आजचा सुधारकच्या मे, जून व जुलै च्या अंकांतून श्री. दिवाकर मोहनी यांनी ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न हा शीर्षकाखाली हिंदुधर्म, हिंदुत्ववादी, मुस्लिम समस्या, रामजन्मभूमीचा प्रश्न इ. विषयांवर चर्चा सुरू केली आहे. त्यांतून त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर टीकेची झोड उठविली आहे.
श्री. मोहनी यांची भूमिका तत्त्वचिंतकाची आहे. ह्या भूमिकेतून ‘हिंदुधर्म ह्या संकल्पनेची चिकित्सा करताना त्यांनी तर्कावर तर्काचे मजले चढवून हिंदुधर्म पंथनिरपेक्ष असेल तर धर्मान्तर होऊच शकत नाही, सारेच हिंदू ठरतात, त्यामुळे बहुसंख्याक व अल्पसंख्याक असा वाद निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळे तुष्टीकरणाचा प्रश्नही उत्पन्न होत नाही असे वास्तवाशी विसंगत असलेले विपर्यस्त निष्कर्ष काढले आहेत. श्री. मोहनी यांनी समानता, स्वायत्तता’, ‘बहुमताचे राज्य म्हणजे लोकशाही व न्याय्य ह्या संकल्पनांचा उल्लेख त्या संशयातीत आहेत अशा पद्धतीने केला आहे. परंतु ज्या निव्वळ तात्त्विक व तार्किक पद्धतीने श्री. मोहनी यांनी ‘हिंदुधर्म ह्या संकल्पनेची चिकित्सा केली आहे त्याच पद्धतीने ह्या संकल्पनांची चिकित्सा केली तर त्याही किती गोंधळात टाकू शकतात ह्याची कल्पना येईल. वास्तवतेचे भान न ठेवता केलेल्या केवळ तात्त्विक विवेचनाने गुंता सुटावयाच्या ऐवजी पुष्कळदा वाढतच जातो. निव्वळ ‘तर्क’ किती ‘अप्रतिष्ठ असतो ह्याची ही उदाहरणे होत.
ऐतिहासिक प्रक्रियेत कालानुसार व परिस्थितीनुसार ‘हिंदू शब्दाला निरनिराळे अर्थ प्राप्त झाले आहेत. पश्चिम आशियातील लोकांनी तो सर्वप्रथम केवळ भौगोलिक अर्थाने वापरलेला दिसतो. सिंधु नदीच्या पलीकडे म्हणजे भरतवर्षात राहणारे ते सर्व हिंदू. पुढे त्याला त्या प्रदेशातील जीवनपद्धतीशी व संस्कृतीशी निगडित असलेले लोक असा अर्थ प्राप्त झाला. ह्या अनिच एके काळी सर सय्यद अहन्द स्वतःला हिंद राष्ट्राचा घटक म्हणवून घेत असत व इक्बाल अहमद श्रीरामाला ‘इमामे हिंद’ म्हणत असत. ह्याच अर्थाने इंडोनेशिया इत्यादि देशातील लोक स्वतःला संस्कृतीने हिंदू म्हणवतात. पुढे भारतात जन्मलेल्या उपासनापद्धतींच्या अनुयायांकरिता हा शब्द रूढ होऊ लागला. त्यानुसार शैव, वैष्णव, शाक्त, जैन, बौद्ध, सिख हे सर्व हिंदु ह्या संज्ञेत अंतर्भूत होतात. भारतीय घटनेने हाच अर्थ मान्य केला आहे. परंतु त्यातही संकोच करून केव्हा केव्हा ‘हिंदू संज्ञेतून जैन, बौद्ध, सिख यांना वगळण्यात येते. ‘हिंदु’ कोण ह्याचे उत्तर काल, परिस्थिती, संदर्भ यांना लक्षात घेऊनच द्यावे लागेल.
श्री. मोहनी यांनी आपली आचार-विचार-वैशिष्ट्ये वर्णन करून आपण हिंदू आहोत काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिन्सेन्ट शीन ह्या लेखकाने पं. नेहरूंशी त्यांच्या धर्माबद्दल चर्चा केली असता श्री. मोहनींप्रमाणेच पं. नेहरूंनी उत्तर देऊन आपण रूढार्थान हिंदू नसल्याचे सुचविले होते. त्यावर भाष्य करून श्री. शीन यांनी Nehru: His Years of Power ह्या आपल्या ग्रंथात नमूद केले आहे की नेहरूंची धारणा ही प्रामुख्याने हिंदूंमध्ये आढळणारी विशिष्ट धारणा आहे, व त्या दृष्टीने नेहरू हे खरे हिंदूच होते. हे भाष्य श्री. मोहनींनाही लागू होऊ शकेल.
