अलीकडल्या इंग्रज लोकांनी किंवा युरोपातील दुसऱ्या कोणत्याही लोकांनी कितीही शेखी मिरविली तरी ज्या आम्ही इतक्या पुरातन काळी येवढी मोठी सुधारणा करून बसलो त्या आमच्यापुढे त्यांची मात्रा बिलकुल चालावयाची नाही! …. पण या एककल्ली देशाभिमान्यांना आम्ही असे विचारतो की, बाबांनो, तुम्ही अशा प्रकारे गतवैभवाचे गाणे गाऊ लागला म्हणजे तुमच्या पक्षाचे मंडन न होता उलट मुंडण होते! इंग्रज लोक रानटी होते त्या वेळेस जर तुम्ही इतके सुधारलेले होता, तर आताही त्यांच्यापेक्षा अधिक सुधारलेले असायला पाहिजे होता. पण तसे तर तुम्ही खचित नाही! तेव्हा हे सिद्ध आहे की केव्हातरी तुमच्या सुधारणेस खळ पडला असावा; किंबहुना ती मागेच हटू लागली असावी; कारण सुधारणा ही स्थिर वस्तू नाही; ती पुढे चालेल किंवा मागे सरेल, आमची सुधारणा क्षणैक निश्चल होऊन मग तिची पिछेहाट होऊ लागली असावी असे मानल्याखेरीज ज्यांस आम्ही रानटी म्हणत होतो ती राष्ट्रे दोन हजार वर्षांच्या अवकाशात आम्हापुढे इतकी कशी गेली याचा उलगडा होत नाही. सु आमच्या फार पाठीमागे होते, त्यांनी आम्हांस गाठले, इतके असे आपल्या स्थितीवरून कबूल करावे लागणे यात आमच काही नाही.