[ पुढे दिलेले पत्र आम्ही छापणार नव्हतो. ते क्रोधाच्या भरात लिहिलेले असून त्यातील भाषा असभ्य आणि अभिरुचीहीन आहे, आणि ते वाचून आमच्या वाचकांना क्लेशच होतील याची जाणीव आम्हाला आहे. त्या पत्रात फक्त शिवीगाळ आहे, युक्तिवादाचा मागमूस नाही हे वाचकांच्या लक्षात येईलच. पण तरीसुद्धा ते पत्र छापायचे आम्ही ठरविले यांची दोन कारणे आहेत. एकतर तुम्ही हे पत्र छापणार नाहीच’ असे म्हणून लेखकाने आम्हाला एक प्रकारे आव्हानच दिले होते; ते आम्ही स्वीकारू शकतो हे त्याला दाखवायचे होते. आणि दुसरे म्हणजे मनुष्य सात्त्विक संतापाचा बुरखा पांघरून कोणत्या पातळीवर उतरू शकतो हे आम्हाला वाचकांना दाखवायचे होते, एवढेच नव्हे तर दुष्ट हेतूने डिवचले गेल्यानंतरही त्याला किती सभ्य आणि संयमी भाषेत उत्तर देता येते याचे प्रात्यक्षिकही लेखकाला दाखवायचे होते. सदर पत्रलेखकाला आता केलेल्या कर्माचा पश्चात्ताप वाटत असेल अशी आम्ही आशा करतो. त्याचबरोबर हेही सांगून टाकतो की यापुढे असली पत्रे (त्यांची किंवा कोणाचीही) आम्ही छापणार नाही, तसेच त्यांची उत्तरेही देणार नाही.
– संपादक
संपादक
‘नवा सुधारक’ यांस,
आपला जुलैचा अंक वाचला, विशेषतः त्यातील दिवाकर मोहोनींचे उत्तर. आणि त्यामुळेच मी लिहिण्यास उद्युक्त झालो. दिवाकर मोहोनींचे पत्र आणि उत्तर वाचून माझ्या मनात निर्माण झालेला पहिला प्रश्न म्हणजे असली बालिश आणि विकृत बुद्धीचे प्रदर्शन करणारी पत्रे आपण का छापता? आगरकरांचा वारसा सांगायचा अन् मजकूर प्रकाशित करायचा अकलेची दिवाळखोरी दाखविणारा! यांची संगती कशी काय लावायची, हे कृपया आपणच सांगावे. कारण बुद्धिनिष्ठतेची सारी मक्तेदारी आपण घेतली आहे ना? असो. आता मुद्द्याकडे वळतो.
दिवाकर मोहोनींचा मूळ प्रश्न आहे की रामजन्मभूमीवर श्रद्धा असावी काय? ते श्रद्धास्थान असावे काय? प्रथम श्रद्धा या शब्दाचा अर्थ. श्रद्धा म्हणजे आदराने धारण केलेले. ज्या ठिकाणी रामजन्मभूमीचा वाद सुरू आहे तेथे हिंदूंची श्रद्धा आहे, आणि ह्या श्रद्धेला तडा जातोय म्हणून हिंदुसमाज जागृत झाला आहे. मोहोनी श्रद्धा मानीत नाहीत, आणि त्यामुळे निर्माण होणार्या भावनाही त्यांना मान्य नाहीत. माझ्या समजुतीप्रमाणे मोहोनी यांचा जन्म त्यांच्या आईच्या गर्भातून झाला आहे. म्हणजे मोहोनींना आई आहे. बायकोही असावी. आता मला सांगा की ‘तुमचे’ विज्ञान आई आणि बायको यांच्यात काय शारीरिक फरक दर्शविते? शास्त्रीयदृष्ट्या ह्या दोघींतही काहीही फरक नाही. कारण दोघींचे लिंग एकच आहे – स्त्रीलिंग. मग बायको म्हटल्यावर मोहोनींच्या मनात वेगळ्या भावना येतात अन् आई म्हणताच वेगळ्या. असे का? (अशा वेगळ्या भावना येतात हे इथे मी गृहीत धरले आहे.) अशी भावना निर्माण करण्यास त्यांना कोणी सांगितले?