विविधता, सर्वसमावेशकता, उदारता, सहिष्णुता, इतर धर्माबद्दल आदर इत्यादि वैशिष्ट्यांचे हिंदुधर्मात इतके वैपुल्य आहे, की ती त्याचे विशेष लक्षण ठरावे. सामान्यतः हिंदुधर्माचा हा महान् सद्गुणही ठरावा. परंतु गेल्या एक हजार वर्षांचा इतिहास पाहता हा दुर्गुण वाटावा अशी स्थिती दिसते. सहिष्णुता, उदारता, इतर धर्माबद्दल आदर यांना तसाच प्रतिसाद अन्यधर्मीयांकडून मिळाला तरच त्या सद्गुणांपासून सर्वांना लाभ होतो. नाहीतर असहिष्णु, अनुदार लोकांचा वरचष्मा होत जातो व सहिष्णु, उदार लोकांची पिछेहाट होत जाते. हिंदु-मुस्लिम संबंधात दुर्दैवाने हेच घडत गेले. जबरदस्तीने धर्मांतरे झाली, मंदिरे पाडून तेथे मशिदी निर्माण झाल्या. हे शल्य आजही हिंदुमनांत ताजे आहे. तरी देखील हिंदूंनी ते सहन केले. काही काळ हिंदु-मुस्लिम सामंजस्याचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसू लागले होते. परंतु मुख्यतः ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि झोडा नीतीने मुस्लिमांतील असहिष्णुता, आक्रमकता, विलगता ह्या भावनांनी पुन्हा उचल घेतली. हिंदू पडते घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करीत गेले व त्याबरोबर त्या मागण्या वाढतच गेल्या. म. गांधींनी कोरा चेक देण्यापर्यंत पडते घेतले तरीअखेरीस देशाचे विभाजन झाले. मुस्लिमांना वेगळे राज्य मिळाले. त्यांनी हिंदूंची हकालपट्टी केली.
अशा स्थितीत उरलेल्या देशाला हिंदू राज्य घोषित केले गेले असते तरी चालले असते. परंतु हिंदनी तसे केले नाही. त्यांनी धर्मनिरपेक्षता हे तत्त्व स्वीकारले. इतकेच नव्हे तर राज्यघटनेद्वारे हिंदूंपेक्षाही मुस्लिमांना विशेष सवलती व अधिकार दिले. अनेक महत्वाच्या पदांवर त्यांची निवड केली.
ही सर्व उदारता लक्षात घेऊन मुस्लिम समाजाने तिला योग्य प्रतिसाद देऊन येथील जीवनात समरस व्हावयास हवे होते. पण तसे झाले नाही. १९७१ पर्यंत मुस्लिम समाजाची दृष्टी पाकिस्तानकडेच होती असे सय्यद शहाबुद्दीनसारखे मुस्लिम नेतेही मान्य करतात. १९७१ च्या बांगलादेशाच्या निर्मितीनंतर मुस्लिम समाजाची-विशेषतः त्यांतील तरुणांची- दृष्टी भारताभिमुख होऊ लागली होती. अजूनही आशा गेली नाही. परंतु मुख्य अडचण आहे जुन्या विचाराच्या मुस्लिम नेतृत्वाची; गठ्ठामतांसाठी त्याला उचलून धरणाऱ्या कृतकधर्मनिरपेक्षतावादी हिंदू नेत्यांची, आणि एकतर्फी सहिष्णुतावादी असलेल्या हिंदुसमाजातील तथाकथित बुद्धिवाद्यांची.
जोपर्यंत ह्या अडचणी दूर होत नाहीत व तज्जन्य तथाकथित फायद्यांची आशा मुस्लिम समाजातून नष्ट होत नाही तोपर्यंत मुस्लिम समाज पूर्णतः भारताभिमुख होणार नाही. उलट तुष्टीकरण जसे जसे वाढेल तशी तशी जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यताच अधिक. तसे झाले तर कालांतराने धर्मनिरपेक्षताही शिल्लक राहणार नाही व हिंदूंचे-विशेषतः सहिष्णू हिंदूंचे – अस्तित्वही धोक्यात येईल.
सध्या ज्या हिंदुत्ववाद्यांचा प्रभाव वाढत आहे त्यांनी वरील अडथळे दूर करण्याची मोहीम उघडली आहे. मुस्लिम आक्रमकता व असहिष्णुता यांना आव्हान देण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात रामजन्मभूमीवरील मंदिराच्या पुनर्निर्मितीचा प्रश्न त्यांनी हाती घेतला आहे. तुष्टीकरणवादी कृतकधर्मनिरपेक्षतेला आपल्या सकारात्मक धर्मनिरपेक्षतेद्वारे व मानववादाद्वारे ते विरोध करीत आहेत, आणि आत्मघातकी आत्यंतिक सहिष्णुता व पडखाऊपणा सोडून हिंदूंनी जरा चैतन्यशाली व्हावे व त्यासाठी आपल्या धर्माचा यथार्थ अभिमान किंवा गर्व बाळगावा असा आग्रह ते धरीत आहेत.
