वा.म.जोशी ह्यांचा नीतिशास्त्रप्रवेश हा ग्रन्थ १९१९ साली प्रसिद्ध झाला. ह्यात नीतिशास्त्राच्या त्यावेळी चर्चिल्या जाणार्या सर्व प्रश्नांचे सांगोपांग विवेचन आले आहे. हे विवेचन करताना भारतीय आणि पाश्चात्य प्रमुख नीतिमीमांसकांची मते तर त्यांनी विचारात घेतलीच, पण त्यांची तौलनिक चिकित्साही स्वतंत्र बुद्धीने केली. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याला आज सत्तर वर्षे होऊन गेली आहेत. परंतु अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेली एकदोन पुस्तके सोडली तर नीतिशास्त्रप्रवेशाच्या तोडीचे किंवा त्याच्या जवळपासही जाऊ शकेल असे पुस्तक मराठीत झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे.
या लेखात या संपूर्ण ग्रंथाचा परामर्श घेण्याचा विचार नाही. ते शक्य नाही, आणि तसे करणे आवश्यकही नाही; कारण नीतिशास्त्राच्या वाचकांना त्याचा परिचय असणारच. या लेखात मी या ग्रंथातील एकदोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वाचकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जोश्यांची नीतिशास्त्रीय भूमिका आणि मीमांसा-पद्धती आपल्या लक्षात येऊ शकते, आणि एकदा भूमिका आणि पद्धती लक्षात आली की इतर नैतिक प्रश्नांकडे ते कोणत्या दृष्टिकोनातून आणि कसे पाहत असतील याचीही कल्पना करता येऊ शकते.
नीतिशास्त्र-प्रवेश या ग्रंथातील, माझ्या मते, जे अधिक महत्त्वाचे मुद्दे आहेत ते असे: (१) धर्मनिष्ठा आणि नीतिनिष्ठा (पृ. १९ -५४ आणि १.४७७-५२०) आणि (२) कार्याकार्य-व्यवस्था (पृ. १२१-२१४ आणि पृ. ४६७-४७७). त्यांत शिरण्यापूर्वी एक-दोन गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक ठरावे.
जोश्यांच्या मते कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधत असताना प्रथम त्या प्रश्नाची मांडणी शुद्ध अवयास हवी आणि त्या प्रश्नातील शब्दांचे अर्थ सुनिश्चित असावयास हवेत. ते म्हणतात: ‘कोणत्याही बाबतीत काय, उत्तर असंदिग्ध आणि सरळ हवे असल्यास प्रथम प्रश्न अगदी असंदिग्ध आणि सरळ केला पाहिजे. प्रश्नामध्ये गोंधळ किंवा संदिग्धता राहिली म्हणजे उत्तरामध्येही हे गुण येणे साहजिक आहे’. (पृ.३२) तसेच नीति आणि धर्म विषयी चर्चा करताना जोशी म्हणतात: ‘इतका वेळ आपण “नीति” आणि “धर्म” या दोन शब्दांचा अर्थ आपणास साधारण कळला आहे व या दोन शब्दांनी दविलेल्या गोष्टी भिन्न आहेत असे गृहीत धरून चाललो होतो. आपले गृहीतकृत्य जितके बाईन सा दिसले तितके ते नाही. त्याच्या पोटात किती तरी कठिण प्रश्न दडून राहिलेले आहेत. उदाहरणार्थ,”धर्म””धर्म” म्हणून आपण जे म्हणतो, त्यामध्ये आणि नीतीमध्ये अक्षरांशिवाय खरोखर काय फरक आहे ? एक मनुष्य नीतिदृष्ट्या अगदी निर्दोष आहे, असे आपण समजू या. तो धर्माविषयी उदासीन असला तर त्याच्या आत्मविकसनात कोणता उणेपणा राहील? “धर्मशून्यता” असे नुसते म्हणून भागावयाचे नाही.
