वामन मल्हारांचा जन्म २१ जानेवारी १८८२ रोजी झाला, आणि सुमारे ६१ वर्षाचे कृतार्थ जीवन जगून २० जुलै १९४३ या दिवशी मुंबईला त्यांचा अंत झाला. या घटनेलाही जवळ जवळ अर्धशतक लोटले आहे. वामनरावांची साहित्यातील कामगिरी तशी मोलाचीच. परंतु तत्त्वचिकित्सा – विशेषतः नैतिक तत्त्वज्ञान आणि एकूणच चौफेर तत्त्वविवेचन करणारे ते मराठीतले पहिले आधुनिक लेखक आहेत असे म्हणता येईल. त्यांच्या जीवनाचा पुढील संक्षिप्त आलेख नव्या पिढीतील सामान्य वाचकांना उपयुक्त होईल असे वाटते.
वामन मल्हार तत्त्वज्ञान हा विषय घेऊन १९०६ साली एम.ए. झाले. १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनाला ते गेले असता त्यांची प्रोफेसर विजापूरकरांशी गाठ पडली. ‘स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण’ या चतु:सूत्रीचा ठराव या अधिवेशनात पास झाला होता. त्यापैकी चवथ्या सूत्राने आकृष्ट होऊन प्रो. विजापूरकरांनी कोल्हापूरला काढलेल्या ‘समर्थ विद्यालय’ या शाळेत ते दाखल झाले. तेथेच विजापूरकरांच्या विश्ववृत्त या मासिकाच्या संपादकपदाची धुरा सांभाळत असताना १९०८ साली मासिकातील ‘वैदिक आर्यांची तेजस्विता’ या श्री.दा. सातवळेकरांच्या लेखाबद्दल राजद्रोहाचा खटला झाला. संपादक म्हणून वामनरावांना ३ वर्षे सक्तमजुरी व १००० रु. दण्ड अशी शिक्षा झाली. १९११ साली ही शिक्षा भोगून कराची तुरुंगातून ते बाहेर आले. नंतर १९१३ ते १५ अशी सुमारे दोन वर्षे लो.टिळकांच्या ‘केसरी’त आणि १९१६-१७ मध्ये संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या ‘मेसेज’ या इंग्रजी पत्रात संपादक विभागात त्यांनी काम केले. परंतु वृत्तपत्रीय धकाधकीच्या जीवनात त्यांचे मन रमले नाही. १९१८ मध्ये महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या अनाथ बालिकाश्रमात ते आले आणि पुढील २५ वर्षे जीवनाच्या अखेरपर्यंत तेथील आश्रमीय वातावरणात त्यांना हवी होती ती शांतता लाभली.
१९४३ साली मार्च महिन्यात मुंबई मराठी साहित्य संघाने त्यांची एकसष्टी मोठ्या थाटात साजरी केली. त्यानंतर चार महिन्यांनी त्यांचा अंत झाला. महर्षि कर्त्यांच्या हिंगणे येथील महिला पाठशाळा कॉलेजात वामनराव आधी प्राध्यापक आणि शेवटची दोन वर्षे प्राचार्य होते.
वामनरावांना लेखक म्हणून लौकिक लाभला तो रागिणी या कादंबरीने. ती १९१४ ते १६ अशी तीन वर्षे मासिक मनोरंजन क्रमशः प्रसिद्ध होत होती. त्या काळातील कॉलेजविद्यार्थी दोन गोष्टींसाठी महिन्याच्या एक तारखेची वाट पाहात. एक म्हणजे घरून येणारी मनीऑर्डर आणि दुसरी म्हणजे रागिणीची प्रकरणे असणारा मासिक मनोरंजनाचा अंक. ह्या कादंबरीबद्दल वाचकांची उत्कंठा इतकी काही वाढली होती की, कादंबरी पूर्ण व्हायच्या आधीच तिचे प्रसिद्ध झालेले पहिले दोन खंड एकत्र बांधून पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले. याच कादंबरीमुळे वा.मं. ना श्रीपादकृष्णांनी ‘तत्त्वप्रधान कादंबरीचे जनक असा किताब बहाल केला.