मोहोनींनी श्रद्धेचा सांगितलेला अर्थ योग्य नाही. त्यांच्या मते श्रद्धा म्हणजे कोणतीही गोष्ट न तपासता स्वीकारणे. परंतु खरा अर्थ मी वर सांगितलेलाच आहे. जेव्हा आई आपल्या लहान मुलाला एका पुरुषाकडे बोट दाखवून सांगते की हे तुझे बाबा, तेव्हा पोरगा त्या पुरूषाला वडील मानतो, का बरे? ते तो तपासून का घेत नाही? तो आईला प्रतिप्रश्न का करीत नाही की कशावरून हा पुरुष माझा वडील? ह्याचेच रक्त माझे अंगात खेळत आहे कशावरून? मला वाटते मोहोनींनी पण हा प्रश्न आपल्या आईला केला नसावा. मग असले हलकट प्रश्न रामजन्मभूमीच्या बाबतीत कसे काय उपस्थित होतात?
मोहोनींना तेथे दगडमाती दिसते. त्यांना तिथे रामजन्मभूमीचे पावित्र्य जाणवत नाही. आईच्या ठिकाणी तरी पावित्र्य जाणवते काय? की तिथेही केवळ एक स्त्रीच दिसते. त्यांच्या देखत जर कुणी त्यांचे आईवर बलात्कार केला तर मोहोनींचे रक्त खवळेल का? की ते स्पष्टीकरण देतील – त्या पुरुषाला माझी आई एक स्त्री दिसली आणि त्याच्यातील निसर्ग जागृत झाला आणि त्याने हे कृत्य केले. शेवटी आईसुद्धा एक स्त्रीच असल्याने मी काहीच करू शकत नाही आणि तसे माझ्या सुपीक बुद्धीला पण पटत नाही. खरेच, मोहोनी साहेब, तुमच्या बुद्धीचा विकास आणि विलास पाहून थक्क झालो.
मोहोनी म्हणतात की हिंदू धर्म सहिष्णु नाही. इतके हलकट व नीच प्रतीचे लिखाण करूनही त्यांना हिंदूधर्माने धर्माच्या बाहेर काढले नाही, यांच्याइतका दुसरा कुठला पुरावा मोहोनींना हवी सहिष्णुतेचा. काढला का एखाद्या खोमेनीने फतवा? खरे म्हणजे अशा लोकांना ताबडतोब धर्मातून हाकलायला हवे. परंतु हिंदुधर्म विचार करतो की इतके लोक आहेत माझ्यात, तसा एक असाही असला तर काय बिघडले? आपण नाही का दिवाळीत ठिकठिकाणी पणत्या लावतो व एक पणती संडासापाशीपण लावतो.
मोहोनींना हिंदूंनी जागृत झाल्याने लोकशाहीची चिंता वाटायला लागली आहे. मोहोनीसाहेब किती मुस्लिम देशात लोकशाही आहे सांगता का? ह्या देशात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून लोकशाही जिवंत आहे. मग हिंदू संघटित झाले तर लोकशाही सशक्त होईल की नष्ट? शेंबडे पोर पण उत्तर देईल. “जे बहुसंख्य संघटित होत आहेत ते एका धर्माचे, एका पंथाचे, एका जातीचे आहेत. से समान विचारांमुळे एकत्र आलेल्यांचे गट नाहीत.” ह्या वाक्यात तुम्हाला काय म्हणायचे आहे, हे तुम्हाला तरी समजते काय? एका धर्मामुळे आम्ही एक होतोय यात विचार नाही काय? की फक्त अविचारच आहे. हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे.
आम्ही महाराष्ट्रीयनांनी महात्मा गांधींचे कोणतेही गुण घेतले नाही. फक्त षंढपणा पुरेपूर घेतला. आणि मोहोनी साहेब, रामजन्मभूमीवर मंदिर बनणार म्हणून तुम्ही अस्वस्थ झालात. तिकडे काश्मिरात भारताचा राष्ट्रध्वज जाळला तेव्हा नाही तुम्ही असले अकलेचे तारे प्रसविलेत? की ते ‘मुसलमान’ म्हणून गर्भपात झाला?
मोहोनीसाहेब, तुमच्या ह्या असल्या बुद्धीला मी येथूनच साष्टांग नमस्कार घालतो.
