वैज्ञानिक वृत्तीचे अलीकडच्या काळातील एक अतिशय लक्षणीय उदाहरण म्हणजे सापेक्षतेच्या उपपत्तीचा सबंध जगाकडून झालेला स्वीकार, आइन्स्टाइन नावाच्या एका जर्मन-स्विस्-ज्यू शांततावाद्याची जर्मन शासनाने संशोधक प्राध्यापक म्हणून पहिल्या महायुद्धाच्या आरंभीच्या काळात नेमणूक केली होती. त्याने वर्तविलेलेली भविष्ये युद्धविरामानंतर १९१९ साली झालेल्या ग्रहणाच्या इंग्लिश अभियानाने केलेल्या निरीक्षणांनी खरी ठरली. त्याच्या उपपत्तीने सबंध प्रस्थापित भौतिकीची उलथापालट झाली. डार्विनने बायबलला दिलेल्या धक्क्यासारखा धक्का आइन्स्टाइनने तत्कालीन भौतिकीला दिला होता, असे असूनही पुरावा त्याला अनुकूल आहे हे जेव्हा दिसून आले तेव्हा सर्व जगातील भौतिकशास्त्रज्ञांनी त्याची उपपत्ती बिनतकार स्वीकारली. परंतु त्यांपैकी कोणीही, आपण अखेरचा शब्द उच्चारला आहे असा दावा केला नाही, आइन्स्टाइनने तर नाहीच नाही. सदाकरिता टिकून राहणारा अस्खलनीय तत्त्वांचा स्तंभ त्याने उभारला नव्हता. जो तो सोडवू शकला नाही अशा अनेक अडचणी आहेत; जसे त्याच्या सिद्धांतामुळे न्यूटनचे सिद्धांत बदलावे लागले, तसेच त्याच्याही सिद्धांतात बदल करावे लागतील. कशालाही अस्खलनशील न मानणारी आणि कशाचाही चिकित्सक स्वीकार करण्याची तयारी ठेवणारी ही खरी वैज्ञानिक अभिवृत्ती.