पत्रव्यवहार
संपादक, आजचा सुधारक स.न.वि.वि.
तमचा “धर्मनिरपेक्षता” अंक मिळाला. त्यात अनेक व्यासंगी विद्वानांचे लेख आले आहेत. त्यात डावे उजवे आहेत. तरी त्यांच्यांत आगरकर यांचा बुद्धिप्रामाण्यवाद गोमारोमातून भिनलेला दिसत नाही. कारण ते सर्वजण हिंदूंच्या सहिष्णुतेची अपरंपार स्तुती करताना दिसतात.
वास्तविकरीत्या जगाच्या इतिहासावरून हे स्पष्ट होते की जेते अत्याचार करतात आणि हिंदु जेते कधीच नव्हते. नवराबायको या जोडीमध्येसुद्धा हुशार जो असतो किंवा अर्थार्जन करतो तो दुसऱ्यावर कुरघोडी करतो, स्त्रियांनी पुरुषावर केलेल्या कुरघोडीची अनेक उदाहरणे आहेत.
पुराणकाळी खांडववन जाळणे किंवा नागांची हत्या करणे अशा अनेक गोष्टी जेत्यांनी केलेल्या आहेत. इतकेच कशाला मोहेंजोदडो आणि हडप्पा येथील सिंधुसंस्कृती सुद्धा आर्यानीच नष्ट केली. इतिहासकाळात अनेक बौद्धविहार हिंदूनी नष्ट केले आहेत.
मुसलमानांच्या मशिदी आणि ख्रिश्चनांची चर्चेस हिदूंनी उद्ध्वस्त केली नाहीत हे खरे; परंतु त्याचे कारण असे की मुसलमान आणि ख्रिश्चन राज्यकर्ते होते आणि त्यांच्या देवांबद्दल हिंदूंच्या मनात भक्ती होती. रामदासांनी दासबोधात लिहिले आहे. “कित्येक द्दावलमलकास जाती/कित्येक पीरासीच भजती/कित्येक तुरूक होती/ आपले इच्छेने.” व्हिक्टोरिया राणीच्या नवऱ्याच्या पुतळ्यास (काळाघोडा) हिंदू नवस करीत असत. “परकीयांशी” सहिष्णु असणारा भारतीय समाज दलित किंवा स्त्रिया इ. “स्वकीयांशी कायम असहिष्णूच राहिला, याची कारणे अतिविकेंद्रित अर्थव्यवस्थेत आहेत.
दुसरी एक गोष्ट की, या व्यासंगी विद्वानांनी ‘धर्मनिरपेक्षता याबद्दल लिहिण्याऐवजी सध्याच्या शासनावर ते कसे वागतात हे सांगण्यातच पानेच्या पाने खर्ची घातली आहेत. आणि त्यातही गंमत अशी की,स्वातंत्र्यानंतरचा सुमारे १९८० सालापर्यंतचा काळ त्यांनी ‘धर्मनिरपेक्षता याच्या चर्चेसाठी घेतलेला नाही.
पं. नेहरूंच्या काळात सहसा कोणताहि धार्मिक विधी शासनातर्फे होत नसे. परंत संजय गांधीच्या मृत्यूनंतर स्व. इंदिरा गांधीना जो धक्का बसला त्यानंतरच्या काळात ही धार्मिकता वाढू लागलेली दिसते. रशियामध्ये धर्म पुन्हा रुजला याचा यांना आनंद होतो, पंरतु चीन अजूनही साम्यवादी आहे ही गोष्ट ते विसरतात. तसेच, प. बंगाल सरकारने शासकीय इमारतीमधून सर्व धार्मिक कार्यक्रमांचे नुकतेच उच्चाटन केले आहे याकडे पण डोळेझाक केली जाते. तसेच जपानच्या सुप्रीम कोर्टाने तेथील राजालासुद्धा शासकीय खचाने धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी केली आहे. (टाइम्स ऑफ इंडिया, २८.९.९१ ) आपण जपानचे तरी अनुकरण करणार की नाही? आणि त्यासाठी येथील राज्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष बनविणार की नाही, हा प्रश्न आहे.
