सॉक्रेटीसीय संवाद (पूर्वार्ध)

प्रास्ताविक
अनुवादक : प्र. ब. कुळकर्णी

पुढे दिलेला संवाद प्लेटोच्या प्रसिद्ध संवादांपैकी एक आहे. प्लेटोच्या बहुतेक संवादांत प्रमुख पात्र त्याच्या गुरूचे सॉक्रेटिसाचे आहे. सॉक्रेटिसाने स्वतः काही लिहिलेले दिसत नाही. परंतु सबंध आयुष्य त्याने तत्कालीन तत्त्वज्ञ आणि सामान्य माणसे यांच्याशी चर्चा करण्यात व्यतीत केले, आणि या चर्चेतून तत्त्वज्ञानाच्या इतिहासाला एक वेगळे वळण लावले. त्याच्या वादपद्धतीचा एक उत्तम नमुना म्हणून हा संवाद उल्लेखनीय आहे.

सॉक्रेटिसाच्या तत्त्वज्ञानाची आपल्याला जी माहिती आहे तिचे स्रोत दोन, एक प्लेटोने लिहिलेले संवाद, आणि दुसरा झेनोफोन (Xenophon) ने लिहिलेल्या आठवणी. प्लेटोचे सर्व लिखाण संवादरूपात असून, बहुतेक संवादांत सॉक्रेटीस हे प्रमुख पात्र असते, परंतु हा सॉक्रेटीस खरा सॉक्रेटीस आहे की त्याचा बोलाविता धनी प्लेटो आहे असा प्रश्न सतत निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर असे आहे की प्लेटोच्या आरंभीच्या संवादांमधील सॉक्रेटीस बढुंशी खरा सॉक्रेटीस असावा. मात्र त्याच्या उत्तरकालीन संवादांतील सॉक्रेटिसाच्या तोंडून प्लेटो स्वतःचे तत्त्वज्ञान व्यक्त करतो. येथे उद्धृत केलेला संवाद प्लेटोचा एक पूर्वकालीन संवाद असून त्यातील सॉक्रेटीस हा बहंशी खरा सॉक्रेटीस
आहे असे मानले जाते.

या संवादातील दोन गोष्टींकडे लक्ष वेधणे अवश्य करते. (१) प्रत्येक वस्तुप्रकाराचे एकेक तत्त्व किंवा सार (essence) असते, आणि ते त्या प्रकारच्या सर्व वस्तूंमध्ये हजर असल्यामुळे त्या वस्तू त्या प्रकारच्या आहेत असे आपण म्हणतो. कोणत्याही वस्तु प्रकाराची व्याख्या देणे म्हणजे त्याचे सार सांगणे, या गोष्टीचा सॉक्रेटिसाने प्रथम स्पष्टपणाने उच्चार केला असे मानले जाते. या संवादात धर्म्य म्हणजे काय? या प्रश्नाची चर्चा असून धर्म्य पदार्थाचे सार शोधण्याचा प्रयत्न आहे. (२) यूथफ्रॉन धम्र्याचे सार म्हणून एका गुणाचा उल्लेख करतो. तो म्हणतो की धर्य म्हणजे जे देवांना आवडते ते. यावर सॉक्रेटीस विचारतो की एखादी गोष्ट देवांना आवडते म्हणून धर्म्य असते की ती धर्म्य असते म्हणून देवांना आवडते? ह्या प्रश्नाने युथिफ्रॉनची फजीती होते. हा प्रश्न नीतिशास्त्रातील अतिशय मूलभूत प्रश्नांपैकी आहे.

यूथिफ्रॉन
पात्रे : सॉक्रेटीस
स्थळ : प्रधान न्यायाधीशाच्या दालनाबाहेरचा परिसर
यूथिफ्रॉन – सॉक्रेटीस, तू आणि इथे! लायसीअममधील अड्डा सोडून न्यायमंदिराची पायरी कशी काय चढलास तू? मी जसं एक प्रकरण घेऊन आलो तसं तूही काही काम काढलं असेल म्हणावं तर ते संभवत नाही.
