु ईहेचा उपयोग करणे गैर आहे. साधु ईहा हे सर्वोच्च साध्य आहे; ती कशाचेही साधन होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्या मनुष्याच्या ठिकाणी ती असते त्या मनुष्यांनांही आपण साध्य म्हणून वागविले पाहिजे, केवळ साधन म्हणून वागविणे गैर होईल. एखाद्या मनुष्याला साध्य मानायचे म्हणजे त्याचा उपयोग आपल्या वैयक्तिक साध्यांचे साधन म्हणून करायचा नाही. जमले तर त्याच्या साध्याला आपण मदत करावी. पण त्याला आपल्या साध्याकरिता केवळ साधन म्हणून वापरू नये. कांटने या ठिकाणी कुणाही मनुष्याला केवळ साधन म्हणून वापरू नये असे म्हटले आहे ते महत्त्वाचे आहे. समाजात राहायचे म्हणजे इतर माणसांचा आपल्याला साधन म्हणून उपयोग करावा लागतो. पण तो करीत असताना आपण त्याच्या साध्यांना उपकारकही झाले पाहिजे. उदा. इतरांकडून काम करून घेताना आपण त्याला योग्य मोबदला दिला पाहिजे. म्हणजे गुलामी, वेठबिगारी, इत्यादि प्रकार या मतानुसार निषिद्ध ठरतात.
आपले कर्तव्य काय आहे हे ठरविताना ह्याही सूत्राचा विचार आपण मनात ठेवला पाहिजे. तो ठेवला तर साविकीकरणाच्या नास्तिवाचक अटीला थोडी अस्तिवाचक जोड मिळेल असे वाटते. अन्य मनुष्यांच्या साध्यांचा विचार मनात बाळगून ती आपलीही साध्ये करणे, म्हणजे त्यांना त्यांच्या साध्यसाधनेत मदत करणे. म्हणजे आपण अशी कमें करावीत की जी अन्य व्यक्तींच्या विवेकी (rational)साध्यांना पोषक होतील.
कर्तव्याचा उपयोगितावादी निकष
कर्तव्याची अस्तिवाचक अट उपयोगितावादी मीमांसेत सहज सापडते. आपण उपयोगितावादावरील लेखांकांत पाहिले की उपयोगितावादी उपपत्तीत स्वतोमूल्याची कल्पना केंद्रीय महत्त्वाची असते. ज्या गोष्टी मनुष्याला महत्त्वाच्या वाटतात, ज्या त्याला केवळ त्यांच्याकरिताच हव्याश्या वाटतात, आणि ज्यांच्या प्राप्त्यर्थ तो पुष्कळ किंमत द्यायला तयार असतो अशा अनेक गोष्टी आहेत. त्यात प्रामुख्याने सुखाचा अंतर्भाव होतो. सुख प्रत्येकाला हवे असते आणि ते केवळ सुखाकरिताच हवे असते. म्हणजे ते अन्यकाहीतरी मिळवायचे साधन म्हणून नव्हे, तर केवळ साध्य म्हणून हवे असते. उपयोगितावाद्यांपैकी ज्यांना सुखवादी म्हणतात त्यांच्या मते सुख ही एकमेव स्वतोमूल्यवान वस्तू आहे; परंतु अन्य उपयोगितावादी म्हणतात की सुख हे स्वतोमूल्य आहे खरेच, पण ते एकमेव स्वतोमूल्य नव्हे. अन्यही काही गोष्टी स्वतोमूल्यवान आहेत. उदा. ज्ञान, सौंदर्य, मैत्री, इत्यादि. स्वतोमूल्याची कल्पना आधारभूत घेऊन सुखवादी म्हणतो की जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख ज्याने निर्माण होईल ते कर्म करणे आपले कर्तव्य आहे, तर अन्य उपयोगितावादी म्हणतात की केवळ सुख नव्हे, तर जास्तीत जास्त स्वतोमूल्य निर्माण करणे आपले कर्तव्य आहे.
