द्वितीयावृत्तीत ( १९८७ ) पदार्पण केलेले ‘चार्वाकदर्शन’ हे डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे उपलब्ध ग्रंथांच्या मदतीने चार्वाकमताचे विवेचन करण्याचा प्रयत्न होय. चार्वाकदर्शन हे एक नास्तिक दर्शन, वैदिक परंपरेची चाकोरी सोडून अनुभव व त्यावर आधारलेली विचारप्रणाली निर्भीडपणे मांडणारे. त्यामुळे इतर दर्शनांच्या तुलनेत त्याचे वेगळेपण जाणवते. दुर्दैवाने भारतात या दर्शनाची सदैव उपेक्षाच झाली. जडवादाचा पुरस्कार करणारे हे दर्शन खऱ्या अर्थाने ‘दर्शन’ (तत्त्वज्ञान) नाहीच, हे दर्शन लिहिणाऱ्या व्यक्ती व त्यांचे अनुयायी अगदीच यथातथा बौद्धिक कुवत असलेल्या व्यक्ती असून हे अत्यंत हास्यास्पद असे दर्शन आहे, अशी याच्याविषयीची अन्य दार्शनिकांची व विद्वानांची भूमिका आहे. यामुळे अन्य तत्त्वज्ञांनी चार्वाकदर्शनाला पूर्वपक्ष मानून त्याचे खंडन व आपल्या मतांचे मंडन केले. पण असे करीत असताना चार्वाकांच्या प्रत्युत्तराचा कोठे उल्लेख झाल्याचे दिसत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे चार्वाकांची ग्रंथसंपदाच अस्तित्वात नाही. चार्वाकांचे तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ पाण्यात बुडवून किंवा जाळून नष्ट करण्यात आले असावेत याचा पुरावा उपलब्ध आहे. (पृ. ४) या व्यतिरिक्त जे ग्रंथ वैदिकांच्या तावडीतून वाचले, त्यांतील महत्त्वाचे भाग काढून टाकून नवीन भागांचा प्रक्षेप करण्याचे काम’ वैदिक अनुयायांनी केले असावे असे गरुडपुराणातील पुराव्याच्या आधारे डॉ. साळुंखे म्हणतात. अशा स्थितीत चार्वाकांचे तत्त्वज्ञान खरोखर काय होते हे पाहणे आवश्यक असल्याने त्यांच्या वाट्याला आलेल्या या तिरस्काराचे आणि या तिरस्कारापोटी करण्यात आलेल्या भल्याबुऱ्या असंख्य आरोपांचे आवरण भेदून त्यांच्या मूळ स्वरूपापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न’ या ग्रंथात डॉ. साळुंखे यांनी केलेला आहे. (पृ.११)
या पुस्तकात दर्शनातील विविध विषय डॉ. साळुंखे यांनी कसे हाताळले आहेत हे पाहण्यापूर्वी चार्वाकांबद्दल थोडे लिहिणे आवश्यक आहे. या दर्शनाचे ग्रंथ अस्तित्वात नाहीत हे पूर्वी आलेच आहे. न्याय किंवा वैशेषिक किंवा वेदान्त या दर्शनातील तत्त्वज्ञांच्या परंपरेप्रमाणे येथे कोणतीही परंपरा सध्या नाही असे दिसते; आणि असलीच तरी आता तिचे अवशेषही उरलेले नाहीत. ह्या दर्शनाचा प्रणेता बृहस्पती मानला जातो. हा देवांचा गुरू होता. चार्वाकदर्शनाच्या संदर्भात मूळ ग्रंथरचना काय होती व भाष्यादि ग्रंथ होते काय याची फारशी माहिती उपलब्ध नाही. आपल्या पुस्तकात यासंबंधी थोडा खुलासा डॉ. साळुंखे यांनी केला असता तर पुस्तकाच्या उपयुक्ततेत भर पडली असती. प्रस्तुत पुस्तकात ‘नैषधचरित’, ‘त्रिषष्टिशलाकापुरुषचरित’ व ‘महामोहकृत’ हे ग्रंथ ‘प्रबोधचंद्रोदय’ या व्यतिरिक्त अन्य कसलीच माहिती मिळत नाही. तरीही ही एक खंडित परंपरा होती व चार्वाकमताचे पुरस्कर्ते, सर्वतऱ्हेचे अपमान, तिरस्कार, उपेक्षा आदि सहन करीत धैर्याने आपल्या मतांचे दीर्घकालपर्यंत प्रतिपादन करीत असले पाहिजेत असे मानण्यास हरकत नाही.