सॉक्रेटीस – नाही, यूथफ्रॉन, हे काम काही साधं प्रकरण नाही. याला आपले अथेन्सनिवासी फौजदारी खटला म्हणतात.
यूथि – काय? तुझ्याविरुद्ध कोणी खटला भरला म्हणतोस? तू स्वतःहून कोणावर खटला भरशील असं नाही वाटत.
सॉक्रे – ते मात्र खरं हं. मी असल्या फंदात मुळीच पडणार नाही.
यूथि – तर मग तुझ्यावरच खटला भरलाय कुणी तरी?
सॉक्रे – होय.
यूथ – कुणी?
सॉक्रे – कुणी ते मलासुद्धा नीट माहीत नाही, यूथफ्रॉन. एक नवखाच तरुण मनुष्य आहे. त्याचं नाव मिलेटस, निवास पिथिस येथे. आठवतो तुला कोणी मिलेटस तिथं राहणारा – बाकदार नाकाचा, लांब केस राखणारा आणि लहानशा दाढीवाला?
यूथि – नाही आठवत बुवा असा कोणी, सॉक्रेटीस. पण आधी हे सांग की तुझ्यावर तो जो खटला भरतोय तो काय म्हणून?
सॉक्रे – काय म्हणून? कारण काही लहान नाही वाटत मला. विषय केवढा गंभीर आणि एका तरुणाने त्यावर ठाम निर्णय करावा ही काही लहानसहान गोष्ट नाही. तो म्हणतो की, ‘मला तरुणांचा कसा अधःपात होत आहे ते दिसत आहे आणि त्यांना मार्ग भ्रष्ट करणारे कोण आहेत तेही मी जाणून आहे.’ हे ऐकून तर मला तो महापंडितच वाटतो. कारण माझं अज्ञान पाहून आपल्या मित्रांनी हा मार्गभ्रष्ट करतो असा माझ्यावर आरोप ठेवून आपल्या मातृसदृश नगरीसमोर तो मला उभे करायला निघाला आहे. मला तर वाटू लागलं आहे की, आपल्या राजकीय सुधारणा कुठून सुरू कराव्यात याची जाण असलेला तो एकमेव गृहस्थ आहे. म्हणजे असा की, नवयुवकांना आधी सर्वांगांनी परिपूर्ण केले पाहिजे याची त्याला जाण आहे. एखादा शहाणा शेतकरी नाही का कोवळी रोपं निवडून आधी त्यांची काळजी घेतो? आणि हे झालं म्हणजे मग तो दुसरीकडे लक्ष देतो. तसा मिलेटस, मला वाटतं, आधी आपले तण काढायला निघाला आहे. कारण त्याच्या मते आपण वाढत्या वयाच्या तरुणांना बिघडवत आहोत. हे काम एकदा आटोपलं की, तो आपली दृष्टी प्रौढांकडे वळवील, आणि अशा रीतीनं तो एक फार थोर लोकहितकर्ता होईल. इतक्या योजनाबद्ध रीतीने पावलं उचलल्यावर याशिवाय दुसरी कशाची अपेक्षा करणार तुम्ही?
यूथि – तसं झालं तर ठीकच, सॉक्रेटीस; पण मला मात्र त्याबद्दल जबर शंका आहे. तुला हानी करण्याच्या प्रयत्नात तो वस्तुतः या नगरीच्या मर्मस्थळावरच प्रहार करायला निघाला आहे असं मी समजतो. पण मला सांग की, तरुणांना भ्रष्ट करतोस म्हणजे काय करतोस म्हणतो तो?
सॉक्रे – तसं पाह्यलं मित्रा, तर ऐकायला ते चमत्कारिक अटतं पहिल्याने, त्याचं म्हणणं की मी नवे देव निर्माण करतो, म्हणून तो माझ्यावर खटला भरतो आहे. मी जुन्या देवांनी भजत नाही आणि नवे नवे देव पैदा करतो हा माझा गुन्हा.
