पत्रव्यवहार

पत्रव्यवहार
श्री. संपादक ‘आजचा सुधारक’ यांस,
प्रा. स. ह. देशपांडे यांचे एप्रिल (?) १९९१ च्या अंकातील पत्र वाचले. कळविण्यास खेद वाटतो की सावरकसांचे एकही पान उघडावयाचे नाही’ हा (स. रा. च्या म्हणण्यानुसारचा)’ पुरोगामी’ दंडक मी पाळलेली नाही. सावरकराचे समग्र लेखन अभ्यासले असल्याचा दावा मी करीत नाही, पण प्रसंगोपात्त त्यांचे लेखन जरुरीपुरते मी वाचले आहे. त्यांची चरित्रेही वाचली आहेत.
हिंदुत्वाची सावरकरांनी केलेली व्याख्या सुप्रसिद्ध आहे. धर्मनिष्ठ मुसलमान वा ईसाई यांची भारत ही पितृभू असली तरी पुण्यभू होऊ शकत नाही : ‘पुण्यभू’चा संदर्भ holy places या अनि आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. म्हणजे ही व्याख्या करताना विशिष्ट समूहांना नगळूनच राष्ट्र कोणाचे मिळून बनू शकते ही गोष्ट ते आरेखित करीत होते. हिंदू वा हिंदुत्व यांचा संबंध जर सर्वस्वी या भूमीचा व येथील सर्वसमावेशक इतिहास परंपरेचा माझी/माझा वारसा म्हणून बिनशर्त व पूर्णपणे स्वीकार करण्याशी असला तर (१) एकतर ‘पुण्यभू’ हा शब्द व्याख्येत यायला नको, आणि (२) इथला तथाकथित मुसलमानी’ कालखंडही, इतिहासपरंपराही आपलीच म्हणून स्वीकारायला हवी ही स्पष्टता व्याख्येसोबत हवी.
व्यक्तिशः सावरकर व जिना या दोघांनाही theocratic state नको होते ही गोष्ट मान्य करण्यात अडचण नाही. पण त्यांनी ‘राष्ट्रासाठी जो आधार घेतला तो धर्म हाच होता. यामुळे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर तेथे ‘इस्लामिक रिपब्लिक’ ची घोषणा केली गेली. भारतातही त्या दिशेने दबाव निर्माण होत असल्याचे दिसू शकते. इस्लामिक रिपब्लिक म्हणून घोषणा केली असली तरी पाकिस्तान हे theocratic state नाही असा युक्तिवाद करता येईल, आणि तो तांत्रिकदृष्ट्या खराही असेल, पण पाकिस्तानची मागणी व निर्मिती धार्मिक अस्मितेला आधारभूत धरून झाली असे म्हणणे आजही योग्यच ठरेल. या अर्थाने आम्ही उभयतांनी (प्रा. भोळे व मी) प्रश्नावलीत केलेले विधान योग्यच ठरते. सावरकरांनी हिंदू theocratic state चा पुरस्कार केला वा आग्रह धरला असे आमचे विधान नाही; राष्ट्रवादाची कोणती जातकुळी त्यांना अभिप्रेत होती ते मात्र स्पष्ट केले आहे.
याही मुद्याबाबतीत, आम्ही सावरकरांना न्याय दिलेला नाही, वा आम्हाला त्यांच्या भूमिकेचे यथार्थ आकलन झाले नाही असे प्रा. स. ह. देशपांडे यांना म्हणावयास जागा आहे. आमच्या तुलनेने सावरकरांचे लेखन त्यांनी नक्कीच जास्त अभ्यासले आहे. आमचा समज गैर असल्यास त्यांनी तो साभार विवेचनाद्वारे दूर करावा ही स्नेहादरपूर्वक विनंती. आमचे विधान निराधार ठरल्यास आम्हाला आनंदच होणार आहे. कारण आजच्या हिंदुराष्ट्रवाद्यांचा प्रतिवाद करताना सावरकरांचा कौलही आमच्या बाजूने आहे असे ठरेल.
स्वतःस हिंदु म्हणविण्याबद्दल गांधीनी काही संकोच तर बाळगलाच नाही; उलट अभिमान बाळगला. ‘हिंदस्वराज्य ‘ या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्म, संस्कृती व परंपरा यांना गौरविले. रामराज्य स्थापन करण्याची भाषाही केली. त्यांनी ‘ हिंदुराष्ट्राची कधी भाषा मात्र केली नाही. मुसलमानांना’ परके मानण्याचीही गोष्ट त्यांनी केली नाही. मुसलमानधार्जिणेपण म्हणावे तर टिळकांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसशी जिना १९१६ साली करार करू शकले, गांधांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसंशी १९२८ साली त्यांनी काडीमोड घेतला. या साऱ्या पार्श्वभूमीवर सावरकरांच्या हिंदुत्व’, ‘हिंदुराष्ट्र’ यांच्या मांडणीतले व्यवच्छेदक वेगळेपण कोणते , हा प्रश्नही मी प्रा. स. ह. देशपांडे यांच्या विचारासाठी उपस्थित करून ठेवतो..
