बरोबर १०० वर्षांपूर्वी हरिभाऊ आपटे यांनी आपले करमणूक साप्ताहिक सुरू केले. ‘करमणूक’ काढण्याचा उद्देश स्पष्ट करताना हरिभाऊ यांनी म्हटले होते की, ‘केसरी सुधारकादि पत्रे आपल्या कुशल लेखणीने जे काम निबंधाच्या द्वारे करतात तेच काम हे पत्र मनाची करमणूक करून करणार.’ पुढे ते असे म्हणतात की, ‘ज्यांस पुढल्या माडीपासून चुलीपर्यंत व दिवाणखान्यातील टेबलापासून फणीकरंड्याच्या पेटीपर्यंत कोणाच्या हाती पडले तरी, हवे त्याने हवे त्याच्या देखत निःशंकपणे वाचण्यास हरकत नाही असे पत्र पाहिजे असेल त्यांनी अवश्य ‘करमणूक’चे वर्गणीदार व्हावे.’ यातून एक गोष्ट निश्चितपणे जाणवते की ‘चूल’ आणि ‘फणीकरंड्याचा’ उल्लेख करताना त्यांना हे अंक स्त्रियांच्या हाती पडावेत, त्यांनी ते वाचावेत एवढेच नाही तर लिहिण्यास उद्युक्त व्हावे हा त्यांचा स्पष्ट हेतू होता.
‘करमणूक’चे अंक चाळताना त्यामध्ये स्त्रियांनी लिहिलेल्या काही कविता दृष्टीस पडल्या.
३० जुलै १८९२ च्या करमणूक च्या अंकात एका कवयित्रीची कविता आली आहे. कवयित्रीचे नाव त्यावर नाही; मात्र गेल्या मंगळवारी ‘शारदा सदनाच्या गृहप्रवेशाच्या वेळी म्हटलेल्या पद्यांपैकी हे एक पद्य आहे व ते तेथील एका विद्यार्थिनीने रचलेले आहे.’ असा कवितेच्या सुरुवातीला खुलासा दिलेला आहे. ‘बालविधवा गाणे’ असे या कवितेचे शीर्षक आहे.
ही कविता म्हणजे सासुरवासी विधवेचे गाहाणे आहे. पाचव्या वर्षी तिचे लग्न झाले आणि ते सुद्धा एका साठ वर्षांच्या वृद्धाशी. पैसे घेऊन आईवडिलांनी हा लग्नाची सौदा केलेला दिसतो.
पाचवे वर्षी माझे लग्न पहा झाले |
बहु वृद्ध पती निर्मिले ।
साठ वर्षांचे वय त्यांचे मग कळले |
आप्तवर्ग तिकडे वळले । |
मायेचे कोणी न उरले
शत रुपयांशी मज विकले
सर्व सौख्य त्वरितची सरले ।।
ह्या बालवधूला सासरी मिळणारी वागणूक क्रूर आहे. तिचे वर्णन करताना ती म्हणते :
‘किती सांगु प्रभो, दुःखस्थिती ही अमुची |
जाचणूक सासरच्यांची ।
वदवेना जे शब्द शिव्यांचे देती |
तप्त लोह वदनी हाणिती ।’
ही अशी मारझोड एक वेळ सहन करणे शक्य. परंतु पती निधन पावल्यावर
सासुश्वशुरांनी ना पितास आणविले |
बारावे वर्षी कच हरिले
मी लहान अज्ञ की हो बाला
काय करिती न कळे मजला
अशी ही या बालवधूची हृदयद्रावक कहाणी
मम मृत्यु कळेना का निजला
सुख होते जरि याच घडीला येता ।।
असे तिला वाटले तर त्यात वावगे काहीच नाही. या एकाच कवितेवरून त्या काळातील रूढींची व बालविधवांच्या जीवनाची कल्पना येते. जरठकुमारी विवाह, बालविधवा, केशवपन हे १०० वर्षांपूर्वीचे स्त्रियांचे प्रश्न या एकाच कवितेत एका स्त्रीने अत्यंत तळमळीने मांडले आहेत.
२४ ऋणानुबंध, औंध पुणे ७