बाबरी मसजिद-रामजन्मभूमि प्रश्नाबाबत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, अयोध्येला देऊळ पाडून मशीद बांधली गेली असा कोणताही पुरावा नाही. (टा. ऑ.इ. २७.१०.९०)असा पुरावा असता तर श्री जेठमलानी यांनी ती केस कोर्टात कधीच जिंकली असती.
श्री. स.ह. देशपांडे सावरकरांपेक्षा गोळवलकर जास्त उदारमतवादी होते असे म्हणतात. परंतु कै. गं. बा. सरदार यांनी म्हटले आहे की, “आगरकरांचे विचार सर्वांत श्रेष्ठ होत. अजून शंभर आगरकर निर्माण व्हावे लागतील. सावरकरांच्या धर्मात राष्ट्राला अधिक महत्त्व होते. गोळवलकरांचे विचार उघड-उघड प्रतिगामी होते.” (मंथन. ३१ ऑगस्ट १९७९) शिवाय गोळवलकरांनी आम्ही कोण या पुस्तकात चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला आहे. (We पाने, ५५-५६) श्री देशपांडे यांना हे माहीत असावे की, भारतातील अर्थव्यवस्थेच्या नाड्या ज्या ७५ घराण्यांच्या ताब्यात आहेत, त्यामध्ये मुसलमान नाहीत, आणि आज जनतेला ज्यांच्यामुळे त्रास सहन करावा लागतो, ते सर्व हिंदूच आहेत. नेपाळसारख्या हिंदू राज्यातहि प्रजा सुखी नाही. तेव्हा धार्मिकतेवर प्रजेचे सुख-स्वास्थ्य अवलंबून नसते हे स्पष्ट आहे.
भारतात जे एकूण डॉक्टर्स, इंजिनीअर्स, चार्टर्ड अकौंटन्ट्स, वैज्ञानिक इत्यादि सुशिक्षित समाज आहे त्यात मुस्लिम समाज पंधरा टक्क्यांनी आणि दलित समाज पस्तीस टक्क्यांनी असल्याचे दिसत नाही. सर्वसाधारणपणे अशिक्षित आणि दरिद्री समाज जास्त अंधश्रद्ध, धार्मिक, लालसी असा असतो. आणि ही वृत्ति बाळ ठाकऱ्यांसारख्या अज्ञानी प्रवृत्तीच्या पुढाऱ्यांमध्येही आढळते.
ज्या समाजात सुशिक्षित जास्त आहेत, तो समाज उदार-मत-बादी आणि सहिष्णु असणारच. परंतु आजचे हिंदुत्ववादी नेते सुशिक्षित समाजाला भडक लेखनाद्वारे अज्ञानी बनवू पहात आहेत. बाळ ठाकऱ्यांना अमेरिकेतून ४९ कोटी रुपये मिळाले (क्लॉरेटी २३.१०.८३), अशीच मदत शीख, तामिळी, आसामी, काश्मिरींना मिळत असते.
अमेरिकेतून विविध विद्रोहीना मिळणारी मदत बंद झाल्यावाचून भारतातील विभक्तवाद संपणारा नाही. स.ह. देशपांड्यांनी हा मुद्दासुद्धा विचारात घ्यावा.
समान नागरी कायद्याच्या पुरस्कत्यांनी वरील ७५ घराणी त्यांना अविभक्त हिंदू कुटुंबामुळे आयकरात मिळणारी सूट सोडण्यास तयार होतील का, याचा विचार करावा. कारण समान नागरी कायद्याचे लोण केवळ पोटगीपुरतेच समान न ठेवता आयकर कायद्यापर्यंत पोचवावे लागेल.
या “घटनेच्या ५१ (ए) (एच) या कलमानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, चौकस बुद्धि आणि सुधारणावाद यांचा प्रसार करणे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे.” परंतु हे मूलभूत कर्तव्य प्रत्येकाने पार पाडावे यासाठी काहीही उपाययोजना नाही.