त्यांची दुसरी कादंबरी आश्रमहरिणी ही १९१६ मध्ये प्रसिद्ध झाली. तिची दुसरी आवृत्ती निघेपर्यंत वामनरावांना तिच्याद्वारे बहुपतिकत्वाचे समर्थन करण्याइतके धैर्य आणि वाचकांचा विश्वास संपादन करता आला. यावरून त्यांची लोकप्रियता कशी वाढत होती। हे दिसते. नंतर १९१९ साली नलिनी आणि जवळ जवळ बारा वर्षांनी १९३० साली सुशीलेचा देव ह्या कादंबच्या प्रसिद्ध झाल्या. त्यांमधून स्त्रीपुरुष-समता, स्त्री-स्वातंत्र्य, विश्वकुटुंबवाद, धर्म इत्यादी संबंधीचे वामनरावांचे जे मौलिक चिंतन प्रकट झाले ते पुष्कळ खळबळजनक ठरले, १९३५ साली त्यांची पाचवी आणि शेवटची कादंबरी इंदू काळे व सरला भोळेही प्रकाशित झाली.
त्यांचे बरेचसे वैचारिक लिखाण संग्रहरूपाने प्रसिद्ध झाले आहे. या लिखाणाचे एकुण पाच संग्रह आहेत. त्यांतील जे तीन त्यांच्या हयातीत प्रकाशित झाले होते ते असे : विचारविलास (१९२७) विचारसौंदर्य (१९४०), आणि स्मृतिलहरी (१९४२), त्यांच्या निधनानंतर विचारलहरी (१९४३) आणि विचारविहारप्रकाशित झाले.
शुद्ध तत्त्वज्ञानात्मक लिखाणापैकी पहिला ग्रंथ ‘सॉक्रेटिसाचे संवाद’ हा त्यांनी १९१५ साली केलेला अनुवाद ग्रंथ आहे. तो प्रसिद्ध झाला मात्र १९२२ साली. प्लेटो या ग्रीक तत्त्ववेत्त्याच्या सुप्रसिद्ध चार संवादांचा अनुवाद त्यांनी वर्तमानपत्री धकाधकीच्या जीवनात तत्त्वजिज्ञासेचा विरंगुळा म्हणून केला. सुरुवातीला एक प्रदीर्घ प्रस्तावना व प्रत्येक संवादाच्या अनुवादापूर्वी त्यातील तात्त्विक प्रश्नांचे सारभूत मर्मग्राही विवेचन त्यांनी केले आहे.
नीतिशास्त्रप्रवेश हा त्यांचा खरा तत्त्वज्ञानावरील आकरग्रंथ. हा १९१९ साली प्रसिध्द झाला. सुमारे सव्वापाचशे पानांच्या या ग्रंथांत त्यांनी पौर्वात्य व पाश्चात्य तत्त्वज्ञानातील अनेक प्रश्नांची चर्चा केली आहे. प्रसंगोपात्त स्वत:चे मत नि:संदिग्ध शब्दांत नोंदवले आहे. असे असतांना लोकांनी त्यांना ‘संशयात्मा’ म्हणावे याचा विस्मय वाटतो. या ग्रंथात एकूण दहा परिशिष्टे आहेत. त्यांची नुसती नावे वाचली तरी हा ग्रंथ नुसता नीतिशास्त्राचा ग्रंथ नाही हे पटते.
त्यांचे आणखी प्रकाशित झालेले साहित्य म्हणजे नवपुष्प करंडक (१९१६) हा कथासंग्रह आणि विस्तवाशी खेळ (१९४०) हे नाटक. नाटककार म्हणून ते प्रसिद्ध नाहीत. कादंबरीकार आणि तत्त्वचिंतक हाच त्यांचा खरा लौकिक.