मानवी जीवनात प्रेमाचे स्थान
बहुतेक सर्व समाजांची प्रेमविषयक अभिवृत्ती (attitude) दुहेरी राहिली आहे. एका बाजूला प्रेम काव्य, कादंबरी आणि नाटक यांचा प्रमुख विषय आहे; आणि दुसऱ्या बाजूला बहुतेक समाजशास्त्रज्ञांचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असते, आणि आर्थिक किंवा सामाजिक सुधारणांच्या योजनांत प्रेमाचा समावेश अभीष्ट उद्देशात केला जात नाही. मला ही अभिवृत्ती समर्थनीय वाटत नाही. प्रेम ही मानवी जीवनातील अति महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे असे मी मानतो, आणि ज्या व्यवस्थेत प्रेमाच्या अनिरुद्ध विकासात विनाकारण अडथळे आणले जातात ती व्यवस्था वाईट असे मी समजतो.
जेव्हा ‘प्रेम’ हा शब्द उचितार्थाने वापरला जातो तेव्हा त्याने स्त्री आणि परुष यांच्यामधील यच्चयावत संबंध निर्दिष्ट होत नाहीत. तर ज्यात भावनेचे प्राधान्य असते आणि जो शारीरिक तसाच मानसिकही आहे असा संबंध त्याने अभिप्रेत असतो. त्याच्या तीव्रतेची मात्रा कितीही मोठी असू शकेल. Tristan and Isolde मध्ये व्यक्त झालेल्या भावना असंख्य स्त्रीपुरुषांच्या भावनांशी जुळणाऱ्या आहेत. प्रेमाच्या भावनेची कलात्मक अभिव्यक्ती करणे ही क्वचित् आढळणारी गोष्ट आहे. पण ती भावना मात्र, निदान युरोपमध्ये, विरल नाही. ती काही समाजात इतर समाजांहून अधिक प्रमाणात आढळते, आणि ही गोष्ट, मला वाटते, त्या समाजातील लोकांच्या स्वभावावर अवलंबून नसून, त्यातील रूढी आणि संस्था यांवर अवलंबून असते. चीनमध्ये प्रेम ही गोष्ट क्वचित आढळणारी आहे, आणि तिचा आविर्भाव इतिहासात दुर्गुणी सम्राटांच्या वागण्यात, त्यांच्या रखेल्यांच्या दृष्ट कारवायांमुळे होतो. पारंपारिक चिनी संस्कृतीत सर्वच प्रबल भावना आक्षेपार्ह मानल्या जात, आणि मनुष्याने आपल्यावरील विवेकाचे आधिपत्य सर्व परिस्थितीत कायम राखावे अशी अपेक्षा असे. या बाबतीत ती संस्कृती इथल्या अठराव्या शतकाच्या आरंभीच्या संस्कृतीसारखी होती. मानवी जीवनातील विवेकाचे प्राबल्य राणी ॲनच्या काळी मानले जाई तेवढे नाही, याची कल्पनात्मवादी आंदोलन (Romantic Movement), फ्रेंच राज्यक्रांति आणि महायुद्ध यांतून गेलेल्या आपल्याला जाणीव आहे. आणि मनोविश्लेषणाचा सिद्धांत निर्माण करून विवेकाने स्वतः फितुरीच केली आहे. आधुनिक जीवनातील तीन प्रमुख न-विवेकी (nonrational) उद्योग म्हणजे धर्म, युद्ध आणि प्रेम; आणि ही सर्व जरी नविवेकी असली तरी प्रेम विवेकविरोधी ( antirational) नाही. म्हणजे विवेकी मनुष्याला ते अस्तित्वात आहे याबद्दल आनंद वाटू शकेल. या पूर्वीच्या प्रकरणात आपण विचारात घेतलेल्या कारणांमुळे आधुनिक जगात धर्म आणि प्रेम यांत काही प्रमाणात विरोध आढळतो. हा विरोध अनिवार्य आहे असे मला वाटत नाही. त्याचे मुख्य कारण ख्रिस्ती धर्म तापस वृत्तींत रुजलेला आहे हे आहे.
