माझे औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील गुरू डॉ. भालचंद्र फडके मला १९६६ मध्ये अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रो. श्रीमती म. गं. नातू यांच्याकडे घेऊन गेले. डॉ. भालचंद्र फडके यांनी माझी हमी घेतल्यामुळे बाईंनी मला पीएच्. डी. करिता मार्गदर्शन करण्याचे मान्य केले. मी विदर्भातील नोकरी सोडून पैठणला आलो. १९७६ मध्ये मला पीएच्. डी. मिळाली. बाईंशी या निमित्ताने आलेला ऋणानुबंध पुढेही कायम राहिला. १९४६ पासून १९७७ पर्यंत बाई विदर्भ महाविद्यालयात होत्या. निवृत्त झाल्यानंतर त्या नागपूर येथे स्थायिक झाल्या. दि. ३ एप्रिल १९८८ रोजी बाई नागपूर येथे निधन पावल्या. नामवंत लेखिका, परखड समीक्षक, स्त्री-स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या आणि विद्वान प्राध्यापक असलेल्या बाईंच्या निधनाची वार्ता नागपूरच्या प्रादेशिक वृत्तपत्राखेरीज महाराष्ट्रात अन्यत्र पोहोचलीच नाही. मला स्वतःला ही वार्ता ‘ललित’ मासिकाच्या मे अंकातील नोंदीवरून कळली आणि विलक्षण हुरहूर वाटली.
बाईंचे घराणे मूळ वाई या सातारा जिल्ह्यातील गावचे होते. बाईंचे वडील गंगाधर जनार्दन नातू विदर्भात नोकरीनिमित्त आले. बाईंचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण परतवाडा येथेच झाले. वडील वारल्यानंतर बाई पुढील शिक्षणासाठी नागपूर येथे आपल्या वडील बहिणीच्या घरी दामले कुटुंबात राहिल्या. नागपूर विद्यापीठाची मराठी विषयातील एम.ए. परीक्षा उत्तीर्ण होताच १९४६ मध्ये त्यांची अमरावती येथील किंग एडवर्ड कॉलेजात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९३० च्या आसपास विदर्भात प्रेमविवाहाची लाट उसळली होती. तिचा प्रभाव पुढेही कायम होता. १९५१ मध्ये बाईंनी याच महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्रा. दि. य. देशपांडे यांच्याशी नोंदणीपद्धतीने विवाह केला.
सौंदर्यशास्त्राचे अधिकारी विद्वान असा प्रो. देशपांडे यांचा लौकिक असून सध्या ते नागपूर येथेच असतात. बाईंनी लग्नानंतर आपले नाव बदलले नाही की मंगळसूत्र घातले नाही. बाईंनी कधी कपाळाला कुंकू लावले नाही की आपल्या नावाआधी सौ. लिहिले नाही. त्या बॉबकट करीत होत्या. त्यांच्या या पुरोगामी वर्तनामुळे लोक त्यांच्यापासून फटकून असत असे वाटते. डॉ. शं. दा. पेंडसे, डॉ. वि. भि. कोलते, प्रो. श्री. ना. बनहट्टी, प्रो. श्री. ल. पांढरीपांडे हे बाईंचे विद्यागुरू होते. विदर्भातील थोर समाजसेवक मामा क्षीरसागर यांनी बाईंना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर पितृवत् आधार दिला. बाबा रेडीकर यांच्या समाजकार्याचा बाईंच्या मनावर प्रभाव होता. या सर्वांचा आदर्श बाईंनी आपल्या आचरणात आणला. अनेक विद्यार्थ्यांना सांभाळून त्यांनी शिक्षण दिले. बाईंची शरीरप्रकृती अधूच होती. प्रकाशाचा त्रास होत असल्यामुळे दिवसासुद्धा त्या अंधाऱ्या खोलीत बसत. हात दुखत असल्यामुळे पत्रलेखनासाठीसुद्धा त्यांना इतरांची मदत लागत असे. कमरेला पट्टी बांधल्याशिवाय त्यांना चालता येत नसे. असे असले तरी मनाने त्या प्रसन्न, आनंदी आणि उत्साही होत्या. अशा परिस्थितीतही त्यांचे वाचन चौफेर आणि विपुल होते. त्यांनी विपुल लेखनही केले पण या लेखनाची महाराष्ट्राने फारशी दखल घेतलेली नाही ही वस्तुस्थिती आहे.