प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर एखादी संस्था स्थापून प्रत्येकास वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद इ. कर्तव्ये पार पाडण्यास सक्तीचे केले तर हा प्रश्न सुटणार आहे. कळावे.
आपला तत्त्वबोध,
केशवराव जोशी हायवे चेक नाक्याजवळ, नेरळ (रायगड), ४१०१०१ का
संपादक ‘आजचा सुधारक यांसी स. न. वि. वि.
सप्टेंबर, ऑक्टोबर १९९१ च्या अंकातील डॉ.स.ह. देशपांडे यांच्या लेखातील शेवटच्या परिच्छेदातील संदर्भात हे पत्र लिहीत आहे.
FISecularism चा (भाषांतर मुद्दामच करीत नाही) प्रश्न हा मला भारताच्या संदर्भात आत्यन्तिक महत्त्वाचा वाटतो. राष्ट्राच्या दृष्टीने तो जीवनमरणाचा प्रश्न आहे. सर्वांचेच विचार पूर्वग्रह-(व पूर्व-आग्रह)-दूषित आहेत असे मला वाटते. हे वाटणे चुकीचेही असणे शक्य आहे परंतु ते तसे सिद्ध झाले पाहिजे. सर्वानीच आपापल्या भूमिका स्वच्छपणे आणि विस्ताराने सांगण्याची गरज आहे. आपण एकत्र असे करू म्हटले तर मात्र कोणी या गोष्टीला तयार होत नाहीत असा माझा अनुभव आहे. अशी चर्चा लेखी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात व्हावी व नंतर ती होईल त्या स्वरूपात प्रसिद्ध व्हावी अशी माझी कल्पना. माझा आजवरचा अनुभव असा आहे की आपली विधाने आपण ज्या मंडळीना आपली मानतो त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे अशी परिस्थिती येताच लोक पळवाटा शोधू लागतात. यातून शेवटी ‘राम तेरी गंगा मैली एवढेच हाती लागते.
अशी लेखी चर्चा अनेकांत होऊ शकते. इतर कोणी सहभागी झाले किंवा नाही तरी डॉ. स. ह. देशपांडे व माझ्यामध्ये होऊ शकते. इतरांना सहभागी करण्याचा प्रयत्न असेल परंतु ती अनिवार्य अट असणार नाही.
या आयोजनात, खर्चात अन्य कोणी सहभागी होत असल्यास मला हवेच आहे, परंतु एरवी त्या सर्वाची जबाबदारी मी घेऊन हे पत्र प्रसिद्ध झाल्यापासून एक वर्षाच्या आत हा सर्व कार्यक्रम पूर्ण झाला पाहिजे एवढीच माझी अट राहील.
आपला ४३, गुरुकृपा कॉलनी,
देवदत्त दाभोलकर गोडोली, सातारा ४१५००१ ४ ऑक्टोबर ११
माननीय संपादक
आजचा सुधारक
यांस स. न. वि. वि. आपल्या विवेकवादावरील उत्कृष्ट लेखमालेचा मी एक नियमित वाचक आहे. सप्टेंबर ऑक्टोबर १९९१ च्या अंकातील सुरुवातीच्या परिच्छेदातील (पृष्ठ ५) काही विधाने बुचकळ्यात टाकणारी आहेत. आपण असे म्हणता की इतरांच्या धर्माची चिकित्सा करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपण आपल्या स्वतःच्या मुलांना वळण लावतो. परंतु शेजारच्या मुलांना हात लावीत नाही. हिन्दु धर्माची चिकित्सा फक्त हिन्दू धर्मीयांनीच केली आहे काय? भारतीय दर्शनांची भलावण किंवा त्यांची प्रखर टीका इतर धर्मीय विचारकांनी केलेली आपल्याला आढळते. शिक्षक केवळ आपल्या मुलांनाच शिकवीत नाही तर इतर मुलानांही तो शिकवितो आणि त्यांच्यावर संस्कार करतो. विवेकवादाच्या व्यापक संदर्भात ‘अयं निजः परो वेति ही गणना सयुक्तिक आहे काय? विवेक किंवा विवेकवाद ही संकल्पना कोणत्याही एका विशिष्ट धर्माशी संलग्न नाही असे मला वाटते.