परंतु प्रेमाला धर्मापेक्षाही अधिक भयावह असा आणखी एक शत्रू निर्माण झाला आहे काम (work) आणि आर्थिक यश यांचे खूळ. मनुष्याने प्रेमाला आपल्या व्यवसायात ढवळाढवळ करू देऊ नये, जो करू देईल तो मूर्ख समजावा, असे अलीकडे सामान्यपणे, विशेषतः अमेरिकेत, मानले जाते. परंतु अन्य क्षेत्राप्रमाणेच याही क्षेत्रात समतोल राखणे अवश्य आहे. प्रेमाखातर व्यावसायिक यशाचा बळी देणे हे जरी क्वचित् करुण आणि धीरोदात्त कृत्य असले तरी सामान्यपणे ते मूखर्पणाचेच कृत्य होईल; परंतु व्यवसायाकरिता प्रेमाचा बळी देणे हेही तितकेच मूर्खपणाचे होईल, आणि त्यात धीरोदात्ततेचा अंशही असणार नाही. परंतु पैशाकरिता चाललेल्या सर्वंकष झटापटीवर आधारलेल्या समाजात हे घडते, ‘एवढेच नव्हे तर अपरिहार्यपणे घडते. आजच्या एखाद्या प्रातिनिधिक व्यापाऱ्याच्या, ( businessman), विशेषतः अमेरिकेतील व्यापाऱ्याच्या, जीवनाचा विचार करा. वयात आल्यापासून तो आपला सर्वोत्तम विचार आणि सर्वोत्तम शक्ती व्यापारातील यशाकरिता वापरतो; बाकी सर्व गोष्टी गैरमहत्त्वाच्या आणि केवळ मनोरंजनार्थ आहेत असे मानतो. तरुण असताना तो आपली शारीरिक भूक वेश्यांकडे जाऊन भागवितो. लवकरच तो लग्न करतो. पण त्याच्या आवडीचे विषय बायकोच्या आवडीच्या विषयांहून सर्वथा भिन्न असतात आणि त्याचा तिच्याशी खरा गाढ परिचय कधीच होत नाही. तो ऑफिसमधून थकून उशीरा घरी येतो. तो सकाळी बायको जागी व्हायच्या आधी उठतो. रविवार तो गोल्फ खेळण्यात घालवितो, कारण पैसा कमविण्याच्या उद्योगाकरिता समर्थ राहण्याकरिता व्यायाम आवश्यक असतो. पत्नीच्या आवडी त्याला बायकी वाटतात, आणि जरी त्या त्याला पसंत असल्या तरी त्यात सहभागी होण्याचा तो कसलाही प्रयत्न करीत नाही. तो कामानिमित्त बाहेरगावी जातो तेव्हा तो वेश्यांकडे जातो; परंतु त्याला जसा विवाहांतर्गत प्रेमाला वेळ नसतो, तसाच विवाहबाह्य अवैध प्रेमालाही नसतो. त्याची पत्नी त्याच्या संबंधात बहुधा विरक्त राहते. ह्यात आश्चर्य मुळीच नसते, कारण तिचे प्रियाराधन करायला त्याला कधी वेळच नसतो. तो नेणिवेत असंतुष्ट असतो, पण ते त्याला कळत नाही. तो आपला असंतोष मुख्यतः कामात बुडवितो, पण त्याचबरोबर काही फारशी स्पृहणीय नसलेली कृत्येही करतो. उदा. मुष्टियुद्धासारख्या स्पर्धा पाहण्यातून किंवा कॉम्युनिस्ट आणि इतर डाव्या कार्यकत्याच्या छळातून मिळणारे दुष्ट सुख मिळविण्याची. त्याची बायको त्याच्या इतकीच असंतुष्ट असते; ती दुसऱ्या दर्जाच्या संस्कृतीत त्या असंतोषाला वाट करून देते, आणि तसेच ज्याची जीवने उदार आणि मोकळी आहेत अशा लोकांविरुद्ध सद्गुणाची बाजू घेऊन तो असंतोष व्यक्त करते. अशा रीतीने नवरा आणि