“धर्मशून्यता म्हणजे तरी काय?” [प्र. २३] ‘चांगले’ या पदाविषयी बोलतानाही जोशी म्हणतात: “अमुक मनुष्य चांगला आहे”, “हा सज्जन”, “याने हे सद्बुद्धीने केले”, “हा सदाचार” इत्यादि प्रकारच्या वाक्यांतील “सत्” किंवा “चांगले” या शब्दांचा अर्थ निश्चित व सुस्पष्ट करणे आणि हे “सत्त्व” कसे ठरविले जाते याचा खुलासा करणे, हे नीतिशास्त्राचे एक प्रमुख कर्तव्य आहे. हा मनुष्य “चांगला” आहे, आणि त्या मनुष्याचे अक्षर “चांगले” आहे, या दोन विधानांतील चांगलेपणाची कल्पना एकाच प्रकारची नाही. चांगले चित्र, अक्षर, घर इत्यादि शब्दसमुच्चयात चांगुलपणा म्हणजे सुबकपणा किंवा सौंदर्य. अमक्याचा हेतु “चांगला”, ह्याचा आचार “चांगला”, त्याची बुद्धी, सद्भुट्ठी, इत्यादिकांत “चांगुलपणा” किंवा “सत्व” याचा अर्थ सौंदर्याहून भिन्न आहे. शब्दाला शब्द द्यावयाचाच असला व “घोडा म्हणजे अश्व” अशा प्रकारचे अर्थविवरण करण्याचा दोष पत्करावयाची असला, तर “चांगला” मनुष्य, “चांगला” हेतू इत्यादि शब्दसमुच्चयांतील चांगलेपणा म्हणजे “साधुत्व” असे म्हणावे. [पृ. ७४] थोडक्यात, जोश्यांच्या मते,“शब्दाला ३८ वयाचाच असला”, आणि “घोडा म्हणजे अश्व” अशा प्रकारचे,”अर्थविवरण करण्याची दोष पत्करावयाचा असला”, तर चांगलेपणा म्हणजे “साधुत्व” असे म्हणावे. म्हणजेच हे जर टाळायचे असेल, शब्दाला शब्द द्यावयाचा नसेल आणि शब्दाला शब्द देऊन अर्थविवरण करण्याचा दोष पत्करावयाचा नसेल तर, “चांगलेपणा” म्हणजे नेमके काय है अापल्याला सांगता येणार नाही असेच जोशी यांचे मत आहे.
प्रस्तुत ग्रंथात आढळणाच्या आणखी एका मुद्द्याचा उल्लेख करतो. नीतिशास्त्राचे स्वरूप विशद करताना वामन मल्हार म्हणतात :
‘[ज्योति:शास्त्राप्रमाणे] नीतिशास्त्रातही वर्णनात्मक, वर्गीकरणात्मक व तत्त्वविवरणात्मक अशी तीन अंगे आहेत. [पृ.१६] जोश्यांच्या भतानुसार वर्णनात्मक अंगात [१] मनुष्य कोणत्या प्रेरणांनी कार्याला प्रवृत्त होतो याचे वर्णन, [२] भिन्न भिन्न प्रसंगी एकाच मनुष्याचे निंदा-प्रशंसात्मक नीतिनिर्णय जे असतात त्यांचे वर्णन, [३] भिन्न वयाच्या किंवा भिन्न देशांत अथवा परिस्थितींत वाढलेल्या माणसांचे जे नीतिनिर्णय असतात त्यांचे वर्णन, आणि [४] मनुष्यामध्ये कोणते मनोविकार असतात, त्याला कोणते मोह असतात, इत्यादिकांचे वर्णन, यांचा अंतर्भाव व्हावयास