गीतेतील नीतिशास्त्राचे विवेचन करताना आपण तत्त्वज्ञानाला भारतीय तत्त्वज्ञ मोक्षशास्त्र असेही नाव देतात असे म्हटले आहे, आणि मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका असा अर्थ केला आहे. मोक्ष या शब्दाचा हाच एक अर्थ आहे काय? मोक्ष म्हणजे वासनाचक्रातून सुटकाअसाही अर्थ होऊ शकतो. मोक्ष या शब्दाचे पर्यायीअर्थआपण कोठेही विचारात घेतलेले दिसत नाहीत.
एप्रिल १९९१ च्या अंकात आपण बरटूंड रसेलच्या “A Free Man’s Worship’ या लेखाचा सुंदर अनुवाद केला आहे. या लेखात ‘नियती’, ‘दुर्दैवाचा फटका ‘आत्म्याची नियतीच्या साम्राज्यातून सुटका’, ‘देवी प्रकाशाची ठिणगी’ शाश्वत गोष्टीचा ध्यास’ इ. शब्दप्रयोग आले आहेत. आत्मा, नियती, दैवी प्रकाश, शाश्वत सत्य इत्यादींवर रसेल यांचा विश्वास होता काय? ह्या कल्पना आपण प्रतिपादन करीत असलेल्या विवेकवादाशी सुसंगत आहेत काय?
वरील शंकांचे निरसन व्हावे ही अपेक्षा.
आपला कांचनगौरी’
अ. ना. लोथे धरमपेठ, नागपूर ४४००१०।
श्री संपादक, आजचा सुधारक
‘आजचा सुधारक’चा धर्मनिरपेक्षता विशेषांक वाचला, त्यावरील प्रातिक्रिया धर्मनिरपेक्षतेवरील व्यासंगी विद्वानांचे लेख वाचल्यावर अंकाला दिलेले धर्मनिरपेक्षता विशेषांक हे नाव खटकले. श्री. र. वि.रानडे वगळता इतर सर्व लेखकांनी धर्मनिरपेक्षतेच्या रस्त्याने आपली हिंदुत्वाची व मुस्लिम विरोधाची घोडी भरधाव दामटली आहेत.
आर्य चाणक्य यांचे व्यवहारे पक्षपातो न कार्यः’ (न्यायाचे कामात पक्षपात करू नये) असे एक सूत्र आहे. परंतु सेक्युलॅरिझमला न्याय द्यावयास निघालेल्या लेखकांचे लेख पक्षपाताने बरबटलेले आहेत. त्यात शेरेबाज्या आहेत. वास्तवाचे भान न ठेवता स्वप्नाळूपणाला दिलेले प्राधान्य आहे.
Times of India ने १९३६/३७ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘The New Standard Encyclopaedia’ Secularism’ Fgura system that rejects all belief in god religion and future life. It was founded in England by G. J. Holyoake and took an attitude of opposition to all religion. Its foremost advocate was Charles Bradlaugh, and to forward its ideas the National Secular Society was founded. By this society a good deal of literature has been issued’ अशी माहिती दिली आहे.
बार या माहितीप्रमाणे सेक्युलॅरिझमचा विचार ईश्वर, धर्म, (हिंदुधर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म इत्यादि) व मरणोत्तर जीवन यांचेशी निगडित आहे. धर्माचा अर्थ religion असा घेऊ नये असे प्रतिपादन करणे व धर्मशब्दाचे श्लेष काढीत राहणे हा कालापव्यय आहे. सर्वसाधारण माणसापुढे धर्म म्हटला की हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म याच संकल्पना त्याच्या मनात असतात आणि या संकल्पनांना अनुसरूनच चर्चा व्हायला हव्यात.