‘विवेकाची गोठी’
बाईंनी लिहिलेल्या विवेकवादी निवडक लेखांचा हा संग्रह १९७७ मध्ये प्रकाशित झाला. ‘महाराष्ट्रातील विवेकवादाचा आद्य प्रणेता’ म्हणून त्यांनी आगरकरांचा गौरव केलेला आहे. त्यांनी अनेक संकटांना तोंड दिले. सामाजिक छळ सहन केला. पण महाराष्ट्राने त्यांची उपेक्षाच केली. त्यांचे एकही स्मारक झालेले नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. ‘मनुष्य चुकला असला तरी प्रामाणिक होता हाच आगरकरांचा मोठेपणा’ या केळकरांच्या उद्गारावरून आगरकरांच्या तत्त्वज्ञानाचे माहात्म्य ‘भल्याभल्यांना कळले नाही’ असा अभिप्राय त्यांनी नोंदला. ‘सुधारकातील आगरकरांचे लेख पाश्चात्य ग्रंथकारांच्या तत्त्वज्ञानातून घेतलेल्या उसन्या विचारांनी भरलेले आहेत’ या माडखोलकरांच्या विधानाचा परखड परामर्श घेऊन बाईंनी आगरकरांच्या बुद्धिवादी विचाराचे विस्तृत विवेचन केले आहे. ‘सुधारक चुकले काय?’ या लेखात लोकहितवादी, जोतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे इत्यादी सुधारकांच्या कार्याचा परामर्श घेतला असून ‘जुनी कुटुंबव्यवस्था अस्तित्वात असेपर्यंत समतावादी कुटुंब स्थापन होणार नाही, आणि तोवर स्वातंत्र्य, समता, बंधुता हे केवळ घोषवाक्यच राहील’ असा निकर्ष काढलेला आहे. प्रो. वा. म. जोशी यांनी आपल्या कादंबरीलेखनात रंगविलेल्या विविध स्त्री-व्यक्तिरेखांतून व्यक्तिस्वातंत्र्य आणि समता या ध्येयांचा त्यांनी पाठपुरावा केला, हे सोदाहरण सांगून ‘इंदू काळे – सरला भोळे या कादंबरीत त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा एकदम त्याग केला, याचा अर्थ त्यांना ही ध्येये शेवटपर्यंत पेलता आली नाहीत’, असे बाईंनी दाखविले आहे.
मुद्देसूद, तर्कसंगत लेखन
कोल्हटकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्याविपयी विपुल लेखन झाले. सुधारक म्हणून त्यांनी आगरकरांच्या सुधारणावादाचा आपल्या लेखनातून का पुरस्कार केला हे सांगणाच्या बाईंचे लेखन मुद्देसूद, तर्कसुसंगत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. आगरकरांच्या विचारातून आलेल्या अनेक सिद्धांतांची मांडणी कोल्हटकरांच्या नाटकांत आणि विनोदी लेखनात दिसते. समीक्षा लेखनातही त्यांनी स्त्रियांची बाजू घेऊन प्रतिकूल आणि प्रतिगामी विचारांचा खरमरीत समाचार घेतला. ‘ज्ञानेश्वरीवरील आक्षेप – एक चिंतन’ आणि ‘संतांचे सामाजिक कार्य – एक पुनर्विचार’ हे दोन्ही लेख संत वाङ्मयाविषयी आहेत. ज्ञानेश्वर मानवतावादाचे पुरस्कर्ते असले तरी ज्ञानेश्वरीमध्ये शूद्रांवर अन्याय करणारी वचने का आली असावीत याचे चिंतन करताना हा दोष गीतेतूनच आलेला आहे. असे बाईचे प्रतिपादन आहे. ज्ञानेश्वरी हा परलोकविषयक ग्रंथ असला तरी लौकिक जीवनातील कर्तव्ये सांगताना त्यांनी रूढी-परंपरांचाच पुरस्कार केला. ज्ञानेश्वर सती जाणाऱ्या स्त्रीचा गौरव करतात तर वांझ, विधवा आणि वेश्या यांच्याविषयी तुच्छता दर्शवितात, यावरून नीतीच्या क्षेत्रात ज्ञानेश्वरही गतानुगतिक होते असा अभिप्राय त्यांनी नोंदला आहे.