बायको या दोघांचेही लैंगिक असमाधान मनष्यजातीच्या द्वेषात रूपांतरित होते, आणि तो समाजहितैषित्व आणि उच्च नैतिक आदर्श यांचा बुरखा पांघरून व्यक्त होतो. ही दर्दैवी परिस्थिती प्रामख्याने आपल्या लैंगिक गरजांविषयीच्या चुकीच्या समजुतीमुळे निर्माण होते. सेंट पॉलचे मत असे असल्याचे दिसते की विवाहाचा उद्देश लैंगिक व्यवहाराची संधी उपलब्ध करून देणे एवढाच आहे. आणि या मताला ख्रिस्ती नीतिमार्तंडांनी सामान्यपणे पाठिंबा दिलेला आहे. त्यांना वाटणाऱ्या कामविषयक अप्रीतीने लैंगिक जीवनाच्या सुंदर अंगांविषयी ते अंध झाले होते, आणि त्यामुळे त्यांना अभिप्रेत असलेले शिक्षण तारुण्यात ज्यांच्या वाट्याला आले ते आपल्या सौख्यशक्तींच्या बाबतीत अज्ञ राहिले. प्रेम हे केवळ संभोगेच्छेहून काहीतरी आणि कितीतरी अधिक आहे; बहुतेक स्त्रीपुरुष जवळपास आयुष्यभर ज्या एकाकीपणाने व्यथित होतात त्यातून सुटण्याचा एक प्रमुख उपाय प्रेमात सापड़तो. बहुतेक माणसांच्या मनांत निष्ठुर जगाचे आणि समूहाकडून होऊ शकणाऱ्या क्रौर्याचे एक खोल रुजलेले भय असते. त्यांना स्नेहाची उत्कंठा असते. परंतु दुर्दैवाने ही उत्कंठा पुरुषात रूक्षता, ग्राम्यता आणि दांडगेपणांच्या आवरणाखाली. आणि स्त्रियांच्या बाबतीत तक्रारखोरी आणि कर्कशत्व यांच्या आवरणाखाली लपलेली असते. परस्परांच्या उत्कट स्नेहाने हा अनुभव नाहीसा होतो; त्यामुळे अहंच्या कठोर भिंती जमीनदोस्त होतात आणि दोन व्यक्तींमधून एक व्यक्ती निर्माण होते. मनुष्यप्राण्याने एकटे राहावे अशी निसर्गाची योजना नाही, कारण त्यांचे जीवशास्त्रीय प्रयोजन ते दुसऱ्याच्या मदतीशिवाय पुरे करू शकत नाहीत. आणि नागरित (civilized) मनुष्यांची लैंगिक सहजप्रवृत्ती स्नेहावाचून पूर्णपणे शांत होऊ शकत नाही. मनुष्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व, शरीर तसेच मानसही, त्या संबंधात सहभागी झाल्याशिवाय त्या सहजप्रवृत्तीचे पूर्ण समाधान होऊ शकत नाही. ज्यांना सुखी परस्परस्नेहाच्या गाढ सौहृदाचा आणि उत्कट सख्याचा अनुभव मिळालेला नाही त्यांनी जीवनात प्राप्य अशी सर्वोत्तम गोष्ट गमावली आहे. त्यांना हे जाणवते, जाणतेपणे नसले तरी अजाणतेपणे जाणवते, आणि त्यातून उद्भवणाऱ्या आशाभंगामुळे त्यांचा कल हेवा, छलना आणि क्रौर्य यांकडे होतो. म्हणून उत्कट स्नेहाला त्याचे उचित स्थान देण्याची आवश्यकता ही गोष्ट समाजशास्त्रज्ञाने लक्षात ठेवली पाहिजे; कारण जर स्त्रीपुरुषांना हा अनुभव मिळाला नाही, तर त्यांची वाढ पूर्ण होऊ शकत नाही, आणि त्यांना जगाविषयी स्नेह वाटणे अशक्य होते. याचा परिणाम असा होतो की त्यांचे सामाजिक व्यवहार बहुधा अपायकारक होतात.