यूथि – समजलं, सॉक्रेटीस. तू नेहमी म्हणत असतोस ना की तुला दैवी संदेश ऐकू येतात म्हणून. ही गोष्ट म्हणजे धर्मात नवं खुळ आणण्याचाच प्रकार; आणि तो कोर्टाकडे धाव घेतो आहे याचं कारण तो हे जाणून आहे की, असमंजस जनसंमर्दापुढे अशा गोष्टीचा विपर्यास विनासायास करता येतो. परिणामी तुझी बदनामी होईल. तुझं सोड, खुद्द माझीही थट्टा करून हसं उडवायला कमी करत नाहीत हे लोक. नगर परिषदेपुढे मी दैवी गोष्टींबद्दल बोलतो आणि काय होणार आहे याचं भविष्यही त्यांना सांगतो, तेव्हा त्यांना वाटतं मला पिसं लागलं आहे. तरी बरं झालं, माझी भविष्यवाणी खोटी ठरली असं कधी झालं नाही. आपल्यासारख्या सगळ्यांची त्यांना असूया वाटते. आपण त्यांचा विचार करणे सोडून द्यावे, धीटपणे त्यांचा मुकाबलाच करायला पाहिजे आपण.
सॉक्रे – गड्या यूथिफ्रॉन, त्यांची टवाळी ही फारशी गंभीर बाब नाही. आपले अथेन्सवासी, माझ्या मते, कोणालाही सहजासहजी सुविद्य समजायला तयार असतात. मात्र तो आपल्याला शहाणपणा शिकवतो आहे याचा संशय त्यांना नसला म्हणजे झालं. पण एकदा का त्यांच्या मनानं हे घेतलं की ह्यानं दुसर्‍यांना शहाणं करण्याचा उद्योग सुरू केला आहे की त्यांचं पित्त खवळलेच समजा, मग ते, तू म्हणतोस तसे, असूयेपोटी असो, की आणखी कशानं असो.
यूथि – या बाबतीत ते माझी काय गत करतील याची परीक्षा पाहायला फारसा उत्सुक नाही मी.
सॉक्रे – तसं नाही. तू फारसा कुठं येत नाहीस, आणि आपलं ज्ञान दुसर्‍यांना द्यावं यासाठी तू आतुर नाहीस असं ते समजत असावेत; परंतु मला मात्र मी तसा आहे असे ते समजत असावे, अशी शंका मला वाटते. कारण भेटेल त्याला हिरदा न ठेवता मोकळेपणाने आणि मोबदला न घेता मी बोलत बसतो. माझा उमाळा लोकांच्या प्रेमापोटी आहे. खरंतर, मला ऐपत असती तर माझं बोलणं ऐकण्याबद्दल मीच लोकांना आनंदाने पैसे दिले असते. म्हणून जर, मी आता म्हणालो तसं, त्यांना माझा नुसता उपहासच करायचा असतो, ते तुझा करतात असं तू म्हणतोस तसा, तर कोर्टात हास्यविनोद करून दिनक्रमणा करणं ही मुळीसुद्धा त्रासदायक गोष्ट नाही. परंतु त्यांचा हेतू गंभीर असेल तर मात्र तुझ्यासारखे भविष्यवेत्तेच जाणोत की प्रकरण कोणत्या थराला जाणार आहे.
यूथि – सॉक्रेटीस, मला तर वाटतं की यातून काहीच निष्पन्न होणार नाही. शक्यता तर अशी आहे की, तुझ्यावरील खटल्यात तू जिंकशील आणि माझ्या खटल्यात मी जिंकेन.
सॉक्रे – पण तुझी कसली फिर्याद आहे यूथिफ्रॉन? तुझी फिर्याद आहे की तुझ्यावर कोणाची?
यूथि – माझी फिर्याद आहे.
सॉक्रे – कोणाविरुद्ध?
यूथि – असा एक माणूस, की ज्यामुळे खटले करायचं खुळच माझ्या डोक्यात शिरलं असं म्हणायला लागले आहेत लोक.
सॉक्रे – का बरं? त्याला काय पंख आहेत का उडून जायला?
यूथि – तो कसला उडणार? फार वृद्ध गृहस्थ आहे तो.
