यशोदाबाई आगरकर ह्या थोर समाजसुधारक कैलासवासी गोपाळ गणेश आगरकर यांच्या पत्नी होत. आगरकर बी.ए. च्या वर्गात असताना कऱ्हाडजवाज गावातील मोरभट फडके यांची कन्या अंधुताई हिच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर तिचे नांव यशोदाबाई ठेवण्यात आले. या विवाहाच्या वेळी यशोदाबाईचे वय दहा वर्षांचे होते. आगरकर पुण्याला शिकत असल्यामुळे आणि यशोदाबाईचे वय लहान असल्यामुळे त्या या काळात माहेरी म्हणजे उंब्रजला रहात असत. आगरकर सुट्टीत आले की, मग त्या टेंभूला सासरी जात.
सन १८८० मध्ये आगरकर एम.ए. झाले आणि वर्षभरात ते पुण्याला न्यू इंग्लिश स्कूल व केसरी या कार्यांत गुंतल्यावर त्यांनी पुण्याला संसार थाटला. तेव्हा आगरकरांच्या मावशीसह यशोदाबाई बैलगाडीने उंब्रजहून पुण्याला आल्या आणि शनिवारपेठेत, ओंकारेश्वरानजीकच्या तांबेवाड्यात त्यांनी बिऱ्हाड मांडले.
आपली पत्नी स्वावलंबी व्हावी, शहाणी व्हावी म्हणून आगरकर स्वतः तिला शिकवीत. तिला पुस्तके आणून देत. तिजकडून वह्या तपासून घेत. आपल्या पाठीमागे पत्नीने कोणाकडे पाहू नये असा आगरकरांचा प्रयत्न होता. परंतु हे प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाहीत. शेवटी कंटाळून आगरकरांनी यशोदाबाईंना शिकविण्याचा नाद सोडून दिला.
कोल्हापूर प्रकरणाच्या निमित्ताने टिळक-आगरकरांना १०० दिवसांची शिक्षा झाली व त्यांना डोंगरीच्या कारागृहात जावे लागले. जाताना आगरकर म्हणाले, “हे पाहा, आमची काळजी करू नका, कुठं जाऊ नका, की कुणाची मदत मागू नका.” पुढे तुरुंगातील हालअपेष्टांची वार्ता यशोदेला समजताच तिला रडू कोसळले. धीर द्यायला नामजोश्यांची पत्नी आली होती. ह्या गोष्टीचा गवगवा झाला. आगरकर सुटून आल्यावर त्यांना ही गोष्ट कळली. तेव्हा ते यशोदाबाईस म्हणाले, “आमची अवज्ञा केलीत, आमची रडकथा बाहेर जायला नको होती. पुढे असे करू नका.”
१८८७ साली ‘केसरी’शी मतभेद झाल्यामुळे आगरकरांनी ‘सुधारक’ पत्र काढले. कालांतराने आपट्यांचे निधन झाल्यावर आगरकर फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य झाले. यामुळे यशोदाबाईंच्या जीवनात थोडे सुखाचे वारे येऊ लागले. या वेळेपासून लोक त्यांना यशोदाबाई किंवा येसूताई म्हणत. येथे एक गंमतीदार घटना सांगितली पाहिजे. यशोदाबाई ह्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्या जोगेश्वरीच्या देवळात जाऊन धार्मिक विधी करीत. हे कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी पाहिले. त्यांनी हा प्रश्न आगरकरांना विचारला. आगरकर हसत म्हणाले, “त्या मिसेस आगरकर आहेत, ज्याला जसे पटेल तसे त्यांनी आचरण करावे.” म्हणजे असे दिसून येईल की यशोदाबाईंच्यावर आगरकरांचे कधी दडपण नव्हते.
दिनांक १७ जून, १८९५ रोजी आगरकरांचे निधन झाले. तेव्हा यशोदाबाई मुलांना घेऊन गोळेवाड्यात राहिल्या. त्या पुण्यास दीड दोन वर्षे होत्या. मग १८९७ च्या प्लेगात त्यांनी बिऱ्हाड अन्यत्र हलविले. आगरकरांच्या निधनानंतर यशोदाबाई परावलंबी झाल्या होत्या. परंतु आगरकरांचे मामा दत्तोपंत भागवत यांनी मदतीचा हात दिला आणि त्यांना अकोल्यास नेले. यशोदाबाईंनी काही आठवणी सांगितल्या आहेत. त्या मोठ्या हृदयंगम आहेत. आगरकरांच्या जीवनातील ही एक आठवण आहे. लहानपणी हे अतिशय व्रात्य आणि हूड होते. नेहमी धांगडधिंगा, खेळ, झाडावर चढणे, नदीत डुंबणे असा त्यांचा क्रम सुरू असे. एकदा ते असेच झाडावर चढले असताना मागाहून एका वानराने येऊन पकडले. झाले. आता काय करायचे असा प्रश्न पडला. तो वानर आला हे पाहताच सर्व मुले पळून गेली. हे आपले झाडाची फांदी घट्ट धरून मुकाटपणे बसले. मुलांनी ही बातमी गावात नेताच दहापाच गावकरी काठ्या वगैरे घेऊन आली. तेव्हा स्वारीची सुटका झाली. “अंगी धीटपणा होता म्हणून बचावलो, नाहीतर झाडावरून पडून काही बरेवाईट होण्यास वेळ नव्हता,” असे ते नेहमी बोलत. स्वतःच्या पतीची इतकी लहानपणची आठवण सांगणाऱ्या यशोदाबाई ही विरळाच स्त्री मानावी लागेल.