श्री. मा. गो. वैद्य पान २१ वर म्हणतात, ‘अमेरिकेत ज्यूंची संख्या १६ टक्के आहे. तरीपण अद्यापि एकहीं ज्यू तेथे अध्यक्ष बनू शकला नाही. ‘ अमेरिकेत अल्पसंख्य धर्माचा अध्यक्ष बनू शकत नसेल तर भारतातही तसेच व्हावे ही अपेक्षा स्वतंत्र बुद्धीची द्योतक नाही. भारतातले अल्पसंख्य धर्माचे अध्यक्ष आपल्या घटनेप्रमाणे निवडणुकांद्वाराच निवडून आले होते ना ? त्याच पानावर श्री. वैद्य म्हणतात, ‘आपण सेक्युलर हे दाखविण्यासाठी मुद्दाम एखाद्या ज्यूला राष्ट्राध्यक्ष करण्याची त्याला गरज वाटत नाही. येथले राष्ट्रपती आपल्या संविधानाप्रमाणे निवडणुकीद्वारा निवडून येतात ना? अल्पसंख्य अध्यक्ष आमेरिकेत निवडून येऊ शकत नाही म्हणून येथेही निवडून येऊ नये असे कसे म्हणता येईल?
पान २६ वर श्री. वैद्य यांनी भा.ज.पा. चे यश, राम, मार्क्स, अयोध्या राममंदिर उपक्रम इत्यादींवर वस्तुस्थितीच्या विपरीत बरेच पक्षपाती भाष्य केले आहे. वर्ध्याच्या कम्युनिस्ट उमेदवाराच्या नावाचा उल्लेख न करण्याची क्षुद्र वृत्ती दाखवून त्यांचा उल्लेख तेली जातीचे उमेदवार असा केला आहे. स्थलसंकोचास्तव असे केले असेल असे म्हणवत नाही. कारण लेखात असंबद्ध चर्चेनेच खूप जागा अडवली आहे. हा तेली जातीचा उमेदवार निवडून आला याचा अर्थ श्री. वैद्य यांनी कौतुक केलेला अयोध्या राममंदिर उपक्रम हा क्षणभंगुर परिणामाचा होता हे कबूल केल्यासारखे आहे. भा.ज.पा.चे सामर्थ्य वाढले असा आभास निर्माण केला जातो. वस्तुस्थिती काय असते? भा.ज.पा. ला पूर्वी ३ ते १२ टक्के मते एकूण मतदानाच्या संदर्भात मिळत.९१ साली भा.ज.पा. ला २४ टक्के मते मिळाली. पूर्वी भा.ज.पा. मोजक्याच जागी उमेदवार उभे करी. ९१ साली भा.ज.पा.ने ४७३ उमेदवार उभे केले. त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या परसेंटेजमध्ये वाढ होणारच. हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश या तीन राज्यांत भा.ज.पा.ची सरकारे असताना व ही तीनहीं राज्ये अयोध्या राममंदिरवाल्या उत्तर प्रदेशाला लागून असतानाही या राज्यांत अयोध्या राममंदिर उपक्रम ९१ च्या निवडणुकीत आपला प्रभाव दाखवू शकला नाही. या तीन राज्यांतील ६९ लोकसभेच्या जागांपैकी भा.ज.पा.