कळावे, लोभ असावा,
अ-७ प्राध्यापक निवास, बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर (जि. अहमदनगर)
आपला
बसंत पळशीकर

संपादक
‘आजचा सुधारक’ यांसी
नवा अंक मिळाला. श्री. पळशीकरांचे पत्र वाचले. मध्यंतरी प्रा. पुरोहितांचीही गाठभेट झाली होती. त्यामुळे श्री. पळशीकरांचा वृत्तांत कितपत खरा आहे, याबद्दल मला शंका निर्माण झाली आहे. पण पळशीकरांचा समाचार घ्यायला प्रा. पुरोहित समर्थ आहेत. पत्रातील माझ्याबद्दलचा उल्लेख व भाष्य वाचल्यावर श्री. पळशीकरांना, तात्त्विक वादविवाद चाळी वैयक्तिक कुळात करणारी शेरेबाजी करू नये; ती असभ्य तर आहेच पण वादाला फाटे फुटतात व पातळीही खाली येते- हा साधा नियम ठाऊक नसावे असे वाटते. याच अंकात आपण बरड रसेलच्या (त्याने तिशीत लिहिलेल्या) एका लेखाचा अनुवाद छापला आहे. तो वाचल्यावर सदर गृहस्थ श्री. पळशीकर जर म्हणाले तिशीतल्या रसेलना स्वतःची गरज भागवण्यासाठी वेश्याव्यवसायाची एक करीयर’ म्हणून भलावण करणे
२६/आजचा सुधारक जुलै १९९१
भाग पडले असावे…..” तर त्यात माल आश्चर्य वाटणार नाही. यातच श्री. पळशीकरांना सुयोग्य उत्तर आहे.
कळावे लोभ असावा.
आपला
वसंत कानेटकर

माननीय श्री. दि. य. देशपांडे, सा. न. वि. वि.
आपले दि. १७.५.९१ चे पत्र पोचले. धन्यवाद! आपण उत्तरे दिल्यामुळे माझा शंका विचारण्याचा उत्साह वाढला आहे.
विवेकवादावरील दुसऱ्या लेखांकात आपण म्हटले आहे की “श्रद्धा ही अविवेकी गोष्ट आहे ” पण आपण विवेकवादातच कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळवण्याची एकमेव पद्धत म्हणजे वैज्ञानिक पद्धत असे म्हणता, म्हणजे एकापरीने ही विज्ञानावर श्रद्धाच झाली; म्हणजे ही विवेकवाद्यांनी केलेली अविवेकी गोष्ट ।
विवेकवाद लेखांक १ मधील आपल्या मताप्रमाणे ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणजे त्या क्षेत्रातील वैज्ञानिक यानुसार धर्म, श्रद्धा, साक्षात्कार याविषयी वैज्ञानिकांच्या काय कल्पना आहेत? व त्या तुमच्या विवेकवादात बसतात का?
न्यूटनविषयी बरदँड रसेल यांच्या धर्म आणि विज्ञान (Religion &Science) साहित्य संस्कृती मंडळ प्रकाशित पुस्तकातील पृ. ३५ वरील उतारा :
न्यूटनच्या कार्यामुळे सनातनी मंडळीना मुळीच हादरा बसला नाही, तो स्वतःच अत्यंत धार्मिक होता आणि बायबलच्या शब्दप्रामाण्यावर त्याची श्रद्धा होती.”
बहुसंख्य वैज्ञानिकांनी आपापल्या काळात परंपरागत धार्मिक विचारसरणीला सर्वकाळ आणि सर्वत्र पाठिंबाच दिलेला आहे आणि या बहुसंख्य वैज्ञानिकात काही अग्रगण्य असे वैज्ञानिक आहेत. न्यूटन हा एरियन पंथाचा असला तरी इतर सर्व बाबतीत त्याचा ख्रिश्चन धर्माला पाठिंबा होता. कुहिएर हा शास्त्रज्ञ तर कॅथोलिकांच्या सांप्रदायिक अचूकपणाचा मूर्तिमंत पुतळा होता. फॅरडे हा संडीमॅनीयन पंथाचा होता.” (बरदँड रसेल धर्म आणि विज्ञान पृ. १२५) आइन्स्टाइन यांनीसुद्धा धर्म व देव यांचे अस्तित्व अमान्य केले नाही. अर्थात वरील वैज्ञानिक, ज्ञानाच्या साक्षात्कार या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून विवेकवाद्यांना चालणार नाहीत. म्हणजे आता त्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणजे ज्यांना साक्षात्कार झाला आहे असे म्हणणारे लोक.