प्रस्तुत पुस्तकात एकूण आठ प्रकरणे असून त्यांपैकी ‘चार्वाकांचा प्रमाणविचार’ या ज्ञानमीमांसीय प्रकरणाव्यतिरिक्त अतिभौतिकीय विषयांचा, म्हणजे देहात्मवाद, धर्म, यज्ञ, मोक्ष, कर्मसिद्धान्त, स्वभाववाद यांचा विचार डॉ. साळुंखे यांनी आपल्या समोर मांडला आहे. याव्यतिरिक्त चातुर्वर्ण्य, वार्ता, ऋणसंकल्पना, दण्डनीती या कल्पनांचाही चार्वाकांनी कसा विचार केलेला आहे याचेही विवेचन या पुस्तकात आलेले आहे. या सर्व विवेचनातून एक विवेकवादी सूत्र आपल्यासमोर व्यक्त होते. ते सूत्र असे : आपल्या सभोवताली जे जग पसरले आहे, त्याचे ज्ञान आपल्याला ऐंद्रिय संवेदनांनी प्राप्त होते. मानवी बुद्धीच्या साहाय्याने या संवेदनांचे वस्तुबोधात रूपांतर होते. इंद्रियानुभवाच्या कक्षेतील वस्तूच खऱ्या अर्थाने ‘आहेत’ असे म्हणता येते; या व्यतिरिक्त अन्य वस्तू ‘आहेत’, पण त्यांचे अनुभवजन्य ज्ञान आपणास होते असे म्हणण्यास आपल्याजवळ फारसा आधार नाही. काय अस्तित्वात आहे व काय नाही, कशाचे ज्ञान मानवी बुद्धीला होऊ शकते व कोणत्या वस्तू या ज्ञानकक्षेच्या बाहेर आहेत याचे समर्पक व अंतिम उत्तर मानवी बुद्धीच केवळ देऊ शकते. सारांश, जिला आधुनिक काळात विवेकवादी विचारसरणी म्हणतात तशीच वैचारिक भूमिका चार्वाकांच्या प्रतिपादनातून व्यक्त होते असे दिसून येते.
प्रमाणविचाराच्या बाबतीत चार्वाकांच्या भूमिकेसंबंधी सर्वसाधारण मत असे आहे की त्यांनी अनुमान हे प्रमाण नाकारले. यासंबंधात डॉ. साळुंखे म्हणतात की चार्वाकांच्या युक्तिवादांना युक्तिवादांनीच प्रत्युत्तर देण्याऐवजी. वैदिकांनी वितंडवादी व अनुमानविरोधक असा प्रचार त्यांच्याविरुद्ध करण्यास सुरुवात केली. (पृ. ३५-३६) यासंबंधीची वस्तुस्थिती अशी आहे की व्यवहारासाठी आवश्यक असलेले अनुमानप्रमाण स्वीकारून त्यासाठी लागणारे व्याप्तिज्ञानही त्यांनी मान्य केले. उदा. ‘जेथे जेथे धूर असतो तेथे तेथे अग्नी असतो’ अशासारख्या व्याप्तिज्ञानाच्या साहाय्याने पर्वतावर अग्नी असला पाहिजे, अशी अनुनिती करता येते हे त्यांना मान्य होते. पण ईश्वर, परलोक, आत्मा व मोक्ष यासंबंधीची अनुमाने मात्र त्यांनी त्याज्य ठरविली. (पृ. ३८) याचे कारण असे की अनुभवाच्या कक्षेतील हेतुपद व त्याबाहेरील अतींद्रिय साध्यपद यांचा संबंध जोडता येत नाही व त्यामुळे व्याप्तिज्ञान शक्य होत नाही हे महत्त्वाचे वास्तव त्यानी प्रतिपादले. डॉ. साळुंखे म्हणतात त्याप्रमाणे ‘ …चार्वाकांनी तर्कशास्त्राचे नियम पाळण्यासाठीच अलौकिक अनुमान नाकारले आहे, मोडण्यासाठी नव्हे.’ (पृ. ३९).