ला फक्त २६ जागा जिंकता आल्या. काँग्रेसने ४२ जागा जिंकल्या. जातीची जाण प्रभावी ठरली असल्यास, अयोध्याराममंदिर उपक्रमात जातीयतेवर मात करण्याचे सामर्थ्य नाही हे ओघानेच येते. हिंदू एकतेच्या कितीही वल्गना केल्या तरी हिंदुधर्माचा ‘जात’ हा सर्वांत कमकुवत दुवा आहे तसेच मर्मस्थानही आहे. डोळे आणि कान उघडे ठेवून वावरणाऱ्याला वर्णानां ब्राह्मणो गुरुः’ हेसुद्धा अजून जात, पोट-जात, ऋग्वेदी, यजुर्वेदी या डबक्यातून बाहेर पडले आहेत असे दिसणार नाही. उघडपणे किंवा छुपेपणाने, वर्णानां ब्राह्मणो गुरुः हेसुद्धा आपापल्या पोटजातींची घोडी दामटीत असतात. तेव्हा त्यांना, तेली जातीला जातीय अशी शिवी देण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. । पर पान २२ वर श्री. वैद्य म्हणतात, ‘कम्युनिस्ट तत्त्वप्रणाली मानणाऱ्या देशांमध्ये तेथील सत्ताधीशांनी सेक्युलर स्टेट स्थापन करण्याचे ठरविले. कोणत्याही रिलिजनवर त्यांचा विश्वास नसल्यामुळे त्यांनी सेक्युलर स्टेटचा उद्घोष करावा यात आश्चर्य नाही. पण त्यांनी लोकांना त्यांचे श्रद्धेप्रमाणे उपासना करण्याचे स्वातंत्र्यही ठेवले नाही. कारण रिलिजन त्यांच्या दृष्टीने अफूची गोळी होती. आता त्या अफूची उपयोगिता त्यांना पटली हा भाग वेगळा.’ या अवतरणातील शेवटचे वाक्य शेरेबाजीत मोडते. अफूच्या गोळीची उपयोगिता पटली असती तर श्री. गोबचिन्ह प्रार्थना मंदिरात जाऊ लागले असते. कोणत्याही गोष्टीच्या सक्तीची निरुपयोगिता त्यांना पटली एवढेच खरे आहे. उपासनास्वातंत्र्य मिळाल्यावर रशियात चर्चेस आणि मशिदीतून लोकांची झुंबड उठू लागली असेही नाही. याचाच अर्थ या अफूची उपयोगिता तेथील लोकांनासुद्धा पटलेली नाही असा होतो. कारण तेथे निरीश्वरवाद्यांचे संख्याधिक्य असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. याच अंकातील श्री. र. वि. रानडे यांच्या लेखात त्यांनी म्हटल्याप्रमाणे (शेवटच्या पॅन्यत) सेक्युलॅरिझम या संकल्पनेच्या विकासाची परिणती विज्ञानवादात, निरीश्वरवादात होणे ही प्रक्रिया मानवी संस्कृतीच्या विकासात अनिवार्यतः येणार. या टप्प्यापर्यंत रशियन नागरिक अजून आलेले नाहीत असे समजणे धाष्टांचे आहे. उलट भारतातसुद्धा अशांची संख्या वाढत जाणार हे निश्चित.
श्री. र. वि. रानडे यांचा अपवाद वगळता बाकीच्या लेखकांचा सूर श्री. मा. गो. वैद्य यांच्या लेखाशी मिळता जुळता असल्याने त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही.
श्री. रानडे यांनी व्यक्त केलेले विचार वास्तवाला धरून आहेत. त्यांनी लेखाच्या शेवटी व्यक्त केलेल्या आशावादाचे प्रत्यंतर चालू शतकाच्या अखेरीस किंवा येत्या शतकाच्या सुरुवातीसच आल्यास आश्चर्य नाही.