श्री. मोहनी यांना ‘प्रीती मान्य आहे. परंतु ‘अभिमान’ किंवा ‘गर्व मान्य नाही. वस्तुतः अभिमान, गर्व ह्या प्रीतीच्या कमी-अधिकपणातून निर्माण होणाऱ्या श्रेणी आहेत. श्री. मोहनी यांची आपल्या राष्ट्रावर प्रीती आहे व त्यामुळे दोन राष्ट्रांतील हितसंबंधातील संघर्षाच्या वेळी मी अवश्य माझ्या राष्ट्राची बाजू घेईन असे ते म्हणतात. परंतु हितसंबंध हा योग्य किंवा अयोग्य असू शकतो. आपल्या राष्ट्राचा हितसंबंध अयोग्य व दुसऱ्या राष्ट्राचा जर योग्य असेल तर अशा वेळी आपल्या राष्ट्राची बाजू घेणारी ‘प्रीती अयोग्यच म्हटली पाहिजे. अभिमान, गर्व यांचेही असेच आहे. त्यांना सरसकट अयोग्य ठरविता येणार नाही. एकूण परिस्थितीवरच त्यांचे चांगले-वाईटपण अवलंबून राहील.
सहिष्णुतेचा मार्ग अपयशी ठरत गेल्यामुळे, एवढेच नव्हे तर तो आत्मघातकी ठरण्याचाही संभव असल्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेरास सव्वाशेर होण्याचा हा पवित्रा नेहमीकरिता राहील असे समजण्याचेही कारण नाही. असहिष्ण मुस्लिमांना प्रतिरोध करण्याबरोबर सहिष्णु मुस्लिमांना जवळ करण्याचेही त्यांचे धोरण आहे. आपले धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेऊन त्यांनी सांस्कृतिक दृष्ट्या ह्या देशाशी समरस व्हावे व राष्ट्रीय एकता साधावी एवढाच त्यांचा आग्रह आहे.
मुसलमानांचे तुष्टीकरण केल्यामुळे हिंदु-नेतृत्वाचा आपमान होतो हा मुद्दा गौण आहे. मुख्य मुद्दा राष्ट्रीय एकतेसाठी त्यांनी भारताच्या मुख्य सांस्कृतिक प्रवाहात समरस व्हावे हा आहे. पारशी, ज्यू, कित्येक ख्रिश्चन पंथ हे जसे आपल्या वैशिष्ट्यांना जपूनही भारतीय एकतेत सामील झाले आहेत तेवढीच मुसलमानांकडूनही अपेक्षा आहे. परंतु सामील होणे तर दूरच, विद्यमान मुस्लिम नेते मुस्लिम जीवनप्रवाह हाच, त्यांनी हजार वर्षे येथे राज्य केल्यामुळे, येथील मुख्य सांस्कृतिक जीवनप्रवाह आहे व हिंदूंनीच त्यात सामील व्हावे असे म्हणतात. तसेच मुस्लिम मौलवी भारत ही युद्धभूमी (दारुल हर्ब) मानतात व त्याचे इस्लामीकरण करण्याच्या कारवाया करतात. ही वृत्ती बदलवून प्रामाणिक सहजीवनाला त्यांना अनुकूल करणे ही हिंदूंच्या दृष्टीने आजची काळाची गरज आहे.
हिंदू लोक अस्पृश्य, विधवा, मेहतर इ. लोकांचा अपमान करतात, मग त्यांनी मुसलमानांनी केलेला अपमान का सहन करू नये असे म्हणणे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा सर्वदुष्ट प्रयत्न होय, त्याऐवजी असे म्हणणे उचित होईल की अस्पृश्य, विधवा, मेहतर इत्यादींनी आपली सहनशीलता सोडून आपल्या अपमानाला विरोध करावा, त्याचप्रमाणे हिंदूंनीही चैतन्यशाली होऊन आपल्या अपमानाला विरोध करावा. एकतर्फी सहिष्णुता म्हणजे चैतन्यहीन मृतवत् सहनशीलता होय. सहिष्णुतेच्या गोंडस नावाखाली तिला आम्ही जोपासत आहोत. येथे हेही लक्षात ठेवले पाहिजे की आज जे हिंदू नेते मुसलमानांनी केलेल्या अपमानाविरुद्ध प्रभावी आवाज उठवीत आहेत ते अस्पृश्य, विधवा, मेहतर यांच्या होणाऱ्या अपमानाच्याही विरुद्ध आहेत.