पाहिजे. वर्गीकरणात्मक अंगात [१] मनुष्य जे कर्म करतो ते सहज-स्फूर्तीने [इन्स्टिंक्ट] करतो किंवा सवयीमुळे करतो किंवा विचारपूर्वक करतो, [२] भावना, ज्ञान व कर्मप्रवृत्ती-अशी मनुष्याच्या आत्म्याची तीन अंगे आहेत, [३] मनुष्याच्या कधी स्वसुखेच्छा, कथी परसुखेच्छा, कधी स्वहितेच्छा, कधी परहितेच्छा, कधी आत्म्याच्या प्रसन्नतेची इच्छा, तर कधी दुसरी काही इच्छा, या आणि अशा गोष्टींचे, त्यांच्या अंगांचे आणि उपांगांचे वर्णन करणे, त्यातील हरत-हेचे साधर्म्य, वैधर्म्य, गुण व दोष, इत्यादिकांचा ऊहापोह करणे आणि त्याला अनुसरून नीतिविषयक गोष्टीचे वर्गीकरण करून त्यांची सुव्यवस्थित रचना अथवा मांडणी करणे याचा अंतर्भाव होतो. हे नीतिशास्त्राचे वर्गीकरणात्मक कार्य आहे असे जोशी म्हणतात, ‘पण’, जोशी लगेच म्हणतात, आणि हे महत्वाचे आहे,‘एवढे कार्य केल्याने नीतिशास्त्र कृतार्थ होत नाही.’ त्यांच्या मतानुसार, ‘नीतिशास्त्राने आपल्या विषयाची शिस्तवार व सांगोपांग मांडणी तर केली पाहिजेच, पण मांडणी केल्यानंतर त्यातील आद्यतत्त्वे कोणती, त्यांचा परस्परसंबंध काय, भिन्न दिसणाच्या तत्त्वांची एकवाक्यता कशी करायची… इत्यादि गोष्टींचे नीतिशास्त्राने विवेचन केले पाहिजे’.[पृष्ठ १७, तिरका टाइप माझा.]
‘नीतिशास्त्राची वर्णनात्मक, वर्गीकरणात्मक व अर्थविवरणात्मक अशी तीन अंगे सांगितली. यांपैकी तिसरे अंग अर्थात् सर्वात अधिक महत्त्वाचे आहे, व त्याचेच बर्याच अंशाने या पुस्तकात विवेचन केले आहे. [पृ. १९, तिरका टाइप माझा].
ही पार्श्वभूमी ध्यानात ठेवून आपण मूळ मुद्दयांकडे वळू. धर्म आणि नीती किंवा धर्मनिष्ठा आणि नीतिनिष्ठा, अथवा ज्यांना अनुक्रमे “धार्मिक वृत्ती” आणि “नीतिपरायणता” असे जोशी म्हणतात [पृ. २९ तळटीप], त्यांच्या स्वरूपाविषयी आणि परस्पर-संबंधांविषयी विचारवंतांत एकमत आढळत नाही याची दखल घेऊन त्याविषयीचे विविध दृष्टिकोन जोशी असे मांडतात:
१] नीती आणि धर्म यांचा काहीही संबंध नाही. ते परस्परस्वतंत्र आहेत.
२] नीती आणि धर्म यांचा संबंध आहे. परंतु त्यासंबंधाचे स्वरूप स्पष्ट नाही. धर्मात नीतीचा अंतर्भाव होतो, परंतु नीतीमध्ये धर्माचा अंतर्भाव होत नाही.
३] नीती आणि धर्म यांचा इतका घनिष्ठ संबंध आहे की एक दुसर्यापासून अलग करणे अशक्य आहे.
४] नीती आणि धर्म एकच असून त्यांत काहीही भेद नाही.