आगरकरांच्या निधनानंतर यशोदाबाईंना वैधव्य आले. विधवा स्त्रीस त्या काळात महाराष्ट्रात अतिशय त्रास भोगावे लागत. या संदर्भात यशोदाबाईंच्या एक दोन आठवणी पाहण्यासारख्या आहेत.
“प्रिन्सिपल आपटे यांच्या आधी तीन चार वर्षे वारले. या प्रसंगी आम्ही त्यांच्या घरच्या मंडळींकडे समाचारासाठी म्हणून गेलो होतो. आपट्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई. यांनी त्यांचे सांत्वन केले. एकदा ते आपट्यांच्या घरी गेले असता रमाबाई नेहमीप्रमाणे पुढे न होऊन यांच्याशी आडून बोलल्या. यांच्या मनात एकदम वस्तुस्थितीची कल्पना आली. डोळ्यांत अश्रू आले व ते उदास मनाने घरी परतले. ते मला म्हणाले, “आता यापुढे काही मी त्यांच्या घराकडे फिरकणार नाही. आणि खरोखरच ते मरेपर्यंत गेले नाहीत. मला यापूर्वीच त्यांनी या रूढीचा रानटीपणा समजावून दिला होता आणि माझ्याकडून तिच्या आहारी न जाण्याचे वचन घेतले होते. आपट्यांनी आपल्या बायकोला आधी परिस्थिती समजावून दिली नाही म्हणून दुर्धर प्रसंग ओढवला असे ते नेहमी म्हणत.”
दुसरी आठवण. आगरकरांच्या निधनानंतर घरात वाईट वागणूक मिळाली. तेव्हा माझा स्वाभिमान जागृत झाला, मी म्हणाले, “मला कुणाची मर्जीबिर्जी सांभाळण्याचे काही एक कारण नाही. अर्थात् अशा माझ्या फटकळ उत्तराने सर्वांनाच राग आला. मीही लगेच पुण्याहून उंब्रजला गेले. मला लोकांनी नाना तऱ्हांनी भीती घातली. लोक म्हणत, “तुझ्या मुलांची लग्नकार्ये व्हायची आहेत. मुकाट्याने सोवळी होऊन दृढ जनरूढीप्रमाणे चाल म्हणजे सर्व काही सुरळीत होईल. नाहीतर उगीच हालअपेप्टा आणि मुलाबाळांचा वनवास करून घेशील.” पण मला त्यावेळी कोणाच्याच म्हणण्याची पर्वा वाटली नाही व मी गोपाळरावांनी सांगितलेल्या मार्गापासून एक पाऊलभरही मागे आले नाही.”
यशोदाबाई पुढे म्हणतात, “मला ते दिवस अजूनही आठवतात. त्यावेळी माझ्या हातचे पाणी धुण्यास चालत नसे. मोलकरणीची भांडी जशी विसळून घेतात, तशी पुन्हा विसळून घेत. माझा नमस्कारसुद्धा कोणाला चालत नसे. मी पुण्याला असताना माझ्या मंडळींनी माझ्याकडे यावे असे वाटे. पण सर्वजण टाळत. यांच्या निधनानंतर मी अवधी दोन वेळाच माहेरी गेले. माहेरी असताना मात्र माझ्या वडिलांनी मला कधी हिडीसफिडीस केल्याचे स्मरत नाही.”
आगरकरांविषयी त्या कळवळून पुढीलप्रमाणे म्हणतात, “आपल्या कार्यासाठी त्यांनी आपल्या जिवाचे रान केले. घर, प्रपंच, पैसा, अडचण, मानमरातब कश्शा कश्शाची पर्वा केली नाही. प्रसंगी आपली कातडी देऊन दुसऱ्याची बचावली. म्हणतील ते करून दाखविले. पण काळच विपरीत पडला. त्यांच्या श्रमाचे व्हावे तसे चीज झाले नाही. त्यांना त्याची भीती नव्हती. पण त्यांचे वनवास पाहणाऱ्या माझ्या जिवाला मात्र रात्रंदिवस वाटे, लोकांकरता म्हणून सतत तडफडणाऱ्या या जिवाचे मोल लोकांनी काही नीट केले नाही.”
अकोल्यास राहिल्यामुळे यशोदाबाईंचा पुण्या-मुंबईशी संबंध तुटला होता. यशोदाबाई सोशीक स्त्री होत्या. विकेशी न होता धर्माचरणात व परोपकारात जीवन कंठीत होत्या. दासबोध-वाचन, गोरगरीब स्त्रियांची बाळंतपणे, औषधपाणी इत्यादी करीत त्या आपला वेळ घालवीत.
असहकाराच्या चळवळीत त्या स्वतः सूत कातीत होत्या. त्यांनी सुनांना पिकेटिंगसाठी पाठविले होते. त्यांना मृत्यू आला तोसुद्धा रोग्याला औषधाची बाटली भरून देत असताना अर्धागाचा झटका येऊन. पतीप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत त्या समाजसेवा करीत राहायच्या हे एक अलौकिक आश्चर्य मानावे लागेल.
त्या गोपाळरावांच्या पश्चात् ४५ वर्षांनी म्हणजे बुधवार, दिनांक १२ जुलै १९३९ रोजी निधन पावल्या.
(आकाशवाणी मुंबईच्या सौजन्याने)