बहुतेक स्त्रिया आणि पुरुष यांना संधी मिळाली तर जीवनात केव्हातरी त्यांना उत्कट प्रेमाचा अनुभव येतो. परंतु अननुभवी लोकांना उत्कट प्रेम आणि निव्वळ आकर्षण यांतील भेद ओळखता येत नाही. प्रियकराखेरीज अन्य कोणाही पुरुषाचे चुंबन घेणे आपल्याला आवडणे शक्य नाही ही गोष्ट ज्या मुलीच्या मनावर बिंबवली गेली आहे तिच्याबाबतीत हे विशेषच खरे आहे. विवाहसमयी वधूने कुमारी असण्याची अपेक्षा असेल तर एखाद्या तात्कालिक आणि किरकोळ लैंगिक आकर्षणाने तिची फसगत होऊ शकते; परंतु जिला लैंगिक अनुभव आहे अशी स्त्री त्याने फसणार नाही. असुखी विवाहांचे एक मुख्य कारण हेच राहिले आहे हे निःसंशय. जिथे परस्परस्नेह आहे तिथेही असा स्नेह पापमय आहे या समजुती वैवाहिक सुखात अडथळा येतो. अशी समजूत क्वचित सयुक्तिक आधार असू शकते. पार्नेलने व्यभिचार करताना पाप केले हे निःसंशय, कारण त्यामुळे आयर्लंडच्या आकांक्षा अनेक वर्षे पुढे ढकलाव्या लागल्या. पण जिथे पापभावना निराधार असते, तिथेही तिने स्नेहाचे वाटोळे होते. जर प्रेमाचे शक्य ते सर्व फायदे मिळवायचे असतील तर प्रेम मुक्त, उदार, अनिर्बंध आणि निःशंक असले पाहिजे.
रूढ शिक्षणपद्धतीमुळे प्रेमाला, विवाहांतर्गत प्रेमालाही, जी पापभावना चिकटते तिचे व्यवहार पुष्कळदा स्त्रिया आणि पुरुष दोघांतही उपसंज्ञेत (subconscious) होतात, आणि हे केवळ परंपरेला चिकटलेल्या लोकांतच नव्हे, तर ज्यांची जाणिवेतील मने मुक्त आहेत अशाही लोकांत घडते. या अभिवृत्तीचे ( attitude) परिणाम विविध असतात. त्यांच्यामुळे पुरुष आपल्या प्रेमव्यवहारात पुष्कळदा पाशवी, ग्राम्य आणि सहानुभूतिशून्य होतात, कारण स्त्रीच्या भावना जाणून घेण्याकरिता तिच्याजवळ ती भावना बोलून दाखविण्याचा हिय्या ते करू शकत नाहीत आणि तसेच अंतिम कर्माकडे हळूहळू गेल्याने स्त्रीचे समाधान पूर्ण होते या गोष्टीचे महत्त्व ते ओळखत नाहीत. खरे म्हणजे स्त्रीलाही सौख्य व्हावे ह्या गोष्टीची त्यांना जाणीवच नसते, आणि तिला जर सुख होत नसेल तर तो तिच्या प्रियकराचा दोष आहे हेही ते ओळखत नाहीत. ज्यांचे शिक्षण सनातनी पद्धतीने झालेले असते अशा स्त्रियांना पुष्कळदा आपल्या उदासीनतेचा एक प्रकारचा अभिमान असतो; आणि त्याच्या जोडीला अतिरेकी शारीरिक संयम आणि शारीर सख्याची (physical intimaty) नाखुषीही असते. कुशल प्रियाराधनही करणारा पुरुष बहुधा या कातरतेवर मात करू शकतो; पण जर तो या गोष्टींचे साध्वी स्त्रीचे लक्षण म्हणून कौतुक करत असेल तर त्याच्याने त्यांच्यावर मात होणार नाही, आणि त्यामुळे अनेक वर्षे गेल्यानंतरही पतिपत्नींचे संबंध तणावाचे आणि औपचारिकच राहतील. आपल्या आजोबांच्या काळी पतीची आपल्या पत्नीला विवस्त्र पाहण्याची अपेक्षाच नसे, आणि त्यांच्या पत्नीलाही अशा इच्छेमुळे धक्काच बसला असता. ही अभिवृत्ति आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक प्रमाणात प्रचलित आहे, आणि जे याच्या पलिकडे गेलेले आहेत त्यांचाही जुना प्रतिबंध पुष्कळदा कायम असतो.