आपल्या मते या लोकांना झालेल्या साक्षात्कारात एकवाक्यता नसते. बरदँड रसेलचे मात्र यावर मत वेगळे आहे. तो आपल्या धर्म व विज्ञान या पुस्तकात पृ. १३१ वर म्हणतो, गूढवाद्यांत परस्परांशी एकमत होऊ शकते हाच त्यांच्या बाजूने एक महत्त्वाचा पुरावा आहे. डीन इंज म्हणतात, “ गूढवादी, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक प्रॉटेस्टंट, कॅथॉलिक, बौद्धधर्मीय अथवा मुसलमान असोत, त्या सर्वांत जी एकवाक्यता दिसून येते त्यांपेक्षा अधिक डोळ्यात भरणारी अशी कोणतीच गोष्ट मला माहीत नाही.”
एकूण या बाबतीत विवेकवाद्यांचेही एकमत होत नाही. असो !
साक्षात्कारवाद्यात एकमत होत नाही हा आपला निष्कर्ष कोणत्या तज्ज्ञांच्या साह्याने काढला आहे हे समजत नाही. वैज्ञानिकांचा तर प्रश्न निकालातच निघाला आहे. राहता राहिले त्या विषयाचे तज्ज्ञ म्हणजे प्रत्यक्ष असा अनुभव आलेले लोक – म्हणजे भारताचा विचार करावयास गेल्यास फार पूर्वीचा विचार न केल्यास माझ्या अल्प मतानुसार ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास इत्यादी आगदी अलीकडील स्वामी विवेकानंद अथवा त्यांचे गुरु रामकृष्णपरमहंस अथवा योगीराज अरविंद यांना या विषयाचे तज्ज्ञ समजण्यास आपली हरकत नसावी. त्यांपैकी कुणाला रामाचा तर कुणाला कृष्णाचा तर कुणाला कालीमातेचा (यांपैकी कुणाला गुलाबी उंदराचा साक्षात्कार झाल्याचे मात्र ऐकिवात नाही) साक्षात्कार झाला म्हणजे साक्षात्काराविषयी त्यांचे एकमत नाही असे आपले मत. पण याच सर्वांनी राम, कृष्ण, विठ्ठल सर्व एकच असेही म्हटल्याचे आपण सोयिस्करपणे विसरता.
याप्रकारच्या साक्षात्काराचे अस्तित्व शेवटी बरदँड रसेल यांनीही अमान्यच केले आहे व तसा युक्तिवादही त्यांच्या धर्म व विज्ञान या पुस्तकातील गूढवाद या प्रकरणात आहे. तरीही त्यांनी विज्ञानाचे अपुरेपणही मान्य केलेले आहे. पृष्ठ १२८ वर ते म्हणतात,
“सर्व प्रश्न सोडवण्यास विज्ञान पुरे पडत नाहीत असे कॅनन स्टीटर म्हणतात तेव्हा ते एका अर्थी सत्यच सांगतात”.
बरदँड रसेल हे थोर तत्त्वज्ञ असल्याने त्यांच्या व आपल्या विचारातील या साधाविषयी आदर व्यक्त करूनही मला असे म्हणावे. वाटते की साक्षात्कार हा एक अनुभव आहे. मला कृष्णाचा किंवा दत्ताचा साक्षात्कार झाला म्हणजे तेथे प्रत्यक्ष कृष्ण व दत्त आला असे होत नाही हे उघडच आहे. नाहीतर तो सर्वांनाच दिसला असता व मग मला तो दिसला यासाठी वेगळ्या पुराव्याची आवश्यकताच राहिली नसती. पण असाच प्रकार पं. भीमसेन जोशी यांचे गायन ऐकून मला आनंदाचा जो अनुभव येतो त्याविषयी होतो. तोच अनुभव सर्वांना येईलच असे नाही. त्यामुळे मला आलेला अनुभव हा खोटा ठरत नाही.
