आम्ही स्वतंत्र आहों
हल्ली स्त्रियांची स्थिती पाहिली तर त्यांच्यांत कित्येक दुर्गुण शिरले आहेत. त्या सासुरवासांत असल्यामुळे खोटे बोलण्याची त्यांस संवय लागते व मग ती संवय मुलांस लागते. अशा रीतीने देशांतील लोक सत्य, तेज व साहसहीन होतात. आपण सर्वांनी सत्याचे व्रत धरले पाहिजे व तें आमरण चालविले पाहिजे. कोणास वाटेल की, आम्ही स्त्रियांनी काय सुधारणा करावी. आम्ही पडलों परतंत्र. तर मी त्यांस असें सांगते की, आम्ही स्वतंत्र आहों, आम्ही आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण मात्र केले पाहिजे, आमच्यापेक्षा पुरुषर्षास जास्त हक्क अगर स्वातंत्र्य असण्याची काहीएक जरूरी नाही. सध्या पुरुष आमच्यावर अधिक अंमल चालवीत आहेत; व आम्हांस घरांतील इतर वस्तूंप्रमाणे लेखीत आहेत. ह्या स्थितीतून आम्ही आपला उद्धार करून घेण्यास झटले पाहिजे आपण सर्वांनी मिळून एक सभा स्थापन करावी असा माझा हेतु आहे. कोणास वाटेल की हे पुरुषांच्याविरुद्ध बंड आहे आणि पुरुषांच्या विरुद्ध काही करणे हे पाप आहे. त्यास माझें असें उत्तर आहे की, आपण हल्ली पुष्कळ मोठे पाप करीत आहों. पुष्कळ पुरुष वाईट गोष्टी करितात. आपण त्याविषयी निषेध न करितां स्वस्थ बसतों हेच मोठे पाप आहे. आपणांस अनीतीची किंवा अन्यायाची गोष्ट करावयाची नाही तर न्याय आणि नीति ह्यांस अनुसरूनच चालावयाचे आहे. द्रव्यसाहाय्य करणे हेहि आपल्याला कठिण नाही. उगीच काहीतरी भाकडकथा सांगणारे जे पुराणिक त्यांस आम्ही स्त्रिया द्रव्य पुरवीत असतो. त्यांच्या कुटुंबास दागदागिन्यांनी मढवितो त्यातूनच अशा सभेच्या कार्यासाठी थोडें द्रव्यसाहाय्य करावयाचे मनांत आणिल्यास तें मुळीच जड जावयाचें नाही. ‘पंडिता रमाबाई ह्यांचा इंग्लंडचा प्रवास’