भारताचा सांस्कृतिक वारसा हा जितका हिंदूंचा आहे तितकाच तो मुसलमानांचाही आहे. विकृत मानसिकतेपोटी मुस्लिम नेतृत्व तो वारसा नाकारते. पाकिस्तानातही त्यांना पाच हजार वर्षांचा इतिह्मस आपला वाटू लागला आहे, व तक्षशिला, पाणिनीचा अभिमान वाटू लागला आहे हे येथील मुस्लिम नेत्यांनी लक्षात घ्यावयास पाहिजे. त्यांनी सांस्कृतिक मुख्यप्रवाहात येणे हा राष्ट्रीय दृष्टीने विवेक आहे.
शेवटी येथे दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक, ह्या देशात हिंदुत्ववादी कधीही प्रबळ किंवा बहुसंख्याक नव्हते. बहुसंख्य हिंदू नेहमी सहिष्णू व उदारमतवादी हिंदू नेतृत्वाच्याच पाठीशी ठामपणे उभे राहिले. आजही हिंदुत्ववादी पुरेसे प्रबल किंवा बहुसंख्याक नाहीत. त्यामुळे मुस्लिम समस्येबद्दल त्यांना दोष देता येणार नाही. तत्त्वनिष्ठ सहिष्णु व उदारमतवादी हिंदु नेतृत्व व संधिसाधू असहिष्णु आणि अनुदार मुस्लिम नेतृत्व यांचेकडेच मुख्यतः तो दोष जातो. आज हिंदू समाज हिंदुत्ववाद्यांच्या बाजूला अधिक झुकत आहे याचे मुख्य कारण सहिष्णु हिंदु नेतृत्व मुस्लिम समाजाला राष्ट्रीय प्रवाहात समरस करून घेऊ शकले नाही हे होय.
आणि दुसरे असे की, प्रारंभी ‘हिंदू’ शब्दाचे जे विभिन्न अर्थ दिले आहेत तितके आणि शिवाय त्याच्या मिश्रणातून उत्पन्न होणारे इतर अनेक असे हिंदुत्ववाद्यांचे विविध प्रकार आहेत. त्या सर्वच हिंदुत्ववाद्यांच्या भूमिकांचे मला समर्थन करावयाचे नाही. हिंदू समाज आज ज्या हिंदुत्ववादी राष्ट्रीय पक्षाकडे व नेतृत्वाकडे अधिक झुकत आहे त्याची भूमिका वर वर्णन केल्याप्रमाणे आहे व त्यामुळे वास्तववादी दृष्टीने पूर्वग्रह सोडून विचार करणाऱ्या कोणत्याही बुद्धिवाद्याने तिचे स्वागतच करावयास पाहिजे..
सरते शेवटी मुस्लिम समाजाचेच एक सदस्य असलेले, त्या समाजाच्या मानसिकतेची पूर्ण जाणीव असलेले आणि त्याच्या विकासाची तळमळ असलेले प्रसिद्ध राष्ट्रवादी व बुद्धिवादी मुस्लिम नेते हमीद दलवाई यांच्या ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप, कारणे व उपाय ह्या पुस्तिकेतील त्याचे पुढील निष्कर्ष वाचकांसाठीउद्धृत करतो. ते म्हणतात, माझे असे मत आहे की, हिंदू जातीयवाद हा मूलतः मुस्लिम जातीयवादाला प्रति-उत्तर देण्याच्या स्वरूपात आपल्या देशात निर्माण झाला. मुस्लिम जातीयवाद नष्ट करा, आपल्याला या देशात मूठभर देखील प्रभावी हिंदू जातीयवादी आढळणार नाहीत. (पृ. ४३)
‘मुसलमानांचे हे आव्हान हिंदूसमाजाने स्वीकारलेले नाही. आव्हाने स्वीकारावयाला आवश्यक असलेली चैतन्यशीलता हिंदू समाजाने पुन्हा कमावलेली नाही. (पृ. ४५)
तेव्हा हिंदू पुरेसा चैतन्यशील होण्यावर हिंदु-मुस्लिम संबंधाचे स्वरूप अवलंबून आहे. तो तसा झाल्यास मुस्लिमांना जे धक्के इतिहासाच्या ओघात बसले नाहीत ते बसले जातील. मग त्या समाजासमोर एक तर नामशेष होणे किंवा बदलणे, हे दोनच पर्याय शिल्लक उरतील. आणि नामशेष होण्यापेक्षा बदलणेच कोणताही समाज पसंत करतो. (पृ. ४६)
११३, शिवाजीनगर, नागपूर-१०