आजचा सुधारकच्या मे, जून व जुलै च्या अंकांतून श्री. दिवाकर मोहनी यांनी ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न हा शीर्षकाखाली हिंदुधर्म, हिंदुत्ववादी, मुस्लिम समस्या, रामजन्मभूमीचा प्रश्न इ. विषयांवर चर्चा सुरू केली आहे. त्यांतून त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर टीकेची झोड उठविली आहे.
श्री. मोहनी यांची भूमिका तत्त्वचिंतकाची आहे. ह्या भूमिकेतून ‘हिंदुधर्म ह्या संकल्पनेची चिकित्सा करताना त्यांनी तर्कावर तर्काचे मजले चढवून हिंदुधर्म पंथनिरपेक्ष असेल तर धर्मान्तर होऊच शकत नाही, सारेच हिंदू ठरतात, त्यामुळे बहुसंख्याक व अल्पसंख्याक असा वाद निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळे तुष्टीकरणाचा प्रश्नही उत्पन्न होत नाही असे वास्तवाशी विसंगत असलेले विपर्यस्त निष्कर्ष काढले आहेत.