या दृष्टिकोनापैकी कोणता दृष्टिकोन जोशी स्वीकारतात हे समजून घेणे उद्बोधक ठरावे. स्वत:चे मत स्पष्ट करण्यापूर्वी जोशी ‘नीति’ आणि ‘धर्म’ या संकल्पनांचे विश्लेषण करतात. जोश्यांच्या मतानुसार धर्माची मुख्य दोन अंगे आहेत : [१] सद्बुद्धी आणि [२] सदाचार. ते म्हणतात की सद्भुद्धीचे दोन प्रकार आहेत: [अ] ईश्वरश्रद्धा, कर्तव्यप्रेम, इत्यादि गुणांचे अस्तित्व आणि दंभ, सोंग, लोकेषणा वगैरे दोषांचा अभाव, व [आ] धार्मिक तत्त्वांचे – वेदांताचे वगैरे – आनुभविक ज्ञान, अर्थात प्रत्येक धार्मिक व्यक्ती या दोन्ही अंगांनी संपन्न असते असे मात्र नाही. काही लोकांची बुद्धी ईश्वरश्रद्धादि गुणांनी संपन्न असते, परंतु धर्मविषयक तत्त्वज्ञानाची – थिऑलजीची त्यांना फारशी ओळख नसते. ज्याला जोशी ‘सदाचार’ म्हणतात त्या धर्माच्या अंगात यज्ञादि धर्मविधी, विवाह, मौंजीबंधन इत्यादींचा अंतर्भाव होतो. विशिष्ट आचार, संस्कार, विधी व बंधने विशिष्ट धर्माशी इतकी संलग्न झालेली असतात की, त्यावरूनच व्यवहारात तरी त्या धर्माचे लक्षण ठरविण्यात येते. हे आचार जो श्रद्धापूर्वक पाळतो तो धार्मिक वृत्तीचा आहे व पाळत नाही तो धार्मिक वृत्तीचा नाही, असे साधारणपणे समजण्यात येते. परंतु या आवारातील कोणते प्रधान व आवश्यक आणि कोणते गौर व वैकल्पिक, तसेच त्यांचा नीतीशी संबंध काय आहे हे ठरविणे, जोशी म्हणतात, कठीण आहे. परंतु त्यांच्या मते एवढे म्हणता येईल की, एखादा आचार तद्धर्मीय साधारण जनसमूहाला अनीतीचा वाटू लागला म्हणजे तो त्या धर्माचे आवश्यक अंग म्हणून राहत नाही. त्याचप्रमाणे जो आचार पूर्वी धर्माविरुद्ध मानला जात होता त्यात नीतिदृष्ट्या विशेष निंदनीय असे काही नाही असे साधारण जनसमूहाला वाटू लागले म्हणजे त्याचे धर्मबाह्यत्व नष्ट होत जाते. असे व्यवहारात म्हणता आले तरी हे तात्त्विकदृष्ट्या समाधानकारक ठरत नाही. साधारण जनसमूहाला एखादा आचार नीतीचा किंवा अनीतीची वाटतो एवढेच म्हणून भागणार नाही. तो त्याला तसा का वाटतो, कोणत्या तत्त्वानुसार, निकषानुसार वाटतो याचे स्पष्टीकरण होणे आवश्यक ठरते. परंतु असे स्पष्टीकरण दिल्यानंतरही नीती आणि धर्म – नैतिक आचारण आणि धार्मिक आचरण – यांमधील भेद स्पष्ट होत नाही असे जोशी म्हणतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास,‘धार्मिकता काय किंवा नीतिमत्ता काय, व्यवहारात बाह्य आचरणावरूनच ती बहुधा ठरवावी लागेल, तथापि त्यांचे तत्त्व आंतर म्हणजे हृदयस्थ आहे हे विसरून चालावयाचे नाही’ [पृ. २४]. असे “हृदयस्थ” तत्त्व म्हणजे अनुक्रमे ‘धार्मिक वृत्ती’ आणि ‘नीतिपरायणता’ आहे असे जोशी यांचे मत आहे. म्हणजेच बाह्य आचरण कितीही तथाकथित धार्मिक अथवा नैतिक असो, जोपर्यंत कर्त्यांच्या मनात, “हृदयात”, ते करण्यामागील ‘वृत्ती’ नसेल तोपर्यंत तो खर्या अर्थाने ‘धार्मिक’ अथवा ‘नितिमान’ होणार नाही. परंतु धार्मिक वृत्ती म्हणजे काय? हा प्रश्न उपस्थित करून त्याच्या चर्चेच्या ओघात जोशी म्हणतात: ‘प्रामाणिकपणा, सरळपणा, स्वदेशप्रीती, निरभिमानिता, अमात्सर्य इत्यादि नैतिक गुण मनुष्याच्या ठायी एकवटले तरी त्याच्यामध्ये [धार्मिक वृत्तीचा अभाव असल्यास] व्यंग आहेच असे म्हणणे पुष्कळ धाडसाचे आहे. “धर्मपरायणता” शब्द ठीक आहे, पण धर्मपरायणता झाली म्हणून ती त्याला आणखी काय करावयास लावणार आहे? धर्म तरी लोकांना हेच सांगणार ना, की खरे बोला, चोरी करू नका, देशाभिमान बाळगा, रंजल्यागांजल्यांना “आपले” म्हणा व त्यांच्या आपत्ती यथाशक्ति दूर करण्याचा प्रयत्न करा, इत्यादि इत्यादि; धर्म … काय करण्यास सांगेल? या सर्व गोष्टी उपचार म्हणून, जनलज्जेस्तव किंवा लकिषोने करू नका, मनापासून करा, असे धर्म सांगेल, पण नीतिदेखील हेच सांगते, तेव्हा धर्माचे त्यात काही वैशिष्ट्य आहे असे नाही, मग धर्माचे वैशिष्ट्य कशात आहे?’ [पृ. २८] धर्माचे वैशिष्ट्ये हे धार्मिक आचारात नाही किंवा धर्मविषयक ज्ञानातही नाही अशी जोश्यांची भूमिका असल्याने आचार किंवा ज्ञान धार्मिकतेला ‘पोषक असते. .. तरी ते आवश्यक आहे असे मुळीच नाही असे जोशी म्हणतात [पृ. ३०]. असे असले तरी जोशी यांच्या मते ‘धार्मिकता नीतिएियदेह भिन्न, व्यापक व उच्च दर्जाची आहे. ती उच्चदाबी’ कशी आहे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जोशी नंतर वळतात.
‘समजा’, जोशी म्हणतात, की सर्व सद्भुणांनी संपन्न असा एखादा पुरुष धर्मिल नाही. म्हणजे त्याच्या वृत्ती “धार्मिक” नाहीत. या उणीवेमुळे अशा मनुष्याच्या चारित्र्यामध्ये किंवा शीलामध्ये किंवा वृत्तीमध्ये अशा कोणत्या बऱ्यावाईट गोष्टी दिसून येतील की ज्या धार्मिक वृत्तीच्या माणसात दिसून येणार नाहीत? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या शब्दांत असे: “या लेखकाच्या मताने अशा ज्या गोष्टी प्रामुख्याने दिसून येतील त्या म्हटल्या म्हणजे, दृढश्रद्धेचा अभाव, कृतनिश्चयतेचा अभाव व अर्थात उच्चतम आनंदाचाही अभाव” [पृ. ३५. तिर्थक्करण माझे] पुढे जाऊन ते म्हणतात,”धार्मिक वृत्तीच्या मनुष्याला (ज्याची ईश्वरावर श्रद्धा आहे] या विषयासंबंधाने जो आत्मप्रत्यय, जो उत्साह वाटतो तो सन्मार्गाने चालणार्या [ज्यांची ईश्वरावर श्रद्धा नाही] सर्व लोकांच्या वाट्याला येतोच असे नाही. सरलता, कोमलता, सुसंस्कृती, परहित-तत्परता इत्यादि गुणांनी युक्त असलेल्या काही लोकांना नीती अर्थात प्रिय असते, पण वरील प्रकारची दृढश्रद्धा किंवा संशयातीत ज्ञान त्यांना नसल्यामुळे त्यांची नीतिमत्ता जितकी उत्साहयुक्त, आनंदप्रचुर व स्फूर्तिदायक असावी तशी नसते… नीतिनिष्ठ मनुष्यामध्ये पावित्र्याचे तेज असतेच, पण त्या मनुष्याच्या मनाला पूर्ण समाधान प्राप्त झालेले नसते. त्याला संसाराचे गूढ उलगडलेले नसते… या सर्व गोष्टी चालू ठेवण्यात ईश्वराचा काहीतरी हेतू असेल अशा प्रकारचा युक्तिवाद त्याला समजतो, पण तो पूर्णपणे पटत नाही… धार्मिक श्रद्धेचा किंवा ब्रह्मज्ञानाचा आधार नसलेल्या परंतु नीतितत्पर असलेल्या मनुष्याच्या मनात असल्या का त्याने कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी मधूनमधून येणारच…. प्रगल्भ धार्मिक वृत्तीचे जे लोक असतात त्यांना ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल संशयच राहत नाही.”[पृ.