या संग्रहातील शेवटचा लेख ‘पहिले कर्ते सुधारक’ म्हणजे म. फुले यांची गौरवगाथा आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचे विस्तृत विवेचन करून त्यांचे वेगळेपण बाईंनी टिपले आहे. मानवाचा विवेक जागृत व्हावा म्हणून म. फुले यांनी विद्येचा पुरस्कार केला. परंपरागत श्राद्धादी विधी न करता भुकेल्यांना अन्न व गरीब विद्यार्थ्यांना पाट्या, पुस्तके, फी, कपडे इत्यादी मदत करावी, ही मदत करताना गरीव ब्राह्मण विद्यार्थ्यांना वगळू नये असे सांगणारे जोतिबा आचार-विचाराचे समभाव पाळणारे होते. त्यांनी दरिद्री आणि निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केले पण हे सहाय्य देताना शिक्षकाकडून अभ्यासाचा आणि वर्तनाचा दाखला आणावा, अशी अट त्यांनी घातली. विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी त्यांनी मॅट्रिक पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णपदक ठेवले.
म. फुले यांच्या कार्यामुळे ‘रशियन क्रांतीपूर्वीचे सर्वात मोठे कम्युनिस्ट’ असा गौरव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला, तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ‘महाराष्ट्राचा वॉशिंग्टन’ म्हणून त्यांचा गौरव केला अशी माहिती बाईंनी नोंदली आहे. म. फुले हे विवेकवादी विचारवंत होते. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक लिहून त्यांनी आपल्या विचाराची सांगता केली. हे लेखन त्यांनी अर्धागाचा झटका आल्यामुळे डाव्या हाताने लिहून पूर्ण केले अशी माहिती बाईंनी दिली आहे. या महान नेत्यावर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या दोन्ही वर्गाकडून अन्याय झाला. ‘त्यांनी केलेल्या अनेकविध समाज सुधारणांकडे दुर्लक्ष करून ब्राह्मणवर्गाने फक्त त्यांचा ब्राह्मणविरोधच लक्षात ठेवला तर ब्राह्मणेतरांनी त्यांचा ब्राह्मणविरोधच उचलून धरला’ या बाईंच्या निष्कर्षाशी समजदार माणूस सहमत होईल.
‘वेदनेचा वेध’
मराठीतील नामवंत लेखक चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या अनेक कादंब-यां मध्ये आलेल्या वेगवेगळ्या स्त्री-पात्रांच्या आकलनाचा प्रयत्न’ वेदनेचा वेध’ या समीक्षा ग्रंथात झालेला आहे. खरे तर खानोलकरांच्या कादंबरीलेखनावर विपुल प्रतिकूल टीका झालेली होती. खानोलकर विविध प्रकृतीच्या, प्रवृत्तींच्या, स्वभावाच्या स्त्रियांच्या विविध दुःखांचा वेध घेतात, या वैशिष्ट्यामुळे बाई या लेखनास प्रवृत्त झाल्या असाव्या असे वाटते. या निमित्ताने बाईंनी खानोलकरांच्या अकरा कादंबऱ्यांचे रसग्रहण केले आहे. कादंबरीत आलेल्या विविध स्त्रियांची वैशिष्ट्ये विस्तृतपणे सांगून त्यांच्या दुःखाचा वेध बाईंनी घेतलेला आहे. केवळ स्त्रियांचे दुःख वाचकांपुढे न मांडता त्यामागील कारणमीमांसा वाचकांपुढे मांडतात, म्हणून खानोलकर एक किमयागार होते असा बाईंचा अभिप्राय आहे.
‘आगरकर वाङ्मयाचे संशोधन’
आगरकरांवरील भक्तीमुळे बाईंनी प्रो. दि. य. देशपांडे यांच्या सहकार्याने आगरकरांच्या समग्र वाङ्मयाच्या संपादनाचे काम पूर्ण करून साहित्य संस्कृती मंडळामार्फत तीन खंडांत ते प्रकाशित केले. पहिल्या दोन खंडांत सुधारणाविषयक लेख असून तिसऱ्या खंडात विविध विपयावरील लेख समाविष्ट झाले आहेत. आगरकरांचे हे वाङ्मय दुर्मिळ झाल्यामुळे त्याचे संपादन करावे असे संपादकांना वाटले हे एक कारण आहे. आगरकरांचे विचार कालबाह्य झालेले नाहीत. त्यांनी पुरस्कारलेली विवेकवादी जीवनदृष्टी आणि समतावादी तत्त्वज्ञान समाजाने आत्मसात केले नाही, उलट अंधश्रद्धा आणि विषमता वाढीस लागल्यामुळे समाजाची परागती थांबविण्यासाठी आगरकरांच्या विचाराची गरज आहे अशीही या संपादनामागील भूमिका आहे. सुमारे पन्नास पृष्ठांची या ग्रंथास जोडलेली प्रस्तावना म्हणजे आगरकरांच्या जीवनकार्याविषयीचा प्रबंधच होय.