ह्या कर्तव्यमीमांसेची जोड जर कांटच्या मीमांसेला देता आली तर ती मीमांसा पूर्ण होऊ शकेल असे वाटते. कुणाही मनुष्यप्राण्याला केवळ साधन म्हणून वापरणे चूक आहे हे जे कांटचे म्हणणे आहे, आणि त्याचा त्याने जो अर्थ सांगितला आहे, त्याचा सांधा आपण जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख ज्याने निर्माण होईल असे कर्म करावे या उपयोगितावादी मताशी जोडणे सहज शक्य आहे. मनुष्यांची सुखदुःखे त्यांच्या इच्छा पूर्ण होणे वा न होणे यावर अवलंबून असतात. त्यामुळे आपणअन्य मानवांच्या साध्यांत सहभागी व्हावे हे कांटचे मत, आणि आपण जास्तीत जास्त लोकांचे सुख वाढवावे हे उपयोगितावादी मत, ही फार जवळ आली आहेत हे उघड आहे. त्यामुळे वरम्हटल्याप्रमाणे कांटच्या मीमांसेत उपयोगितावादाची भर घातली तर एक परिपूर्ण नीतिमीमांसा होऊ शकेल असे म्हणायला हरकत नसावी.
कर्तव्य कर्तव्यबुद्धीने केले पाहिजे
कांटच्या मतानुसार आपले कर्तव्य कोणते असेल ते साविकीकरणाच्या निकषाने ठरल्यानंतर ते करणे एवढ्यानेच त्या कर्मात नैतिक मूल्य आले असे होत नाही. ते येण्याकरिता कर्तव्य म्हणून ठरलेले कर्म एका विशिष्ट बुद्धीने, साधु ईहेने (good will ने), कर्तव्यार्थ कर्तव्य करण्याच्या बुद्धीने, करणे अवश्य असते. उदा. गिहाइकांशी प्रामाणिक व्यवहार करणे हे दुकानदारांचे कर्तव्य आहे, कारण ते कर्म साविकीकरणाच्या कसोटीत उतरते. परंतु हे कर्म (म्हणजे गिर्हा इकाशी प्रामाणिक व्यवहार करणे) आपण कर्तव्यबुद्धीखेरीज अन्य हेतूंनी करू शकतो. उदा. लाभदायी धोरण म्हणून. अशावेळी कर्त्याने केलेले कर्म कर्तव्यच असते, पण ते कर्तव्यबुद्धीऐवजी अन्य हेतूने केले गेल्यामुळे त्यात नैतिक मूल्य निर्माण होत नाही. हे म्हणजे विरोधाभासात्मक दिसते. कारण या प्रकरणी कत्याने आपले कर्तव्य केलेले असते, आणि तरी त्यात नैतिक मूल्य निर्माण झालेले नसते. पण येथे विरोधाभास केवळ दर्शनी आहे. वास्तव नव्हे. कारण कर्तव्य करण्याच्या कल्पनेत कांटच्या मतानुसार दोन अटी अंतर्भूत आहेत : (१) ते कर्म साविकीकरणाच्या कसोटीस उतरले पाहिजे, आणि (२) ते कर्म कर्तव्यबुद्धीने केले पाहिजे. या दोन्ही अटी पूर्ण झाल्या तर कर्त्याने आपले कर्तव्य केले असे आपण परमार्थानेम्हणू शकतो. या दोन अटींपैकी पहिली ज्यात पूर्ण झाली पण दुसरी नाही असे कर्म; किंवा ज्यात दुसरी पूर्ण झाली, पण पहिली नाही असे कर्म, ही दोन्ही कर्मे नैतिक दृष्ट्या अपूर्ण किंवा दोषास्पद कर्मे आहेत. पहिल्या प्रकारच्या अपूर्ण कर्माचे उदाहरण दुकानदाराचे वर दिले आहे. दुसर्या प्रकारचे उदाहरण पुढील होईल. तैमूरलंगाने ज्या कत्तली केल्या त्या त्याने कर्तव्यभावनेने केल्या असे कोणी म्हणतील. तसे असेल तर त्या कर्मात नैतिक मूल्य होते असे म्हणता येईल काय?