३५-३८ तिर्यकारण माझे] अशा धार्मिक मनुष्याला कर्तव्य हे जाचक वाटत नाही, तो ‘कर्तव्यातीत’ होतो असे जोशी म्हणतात. म्हणजे त्याला कर्तव्य उरत नाही असे नाही तर, कर्तव्य हेच त्याला अत्यंत प्रिय असल्यामुळे प्रिय गोष्ट करताना जसा आपणाला आनंद होत असतो तसा आनंद त्याला कर्तव्य करताना होत असतो. आपल्या आलंकारिक भाषेत जोशी म्हणतात,’सरोवरातील हंसाला जसे पाण्याचे बंधन वाटत नाही, त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ हा सद्विचार, अदाकांक्षा, सत्स्फूर्ती इत्यादिकांनी भरलेल्या मानस सरोवरात पोहत असल्यामुळे त्याला “कर्तव्याचे” बंधन वाटत नाही.’ या दृष्टीने पाहता “नैतिक वृत्ती” आणि “धार्मिक वृत्ती” यांना अनुक्रमे ‘कर्तव्यबंधनात्मक वृत्ती’ व ‘कर्तव्यातीत वृत्ती’ असे म्हणावयास हरक नाही.[पृ. ३९].
वरील स्पष्टीकरणावरून जो एक निष्कर्ष निघतो तो असा की जोशी यांच्या मते धर्म [अध्यात्म] हा नीतीचा पाया आहे, धर्माच्या [अध्यात्माच्या] अधिष्ठानाशिवाय नीती, सदाचरण शक्य नाही. किंबहुना काही लोकांना ते शक्य जरी होत असले तरी जे “आत्मिक समाधान” धार्मिक व्यक्तींना लाभते ते “केवळ”,”शुद्ध” नैतिक आचरण करणार्यांना लाभत नाही, लाभणार नाही, असे अत्यंत विवाद्य मत जोशी प्रतिपादन करताना आढळतात. आणि हीच त्यांची भूमिका “नीतिशास्त्र-प्रवेशा”चे मुख्य सूत्र आहे असे म्हणता येईल.
हेच सूत्र त्यांच्या ‘कार्याकार्यव्यवस्था’ या मुद्द्याच्या चर्चेतही कसे आढळते ते आता आपण पाहू.
लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य या ग्रंथाविषयी चर्चा करताना जोशी म्हणतात: ‘लोकमान्य टिळक यांचे गीतारहस्य प्रसिद्ध झाल्यापासून गीता में एक कार्याकार्यव्यवस्थेचे मोठे गहन शास्त्र आहे असे कित्येकांचे मत झाले आहे. तथापि दोन कर्तव्यांत लढा पडला असता कोणते कर्तव्य उच्चतर, अधिक आदरणीय किंवा श्रेयस्कर हे कसे ठरवावे, म्हणजे कोणत्या कसोटीला लावून ठरवावे, याचे गीतेत यथासांग व समर्पक उत्तर नाही, असे जे या लेखकाचे पूर्वीचे मत होते ते लोकमान्य टिळकांचे “रहस्य” वाचूनही बदललेले नाही. [पृ. ४६७ तिर्थक्करण माझे]. शिष्यांपेक्षा किंवा बंधुधर्मापेक्षा क्षात्रधर्म श्रेष्ठ का, याचे गीतेत समाधानकारक उत्तर नाही. ‘स्वभाबनियत’ कर्म करावे,‘सहज’ कर्म करावे,‘स्वधर्म आचरावा, किंवा ‘प्रवाहपतित’ कर्तव्य करीत राहावे, पण बुद्धी मात्र सम व निष्काम ठेवावी, म्हणजे त्या कर्मामुळे होणारे दोष कत्र्याला लागत नाहीत, – ‘हे’, जोशी म्हणतात,“बोलणे सर्व ठीक आहे, पण “स्वभावनियत” कर्म कोणते? “सहज कर्म” कसे ओळखावे? इत्यादि प्रश्नांची समाधानकारक उत्तरे गीतेत नाहीत. या प्रश्नांची उत्तरे जोशी यांच्या मतानुसार “जनहितवादा”त [युटिलिटेरिअॅनिझममध्ये] आहेत. तसेच कार्याकार्यनिर्णयाची कसोटी म्हणजे स्थितप्रज्ञ मनुष्याची शांत व स्थिर असलेली साम्यबुद्धी होय हे त्दै खेर उसले तरी ते व्यवहारदृष्ट्या विशेष उपयुक्त नाही असेही जोशी म्हणतात. कारण ज्याला हा प्रश्न पडतो तो स्थितप्रज्ञ नसतो! तो कोणत्या प्रकारचा मनुष्य असतो या प्रश्नाचा विचार करताना जोशी माणसांचे चार वर्ग खालीलप्रमाणे सांगतात.