सॉक्रे – आहे तरी कोण तो?
यूथि – तो आहे माझा बाप.
सॉक्रे – तुझा बाप? काय म्हणतोस तरी काय?
यूथि – अगदी खरं.
सॉक्रे – कशासाठी भरतोयस तू हा खटला त्याच्यावर? काय आरोप आहे?
यूथि – खुनाचा आरोप, सॉक्रेटीस.
सॉक्रे – वाहव्वा, यूथफ्रॉन! असमंजस लोकांना नीतित्त्विाचं ज्ञान नसतं. तू करतोयस तितक्या अधिकारीपणाने हे करू धजणे हे सर्वांचं काम नाही हे मी जाणून आहे. तुझ्यासारखा इतका पुढे गेलेला मनुष्यच हे करू जाणे.
यूथि – ते खरं आहे, सॉक्रेटीस.
सॉक्रे – तुझ्या पित्याने हत्या केलेला मनुष्य तुमचा आप्त होता? नाही कसा? असलाच पाहिजे. एखाद्या परक्या इसमाच्या खुनाबद्दल काही तू आपल्या जन्मदात्यावर खटला भरणार नाहीस!
यूथि – तुझं नवलच आहे सॉक्रेटीस. खुन झालेला मनुष्य आप्त होता की परका इसम होता यानं काय फरक पडतो? प्रश्न एवढाच विचारात घ्यायला हवा की, हत्या करणार्‍यानं केलेली हत्या न्याय्य होती की अन्याय्य ? ती न्याय्य असेल तर त्याच्या वाटेला कोणी जाऊ नये. अन्याय्य असेल तर मात्र खुनाच्या आरोपाखाली त्याला न्यायालयात खेचलंच पाहिजे. मग तो तुमचा बैठकीत बसणारा असो की एका पंगतीत जेवणारा. दूषण सारखंच, अशा माणसाशी तुम्ही संगत ठेवली आणि त्याने काय कर्म केलं माहीत असूनही उभे केले नाही तर होणारे दूषण सारखंच! प्रस्तुत प्रकरणात खून झालेला मनुष्य आमचा एक गरीब आश्रित होता. तो आमच्या नाक्सॉस येथील शेतावर कारभारी होता. दारूच्या नशेत आमच्या एका गुलामाचा त्याला राग आला, आणि त्या भरात त्याचा त्याने जीव घेतला. यावरून माझ्या वडिलांनी त्याचे हातपाय बांधले आणि त्याला एका खड्ड्यात फेकून दिलं, आणि अथेन्सला माणूस पाठवून पुढे काय करावे याचा कौल देवाजवळून मागवला. दूत रवाना झाल्यावर वडिलांनी याची बिलकुल खबरबात घेतली नाही. विचार असा की, एवीतेवी तो खुनीच. त्यामुळे तो मेलाही तरी मोठंसं बिघडणार नाही. आणि घडलं ते नेमकं तस्संच. भूक, थंडी आणि बेड्या यांनी दूत परतण्यापूर्वीच त्याचा प्राण घेतला. आणि आता माझे वडील आणि घरातले इतर माझ्यावर भडकले आहेत मी वडिलांवर ह्या खुन्याचा त्यांनी खून केल्याबद्दल खटला भरायला निघालो म्हणून. त्यांचं म्हणणं की त्यांनी त्या माणसांचा खून केलाच नाही मुळी; आणि वर म्हणतात की, जरी त्यांनी एकदा सोडून अनेकदा त्याला मारलं असतं तरी तो माणूस स्वतःच खुनी होता. अशा माणसाच्या भानगडीत मी पडावं हे मुळीच योग्य नाही असं त्यांचं म्हणणं, कारण पुत्रानं प्रत्यक्ष आपल्या पित्यावर खुनाचा खटला चालवणं हे पाप आहे. पापपुण्याच्या दैवी कायद्याबद्दल, सॉक्रेटीस, ह्या लोकांचं केवढे हे अज्ञान!
