आजचा सुधारकाचा हा तिसर्या वर्षाचा पहिला अंक. म्हणजे आजचा सुधारक आता दोन वर्षाचा झाला. दोन वर्षांपूर्वी जेव्हा तो जन्मला तेव्हा तो किती काळ तग धरू शकेल अशी शंका आम्हाला होती. याचे कारण त्याला वाचकांचा प्रतिसाद कितपत मिळेल याविषयीची साशंकता हे जसे होते, तसेच वाचकांचे विचारप्रवर्तन करील आणि तरी त्यांनी स्वीकार्य वाटेल असे साहित्य आपण किती काळपर्यंत देऊ शकू याविषयीची अनिश्चितता हेही होते. त्या दोन्ही शंका बहुतांशी निराधार होत्या याचा पुरावा गेल्या दोन वर्षांत बर्याच मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. वर्गणीदारांची संख्या हळूहळू का होईना सतत वाढते आहे, आणि विचारप्रवर्तक साहित्य पुरविणारे लेखकही आम्हाला साह्य देत आहेत. त्यामुळे आता यापुढील मार्गक्रमण निश्चित मनाने करायला आजचा सुधारक मोकळा झाला आहे असे आम्ही समजतो.
गेल्या वर्षातील आजचा सुधारकाच्या कामगिरीकडे लक्ष टाकल्यास ‘विवेकवाद व ‘विवाह आणि नीती’ या दोन लेखमालांखेरीज धर्मनिरपेक्षतेवरील परिसंवादाचा उल्लेख करावा लागेल. या परिसंवादात धर्मनिरपेक्षतेची अधिकारी लेखकांकडून मूलगामी आणि साधकबाधक चर्चा बर्याच मोठ्या प्रमाणावर झाली असून त्या संकल्पनेचे स्वरूप बरेच स्पष्ट झाले आहे असे मानायला हरकत नाही. याशिवाय डॉ. नी.र.वर्हाझडपांडे यांच्या लेखाने एका नव्या विषयाला तोंड फोडले असून त्यातून या विषयाचे मंथन होईल अशी आमची अपेक्षा आहे. त्या लेखावर आलेल्या दोन प्रतिक्रिया प्रस्तुत अंकात समाविष्ट केल्या आहेत.
यावर्षी समान नागरी कायदा या विषयाची चर्चा घडवून आणण्याचा विचार आहे. या विषयाचा उल्लेख जरी वारंवार होत असला तरी त्यासंबंधीचे विचार अजून बरेच संदिग्ध आणि धूसर आहेत हे मान्य करायला हवे. समान नागरी कायद्याचे तपशील काय असावेत याविषयी फारच थोडा विचार व्यक्त झाला आहे. समान नागरी कायदा हवा असे म्हणणारे बहुतेक सर्व हिंदू असतात, आणि त्यांची समजूत अशी असते की हिंदूंचा कायदा अन्य धर्मीयांनाही लागू केला की झाले. परंतु हे म्हणणे फारच भाबडेपणाचे होईल. सर्व धर्माच्या अनुयायांना मान्य होण्याकरिता तयार करावयाच्या कायद्यात अन्यधर्मीयांप्रमाणेच हिंदूंनाही काही गोष्टी सोडाव्या लागतील हे निर्विवाद. तेव्हा या विषयावरील चर्चा अत्यंत आवश्यक आहे हे मान्य केले पाहिजे. याही चर्चेला भरपूर प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे. याखेरीज एक दोन नवे उपक्रम सुरू करायचा विचार आहे. परंतु त्याविषयी तूर्त एवढेच पुरे.
जाता जाता लेखकांना एक सूचना करावीशी वाटते. आजचा सुधारकाची पृष्ठसंख्या बत्तीस. त्यांपैकी मुखपृष्ठ आणि मासिकाविषयीची माहिती यांकरिता दोन पृष्ठे लागतात. उरलेल्या ३० पानांत जास्तीत जास्त लेख द्यायचा आमचा प्रयत्न असतो. अंकात निदान चार लेख असावेत असे म्हटले तरी एका लेखाची पृष्ठमर्यादा ६ किंवा ७ (किंवाशब्दांत २५०० शब्द) असावी लागेल, लेखकांनी याची नोंद घ्यावी ही विनंती.
शेवटी वाचकांनाही एक विनंती करावयाची आहे. त्यांनी या मासिकाच्या कामगिरीविषयी आपली मते निर्भीडपणे आम्हाला कळवावीत. त्यांनी केलेल्या सगळ्याच सूचना आम्ही स्वीकारू शकू असे आश्वासन आम्ही देत नाही. पण त्यांचा उपयोग मासिकाचे स्वरूप अधिक उपयुक्त करण्यासाठी आम्ही करू एवढे निश्चित.