१] पूर्ण ज्ञान झालेले, म्हणजे मुक्त.
२] पूर्ण ज्ञान नाही, पण दुसन्यावर नि:सीम श्रद्धा असलेले लोक म्हणजे पूर्णश्रद्ध मुमुक्षु.
३] पूर्ण ज्ञान नाही, नि:सीम श्रद्धाही नाही, पण धर्मजिज्ञासा शिल्लक असलेले अश्रद्ध मुमुक्ष.
४] पापात पूर्ण निर्दावलेले व पापपुण्याची क्षिती न बाळगणारे असे पशुतुल्य लोक.[पृ. ४७१]
यापैकी कार्याकार्यव्यवस्थेविषयीचा प्रश्न हा तिसर्या वर्गातील लोकांना भेडसावीत असतो असे जोशी रास्तपणे म्हणतात. परंतु “अश्रद्ध” म्हणजे “कशावरही श्रद्धा नसलेले” असा अर्थ जोशी करीत नाहीत. तर एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर, स्मृतीवर किंवा धर्मग्रंथावर अचल के नि:सीम श्रद्धा नसलेले असा करतात, आणि अशा लोकांना गीतेत मार्गदर्शन होत नाही हे गीतेतील व्यंग आहे असे जोशी म्हणतात. परंतु या व्यंगाचे कारण शोधत असताना ते असेही म्हणतात: ‘गीतेमध्ये हा कर्तव्याच्या कसोटीचा प्रश्न प्राधान्येवरून पुढे आला नाही म्हणून हे व्यंग राहिले असावे अशी माझी समजूत आहे.’ [पृ. ४७२]
गीतेत स्वधर्म ठरविण्याची जी दोन प्रकारची साधने सुचविलेली आहेत त्यांपैकी पहिले शास्त्रावरून आपले कर्तव्य ठरविणे हे होय आणि दुसरे स्वभावनियत किंवा सहज कर्म कोणते याचा विचार करून आपले कर्तव्य ठरविणे हे होय. यापैकी पहिला मार्ग निरुपयोगी आहे, तर दुसरा मार्ग पोकळ आहे अशी त्यावर जोशी टीका करतात, आणि म्हणतात,”शास्त्र” किंवा “स्वभावनियत कर्म” किंवा “सहजकर्म” इत्यादि कार्याकार्यनिकष अपुरे ठरतात व गीतेतील “सर्वभूतहिततत्व” किंवा मिलचे “पुष्कळांचे पुष्कळ हित” यांसारख्या एखाद्या तत्त्वाचीच कास धरावी लागते’..[पृ. ४७३]
स्वधर्म ओळखण्याची जी कसोटी जोशी सुचवितात ती अशी: प्रत्येक मनुष्याने “स्व” म्हणजे काय हे आपल्या मनाशी ठरवावे. “स्व” म्हणजे माझा देह, माझे कपडे, माझे गृह, माझी भार्या, माझी मुलेबाळे असा जो मनुष्य अर्थ करील नो,“माझ्या देहाला, माझ्या बायनल, वेमुलाबाळांना अधिक सुखकारक/हितकारक ते अधिक श्रेयस्कर, तोच माझा बम” असा निर्णय घेईल. ज्याची “स्व” ची कल्पना अधिक व्यापक व उदार असेल — उदा. “स्व” म्हणजे माझा देश —- तो आपल्या देशाकरिता स्वत:ची, बायकोमुलांची आहुतीही देईल! अर्थात देशहित कशात आहे याचाही त्याला निर्णय करावा लागेल. आणि हा निर्णय अर्थातच तो आपल्या जन्मसिद्ध गुणांकडे, स्वभावाकडे, प्रवृत्तीकडे व प्रकृतीकडे पाहूनच करील हे उघडच आहे. [पृ. ४७६]