सॉक्रे – तुझ्या म्हणण्याचा अर्थ, यूथफ्रॉन, हाच ना की, तुझ्या मतानुसार तू दैवी गोष्टींचा जाणकार आहेस. तसेच पुण्य आणि पाप यांचं तुझं ज्ञान इतकं बिनचूक आहे की, खुद्द आपल्याच हातून पापकर्म तर घडत नाही ना याची शंकासुद्धा मनात न आणता तू आपल्या पित्याला न्यायासनासमोर खेचू शकतोस.
यूथि – या गोष्टींचं माझं ज्ञान काटेकोर नसेल, तर सॉक्रेटीस माझा उपयोग काय? आणि मग यूथफ्रॉन जनांपेक्षा मुळीसुद्धा श्रेष्ठ राहणार नाही!
सॉक्रे – मग, यूथिॉन, माझा खटला सुरू होण्याआधीच, तुझं शिष्यत्व पत्करावं आणि मिलेटसला ह्याच मुद्द्यावर आव्हान द्यावं यापेक्षा आणखी चांगलं काय असू शकेल? मी हे म्हणणार की, दैवी गोष्टींचे ज्ञान मी नेहमीच महत्त्वाचं मानत आलो आहे; आणि त्यांबद्दल अनादरानं बोलून आणि आपल्या पदरचंघालून मी त्यांची अवहेलना करीत आहे असे तो म्हणत असताना, आता, मी तुझा शिष्य झालो आहे; आणि मी म्हणणार की, मिलेटस, तू यूथफ्रॉनला या बाबतीतला तज्ज्ञ मानत असशील आणि योग्य मत असणारा समजत असशील, तर मलाही तसाच मान, आणि माझ्यावरचा खटला काढून घे; पण तसं नसेल तर, खटला भर, पण माझ्याविरुद्ध नाही, तर माझ्या गुरुवर्याविरुद्ध, ते आपल्या वडीलधार्‍यांना भ्रष्टवीत आहेत म्हणून; म्हणजे ते मला आपल्या सिद्धांतांनी भ्रष्टवीत आहेत आणि खुद्द आपल्या पित्याला, त्यांची भर्सना करून आणि दंड देववून त्यांचंही पतन ते करवीत आहेत. आणि खटल्यातून मला मोकळे करण्यास किंवा माझ्या जागी तुझ्यावर आरोप ठेवण्यास त्याचं मन वळविण्यात मला यश आलं नाही तर, मी माझ्या ह्या आव्हानाचा न्यायालयात पुनरुच्चार करू शकेन.
यूथि – झ्यूसची शपथ, सॉक्रेटीस, त्याने मला खटल्यात गुंतवून पाहावेच. मी त्याच्या वर्मावर बोट ठेवल्यावाचून राहणार नाही. न्यायालयात स्वतःबद्दल काही बोलायची पाळी यायच्या आधीच त्याचे वाभाडे काढायला भरपूर अवसर मिळेल मला.
सॉक्रे – होय मित्रा, हे जाणूनच मी तुझा शिष्य व्हायला एवढा उत्सुक झालो आहे. इथेच मिलेटसचे आणि अन्य लोकांचे ही तुझ्याकडे मुळीच लक्ष गेलेले दिसत नाही हे माझ्या ध्यानात आले. पण माझा कमकुवतपणा त्याने ओळखला आहे म्हणून घाईने माझ्यावर पाखंडीपणाबद्दल खटला भरायला तो निघाला आहे. म्हणून आता तू जे ज्ञान तुला असल्याचे एवढ्या विश्वासाने सांगत होतास ते मला समजावून सांग. खुनाच्या संदर्भात आणि इतरही धर्म्य काय आणि अधर्म्य काय ते मला सांग, ‘पुण्य’ सर्व कर्मात एक सारखेच असणार, आणि पाप सर्वदा पुण्याच्या विरुद्ध आणि म्हणून त्याचे सार सर्वत्र एकच असणार, आणि जे म्हणून पापकर्म असेल तेथे ते हटकून आढळणार.
यूथि – अर्थात्, सॉक्रेटीस, मीही तेच म्हणतो.
सॉक्रे – तर मग, पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय ते मला सांग.
