श्री. संपादक नवा सुधारक यांस स. न. वि. वि.
पुष्कळ दिवसांपासून माझ्या मनात एक प्रश्न घोळत आहे. त्याबाबतीत आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती. आपणांस इष्ट वाटेल तर ह्या प्रश्नांची आपण आपल्या नवीन मासिकातून प्रकट चर्चा करावी. त्यामुळे कदाचित इतर जिज्ञासूंनासुद्धा लाभ होईल. प्रश्न हिन्दू म्हणून माझी कर्तव्ये काय असा आहे.
मी जन्मतः वा परंपरेने हिन्दू आहे. हे हिन्दुत्व मी जसे विधिपूर्वक स्वीकारले नाही तसेच मी त्याचा विधिवत.त्यागही केलेला नाही; तसेच मी केवळ वेदोक्त धर्माचे पालन करणारा स्वामी दयानन्दानुयायी आर्यसमाजीही नाही. त्यामुळे माझ्या मनात जास्त संभ्रम आहे.
मुद्दा रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद ह्यांविषयीच्या वादामधून निर्माण झाला आहे. तसाच त्यातून निर्माण झालेल्या रामशिलापूजनाविषयीचा, हिन्दुत्वाच्या धार्मिक भावनांना, श्रद्धेला आवाहन केल्यामुळे निघालेल्या दंगलीचा आहे. हा वाद दंगलीमध्ये परिणत झाल्यामुळे आणि पुढेही तसेच घडण्याची शक्यता कायम असल्यामुळे मी त्या बाबतीत तटस्थ राहू इच्छित नाही. माझी तटस्थता ही निष्क्रियता होऊ नये अशी माझी इच्छा आहे.
मी परंपरेने का होईना पण स्वतःला ‘हिन्दू’ म्हणवत असेन तर मी कर्मसिद्धान्तावर, पुनर्जन्मावर विश्वास ठेवला पाहिजे काय?
सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ।। आणि
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।
ह्या भगवद्भुचनावर मी श्रद्धा ठेवली पाहिजे काय? श्रीराम हा अवतारी पुरुष होता व तो सर्व हिन्दूंसाठी पूज्य आणि श्रद्धेय आहे असे मी मानले पाहिजे काय?
मी जर अश्रद्ध असेन, माझ्या दैनंदिन व्यवहारासाठी ईश्वराची – ईश्वराचे अस्तित्व मानण्याची – जर मला गरज वाटत नसेल तरी मी हिन्दू ठरतो काय? ही पुण्यभृ-पितृभू सोडून मी परक्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यावरही मी हिन्दू समजला जाईन काय? मी श्राद्धपक्ष न करणारा असेन, प्रेतदहन न करता पुरणारा असेन, गोमांसभक्षक असेन, नोंदणी पद्धतीने विवाह करणारा असेन आणि त्याचवेळी कर्मसिद्धान्तावर विश्वास न ठेवणारा असेन तरी मी विधिवत दुसरा धर्म स्वीकारला नाही तोवर हिन्दूच समजला जाईन काय?
रामजन्मभूमीच्या प्रश्नांवर दंगल होणार अशी चिन्हे दिसत असल्यामुळे आपसांत इतर बाबतीत मतभेद कितीही असोत त्या प्रश्नांवर सर्व हिन्दूंनी भगवद्ध्वजाखाली एकत्र जमलेच पाहिजे असे फर्मान आमच्या धर्माधिकाऱ्यांनी काढले आहे असे मला भासते. मी जर ‘हिन्दू’ आहे तर त्यांची अवज्ञा केल्याबद्दल ते मला ‘तनखैया’ म्हणून घोषित करू शकतात काय?
थोडक्यात काय तर मी बहुसंख्यकांना मान्य असलेले जे हिन्दुत्व आहे त्याच्या पूर्णतया विरोधी भूमिका घेऊनही स्वत:ला हिन्दू म्हणवत राहू शकतो काय? आणि माझ्या धर्मबान्धवांनी केलेले अत्याचार मी फक्त दुरून पाहत राहावे काय?
सध्या निर्माण केलेल्या बाबरी मशीदीचा वाद हा वर सांगितल्याप्रमाणे मी कोणतीतरी बाजू स्वीकारलीच पाहिजे अशा assembly मधल्या division सारखा मला जाणवतो. आणि त्याचवेळी किमान तीनशे वर्षांपूर्वी केल्या गेलेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याचा हा प्रकार पाहून मला इसापनीतीतील कोकराला “पाणी तू नसले तरी तुझ्या बापाने गढूळ केले होते” असे म्हणून खाणाऱ्या लांडग्याची आठवण होते.
भागलपूरमध्ये जी हिंसा झाली, पंजाबमध्ये जी रोज होत आहे आणि काश्मीरमध्ये जी स्फोटक अशान्तता नांदत आहे तिच्यामागे श्रद्धा आहे. धर्मश्रद्धा आहे.
बहुसंख्यकांच्या श्रद्धास्थानापेक्षा वेगळ्या श्रद्धा राखण्याचा अथवा अजिबात अश्रद्ध असण्याचा लोकांचा अधिकार आम्ही स्वतःला सहिष्णु म्हणवून घेणारे हिन्दू, आमच्या देशात आम्ही बहुसंख्यक आहोत म्हणून, बाबरी मशिदीचे निमित्त करून हिरावून तर घेत नाही? आणि मी निष्क्रिय राहून त्यांचे हात बळकट तर करीत नाही?
आपला
दिवाकर मोहनी, धरमपेठ, नागपूर -४४० ०१०
दि. १७.३.१९९०
(ह्या विषयावर वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया प्रसिद्धीसाठी पाठवाव्या.)
यावरील पुढील पत्रव्यवहार वाचण्यासाठी
मे १९९० च्या अंकातील पत्रोत्तरे
जुलै १९९० च्या अंकातील पत्रोत्तरे
तसेच सप्टेंबर १९९० च्या अंकातील पत्रव्यवहाराकडेही आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो.
सप्टेंबर १९९० च्या अंकातील श्रीनिवास वैद्य ह्यांचे पत्र आणि त्यावरील दिवाकर मोहोनी ह्यांचे उत्तर
रामजन्मभूमिसारख्या ज्वलंत विषयाच्या अनुषंगाने हा सारा पत्रव्यवहार अवश्य वाचावा असा आहे.