ग. य. धारप
आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रातील समस्या
संपादक, आजचा सुधारक यांस-माग
तीन चार वर्षांपूर्वी सलग तीन वर्षे मी एका मुद्रणाचे व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळेमध्ये मुख्याध्यापकाचे व अर्थातच शिक्षकाचे काम केले. तेथे प्रवेशासाठी किमान नबवी यत्ता पास अशी अट होती. दरवर्षी वर्गामध्ये सहासात विद्यार्थी असत. त्यामधले एकदोघे बारावी पास झालेलेही होते. त्यांना शिकविताना अनुभव असा आला की विद्यार्थी नववीतून शाळा सोडलेला असो की इंग्लिश माध्यमातून बारावी पास झालेला, त्याची शैक्षणिक पात्रता ही पाचवी-सहावीच्या वर्गाच्या वर कधीच नसे. तो साक्षर झालेला असे, पण गणित-विज्ञान हे विषय तर सोडाच पण त्याला इतिहास, भूगोलाचे जुजबी ज्ञानसुद्धा नसे; इंच आणि सेंटिमिटर ह्यांमधला फरक त्याला समजलेला नसे. छपाईमध्ये मजकूर जुळविण्याचे माप वेगळे असते. ते ‘पायका एम् ‘असे असत्ते. माझी ते माप त्यांना समजावून देताना पुरेबाट होत असे. आपण कितीही प्रयत्न केले तरी मुले शिकत नाहीतत्यांच्या ठिकाणी शिक्षणाविषयी रुचि निर्माण करणे अत्यंत अवघड काम आहे; त्यांना ज्ञान नको, त्यांना फक्त प्रमाणपत्र हवे असे लक्षात आल्यामुळे मी हताश होऊन ते कामच सोडून दिले. ज्याला शिक्षणक्षेत्रामधला गाळ म्हणता येईल तोच माझ्या वाट्याला आला असेल असे माझ्या मनात आले. पण मी जसा इतर शिक्षकांशी, महाविद्यालयीन प्राध्यापकांशी बोलू लागलो तसा त्यांचाही अनुभव माझ्यासारखाच अत्यंत भीषण आहे असे माझ्या लक्षात आले. ही मला त्यावेळी झालेली शिक्षणक्षेत्रातील अनवस्थेची फक्त तोंडओळख होती, हे हिमनगाचे टोक तेवढे मला दिसले होते हे मला मागाहून समजले.
ही परिस्थिती इतकी भीषण असताना ती उजेडात का येत नाही? तर असे लक्षात आले की या क्षेत्रात एकीकडे ‘तेरीभी चूप व मेरीभी चूप’ असा प्रकार आहे; विद्यार्थी पास होत आहेत; शिक्षकांना न केलेल्या कामाबद्दल पुरेसे पगार मिळत आहेत, एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना पास करून दिल्याबद्दल पगाराच्या वर बोनस मिळत आहे. बहुतेक शिक्षकांच्या हाती त्यांना स्वप्नात पाहायला मिळाला नव्हता इतका पैसा खेळत आहे. त्यामुळे शिक्षक हा नवश्रीमन्त वर्गात मोडू लागला आहे. त्या वर्गामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. वाढते आहे, तर दुसरीकडे प्रामाणिक शिक्षक लज्जावनत आहेत.
महाराष्ट्रापेक्षा उत्तर भारतामधली परिस्थिती आणखीच बिकट आहे. महाराष्ट्रात एकूण प्रकाराविषयी मौन आहे. उत्तर भारतात जेथे रोखठोकपणा किंवा रांगडेपणा अधिक तेथे त्याविषयी निलाजरेपणाही आला आहे. खाजगी व्यावसायिक महाविद्यालयांना येथे कुरण मोकळे सोडल्यापासून बिहारमधून महाराष्ट्रात मोठ्या संख्येत विद्यार्थी येत असत. पण त्यांच्या एकूण निर्लज्ज व बेशिस्त वागण्याला कंटाळून काही महाविद्यालयांनी त्यांना प्रवेश देणे बंद केले आहे. तरीही शिक्षणाच्या क्षेत्रात, जे वास्तविक सर्वात स्वच्छ असावयाला पाहिजे, भयानक भ्रष्टाचार बोकाळला आहे.
विद्याथ्यांची बेशिस्त इतकी भयंकर वाढत आहे की कालचा दिवस बरा होता असे म्हणण्याची पाळी चांगल्या प्रामाणिक शिक्षकांवर आली आहे. बऱ्याच महाविद्यालयांनी स्नेहसंमेलने घेणे बंद करून टाकले आहे, आणि महाविद्यालयीन निवडणुकांचा शिमगा कसा बंद करावा असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे. विद्यापीठांच्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांसारख्याच उमेदवारांच्या पळवापळवीच्या बाबतीत गाजत आहेत. हा कोळसा उगाळावा तेवढा काळाच आहे.