एखाद्या औरंगजेबास ते गायन ऐकून आनंद होणार नाही व तो मला वेड्यात काढेल. मला गुलाबाच्या फुलाचा वास येतो पण ज्याचे प्राणेंद्रिय तो वास घेऊ शकत नाही त्याच्या मते मला येणारा अनुभव खोटाच ठरणारा कारण त्यासाठी पुरावा देणे मला शक्य नाही. यावर तुमचे उत्तर काय असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. तुम्ही म्हणाल शेकडा ९९ लोकांना वास येतो पण एखाद्याचा बाबतीत असे घडते. त्यामुळे तो अपवाद ठरतो व त्यामुळे गुलाबाला वास येतो हा नियम सिद्ध होतो. शेकडा ९९ च काय, पण शेकडा १०० लोकांनी (त्यात वैज्ञानिकही आले) मान्य केलेले न्यूटनचे नियमसुद्धा आइन्स्टाइनच्या सिद्धांताने खोटे ठरले, हे कदाचित् आपणास माहीत नसेल.
मला एवढेच म्हणायचे आहे, भीमसेनांचे गाणे ऐकून मला होणाऱ्या आनंदाची जात व तुम्हाला होणाऱ्या आनंदाची जात हीसुद्धा वेगळी (म्हणजे वेगवेगळ्या साक्षात्काराप्रमाणे) असेल पण तो अनुभव मात्र खोटा आहे असे म्हणता येणार नाही. एवढेच काय वेगवेगळ्या परिस्थितीत त्यापासून मला स्वतःला होणारा आनंदसुद्धा कदाचित् वेगवेगळा असेल. ‘सतारीचे बोल ऐकून कवीला होणाऱ्या अनुभवाचे कारण त्यांची हृदयी भरल्या असत्या खंती’ अशी मनःस्थिती हे असू शकेल म्हणून तो अनुभव खोटा नाही. असा अनुभव हा एक प्रकारे साक्षात्कारच असतो. श्री. बाबा आमटे यांना महारोग्यांची शुश्रूषा किंवा मदर तेरेसा यांना दलितांचे, दुबळ्यांचे अश्रू पुसताना होणारा आनंद हाही साक्षात्कारच आहे, कारण आपण त्या वस्तीवरून जाताना नाक मुठीत दाबून पुढे होतो. म्हणजे काही विशिष्ट आनंद मिळण्यासाठी तुमची मनोभूमिका तशी असणे आवश्यकच असते. सरसकट सगळ्यांना ते अनुभव येणे शक्यच नाही. जी. ए. कुळकर्णीची कथा वाचून, भाऊ समर्थ किंवा पिकासीचे चित्र पाहून, येहुदी मेनुहीनचे व्हायोलिन किंवा रविशंकरची सतार ऐकून आनंद होणारे शेकडा एक तरी निघतील की नाही शंकाच आहे. असे हजारात एक असतात ते भाग्यवान असतात व बाकीचे करंटे असे आपण म्हणतो. स्वतःस होणारा हा आनंद श्री. पु. ल. देशपांडेच्यासारखा एखादा शब्दप्रभू शब्दात पकडून इतरांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतो तरीही तो प्रयत्न अपुराच असतो याची जाणीव त्यांना असते.
याच्याही पुढे जाऊन मी असे म्हणेन की आइन्स्टाइन यांचा सापेक्षतावाद हाही एक साक्षात्कारच होता कारण ते म्हणतात, ” १९०७ मध्ये एका शोधपत्रिकेसाठी मला विशिष्ट सापेक्षतावादासंबंधी एक सर्वकस लेख लिहायचा होता…. आणि मग माझ्या जीवनातील सर्वात सुखद कल्पना मला पुढीलप्रमाणे सुचली.”
म्हणजे सापेक्षतावाद ही गोष्ट प्रयोग वगैरे करताना त्यांना सापडली नाही तर ‘सुचली’आइन्स्टाइनच्या संशोधनाला प्रयोगशाळेची किंवा प्रयोग करण्याची गरज नव्हती. मन हीच त्यांची प्रयोगशाळा. चिंतन हाच त्यांचा प्रयोग आणि कागद पेन हीच त्यांची साधने होती. १९०७ मध्ये त्यांना सुचलेल्या या गोष्टीचा पडताळा त्यांनी घेतलाच नाही. तो १९१९ मध्ये इतर शास्त्रज्ञांनी घेतला.
मी स्वतः वैज्ञानिक व साक्षात्कारी दोन्हीही नाही. फक्त विज्ञानाचा अभ्यासक आहे तरीही वरील विचार मांडण्यामागे माझी बरट्रेंड रसेल यांनी खाली व्यक्त केलेल्या विचारा ईतकीच अपेक्षा आपणाकडून आहे.