आधुनिक जगतात प्रेमाचा पूर्ण विकास होण्याच्या मार्गातील आणखी एक मानसिक अडथळा आहे, आणि तो म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व आपण अखंड राखू शकणार नाही ही अनेक मनुष्यांना वाटणारी भीती. हे एक मूर्खपणाचे आणि काहीसे आधुनिक भय आहे. व्यक्तिमत्त्व हे काही अंतिम साध्य नव्हे; ती एक अशी गोष्ट आहे की जिला जगाशी फलदायी संपर्कात यावे लागते, आणि तसे करताना आपला विभक्तपणा विसरावा लागतो. काचेच्या घरात जपून ठेवलेले व्यक्तिमत्त्व कोमेजून जाते; परंतु जे मुक्तपणे मानवी संपर्कात येते ते समृद्ध होते. स्नेह, अपत्ये आणि आपले काम हे व्यक्ती आणि बाकीचे जग यांचा संपर्क फलदायी करणारे मोठे स्रोत आहेत. यांच्यापैकी प्रेम हे कालक्रमाने पहिले असते. तसेच ते वात्सल्यभावाच्या उत्तम वाढीकरिता अत्यावश्यक असते; कारण मुलांमध्ये माता आणि पिता दोघांचेही गुण उतरण्याचा संभव असतो, आणि जर त्याचे परस्परांवर प्रेम नसेल तर ती दोघे मुलांमध्ये उतरलेल्या आपल्या स्वतःच्या गुणांनी आनंदित होतील, आणि अन्य गुणांनी रुष्ट होतील. कामामुळे मनुष्य बाह्य जगाशी फलदायी संपर्कात येईलच असे नाही. ते आपण ज्या वृत्तीने कामाचा स्वीकार करतो त्यावर अवलंबून असते. ज्या कामाचा हेतू केवळ पैसा आहे त्यात हे मूल्य असू शकत नाही. त्याकरिता कामात एक प्रकारची समर्पणाची भावना असावी लागते, मग ते समर्पण एखाद्या व्यक्तीला केलेले असेल, एखाद्या वस्तूला असेल, किंवा एखाद्या दर्शनाला (vision) केलेले असेल. आणि स्नेह जर केवळ स्वामित्वप्रेरित असेल तर तो निर्मूल्य असतो. अशा प्रेमाची आणि केवळ पैशाकरिता केलेल्या कामाची पातळी सारखीच असते. ज्या प्रकारच्या मूल्याविषयी मी बोलतो आहे ते प्रेमात असण्याकरिता प्रिय व्यक्तीचा अहं आपल्या स्वतःच्या अहं इतकाच महत्त्वाचा वाटला पाहिजे, एवढेच नव्हे तर तिच्या भावना आणि इच्छाही आपल्याला स्वतःच्या इच्छा आणि भावनांसारख्याच जाणवल्या पाहिजेत. याचा अर्थ आपल्या अहंचा विस्तार दुसऱ्या व्यक्तीचा समावेश त्यात करण्याकरिता केवळ जाणीवपूर्वक केलेला असून चालत नाही.तो सहजप्रवृत्तिमय असावा लागतो. हे सर्व आपल्या कलहप्रिय स्पर्धक समाजाने अतिशय दुर्लभ करून टाकले आहे, आणि त्याला अंशतः प्रॉटेस्टंटवाद आणि अंशतः कल्पनात्मतेचा संप्रदाय यांतून उद्भवलेल्या व्यक्तिमत्त्वाचे स्तोम माजवणाऱ्या पंथाने हातभार लावला आहे.