यूथि – ऐक. पुण्य म्हणजे दुष्कर्म करणार्‍यावर खटला भरणं, त्यानं खून केला म्हणून म्हणा की देवताद्रोह केला म्हणून म्हणा किंवा त्या सारखा दुसरा काही गुन्हा केला म्हणून म्हणा, मी आता भरणार तसी खटला भरणं, मग तो तुमचा पिता असो अथवा माता असो की आणखी कोणी असो; आणि पाप म्हणजे अशा कुकम्र्याला सोडून देणं आणि सदाचार म्हणजे देवताद्रोह्याला तसाच सोडून न देणं, मग तो कोणी का असेना. आणि सॉक्रेटीस, मी तुला याचं निर्णायक प्रमाण देईन. ते मी पुष्कळांना दिलेलं आहे. लोक झ्यूसला सर्वोच्च देवाधिदेव, श्रेष्ठ न्यायदात्री देवता समजतात; तेही कबूल करतात की, झ्यूसने आपल्या पित्याला क्रोनॉसला बंदिस्त केले, कारण त्याने दुष्टपणाने आपल्याच अपत्यांना गिळंकृत केले; आणि क्रोनॉसने आपल्या पित्याला तशाच कारणासाठी नपुंसक केले. आणि तरीही हेच लोक मी दुष्कर्माबद्दल आपल्या पित्यावर कारवाई करायला निघालो आहे म्हणून माझ्यावर कोपले आहेत. आता तूच पहा, हे लोक देवांना एक न्याय लावताहेत आणि मला दुसरा.
सॉक्रे – माझ्यावर जो खटला होतोय तो देखील यासाठीच ना, यूथफ्रॉन? माझं म्हणणं हेच की, लोक देवादिकांबद्दल जे बोलतात ते ऐकून मला दुःख होतं. मला या गोष्टी खुन्या वाटत नाहीत म्हणून लोक मला पातकी समजतील अशी माझी समजूत आहे. आता तुला या सर्व गोष्टींची चांगली माहिती आहे. पण तूही या कथा त्यांच्यासारख्याच खर्‍या समजत असशील, तर मला वाटतं मी माघार घेतलेलीच बरी. या गोष्टींमध्ये आपल्याला काही कळत नाही हे मीच कबूल करत असता मी त्याबद्दल काय म्हणणार? पण मला आपल्या मैत्रीखातर सांग की, ह्या गोष्टी खरोखरी घडल्या असतील असं वाटतं तुला?
यूथि – अवश्य. ह्याच काय आणखी कितीतरी चकित करणाच्या कथा आहेत, सॉक्रेटीस, यो सामान्य जनांना माहीत नसणार्‍या.
सॉक्रे – तर मग देवांमध्ये युद्ध होतात यावर तुझा विश्वास आहे तर. त्यांच्यात उग्र हेवेदावे असतात आणि ते लढाया करतात, विशेषतः कवी वर्णन करतात तशा, आणि थोर चित्रकारांनी आपल्या मंदिरामधील चित्रांत रंगवल्या आहेत, विशेषतः आपल्या राष्ट्रीय महोत्सवात अॅक्रोपोलिस येथे घेऊन जातात ह्या महावस्त्रावर जी चितारली आहेत अशा चित्रांतल्या प्रमाणे. ह्या सगळ्या कथी खन्या आहेत असं का म्हणायचं आपण यूथिॉन?
यूथि – होय सॉक्रेटीस आणि आणखी पुष्कळ. तुला हवे असेल तर मी म्हटले तशा दिव्यकथा पुष्कळ ऐकवीन. त्या ऐकशील तर तू चकित होऊन जाशील याची खात्री आहे मला.
सॉक्रे – असतील बुवा. पुन्हा केव्हातरी तुझ्या सवडीनं तू मला त्या सांग. सध्या मी तुला आत्ता विचारलेल्या प्रश्नाचं जास्त निश्चित उत्तर देता येते का पाहा. मित्रा, मी तुला विचारलं होतं की, पुण्य म्हणजे काय? आणि तू माझं समाधान होईल असं उत्तर अजून दिलं नाहीस. तू फक्त एवढं म्हणतोस की, तू आत्ता जे करीत आहेस, म्हणजे आपल्या वडिलांनी खून केल्याबद्दल त्यांच्यावर खटला भरणं, ते एक
पुण्यकर्म आहे.