शाळांमध्ये नावापुरतेच शिक्षण मिळत असल्यामुळे खाजगी शिकवणी वर्गाचे फावत आहे. त्यांच्या योगाने कुशल शिक्षकांच्या हाती टाकसाळीच सापडल्या आहेत. तेथेही गटबाजी आहे व तिचा उपयोग आपल्या ‘क्लास मधल्या मुलांना घवघवीत यश मिळवून देण्यासाठी केला जात आहे. सर्वसाधारण लोक एकतर त्या सर्व प्रकाराविषयी अनभिज्ञ आहेत, संवेदनशून्य आहेत किंवा हताश आहेत. काही थोड्यांना थोडी धडपड केल्यानंतर मरगळ आलेली आहे. हे असेच चालणार, आपली शक्ती अपुरी आहे. एवढ्या बलाढ्य शत्रूशी सामना देणे आपणास शक्य नाही म्हणून काही स्तब्ध आहेत, तर काही प्रवाहपतित आहेत. ते कालमानाप्रमाणे आपणास बदलणे भाग आहे असे स्वतःचे समर्थन करीत आहेत.
ही परिस्थिती बदलावयास पाहिजे ह्याविषयी सर्वांचे एकमत असले तरी ह्या बलाढ्य शत्रूपुढे एकटे आपण काही करू शकणार नाही ह्या जाणिवेने कोणीच काही करीत नाही. परिणामी शिक्षणक्षेत्रातली दुरवस्था दिवसानुदिवस वाढत आहे.अशा परिस्थितीत ही अवस्था बदलावी असे ज्यांना उत्कटतेने वाटते अशांनी एकत्र आले पाहिजे. हे भिंतीवर डोके आपटण्याचे काम केले पाहिजे. शिक्षणक्षेत्रातली खरी परिस्थिती पालकांसमोर उघडून दाखविली पाहिजे. सज्जनशक्ती जागविली पाहिजे असे मला वाटू लागले. या गंभीर समस्येवर काहीना काही उपाय शोधून काढूच अशा पणाने, अशा निर्धाराने आपण एकत्र आले पाहिजे. आपले प्रयत्न, चुकले तरी चालेल. पण ही निष्क्रियता नको.
आपण कृपा करून ह्या गंभीर समस्येच्या चर्चेला एक निरपेक्ष आणि तटस्थ व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे अशी आपणांस नम्र विनंती आहे.
शिक्षणामुळे मुलामुलींमध्ये अर्थार्जनक्षमता यावी एवढी माफक अपेक्षा आपण ठेवली असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असे माझे मत आहे. ती
अर्थार्जनक्षमता शिक्षणाशिवायच आपल्यामध्ये येत असेल तर सोन्याहून पिवळे असे सामान्य विद्यार्थ्यास वाटत असल्यास नवल नाही. पालकाच्या कल्पनेचीही झेप अर्जनक्षमतेच्या पलीकडची नाही, त्यामुळे तो आपल्या मुलांच्या पाठीशी उभा आहे. आमच्या सगळ्या समस्यांचे मूळ आपल्या या समजुतीमध्ये आहे. हे सारे पारडे उलटून शिक्षणामुळे मुलांमध्ये शहाणपणा यावा, त्यांना विवेक करता यावा हे शिक्षणाचे उद्दिष्ट ठरवून शहाणपणा येण्यासाठी त्यांना ज्ञान द्यावे. आपल्या तात्कालिक हिताचे जे काय असेल त्यापेक्षा चिरकालिक हिताचे काय ते प्रत्येकाला पाहता यावे, असे मला वाटते. आपले सध्याचे सर्वच महत्त्वाचे प्रश्न, मग ते पर्यावरणाचे म्हणजे प्रदूषणाचे असोत की धर्माभिमानाचे किंवा दारित्र्याचे असोत, सारे आमच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे निर्माण झालेले आहेत असे मला वाटते. ही दूरदृष्टी माणसाला शिकविण्याची पद्धती मला सुचत नाही. ती माझे हे पत्र वाचून आणखी कोणाला सुचेल आणि या चर्चेतून काही रचनात्मक सूचना पुढे येतील अशी मला आशा आहे.
आपला
दिवाकर पुरुषोत्तम मोहनी नागपूर-४४००१०
दि. १०.११.१९९१