या प्रश्नाचे उत्तर असे आहे की तैमूरलंगाने केलेल्या कत्तली कर्तव्य म्हणून केल्या हे खरे असेल, तर त्यांत साधु ईहेचे (good will चे) मूल्य (म्हणजे नैतिक मूल्य) हजर होते हे मान्य करावे लागेल. पण येथे असा प्रश्न विचारता येतो की त्याचे कर्म साविकीकरणाच्या निकषावर उतरले होते काय?आणि या प्रश्नाला उघडच नाही हे उत्तर द्यावे लागते. प्रत्येकाने आपल्या धर्माहूनअन्य धर्माच्या अनुयायांना ठार मारावे हा जर सार्विक नियम झाला, म्हणजे सर्व माणसे त्यानुसार वागू लागली, तर मानवजात लवकरच नष्ट होण्याच्या मार्गाला लागेल यात शंका नाही. म्हणून तैमूरलंगाचे कृत्य कर्तव्यकर्म नव्हते असे म्हणावे लागते, आणि म्हणून ते कर्तव्यबुद्धीने करूनही ते निषिद्धहोईल.
एक विरोधाभास
वर आपण पाहिले की कर्तव्यकर्म कर्तव्यबुद्धीने केले तरच त्यात नैतिक मूल्य उतरते, आणि अशीच कर्मे करणे आपले कर्तव्य आहे. परंतु इथे एक प्रश्न उद्भवतो. कोणतेही कर्म करण्याचे तीन हेतू संभवतात. (१) कर्तव्यार्थ कर्तव्य, (२) स्वार्थ, आणि (३) नैसर्गिक कल. यांपैकी पहिला हेतूच फक्त नैतिक दृष्ट्या बरोबर आहे. दुसरा तर उघड्च ननैतिक आहे. स्वार्थाखातर कर्म करणे म्हणजे कर्तव्यकर्म करणे नव्हे. परंतु तिसरया हेतूचे काय? जर एखादे कर्म सार्विकीकरणाच्या कसोटीला उतरणारे असेल, आणि ते करण्याचा माझा हेतु नैसर्गिक कल असेल, तर ते कर्म करण्याकरिता मला कर्तव्यतार्हेहतूची गरज राहणार नाही. मग या नैसर्गिक कलाने केलेल्या कर्मात नैतिक मूल्य नसते असे म्हणायचे काय? उदा. लहान, असहाय अर्भकाची काळजी घेणे हे कर्म सार्तिकीकरणाच्या कसोटीला उतरते. पण त्याची आई त्याची जी काळजी घेते त्याकरिता तिला कर्तव्यबुद्धीची गरज नसते. तिला निसर्गतःच अपत्यरक्षणाची प्रेरणा असते. मग मातेचे अपत्यसंगोपनाचे कर्म नैतिकमूल्यहीन समजावयाचे काय? किंवा एखादा मनुष्य आपल्या मित्राच्या संकटकाळी त्याच्या उपयोगी पडतो ते मित्रप्रेमामुळे, कर्तव्यबुद्धीने नव्हे. मग मित्राची कृत्ये नैतिकमूल्यहीन समजावयाची काय? या प्रश्नाचे एक उत्तर ‘होय, ती कमें नैतिकमूल्यहीन मानावी लागतील असे असू शकेल; परंतु असेही म्हणता येऊ शकेल की आपण जी कर्मे करतो आहोत ती कर्तव्याच्या कसोटीला उतरणारी आहेत एवढी जाणीव असेल तर मग ती कर्मे कर्तव्यबुद्धीच्या जोडीला अन्य हेतू असले तरी ती नैतिक मानली जायला हरकत नाही. कर्मे करण्यापूर्वी प्रत्येक कर्म कर्तव्याच्या कसोटीला उतरते हे आपण पाहात गेलो, तरकर्तव्यबुद्धीने न केलेल्या कर्मातही नैतिक मूल्य येते असे म्हणायला हरकत नसावी. कारण ती कर्मे कर्तव्ये आहेत ही जाणीव त्यांत असते, आणि जर नैसर्गिक कल त्यांना अनुकूल, नसला तरी कर्तव्यबुद्धी पुरेशी प्रबळ असल्यामुळे ती कर्मे आपण केली असती ही खात्री असते.