व्यावहारिक अनुमानाचा स्वीकार जरी चार्वाक करीत असले, तरी ज्ञानप्राप्तीचे हे साथन ‘तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मात्र संदिग्ध मानण्याचा प्रसंग येतो.’ (पृ. ४१) याचे वर्णन डॉ. साळुंखे ‘तात्त्विक पातळीवरून अनुमानाला (केलेला) विरोध’ असे करतात. यातील मुख्य विचार असा की जरी भूतकाळात घूम व अग्नि यांचे साहचर्य अनुभवाला आलेले असले तरी ते भविष्यकाळातही टिकून राहील याची खात्री देता येत नाही. शंकराचार्यांनी दिलेल्या उदाहरणानुसार गुराख्यांच्या मडक्यात साठवून ठेवलेला केवळ धूर असू शकतो पण त्यावरून अग्नीची अनुमिती करता येत नाही. तात्त्विक पातळीवरून अनुमानाला विरोध म्हणजे व्याप्तिज्ञानाला विरोध होय. अनुभवाधारित विशिष्ट विधानांपासून सामान्यीकरणाने प्राप्त झालेली विधाने कितपत सत्य असतात हा येथे मुख्य प्रश्न असून पाश्चात्य तत्त्वज्ञानात या प्रश्नाचा बराच ऊहापोह झालेला आहे. याला ‘ उद्गमनाची समस्या’ असे नाव असून अशी सत्य विधाने मिळणे दुरापास्त आहे या निष्कर्षाप्रत डेव्हिड ह्यूम व अन्य तत्त्वज्ञ आले आहेत. प्राचीन काळी या समस्येचा आपल्या पद्धतीने विचार करून चार्वाकही याच निष्कर्षाप्रत आले होते, ही गोष्ट कौतुकास्पद मानली पाहिजे. तात्त्विक आणि व्यावहारिक अशा दोन्ही स्तरांवरून विचार करून त्यांनी या प्रमाणच्या सीमा निश्चित करण्याचा प्रयत्न केला यातून त्यांची तार्किकीय मर्मदृष्टी (logical Insight) प्रत्ययास येते.
अनुमानाप्रमाणेच तात्त्विक पातळीवरून शब्दप्रमाणही स्वीकारता येत नाही असा युक्तिवाद करून या प्रमाणाविषयी चार्वाक खालील निष्कर्षांप्रत येतात. (१) अलौकिकांचे अस्तित्व सांगणाऱ्या शब्दाला प्रामाण्य नाही; (२) लौकिकाच्या क्षेत्रातही शब्दाला तत्त्विक पातळीवरून मान्यता देता येत नाही; (३) परंतु शब्दाधारे लौकिक व्यवहार मात्र पार पाडता येतात. (पृ. ४४) त्यामुळे वेदप्रामाण्य त्यांनी नाकारले.
इंद्रियानुभवाचे क्षेत्र हेच ज्ञानाचे क्षेत्र आहे असे एकदा म्हटल्यानंतर त्याबाहेरील कोणत्याच अनुभवाबाबत यथार्थपणे बोलता येत नाही, हे ओघानेच आले; त्यामुळे चार्वाकदर्शन आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष, कर्मसिद्धान्त, अंतिम (पारमार्थिक) सत्य या सर्व कल्पना त्याज्य ठरविते. आत्मकल्पनेऐवजी देह हाच आत्मा हे नवीन मत चार्वाक मांडतात. त्यांच्या मते पुनर्जन्माची कल्पना मान्य होण्यासारखी नाही, कारण ही कल्पना आत्म्याच्या अशरीरित्वावर आधारलेली आहे. चार्वाक म्हणतात, ‘जोपर्यंत चेतन देह असतो, तोपर्यंत त्याच्या इच्छेनुसार हालचाली घडतात. एकदा चेतन देहाचा नाश झाला की पुनर्जन्म नाही’. (त्रिषष्टिशलाकापुरुषचरित). तसेच प्रबोध चंद्रोदय या ग्रंथाचा कर्ता विचारतो, ‘मृत झालेल्या शरीरातून बाहेर पडून वेगळे रूप धारण केलेला जीव कोणी पाहिला आहे काय?’ (पृ.६०).