ता. क. आपण हे पत्र प्रसिद्ध तर करणार नाहीच. परंतु मोहोनी साहेबांना वाचायला द्या. त्यांचा पुरेसा पत्ता नसल्याने तुम्हास तसदी देत आहे. नाहीतर परस्पर पत्र पाठविले असते. हे असले लिखाण छापण्यापेक्षा जागा कोरी सोडली तरी चालेल; निदान रफ वर्क करिता तरी उपयोगी पडेल.
धन्यवाद.
श्रीनिवास वैद्य
तरोडा – ४४२ १०२
श्रीनिवास वैद्यांना उत्तर
श्री. संपादक
‘नवा सुधारक’ यांस,
सा.न.वि.वि., रामजन्मभूमी व बाबरी मस्जिदीच्या विवादामुळे माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरादाखल जी पत्रे आली त्यांमध्ये तरोडा, जि. वर्धा येथील श्री. श्रीनिवास वैद्य ह्यांच्या पत्राची वेगळी दखल घेतली पाहिजे असे मला जाणवले.
श्री. श्रीनिवास वैद्य ह्यांना माझ्या पत्रोत्तरामुळे (जुलै ९०) सात्त्विक संताप आला आहे. त्या संतापामुळेच की काय, त्यांनी माझ्या पत्राला मुद्देसूद उत्तर देण्याऐवजी जी भाषा सभ्य पुरुष वापरीत नाहीत अशी भाषा माझ्याविषयी वापरली आहे. सभ्यतेची मर्यादा त्यांनी सोडली आहे हे त्यांनीच त्यांच्या पत्रात कबूल केले आहे. त्यांच्या पत्रातील भाषेबद्दल मी आपला निषेथ नोंदवितो आणि त्यांनी माझ्या पत्रातील विधानांचे मुद्देसूद खंडन करणारे पत्रे पाठवावे, अशी मी त्यांना आणि आपण ते प्रकाशित करावे अशी आपणाला विनंती करतो.
श्रद्धा व आदर यांत श्री. श्रीनिवास वैद्य फरक करीत नाहीत, मी करतो. विवेकी, बुद्धिवादी किंवा समतावादी माणूस हा रूक्ष, तर्ककर्कश आणि भावनाशून्य असतो. प्रेम, आदर, ऋजुता असे जे कोमलभावे सुसंस्कृतपणामुळे माणसाच्या अंगी यावे, ते भाव त्याच्या मनात वसत नाहीत; त्यांच्यापासून त्याने फारकत घेतलेली असते अशी श्री. श्रीनिवास वैद्यांची समजूत झाली असावी असा माझा, त्यांचे पत्र वाचून ग्रह झाला. मला इतकेच सांगावयाचे आहे की समतावाद्यांना, इहवाद्यांनाही प्रेम करता येते. त्यांच्या ठिकाणी आदरभावही असतो. पण त्यांना फक्त आपल्याच आईवडिलांबद्दल नितान्त आदर आणि इतरांबद्दल अनादर असे नसते. त्यांना सारेच पवित्र असतात, आणि प्रेम आणि श्रद्धा ह्या गोष्टी ते विवेकावर स्वार होऊ देत नाहीत. आपल्याच माणसांवर नव्हे तर कोणावरच कोणत्याही प्रकारचा अत्याचार, अन्याय होऊ नये असा त्यांचा प्रयत्न असतो. निदान असावयाला हवा.
माझे पहिले पत्र काय किंवा दुसरे पत्र काय, माणसाच्या वैयक्तिक स्वायत्ततेकडे – स्वातंत्र्याकडे — लक्ष वेधण्यासाठी होते.
रामजन्मभूमीविषयीचा विवाद हे त्यासाठी घेतलेले निमित्त होते. आम्हाला खरी लोकशाही आणण्यासाठी काय करावे लागेल, लोकशाहीचे रूपान्तर oligarchy मध्ये होऊ नये ह्यासाठी काय करावे लागेल ह्याविषयीची चर्चा मला अभिप्रेत होती. प्रा. ना. वि. करंबेलकर सोडता – कारण त्यांनी मानवजातीच्या उत्क्रान्तीचा मुद्दा मांडला आहे – दुसर्या कोणीही ह्या मुद्द्याचा विचार मांडला नाही.