यूथि – पण ते खरे आहे, सॉक्रेटीस.
सॉक्रे – असेल. पण आणखी पुष्कळ कर्मे पुण्य असतात. असतात ना यूथिफ्रॉन?
यूथि – अर्थात्.
सॉक्रे – मग, ध्यानात घे की, जी म्हणून पुण्यकर्मे असतील त्यातली एखाददुसरी पुण्यकर्मे कोणती ते मी तुला विचारलं नाही. मला हे जाणून घ्यायचे आहे की, सकल पुण्याचे अवश्य तत्त्व काय आहे की ज्यामुळे पुण्यकर्मे पुण्य ठरतात. मला वाटतं, तू म्हणाला होतास की सर्व पुण्यकर्मे ज्यामुळे पुण्य होतात असं एक तत्त्व असतं आणि ज्यामुळे सर्व पापकर्मे पाप होतात असे दुसरं एक तत्त्व असतं. आठवण आहे
तुला?
यूथि – आहे.
सॉक्रे – तर मग मला समजावून सांग, ते कोणतं तत्त्व आहे. म्हणजे त्याचा आधार घेऊन आणि तो निकष वापरून मी तुझ्या कृत्याबद्दल आणि इतरांच्याही कृत्यांबद्दल निर्णय करू शकेन आणि म्हणू शकेन की कोणतीही कृती घ्या ती या समान असेल तर ती धर्म्य आहे आणि अशी नसेल तर ती धर्म्य नाही.
यूथि – तुझी इच्छा असेल, सॉक्रेटीस, तर ते मी तुला अवश्य सांगेन.
सॉक्रे – होय, माझी तशी फार इच्छा आहे.
यूथि – हे पाहा जे देवांना तोषवितं ते धर्त्य; आणि जे देवांना तोषवीत नाही ते अधर्म्य.
सॉक्रे – यूथफ्रॉन, मला हवे ते उत्तर तू आत्ता दिलंस, मात्र तू म्हणतोस ते खरं की कसं हे इतक्यात सांगता येणार नाही मला. पण त्याची सत्यता तू सिद्ध करून देशीलच म्हणा..
यूथि – अवश्य.
सॉक्रे – चल तर मग, आपण आपले शब्द पारखून घेऊ या. देवांना तोषकारक गोष्टी आणि व्यक्ती धर्त्य; आणि देवांनी असंतोषकारक गोष्टी आणि व्यक्ती ह्या अधर्म्य, परंतु धर्म्य आणि अधर्म्य एकच नव्हेत, त्या दोन ध्रुवांइतक्या विरुद्ध गोष्टी आहेत, असेच आपण म्हणालो, नाही का?
यूथि – असेच.
सॉक्रे – आणि मला वाटतं ते म्हणणं बरोबर होतं.
यूथि – होय, सॉक्रेटीस, तसंच म्हणालो आपण.
सॉक्रे – आपण असंही म्हणालो नाही का, यूथफ्रॉन, की देवांमध्ये तट असतात, मतभेद असतात, आणि हेवेदावे असतात?
यूथि – होय, म्हणालो.
सॉक्रे – पण मित्रा, कशा प्रकारचे मतभेद द्वेष आणि क्रोधांना कारणीभूत होतात? ह्या प्रश्नाकडे जरा असं बघू. एक संख्या दुसरीहून मोठी आहे की नाही याबद्दल समजा, तुझ्यात आणि माझ्यात मतभेद झाला तर तो क्रोधाला कारण होऊन आपल्याला वैरी बनवील? असा वाद एका झटक्यात संख्या मोजून मिटवता येणार नाही आपल्याला?
यूथि – अर्थात् येईल.

(अपूर्ण)
‘शांतिविहार’, चिटणवीस मार्ग सिव्हिल लाइन्स,
नागपूर – ४४० ००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.