हेच उत्तर वरील आक्षेपाशी संबद्ध पुढील आक्षेपालाही देता येईल. हा आक्षेपक म्हणतो की येथे पुरस्कारलेल्या मतानुसार मानवी जीवनातील नैतिक उत्स्फूर्तता नाहीशी होईल, आणि तिची जागा यांत्रिक रूक्षता येईल. कारण नैतिक असण्याकरिता कोणतेही कर्म सार्विकीकरणाच्या कसोटीला उतरावे लागते, आणि मगच ते करण्याची आपल्याला परवानगी मिळते. पण आपण जर असे वागू लागलो, तर आईबापांचे अपत्यांशी अकृत्रिमप्रेमाने वागणे किंवा आपले आपल्या मित्रांशी वागणे इ. अशक्य होईल. आपली सर्व कर्मे कर्तव्यबुद्धीला संमत असतील अशीच घडतील; पण असे जीवन अनैसर्गिक होईल. आणि असे अनैसर्गिक जीवन कितपत इष्ट म्हणता येईल?
या आक्षेपाला एक उत्तर असे आहे की सहजप्रवृत्तिमय कर्मे उत्स्फूर्तपणेच केली जायला हरकत नाही. एवढेच नव्हे, तर ती उत्स्फूर्तपणेच केली जावीत हेच श्रेयस्कर आहे. पण ती नीतिसंमत आहेत एवढे पाहण्याची सवय आपल्याला लावून घेणे अवश्य आहे, कारण सहजप्रवृत्तीने घडणारी सर्वच कर्मे नीतिसंमत नसतात. आणि जी कर्मे नीतिसंमत नसतील ती कितीही उत्स्फूर्तपणे आपण केली तरी ती ननैतिक होतील, एवढेच नव्हे तर ती क्वचित् अनैतिकही होतील.
नैसर्गिक कलामुळे एखादे कर्म करणे गौण असते याचे एक महत्त्वाचे कारण असे आहे की या प्रकरणी कर्तव्यकर्म कर्त्याला आवडणारे निघाले हा अपघात असतो. असाही प्रसंग येऊ शकतो की दुसरे एखादे कर्तव्यकर्म कर्त्याच्या आवडीचे नसेल, एवढेच नव्हे, तर कदाचित् त्याला त्याची चक्क नावड असेल. अशा प्रसंगी तो कर्तव्य करीलअशी शाश्वती कशी राहणार? म्हणून कर्तव्यकर्म आवडीचे असते तेव्हाही ते करण्याचा हेतू ते कर्तव्य आहे हेच असले पाहिजे असे म्हणावे लागते.
आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. जे लोक कर्तव्याविषयी जागरूक असतात त्यांना कालांतराने अशी सवय लागते की सर्वदा कर्तव्य करणे हा त्यांचा स्वभावच बनतो. त्यांना मग आपण करणार असलेले कर्म कर्तव्य आहे की नाही याचा मुद्दाम तपास करावा लागत नाही. पण असे जरी असले तरी कर्तव्याचा विचार त्यांच्या अंतर्यामात सदैव, सुप्त का होईना, पण असतोच. मनुष्य कितीही उन्नत झाला तरी त्याला कर्तव्यबुद्धी विसरून चालत नाही.