“माझ्या मते गूढवादी तत्त्वज्ञानात शहाणपणाचा गाभा असल्याने त्या तत्त्वज्ञानाचे विडंबन न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ”
असो ! पत्र फारच लांबले. तसदीबद्दल क्षमस्व!
“यमाई’ तंत्रनगर, टिळकनगर,
औरंगाबाद ४३१००४
आपला श्याम कुळकर्णी

पुस्तक परिचय
राखीव जागा : ठोस आक्षेप, रास्त समर्थन सुगावा प्रकाशन, पुणे -३०
लेखक : रा. प. नेने
राखीव जागांचा प्रश्न आणखी पुष्कळ काळपर्यंत जिव्हाळ्याचा राहणार आहे. त्या विषयावरील आपले सुस्पष्ट विवेचन पुणे येथील पुरोगामी चळवळीतील एक विचारवंत, श्री. रा. प. नेने यांनी उपरोक्त पुस्तिकेद्वारा मांडले आहे. विरोधकांचे आणि समर्थकांचे नेमके मद्दे संक्षिप्तपणे मांडून स्वतःची भूमिका त्यांनी विशद केली आहे. पुण्याला श्री. टेक्सस गायकवाड हे ‘असिधारा ‘नावाचे मासिक काढणार आहेत. या मासिकाच्या वतीने श्री. आदरकरांनी विचारलेल्या १४ प्रश्नांची उत्तरे हे या पुस्तिकेचे अंतरंग आहे.
राखीव जागा का द्याव्यात याचे नेन्यांनी मोठे खुबीदार उत्तर दिले आहे. आगगाडीच्या डब्यांत केवळ स्त्रियांसाठी डबे राखीव असतात. तेवढ्या प्रमाणात पुरुषांची जागांची संधी कमी होते. परंतु आत घुसण्याच्या स्पर्धेत स्त्रिया दुबळ्या पडतात म्हणून या आरक्षणाचे आपण समर्थनच करतो ना, याची आठवण ते देतात.
केवळ आर्थिक निकष लावून भागणार नाही हे सांगताना ते आपल्या समाजाची डॉ. आंबेडकरांनी केलेली मीमांसा सांगतात. हा समाज एकावर एक मजले असलेली इमारत आहे. पण तीत शिडी नाही. खालचे कायम खाली राहतात. राखीव जागा ही खालच्यांना वर जाण्याची शिडी आहे. इतर मागासवर्गीय म्हटलेल्या वर्गात बराच सधनवर्ग झाला आहे
तिथे किंवा पुढारलेल्या समाजाच्या ५० टक्के जागांमध्ये आर्थिक निकष लावायला त्यांची हरकत नाही. मंडलआयोगाने काही राज्यातील ब्राह्मणांनाही ‘इतर मागासवर्गीय ठरविण्याची शिफारस केलेली आहे तिकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. उदा. प. बंगालात पतित ब्राह्मण, राजस्थानात महाब्राह्मण इ.
राखीव जागांमळे अपात्र अधिकारी निर्माण होतात का या प्रश्नाचे त्यांचे उत्तर असे की, तामिळनाडू व कर्नाटकात मागासवर्गीय अधिकारी पुष्कळ आले आहेत. पण इतर राज्यांपेक्षा त्या राज्यांचे प्रशासन कमी दर्जाचे झालेले दिसत नाही. शेवटी पात्रता ही तुलनासापेक्ष आहे, संधी व अनुभवाने ती वाढते.
मंडल आयोगात घाईमुळे कित्येक त्रुटी राहिल्या हे श्री. नेन्यांना मान्य आहे. परंतु आयोगाने केवळ नोकऱ्यांपुरती दृष्टी आखूड ठेवली नाही, जमीनसुधारणेपासून स्वयंरोजगारांपर्यंत सवलतीच्या शिफारशी केल्या याकडे लोकांचे दुर्लक्ष होते ही त्यांची खंत आहे. हिंदूंमध्ये इतर मागासवर्गीयांचे जेवढे प्रमाण आहे तेवढेच अहिंदूंच्यामध्येही असेल असे मंडल आयोगाने आधार न देता गृहीत धरणे योग्य कसे? असा त्यांचा सवाल आहे.
जातीचा आधार असुरक्षिततेच्या पोटी घ्यावासा वाटतो, ती नष्ट केल्यावर जातीच्या संकुचित निष्ठा टिकणार नाहीत असा आशावाद श्री. नेन्यांनी व्यक्त केला आहे,
शांतिविहार, सिव्हिल लाईन्स, नागपूर -४४०००१
– प्र. ब, कुळकर्णी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.