जेव्हा हिंदूंचे चुकते असे मी म्हणतो तेव्हा मुसलमान कुरापती काढीत नाहीत, त्यांच्या निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या स्थानिक बहुसंख्येचा उपयोग ते तदितरांवर जुलूम करण्यासाठी करीत नाहीत, असे मला मुळीच म्हणावयाचे नसते. हिंदूधर्मीय राज्यकर्त्यांपेक्षा इस्लामधर्मीय राजे सामान्यपणे अधिक जुलमी होऊन गेले हे इतिहासाचे वाचन करणार्या कोणालाही सहज समजण्यासारखे आहे. ते त्यांचे करणे सर्वथा निंद्य आहे, निर्भर्सनीय आहे. आजही कुरापत बहुधा तेच काढतात.
तथाकथित बाबरी मशीद पाडू नये असा आग्रह धरणे हे माझ्या मते त्यांच्या बुतपरस्तीचेच लक्षण मानता येईल. दगडाला मूर्तीचा आकार दिल्यामुळेच केवळ त्याचा बुत होतो असे नव्हे. निर्गुण आणि निराकार अशा देवाची कल्पना एखाद्या भौतिक वस्तूमध्ये वा वास्तूमध्ये केल्यामुळेही तो बुत होतो (मशीद हाच जणू देव) असे मला वाटते. माझ्या मागच्या पत्रात मी तसा उल्लेखही केला आहे.
रामजन्मभूमीचा विवाद मुसलमानांच्या आजवरच्या कुरापतखोरीचाच परिणाम आहे असेही मानण्यास प्रत्यवाय नाही. ती हिंदुधर्मीयांची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, हेही मला मान्य आहे. पण समंजस लोकांनी, विवेकी, चिंतनशील लोकांनी हिंदूंची ही स्वाभाविक प्रतिक्रिया असे म्हणून त्या विवादाकडे दुर्लक्ष करावयाचे, तिचे समर्थन करावयाचे, की ती प्रतिक्रिया योग्य आहे की नाही हे ठरवावयाचे असा मला पडलेला प्रश्न आहे.
मला पडलेला प्रश्न कसा आहे त्याबद्दल मी एक दृष्टान्त देतो. श्री. वैद्य ह्यांनी त्यांच्या पत्रात मला उद्देशून काही अपशब्द लिहिले आहेत. ते वाचून माझी काही स्वाभाविक प्रतिक्रिया झाली, पण त्या प्रतिक्रियेप्रमाणे वागावयाचे नाही असे मी ठरविले. कारण माझी ही प्रतिक्रिया योग्यतेच्या निकषावर उतरणार नाही असे मलाच वाटले. मी मला स्वतःला शिकविलेला प्रस्तुत विवेक माझ्या धर्मबांधवांनी करावा एवढेच मला सुचवावयाचे आहे.
त्याचप्रमाणे म. गांधींच्या हत्येनंतर १९४८ साली महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या घरांची भयानक जाळपोळ झाली. ती घटना न विसरता ब्राह्मणांनी ते जन्माने ब्राह्मण म्हणून आपली संघटना करावयाची व ती संघटना ज्यावेळी बलशाली होईल त्यावेळी – कदाचित दोनचारशे वर्षांनी – ज्यांनी जाळपोळ केली त्यांचे वारस म्हणविणार्यांना तिचे प्रायश्चित्त देऊन पूर्वी ब्राह्मणांवर झालेल्या जुलुमाचे परिमार्जन करावयाचे हे मला मान्य होण्यासारखे नाही.
आणखीही एक आगळिकीची घटना मला आठवते.
पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील मोगा शहरात २५ जून १९८९ ह्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रभात शाखेवर अतिरेक्यांनी केलेल्या पूर्वनियोजित बेछूट गोळीबारात व बॉम्बस्फोटात किमान २४ संघस्वयंसेवक ठार झाले आणि २२ जण जखमी झाले. ह्या घटनेच्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. बाळासाहेब देवरस ह्यांनी आपल्या भावना व्यक्त करणारे एक पत्रक काढले होते, ते शब्दशः उद्धृत करण्याचा मला मोह होतो. ह्या पत्रकात श्री. बाळासाहेब देवरस म्हणतात :
‘आज सकाळी फरीदकोट जिल्ह्यातील मोगा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभातशाखेवर दहशतवाद्यांनी केलेला भ्याड पण क्रूर हल्ला अत्यन्त निषेधार्ह आहे. ह्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी २६ संघस्वयंसेवकांचे बळी घ्यावेत ही घटना अतिशय धक्कादायक व मनाला क्लेश देणारी आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेले प्रिय स्वयंसेवक बंधू हुतात्मे ठरले आहेत. त्यांनी आपल्या मातृभूमीच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी फार मोठे बलिदान दिले आहे. मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो व हे दुःख सहन करण्याचे धैर्य त्यांच्या कुटुंबीयांना व देशभर पसरलेल्या संघस्वयंसेवकांना प्राप्त होवो, अशी कामना करतो.