प्रेम या शब्दाच्या ज्या गंभीर अर्थी आपण त्याचा विचार करतो आहोत त्याला आधुनिक मुक्त लोकांमध्ये एका नवीन संकटाला तोंड द्यावे लागते आहे. समागमेच्छा उद्भवल्याबरोबर तिचे समाधान करण्यास प्रतिबंध करणारा नैतिक अडथळा जेव्हा जाणवेनासा होतो तेव्हा मनुष्याची प्रवृत्ती गंभीर भावना आणि स्नेह यांच्यापासून लैंगिक व्यवहाराची फारकत करण्याची होते; एवढेच नव्हे तर त्या कर्मासंबंधी त्यांना द्वेषाची भावनाही वाट शकते. या प्रवत्तीचे उत्तम उदाहरण ऑल्डस हक्स्लीच्या कादंबऱ्यांत आपल्याला सापडते. त्याची पात्रे लैंगिक व्यवहाराकडे सेंट पॉलप्रमाणेच, केवळ शारीर गरज भागविण्याचे साधन म्हणून पाहतात. जी उच्चतर मूल्ये त्या संबंधाशी युक्त होऊ शकतात त्यांचे त्यांना भानच नसते. या अभिवृत्तीपासून तापसवाद फक्त एक पाऊल अंतरावर असतो. प्रेमाची स्वतःची उचित ध्येये आहेत, आणि अंगभूत नैतिक मानदंडही आहेत. ख्रिस्ती शिकवण, आणि तसेच तरुण पिढीतील बऱ्याच मोठ्या वर्गात सर्वच लैंगिक नीतीविरुद्ध निर्माण झालेले अविवेकी बंड या दोन्हीमुळे त्यांचे स्वरूप झाकले गेले आहे. प्रेमापासून विभक्त झालेली लैंगिक क्रिया कसलेही गाढ समाधान देऊ शकत नाही. हे असे कधीच होऊ नये असे मी म्हणत नाही; कारण त्याकरिता आपल्याला असे प्रतिबंध योजावे लागतील की त्यामुळे प्रेमही दुर्लभ होईल. मी एवढेच म्हणतो आहे की प्रेमावाचून लैंगिक कर्म मूल्यहीन असते, आणि त्याचा उपयोग प्रेमोद्भव व्हावा म्हणून करावयाचा असतो. मानवी जीवनात प्रेमाला सर्वमान्य स्थान असले पाहिजे या मागणीच्या अपेक्षा आपण पाहिल्याप्रमाणे फार मोठ्या आहेत. परंतु प्रेम जर अनिर्बंध असेल, तर ते अराजकाला पोषक होते, आणि ते कायदा आणि रूढी यांनी घातलेल्या मर्यादांत राहत नाही. जोपर्यंत अपत्ये होत नाहीत तोपर्यंत हे चालू शकेल. पण अपत्यजन्म झाल्याबरोबर आपण एका वेगळ्या प्रदेशात जातो. या प्रदेशात प्रेम स्वायत्त नसते, ते मनुष्यजातीच्या जीवशास्त्रीय प्रयोजनाचे साधन होते. मुलांच्या बाबतीत एक सामाजिक नीती स्वीकारावी लागेल, आणि तिचा प्रेमाशी संघर्ष आला असता तिला प्रेमापेक्षा श्रेष्ठ मानावे लागेल. सुबुद्ध नीतीत हा संघर्ष शक्य तो कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल; याचे कारण प्रेम स्वयं मूल्यवान आहे हे तर आहेच, पण त्याखेरीज हेही आहे की आईबापांचे परस्परांवरील प्रेम अपत्यांच्याही हिताचे असते. अपत्याच्या हिताला उपसर्ग न पोचेल अशा रीतीने लैंगिक नीतीची योजना करणे हा सुबुद्ध लैंगिक नीतीचा प्रमुख उद्देश असला पाहिजे. परंतु याविषयी चर्चा कुटुंबाचा विचार केल्याशिवाय करता येणार नाही.
अनुवादक : म. गं. नातू