आगरकरांचे चरित्र मोठ्या श्रद्धेने व सहानुभूतीने या प्रस्तावनेत सांगितले आहे. आगरकरांनी महाराष्ट्राला विवेकवादी तत्त्वज्ञान दिले. आगरकरांनी हे लेखन इंग्रजीत केले असते तर त्यांनी हिंदुस्थानाला विवेकवादी तत्त्वज्ञान दिले असे म्हणता आले असते. या तत्त्वज्ञानास आपल्या निःस्वार्थ आणि कृतिशील चारित्र्याची जोड देऊन विवेकी जीवनाचा आदर्शच त्यांनी समाजापुढे ठेवला. आपले विचार समाजापुढे मांडण्यासाठी त्यांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले, आणि निर्भयपणे हे विचार समाजापुढे मांडले. आपला मृत्यू जवळ आलेला पाहून आगरकरांनी आपल्या पत्नीला केशवपन करू नये आणि स्वाभिमानाने मुलांचा सांभाळ करावा असे सांगितले. आपल्या अन्त्यकार्यासाठी त्यांनी बांधून ठेवलेली पैशाची पिशवी पाहून गोखल्यांना रडू कोसळले अशी माहिती या प्रस्तावनेत आली आहे.
आगरकरांच्या सुधारणाविचारांत व्यक्तिस्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे आधारभूत आहेत. वर्तमान व्यवस्थेत या तत्त्वांची कशी उपेक्षा झाली आहे हे विस्ताराने सांगून आगरकरांनी नवीन आचारविचार सुचवले आणि समाजाने त्यांचा स्वीकार करावा म्हणून प्रयत्न केले. आगरकरांच्या सुधारणाविषयक विचाराचे क्षेत्र किती व्यापक होते याचा तत्त्वसुसंगत परिचय या प्रस्तावनेत आलेला आहे.
आपण जातिभेद नष्ट करू शकलो नाही, उलट जातींनी आपला सवतासुभा निर्माण करून बळ वाढविल्यामुळे राष्ट्राच्या एकतेस धोका निर्माण झाला आहे. आजम समाज आगरकरांच्या विचारांच्या शंभर वर्षे मागे आहे. आगरकरांनी आपल्या विवेकबुद्धीला पटले ते विचार स्वीकारून स्वतंत्र सुधारणाविचाराची मांडणी केली. आगरकर धर्मबुडवे नव्हते. इतरांनी हिंदू धर्मावर टीका केली. त्यावर आगरकरांनी कसा हल्ला केला याचे सविस्तर विवेचन या प्रस्तावनेत आहे.
‘कृतार्थ जीवन’
आगरकरांच्या विचाराप्रमाणे बाई स्वतंत्रपणे आपले जीवन जगल्या. प्रखर बुद्धिमत्ता, अखंड व्यासंग आणि समाजसुधारणेची तळमळ हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होते. निवृत्त झाल्यानंतर बाईंनी आपल्या मिळकतीचा ट्रस्ट करून टाकला. या ट्रस्ट-मार्फत अनाथ-निराधार मुलींचे संगोपन, शिक्षण, विवाह आणि पहिले बाळंतपण याची कायम तरतूद करून ठेवलेली आहे. अनेक सार्वजनिक संस्थांना देणग्या दिल्या. मामा क्षीरसागर आणि बाबा रेडीकर या थोर पुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भ महाविद्यालयातून एम.ए. च्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणा-या विद्याथ्र्यास आणि नागपूर विद्यापीठाच्या मराठी विषयातील एम.ए. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पारितोषिके ठेवली. बाईंचा स्वतःचा प्रचंड ग्रंथसंग्रह त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या ‘गडकरी संदर्भ ग्रंथालयास’ देऊन टाकला. अशा या विवेकी, परोपकारी, तेजस्वी विदुषीचे स्मारक म्हणून नागपूरहून ‘नवा सुधारक’ हे मासिक प्रकाशित होत आहे. बाईंच्या मार्गदर्शनाच्या निमित्ताने त्यांचा लाभलेला सहवास, त्या सहवासात भेटलेली अनेक मोठी माणसे माझ्याही जीवनात आनंदाचे अविस्मरणीय क्षण निर्माण करून गेली. गुरुवर्य नातूबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
‘सुनीत’, पैठण, औरंगाबाद