‘क्रूर हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी संघ शाखा व संघस्वयंसेवक यांची निवड करावी यामागे त्यांचा समाजात परस्परशत्रुता निर्माण करण्याचा दुष्ट हेतू आहे. तो सर्वांनी ओळखला पाहिजे. या हल्ल्याने प्रक्षुब्ध न होता सर्व बांधवांनी संयम बाळगावा. परंपरागत शीख व शीखेतर हिंदू यांच्या ऐक्याला यत्किंचितही तडा जाणार नाही, एवढेच नव्हे तर बंधुभाव अधिक मजबूत होईल याची काळजी घ्यावी. त्यामुळे दहशतवाद्यांचे दुष्ट हेतू विफल होतील असा मला विश्वास आहे.’ (तरुण भारते, नागपूर, दि. २६ जून १९८९)
प्रस्तुत प्रकरणी आणि नेहमीच अशाच संयमाची आणि विवेकाची मी सर्वांकडून अपेक्षा करणे चूक आहे काय?
मी जेव्हा हिंदूंचे अमके चुकते असे म्हणतो तेव्हा मुसलमानांचे चुकत नाही, ख्रिश्चनांचे चुकत नाही किंवा शीखांचे काही चुकत नाही असे मला मुळीच म्हणावयाचे नसते. हिंदूचे काय चुकते ते सांगितले तर मुसलमानांचे काय चुकते ते सर्वांना आपोआप समजावे असे मला वाटत असते. मला महत्त्व ‘कोणाचे’पेक्षा ‘काय’चे अधिक आहे. कोणाचे ते ज्याचे त्याने अंतर्मुख होऊन पाहावयाचे आहे. पण मी हिंदूंचा ह्या बाबतीत कैवारी नाही, त्याअर्थी मुसलमानांचा असला पाहिजे असे काहीजणे समजतात, त्याला माझा नाइलाज आहे.
थोडक्यात काय तर मला पडलेला प्रश्न स्वाभाविक काय, नजीकच्या हिताचे काय, सद्य:परिस्थितीत इष्ट काय असा नाही. योग्य काय, अयोग्य काय, मानवजातीच्या अंतिम हिताचे काय अशा स्वरूपाचा आहे. जे काही सद्यःफलदायी आहे असे त्यांना वाटते ते बाकीचे लोक करीतच आहेत.
मला रामजन्मभूमीच्या बाबतीत पडणारे हे प्रश्न मी ईश्वराच्या आणि अवतारांच्या बाबतीत अश्रद्ध असल्यामुळेच पडतात. मी जर अवतारावर श्रद्धा ठेवणारा असतो तर ह्या प्रकरणी माझे कर्तव्य मला आपणाला विचारण्याची गरज पडली नसती. इतकेच नव्हे तर ह्या साऱ्या स्वाभाविक प्रतिक्रियांचे आदिकारण शोधले पाहिजे असा विचार माझ्या मनात आला नसता. एकतर आदिकारण शोधले पाहिजे, किंवा त्याऐवजी आदिकारणाकडे म्हणजेच इतिहासाकडे दुर्लक्ष करून भविष्याकडे पाहिले पाहिजे, असेही मला वाटले नसते; आणि मग श्री. वैद्यांनाही त्यांनी लिहिले तसे लिहिण्याचे प्रयोजन पडले नसते.
ह्या विषयाच्या निमित्ताने आणखीही काही मुद्द्यांची चर्चा मला अपेक्षित आहे पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
आपला
दिवाकर पुरुषोत्तम मोहनी
धरमपेठ, नागपूर – ४४००१०.