‘व्यक्तीच्या शरीरातील अवयवांत आणि समाजाच्या शरीरातील अवयवांत एक मोठा भेद आहे, तो हा की, ज्याप्रमाणे समाजाच्या प्रत्येक अवयवास ज्ञान, संवेदन, इच्छा इत्यादि मनोधर्म पृथक्त्वाने असल्यामुळे सुखदुःखाचा अनुभव प्रत्येकास होत असून ते संपादण्याविषयी अथवा टाळण्याविषयी प्रत्येकाचा प्रयत्न निरंतर चालू असतो, त्याप्रमाणे व्यक्तीच्या शरीरातील प्रत्येक अवयवाची स्थिती नाही. त्यापैकी प्रत्येकास मन नाही. त्या सर्वांचे व्यापार नीट चालणे ही गोष्ट ज्या एका व्यक्तीचे ते अवयव आहेत त्या व्यक्तीस कल्याणकारक आहे. समाज हा काल्पनिक पुरुष आहे. समाजाचे कल्याण म्हणजे या काल्पनिक पुरुषाचे कल्याण नव्हे; तर त्याच्या अवयवांचे कल्याण होय. व्यक्तिशरीर आणि समाजशरीर यांतील या महत्त्वाच्या भेदामुळे त्याविषयी विचार करताना व लिहिताना ही गोष्ट नेहमी डोळ्यांपुढे ठेवावी लागते की, व्यक्तीच्या अवयवांच्या हितासाठी जे नियम घालावयाचे ते वास्तविक पाहता ते ज्या व्यक्तीचे अवयव असतील त्या व्यक्तीच्या हितासाठी असतात व समाजाच्या हितासाठी जे नियम करावयाचे हे वास्तविक पाहता समाजाच्या अवयवांच्या हितासाठी असतात. तेव्हा व्यक्तीच्या हिताकडे दुर्लक्ष झाले तरी हरकत नाही, समाजाचे हित साधले म्हणजे झाले, असे बोलणे म्हणजे असंबद्ध प्रलाप करण्यासारखे होय; कारण व्यक्तींच्या हिताहून निराळे असे समाजाचे हित नाही.’