अशी स्वधर्म ओळखण्याची कसोटी जरी जोशी सांगतात तरी त्यांचा कल हा “सर्वभूतहित” अथवा “जनहित” या कसोटीकडेच आहे. परंतु याही बाबतीत व्यावहारिक दृष्टीने ते समाधानकारक वाटले तरी तत्त्वतः ते समाधानकारक नाही अशीच जोश्यांची भूमिका दिसते. कारण त्यांच्या मते नीतिमत्ता कर्याच्या बुद्धीवर अवलंबून असते, त्याच्या वृत्तीवर, नीतिपरायणतेवर अवलंबून असते, त्याच्या बाह्य परिणामांबर नाही. म्हणून आपल्या आध्यात्मिक भूमिकेकडे वळून ते म्हणतात: “जगाचे कल्याण, देशहित, जनसेवा, परोपकार, ज्ञानबर्धन, सदभिरुचीचे पोषण, इत्यादि इष्ट तत्त्वे ज्या कर्मामध्ये गर्भित आहेत, अशा कर्मामध्ये आपल्या खप्या आत्म्याचे — परमात्म्याचे स्वरूप व्यक्त पावत असते.” [पृ. १९२] पुढे ते म्हणतात: “आपल्या हृदयातील खरा आत्मा —- परमात्मा — आपले स्वत:चे श्रेय साध्यण्यासत आपणास सांगतो आणि या श्रेयाच्या अविरोधाने आपले स्वरूप जितके रम्य व प्रेममय होईल तितके त्याला पाहिजे असते. खरे प्रेम दुसन्याला सुख द्या असे सांगत नाही, तर त्यालाही आपल्याप्रमाणेच आत्मा आहे, तेव्हा या आत्म्याचे श्रेष्ठ स्वरूप सर्वांगाने व्यक्त होईल याबद्दल तुला जेवढे साहाय्य देता येईल तेवढे दे, असे सांगते… आत्महिताची जी उच्च कल्पना आहे तिला अनुसरून अशीच परहिताची कल्पना असली पाहिजे. परहित साधणे आपले कर्तव्य आहे, पण याचा अर्थ दुसरा मागेल ते त्याला द्यावे असा नाही, तर आपल्याप्रमाणेच त्याच्या हृदयातही वास करणार्या आत्म्याचे सर्वांगाने विकसन होईल व आत्मप्रसादाचा त्याला लाभ होईल अशा उद्देशाने त्याला जेवढे म्हणून आपल्या हातून साहाय्य देववेल तेवढे द्यावे, असा त्याचा अर्थ आहे.” [पृष्ठ १९४]
याप्रमाणे जोशी यांची अध्यात्मनिष्ठ नीतिशास्त्रीय भूमिका आणि विवेकनिष्ठ विश्लेषणपद्धती त्यांच्या नीतिशास्त्र – प्रवेश या ग्रंथात पदोपदी जाणवते. अर्थातच सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या भूमिकेविषयी विचारवंतांत मतभेद राहू शकतो, ती विवाद्य राहू शकते. परंतु ज्या पद्धतीचा उपयोग जोशी यांनी केला आहे तिचे महत्त्व आणि तिची उपयुक्तता मात्र वैचारिक क्षेत्रात निर्विवाद आहे असे म्हणता येईल. आणि हेच प्रस्तुत ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे!
‘प्रतिभा’, टिकेकर रोड, धंतोली, नागपूर ४४००१२