कर्मसिद्धान्तदेखील अनुभवाच्या कसोटीवर उतरत नाही म्हणून चार्वाक अमान्य करतात. हा सिद्धान्त अमान्य करण्यात केवळ अनुभववादी दृष्टिकोन होता असे नाही, तर त्याचे होणारे सामाजिक दुष्परिणाम चार्वाकांना जाणवत होते. सद्यःकालीन जीवनातील सुखदुःखांना आपले पूर्वजन्मींचे कर्मच जबाबदार असल्याने त्याबद्दल अन्य कोणाला जबाबदार धरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे विषमता, अन्याय आदि नष्ट करण्यासाठी प्रचलित सामाजिक व्यवस्थेतील बदल आवश्यक वाटत नाही. प्रयत्नवादाला खीळ बसून अनेक प्रकारची अशिवे (evils) समाजात ठाण मांडून बसतात. तेव्हा कर्मसिद्धान्त नाकारण्याचा चार्वाकांचा निर्णय सामाजिक दृष्ट्या फार महत्त्वाचा वाटतो. या सिद्धांताबरोबरच ईश्वर, परलोक व मोक्ष या कल्पनाही चार्वाक त्याज्य ठरवितात. जगाचे रहाटगाडगे स्वभाववाद’ या सिद्धान्तानुसार चालते असे प्रतिपादन चार्वाक करतात. स्वभाववाद म्हणजे एक प्रकारचा निसर्गवाद–एक नियमबद्ध व्यवस्था. चार पुरुषार्थापैकी अर्थ व काम हे दोनच पुरुषार्थ आहेत असे चार्वाक मानतात. ऐहिक जीवन व्यतीत करताना इहलोकीचेच सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा याचा चार्वाक आग्रह धरतात. हे सुख प्राप्त करताना स्वैराचाराने किंवा गैरमार्गाने दुसऱ्याचे सुख हिरावून घेऊन स्वतः सुख भोगावे असे चार्वाक कोठेच प्रतिपादन करताना दिसत नाहीत. सुखाच्या बाबतीत एक संयमित विचारी भूमिका ते स्वीकारतात. उदा. नैषधचरितात चार्वाक म्हणतात, ‘तर्कम पुरुषः कुर्याद् येनान्तें सुखमेधते'(असे कर्म माणसाने करावे की ज्यामुळे अखेरीस सुखच प्राप्त होईल.) यातून चार्वाकांची जीवनाबद्दलची विचारी दृष्टी व्यक्त होते. अलौकिक शब्द नाकारल्याबरोबर यज्ञसंस्था मोडीत निघाल्याप्रमाणे होते. यज्ञाने पुण्य, पर्जन्यादि. प्राप्त होतात हे प्रतिपादन अनुभवावर टिकणारे नाही. यज्ञातील पशुबळीच्या समर्थनार्थ याज्ञिक असा युक्तिवाद करतात की यज्ञात बळी दिलेला पशु स्वर्गात जातो. जर हे खरे असेल तर यजमान आपल्या पित्याला स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञात बळी का देत नाहीत असा परखड प्रश्न चार्वाक विचारतात.
वरील सर्व विवेचनावरून असे दिसते की चार्वाकांनी काही जगावेगळे तत्त्वज्ञान मांडले नाही. जे प्रतिपादन त्यांनी केले त्यामागे त्यांची एक वास्तववादी भूमिका होती, जीवन चांगल्या त-हेने जगण्याची ती एक विशिष्ट पद्धत होती. चार्वाकांनुसार जीवन एक वास्तव आहे, भास अथवा भ्रम नव्हे. जगणे आणि आनंदाने जगणे हा जीवनाचा एकमेव उद्देश असून त्यासाठी पारलौकिक कल्पना उराशी बाळगण्याची गरज नाही असे त्यांनी प्रतिपादन केले. मानवनिर्मित आणि विवेकाधिष्ठित समाजव्यवस्था मानवी जीवनातील सर्व उद्देश पूर्ण करील असे त्यांनी मानले व त्यानुरूप विविध विचार व्यक्त केले. (पृ. ११८)
प्रस्तुत पुस्तक सर्वसामान्यांसाठी लिहिले आहे असे डॉ. साळुंखे प्रस्तावनेत म्हणतात. परंतु आपल्या प्रतिपादनाच्या समर्थनार्थ त्यांनी पुरेशी अवतरणे व युक्तिवादही दिलेले आहेत. त्य मुळे प्रस्तुत पुस्तक चार्वाक दर्शनावरील एक उपयुक्त ग्रंथ ठरतो. या पुस्तकाची भाषा सोपी व ओघवती आहे. सर्वस्वी उपेक्षित अशा चार्वाकदर्शनाबाबत सहानुभूती व त्यांच्या विचारसरणीबद्दल आदर दाखवणारे हे पुस्तक कोठेही अतिरंजित झाल्याचे दिसत न ही. तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक मौल्यवान ठरेलच, पण सर्वसामान्य व्यक्तींनी देखील वाचावे असे हे पुस्तक आहे.
३, कर्मयोग अपार्ट टस. सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर- ४४००१२